जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 286/2021. तक्रार दाखल दिनांक : 16/12/2021. तक्रार निर्णय दिनांक : 14/10/2022.
कालावधी : 00 वर्षे 09 महिने 29 दिवस
महादेव अशोक कांबळे, वय 31 वर्षे, व्यवसाय : स्वंयरोजगार,
रा. टाकळी (वलांडी), ता. देवणी, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक,
शाखा वलांडी, ता. देवणी, जि. लातूर.
(2) शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा पोलीस स्टेशनसमोर, मेन रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर.
(3) व्यवस्थापक / मालक, आशा मेडीकल स्टोअर्स,
उदय टॉकीजजवळ, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.बी. देशमुख
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- बिपीन सी. अपसिंगेकर
विरुध्द पक्ष क्र.3 स्वत:
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, त्यांचे विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "महाराष्ट्र ग्रामीण बँक") यांच्याकडे 'भारत मेडीकल ॲन्ड जनरल स्टोअर्स' नांवे खाते क्रमांक 80047482813 आहे. साहित्य खरेदीच्या अनुषंगाने त्यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांना दि.24/2/2021 रोजी रु.6,284/- रकमेचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा धनादेश क्र. 028430 दिला. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दि.26/2/2021 रोजी धनादेश वटण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "भारतीय स्टेट बँक") यांच्याकडे सादर केला असता तो अनादरीत झाला. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांना रोख स्वरुपात रु.6,284/- अदा केले.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि.24/2/2021 रोजी त्यांच्या खात्यामध्ये रु.6,369/- शिल्लक होते. त्या दिवशी तक्रारकर्ता यांच्या खात्यातून रु.6,284/- कपात होऊन रु.85/- शिल्लक राहिले. वास्तविक ती रक्कम विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यासंबंधी चौकशी केली असता महाराष्ट्र ग्रामीण बँक व भारतीय स्टेट बँकेने उडवाउडवीची उत्तर दिले. सूचनापत्र प्राप्त होऊनही महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक व विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दखल घेतली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने धनादेश क्र. 028430 ची रक्कम रु.6,284/-; नुकसान भरपाई रु.25,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/-; भारतीय रिझर्व बँकेच्या परिपत्रकानुसार प्रतिदिन रु.100/- प्रमाणे दंड आकारण्याचा; तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा व सर्व रक्कम व्याजासह देण्याचा महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक व विरुध्द पक्ष क्र.3 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(3) महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे विहीत मुदतीमध्ये लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(4) भारतीय स्टेट बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. ते नमूद करतात की, तक्रारकर्ता यांचा धनादेश दि.26/2/2021 रोजी वटविण्याकरिता प्राप्त झाला असता त्याच दिवशी क्लिअरींग हाऊस, मुंबई येथे पाठविण्यात आला. त्याच दिवशी Out Cheque Return 05 PT contact drawer / drawee bank and present again कारणास्तव तो न वटता परत आला. त्यामुळे धनादेशाची रक्कम विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकली नाही. तक्रारकर्ता यांच्या खाते उता-यानुसार धनादेशाची रक्कम दि.24/2/2021 रोजी म्हणजेच क्लिअरींगला पाठविण्यापूर्वी वजा झालेली आहे. दि.26/2/2021 रोजी खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश अनादरीत झाला आणि विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. त्यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही आणि ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली.
(5) विरुध्द पक्ष क्र.3 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. ते नमूद करतात की, धनादेश क्र. 028430 हा त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खाते क्र. 62104035139 मध्ये जमा केला असता अनादरीत झाला. त्यानंतर तक्रारकर्ता यांच्याकडून दि.23/7/2021 रोजी रु.6,284/- रोख प्राप्त झाले.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय (महाराष्ट्र ग्रामीण बँकेने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र. 1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये व विरुध्द पक्ष क्र.3 यांचे भारतीय स्टेट बँकेमध्ये खाते आहे, हे विवादीत नाही. तक्रारकर्ता यांनी व्यवहाराच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.3 यांना दि.24/2/2021 रोजीचा धनादेश दिला, हे विवादीत नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी धनादेश वटविण्याकरिता भारतीय स्टेट बँकेमध्ये सादर केला, हे विवादीत नाही. वादकथित धनादेश अनादरीत झाला, हे विवादीत नाही.
(8) तक्रारकर्ता यांच्या वादकथनानुसार धनादेश अनादरीत होऊन परत प्राप्त झालेला असतानाही महाराष्ट्र ग्रामीण बँकेने तक्रारकर्ता यांच्या खात्यातून रु.6,284/- कपात केले आणि ती रक्कम विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. भारतीय स्टेट बँकेच्या कथनानुसार धनादेश दि.26/2/2021 रोजी वटविण्याकरिता प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी क्लिअरींग हाऊस, मुंबई येथे पाठविण्यात आला असता Out Cheque Return 05 PT contact drawer / drawee bank and present again कारणास्तव न वटता परत आला आणि धनादेशाची रक्कम विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकली नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांचे कथन असे की, धनादेश क्र. 028430 भारतीय स्टेट बँकेच्या खाते क्र. 62104035139 मध्ये जमा केला असता अनादरीत झाला आणि तक्रारकर्ता यांच्याकडून दि.23/7/2021 रोजी रु.6,284/- रोख प्राप्त झालेले आहेत.
(9) तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.3 यांचे बँक खाते उतारे अभिलेखावर दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांच्या खात्यातून दि.24/2/2021 रोजी धनादेश क्र. 028430 च्या अनुषंगाने अशा मेडीकल करिता रु.6,284/- कपात करण्यात आलेले दिसतात. परंतु विरुध्द पक्ष क्र.3 यांच खाते उतारा पाहिला असता धनादेशाच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या खात्यामध्ये रु.6,284/- रक्कम जमा झाल्याचे दिसून येत नाहीत.
(10) निर्विवादपणे, तक्रारकर्ता यांनी दि.24/2/2021 तारखेचा धनादेश क्र.028430 विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या नांवे दिलेला होता. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तो धनादेश दि.26/2/2021 रोजी भारतीय स्टेट बँकेमध्ये जमा केल्याचे नमूद आहे. भारतीय स्टेट बँकेने त्याच पुष्ठी दिलेली आहे. अभिलेखावर दाखल कागदपत्रानुसार दि.26/2/2021 रोजी धनादेश अनादरीत झाल्याचे दिसून येते. असे असताना तक्रारकर्ता यांच्या खात्यातून दि.24/2/2021 रोजी रु.6,284/- कपात का करण्यात आले, हे स्पष्ट होत नाही. इतकेच नव्हेतर, रु.6,284/- कपात केल्यानंतर ते विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या खात्यामध्ये जमा झालेले दिसत नाहीत. अशा स्थितीत, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने अनुचित प्रक्रियेचा अवलंब करुन रु.6,284/- कपात केले आणि ते विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या खात्यामध्ये वर्ग केले नाहीत किंवा तक्रारकर्ता यांनाही परत केलेले नाहीत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कृत्यामुळे तक्रारकर्ता यांना आर्थिक नुकसान झाल्याचे ग्राह्य धरावे लागेल. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रस्तुत कृत्य सेवेतील त्रुटी ठरते आणि तक्रारकर्ता हे त्यांच्या खात्यातून कपात झालेली रक्कम रु.6,284/- हे परत मिळण्याकरिता पात्र ठरतात. तसेच रकमेवर व्याज मिळण्यासंबंधी तक्रारकर्ता यांची विनंती पाहता कपात केलेल्या तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याचा आदेश करणे न्याय्य ठरेल, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(11) तक्रारकर्ता यांनी भारतीय रिझर्व बँकेच्या परिपत्रक क्रमांक RBI/2019-20/67, DPSS.CO.PD No.629/02.01.014/2019-20, दि.20 सप्टेंबर, 2019 चा आधार घेऊन प्रतिदिन रु.100/- नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केलेली आहे. परिपत्रकाचे अवलोकन केले असता त्यामध्ये धनादेशाचे व्यवहार असफल झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यासंबंधी उल्लेख नाही. त्यामुळे परिपत्रकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांची विनंती योग्य ठरत नाही.
(12) त्यानंतर तक्रारकर्ता यांनी नुकसान भरपाई रु.25,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा, अशी विनंती केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. तक्रारकर्ता यांच्याकडून रु.25,000/- नुकसान भरपाई मागणी करण्यामागे उचित विश्लेषण दिसत नाही. परंतु, हे सत्य आहे की, कपात झालेली रक्कम परत मिळण्यासाठी तक्रारकर्ता यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(13) भारतीय स्टेट बँक व विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द आदेश नाहीत.
(14) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र ग्रामीण बँकेने तक्रारकर्ता यांना रु.6,284/- व त्या रकमेवर दि.24/2/2021 पासून उक्त रक्कम परत करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र ग्रामीण बँकेने तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र ग्रामीण बँकेने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-