जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 33/2019. तक्रार दाखल दिनांक : 11/02/2019. तक्रार निर्णय दिनांक : 25/01/2023.
कालावधी : 03 वर्षे 11 महिने 14 दिवस
राजेंद्र पिता वैजनाथ मुळे, वय 40 वर्षे,
धंदा : व्यापार, रा. उस्तुरी, ता. निलंगा, जि. लातूर.
ह.मु. प्रकाश नगर, सूर्योदय कॉलनी, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, युनायटे इंडिया इन्शुरन्स कं. मर्यादीत,
शाखा शांताई हॉटेलजवळ, अंबाजोगाई रोड, लातूर, जि. लातूर.
(2) विभागीय व्यवस्थापक, युनायटे इंडिया इन्शुरन्स कं. मर्यादीत,
विभागीय कार्यालय, औरंगाबाद, रा. घर क्र. 5/5/76, एन.पी. चौक,
न्यू उस्मानपुरा, औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. व्ही.व्ही. माने
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. एस.व्ही. तापडिया
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांच्या मालकीच्या मिनी ट्रॅव्हल्स बस क्र. एम.एच. 12 सी.टी. 4686 (यापुढे 'विमा संरक्षीत वाहन') करिता विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 'विमा कंपनी') यांच्याकडे विमापत्र क्रमांक 2307003114 अन्वये दि.12/2/2015 ते 18/2/2016 कालावधीकरिता विमा संरक्षण घेतलेले होते. तक्रारकर्ता यांनी दि.1/12/2015 रोजी रात्री 10.00 वाजता बसवेश्वर पुतळा रिंग रोड, लातूर येथे विमा संरक्षीत वाहन उभे केले. तक्रारकर्ता यांना कर्करोग असल्यामुळे उपचारास्तव हैद्राबाद येथे जात असताना त्यांचे मित्र बालाजी बिराजदार यांनी विमा संरक्षीत वाहन उभे केलेल्या ठिकाणी नसल्याचे सांगितले. विमा संरक्षीत वाहनाचा शोध न लागल्यामुळे दि.8/12/2015 रोजी पोलीस ठाणे, गांधी चौक, लातूर येथे चोरीसंबंधी लेखी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा क्र. 320/2015 नोंद करण्यात आला. त्याच दिवशी विमा संरक्षीत वाहन चोरीस गेल्यासंबंधी विमा कंपनीस कळविण्यात आले. विमा कंपनीच्या सूचनेनुसार कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु विमा कंपनीने दि.9/2/2017 रोजीच्या पत्राद्वारे नुकसान भरपाई देता येत नाही, असे कळविले. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.4,95,000/- व्याजासह देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विमा कंपनीतर्फे लेखी निवेदनपत्र दाखल करण्यात आले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी कथित चोरीबद्दल दि.9/12/2015 रोजी प्रथमत: कळविले. विमा कंपनीने नियुक्त केलेले अन्वेषक ॲड. ए.एम. काळे यांनी अन्वेषन करुन दि.20/10/2016 रोजी कागदपत्रांसह अहवाल सादर केला. अहवालानुसार कथित घटनेच्यावेळी विमा संरक्षीत वाहनाचा वैध परवाना व योग्यता नसल्याचे आढळून आले. विमापत्राच्या अट क्र.1 अनुसार अपघाती नुकसान किंवा दाव्यासंबंधी घटना घडल्यानंतर तात्काळ विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. चोरी किंवा फौजदारी कृत्यामध्ये दाव्यासंबंधी गुन्हेगारास शिक्षा होण्याकरिता पोलीस व विमा कंपनीस तात्काळ सूचना देणे आवश्यक असते. विमापत्राच्या अट क्र.5 अनुसार विमा संरक्षीत वाहनाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. विमा संरक्षीत वाहनाच्या सुरक्षेसंबंधी तक्रारकर्ता यांनी गंभीर निष्काळजीपणा केला आहे. विमापत्राच्या अटी व शर्तींचा भंग झाल्यामुळे विमा कंपनीने योग्य कारणास्तव विमा दावा नामंजूर केला आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विमा कंपनीतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडून घेतलेले विमापत्र, विमा संरक्षीत वाहनाकरिता विमा जोखीम, विमा कालावधी, विमा रक्कम, विमा संरक्षीत वाहनाची चोरी, पोलीस प्रथम माहिती अहवाल, दाखल केलेला विमा दावा, विमा दावा नामंजूर करणे इ. बाबी विवादीत नाहीत.
(5) दि.8/2/2017 रोजी विमा कंपनीतर्फे तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर करण्यात आला, ही मान्यस्थिती आहे. विमा संरक्षीत वाहनाच्या चोरीची घटना दि.1/12/2015 रोजी घडलेली असताना पोलीस यंत्रणेकडे दि.8/12/2015 रोजी प्रथम माहिती अहवाल नोंद करण्यात आला आणि दि.9/12/2015 रोजी विमा कंपनीस सूचना देण्यात आल्यामुळे तात्काळ सूचना देण्यासंबंधी विमापत्राच्या अट क्र.1 चे उल्लंघन झाले आणि तक्रारकर्ता यांनी वाहनाचा मुळ परवाना व योग्यता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे विमापत्राचा मुलभूत भंग झाल्याचे नमूद करुन विमा रक्कम देण्याचे दायित्व विमा कंपनीने अमान्य केले आहे. तक्रारकर्ता यांचे कथन व कागदपत्रे पाहता विमा संरक्षीत वाहनाची चोरी दि.1/12/2015 रोजी झाली आणि त्याबद्दल दि.8/12/2015 रोजी पोलीस व विमा कंपनीस कळविण्यात आलेले दिसते. निर्विवादपणे, तक्रारकर्ता यांना विमा संरक्षीत वाहनाच्या चोरीबद्दल कळविण्याकरिता 7 दिवस विलंब झाला, हे स्पष्ट होते.
(6) विमा कंपनीतर्फे मा. राष्ट्रीय आयोगाच्या "टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स कं. लि. /विरुध्द/ महेंद्र सिंग" 2019 (2) सी.पी.आर. 713 (एन.सी.); "रॉयल सुंदरम अलायन्स इन्शुरन्स कं. लि. /विरुध्द/ कंवल जीत सिंग" 2015 (3) सी.पी.आर. 474; "श्रीराम जनरल इन्शुरन्स कं. लि. /विरुध्द/ गुरशिंदर सिंग" 2015 (2) सी.पी.जे. 750; "एच.डी.एफ.सी. इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. /विरुध्द/ भागचंद सैनी 2015 (1) सी.पी.जे. 206; "डॉ. चंद्रकांत परशुराम महाजन /विरुध्द/ न्यू इंडिया अश्युरन्स कं. लि." 2018 (4) सी.पी.आर. 558 व "रमेश चंद्र /विरुध्द/ आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि." 2014 (1) सी.पी.जे. 321 ह्या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर केला. उक्त न्यायनिर्णयांमध्ये विलंबाने विमा कंपनी व पोलीस यंत्रणेस कळविणे आणि वाहनाकरिता आवश्यक उपाययोजना न करणे इ. कारणास्तव दावा नामंजूर करण्याचे विमा कंपनीचे कृत्य योग्य ठरविलेले आहे.
(7) वाद-तथ्ये, दाखल कागदपत्रे व उक्त न्यायनिर्णयातील तत्व पाहता तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर करण्याचे विमा कंपनीचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरत नाही आणि त्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-