जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 232/2021. तक्रार दाखल दिनांक : 14/10/2021. तक्रार निर्णय दिनांक : 23/02/2023.
कालावधी : 01 वर्षे 04 महिने 09 दिवस
प्रविण पिता सुभाषराव बिरादार, वय 37 वर्षे,
व्यवसाय : वकिली व शेती, रा. मोघा, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा : महाजन कॉम्प्लेक्स, मोंढा रोड, उदगीर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एस. आर. जगताप
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- बिपीन सी. अपसिंगेकर
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष (यापुढे 'बँक') यांच्याकडे त्यांचे बचत खाते क्रमांक 030371949190 आहे. रोहीत नॅचरल दुध यांनी तक्रारकर्ता यांना वैश्य नागरी सहकारी बँक लि., परभणी, शाखा : उदगीर यांचा धनादेश क्र. 355979, रक्कम रु.52,300/-, दि. 30/9/2020 दिला होता. तक्रारकर्ता यांनी दि.23/12/2020 रोजी तो धनादेश बँकेमध्ये जमा केला. बँकेने धनादेश वटविण्याकरिता योग्य वेळेमध्ये पाठविला नाही आणि दि.31/12/2020 रोजी 'चेक आऊट डेटेड' मेमो देण्यात आला. तक्रारकर्ता यांनी धनादेश न वटण्याच्या व्यवहारासंबंधी तपशीलवार माहिती मागितली असता दि.23/12/2020 ते 30/12/2020 कालावधीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे क्लिअरन्सचे व्यवहार होऊ शकले नाहीत, असे सांगितले. बॅंकेच्या निष्काळजीपणामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने धनादेश नुकसान भरपाई रु.52,300/-, मानसिक त्रासाकरिता रु.40,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.30,000/- देण्याचा बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) बँकेने लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी बँकेमध्ये धनादेश सादर केला त्या दिवशी म्हणजेच दि.23/12/2020 ते 29/12/2020 पर्यंत बँकेचे धनादेश क्लिअरींग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते बंद अवस्थेत होते. ड्रॉप बॉक्सवर मशीन नादुरुस्तीचा फलक लावलेला होता. त्याबद्दल तक्रारकर्ता यांना माहिती दिली असतानाही धनादेश ड्रॉप बॉक्समध्ये टाकून निघून गेले. मशीन दुरुस्त झाल्यानंतर धनादेश क्लिअरींगसाठी पाठविला असता परत करण्यात आला. त्यांनी निष्काळजीपणा किंवा सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही. धनादेश न वटण्याकरिता वैश्य नागरी सहकारी बँक लि. यांची चुक आहे आणि त्यांना पक्षकार न केल्यामुळे पक्षकाराचे असंयोजन तत्वाचा बाध निर्माण होतो. तक्रारकर्ता यांनी नुकसान भरपाई देण्याचे दायित्व येत नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती बँकेने केली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, बँकेचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) बँकेने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांनी दि.23/12/2020 रोजी बँकेकडे वैश्य नागरी सहकारी बँक लि., परभणी, शाखा : उदगीर यांचा धनादेश क्र. 355979, रक्कम रु.52,300/-, दि. 30/9/2020 सादर केला, ही मान्यस्थिती आहे. दि.31/12/2020 रोजी तो धनादेश 'चेक आऊट डेटेड' नमूद करुन मेमो देण्यात आला, याबद्दल वाद नाही.
(5) बँकेचा प्रतिवाद असा की, तक्रारकर्ता यांनी बँकेमध्ये धनादेश सादर केला त्या दिवशी म्हणजेच दि.23/12/2020 ते 29/12/2020 पर्यंत बँकेचे धनादेश क्लिअरींग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते बंद अवस्थेत होते. त्याबद्दल ड्रॉप बॉक्सवर मशीन नादुरुस्तीचा फलक लावलेला असताना व तक्रारकर्ता यांना माहिती दिलेली असतानाही धनादेश ड्रॉप बॉक्समध्ये टाकून निघून गेले. मशीन दुरुस्त झाल्यानंतर धनादेश क्लिअरींगसाठी पाठविला असता परत करण्यात आला.
(6) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता ज्या दिवशी मशीन बंद पडली त्याच दिवशी तक्रारकर्ता यांनी ड्रॉप बॉक्समध्ये धनादेश टाकला, असे बँकेचे कथन दिसते. आमच्या मते, धनादेशाची अंतीम तारीख 30/12/2020 असताना ड्रॉप बॉक्सच्या फलकावरील सूचना पाहिल्या असतानाही तक्रारकर्ता यांनी ड्रॉप बॉक्समध्ये धनादेश टाकला, ही बाब सहजपणे मान्य करता येणार नाही. उलटपक्षी, दररोज ड्रॉप बॉक्समध्ये जमा होणा-या धनादेशाच्या अनुषंगाने संबंधीत खातेधारकांना भ्रमणध्वनीद्वारे मशीन बंद असल्याबद्दल सूचना देणे बँकेस शक्य होते; परंतु त्याबद्दल बँकेचे काही स्पष्टीकरण नाही. शिवाय, धनादेश क्लिअरींग मशीनमध्ये तांत्रिक दोष असणा-या दि.23/12/2020 ते 29/12/2020 कालावधीमध्ये किती धनादेश ड्रॉप बॉक्समध्ये जमा झाले, हे स्पष्ट केलेले नाही. अशा स्थितीत, बँकेच्या सूचनांकडे तक्रारकर्ता यांनी दुर्लक्ष केले, ही बाब सिध्द होत नाही. बँकेचा Return Memo Report पाहता त्यामध्ये Cheque/Draft No. 355979 for Rs.52,300/- drawn on Gujrat Ambuja Co-operative Bank Ltd. ATPAR BRANCH नमूद आहे. धनादेश न वटण्याकरिता तक्रारकर्ता यांचा दोष आहे, अशी सिध्दता होत नाही. उलटपक्षी, पुरावे व वाद-तथ्ये पाहता बँकेच्या कार्यपध्दतीतील त्रुटीमुळे तक्रारकर्ता यांचा धनादेश वटला नाही, असे सिध्द होते. त्या अनुषंगाने बँकेने तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केली, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(7) बँकेचा बचाव असा की, धनादेश न वटण्याकरिता वैश्य नागरी सहकारी बँक लि. यांची चूक आहे आणि त्यांना पक्षकार करण्यात आलेले नाही. बँकेचे स्वकथन आहे की, दि.23/12/2020 ते 29/12/2020 पर्यंत बँकेचे धनादेश क्लिअरींग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते बंद अवस्थेत होते. अशा स्थितीत, वैश्य नागरी सहकारी बँक लि. यांची काय चूक होती, याचे स्पष्टीकरण नाही. त्यामुळे वैश्य नागरी सहकारी बँक लि. यांना पक्षकार न केल्यामुळे पक्षकाराच्या असंयोजन तत्वाचा बाध निर्माण होत नाही आणि बँकेचा बचाव संयुक्तिक नसल्यामुळे दखल घेता येणार नाही.
(8) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांना चलनक्षम दस्तऐवजाचा कायद्यामधील तरतुदीनुसार न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुतोष मागणीपासून वंचित रहावे लागले. उलटपक्षी, बँकेतर्फे चलनक्षम दस्तऐवजाचा कायद्यातील कलम 22, 23 व 75-ए चा आधार घेतला. सकृतदर्शनी, बँकेतर्फे घेण्यात आलेला आधार गैरलागू व तथ्यहीन आढळतो. तसेच तक्रारकर्ता यांनी सुध्दा त्यांचा धनादेश परत केल्यानंतर धनादेशाची रक्कम मिळविण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ? यासंबंधी पुराव्याद्वारे स्पष्टीकरण दिलेले नाही. आमच्या मते, तक्रारकर्ता यांना संबंधिताकडून नवीन धनादेश किंवा त्या धनादेशाची रक्कम मिळविण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. संबंधिताने त्यांना धनादेश किंवा रक्कम देण्यास नकार दिला, अशी वस्तुस्थिती आढळत नाही. काहीही असले तरी, तक्रारकर्ता यांना त्यांचे येणे वसूल करण्यासाठी अन्य कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता यांची धनादेशावर नमूद रकमेची मागणी कायदेशीरदृष्टया समर्थनिय नाही.
(9) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.40,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.30,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. तक्रारकर्ता यांचा धनादेश वटला नसल्यामुळे निश्चितच बँकेकडे पाठपुरावा करावा लागला आहे. बँकेने दखल न घेतल्यामुळे त्यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. शिवाय, संबंधिताकडून धनादेश रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना अन्य प्रयत्न करावा लागणार आहे. प्रस्तुत प्रकरणाच्या कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास व आर्थिक खर्च होणे स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रास व आर्थिक नुकसान भरपाईकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मंजूर करणे न्याय्य ठरेल.
(10) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्र. 232/2021.
(2) विरुध्द पक्ष बँकेने तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास व आर्थिक नुकसान भरपाईकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(3) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-