जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 262/2021. तक्रार दाखल दिनांक : 26/11/2021. तक्रार निर्णय दिनांक : 13/09/2022.
कालावधी : 00 वर्षे 09 महिने 18 दिवस
शिवानंद पि. मोहनराव नरहरे, वय 29 वर्षे,
व्यवसाय : खाजगी नोकरी व शेती, रा. लांबोटा, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, भारतीय जीवन बीमा निगम (एल.आय.सी.),
शाखा क्रमांक 98 सी, धुत कॉम्प्लेक्स, बिदर रोड,
निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर.
(2) विभागीय व्यवस्थापक, भारतीय जीवन बीमा निगम (एल.आय.सी.),
दावा विभाग, 'जीवन प्रकाश', अदालत रोड, औरंगाबाद - 431 005. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- संदीप एस. औसेकर
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, त्यांच्या मातोश्री सुनिता मोहन नरहरे (यापुढे "विमाधारक सुनिता") यांनी दि.24/4/2017 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (यापुढे "बीमा निगम") यांच्या अभिकर्त्याद्वारे विमापत्र घेतले होते. विमापत्र क्रमांक 988917035 व विमा कालावधी दि.24/4/2017 ते 24/4/2029 होता. विमापत्रानुसार रु.75,000/- विमा जोखीम व अपघाती लाभ रु.75,000/- होता. विमाधारक सुनिता यांनी सन 2017 व 2018 चे विमा हप्ते नियमाप्रमाणे भरणा केले आहेत.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, दि.20/10/2018 रोजी विमाधारक सुनिता चुलीवर हुरडा भाजत असताना तुराट्यांचा जाळ साडीस लागल्यामुळे साडीने पेट घेतला आणि गंभीर स्वरुपात भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलीस ठाणे, निलंगा येथे घटनेबाबत आकस्मिक मृत्यू क्र.46/2018 प्रमाणे नोंद करण्यात आलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विमाधारक सुनिता यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ता यांनी बीमा निगम यांच्याकडे मुळ विमापत्रासह प्रस्ताव सादर केला; परंतु त्यांना विमा रक्कम देण्यात आलेली नाही. बीमा निगमने सेवेमध्ये त्रुटी केल्याचे निवेदन करुन विमा रक्कम रु.1,50,000/- व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(4) बीमा निगमने लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे कथन असे की, विमापत्रास अनुसरुन मृत्यू दाव्यासंबंधी तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे कोणतीही कार्यवाही केलेली नाही आणि विमा दावा व कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना दावा निर्णयीत करण्याची प्रक्रिया करता आलेली नाही. तक्रारकर्ता यांनी बीमा निगमकडे कागदपत्रे सादर न करता जिल्हा आयोगाकडे ग्राहक तक्रार केलेली आहे. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे आणि ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने वादकारण निर्माण झालेले नाही. तक्रारकर्ता यांनी खोटी व चूक कागदपत्रे तयार करुन चुकीची ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.
(5) बीमा निगमचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र व दाव्याशी संबंधीत कागदपत्रे सादर केल्यास नियमाप्रमाणे मृत्यू दावा निर्णयीत करण्यासंबंधी त्यांना निर्णय घेता येईल. अंतिमत: ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती बीमा निगम यांनी केलेली आहे.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, बीमा निगम यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे काय ? नाही.
(2) ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वाद-तथ्ये सिध्द होतात काय ? नाही.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(4) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(5) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 :- सर्वप्रथम बीमा निगमचा प्रतिवाद असा की, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, विमाधारक सुनिता यांचा दि.20/10/2018 रोजी मृत्यू झालेला आहे आणि दि.20/10/2020 पर्यंत ग्राहक तक्रार दाखल करणे आवश्यक होते. परंतु कोविड-19 प्रादुर्भाव कालावधीमध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.15/3/2020 ते 2/10/2021 कालावधीमध्ये मुदतीमध्ये सवलत दिलेली असल्यामुळे ग्राहक तक्रार मुदतबाह्य नाही. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे अवलोकन करण्यात आले. त्या अनुषंगाने दखल घेतली असता तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार मुदतबाह्य ठरत नाही आणि त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
(8) मुद्दा क्र. 2 :- प्रामुख्याने, बीमा निगमने विमाधारक सुनिता यांना विमापत्र क्र. 988917035 दिले, ही बाब विवादीत नाही. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, विमाधारक सुनिता यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मुळ विमापत्रासह बीमा निगम यांच्याकडे प्रस्ताव सादर केला; परंतु त्यांना विमा रक्कम देण्यात आलेली नाही. उलटपक्षी, बीमा निगमचे कथन असे की, विमापत्रास अनुसरुन मृत्यू दाव्यासंबंधी तक्रारकर्ता यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही आणि त्यांनी विमा दावा व कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना दावा निर्णयीत करण्याची प्रक्रिया करता आलेली नाही.
(9) विमापत्र हे संविदालेख आहे. जोखीम घटना घडल्यानंतर विमाधारकाने विमापत्राच्या अनुषंगाने विमा कंपनीकडे विमा दावा व आवश्यक कागदपत्रे सादर केले पाहिजेत. प्रस्तुत प्रकरणामध्ये वाद-तथ्ये पाहता विमाधारक सुनिता यांनी घेतलेले विमापत्र, त्याकरिता भरण्यात आलेले हप्ते, त्यांचा मृत्यू, विमा दावा दाखल करण्याची प्रक्रिया, सोबत जोडलेली कागदपत्रे, बीमा निगमचा निर्णय इ. संबध्द तथ्ये असून त्या अनुषंगाने उचित व आवश्यक पुरावे सादर होणे आवश्यक आहेत.
(10) तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर विमा दावा, पोलीस कागदपत्रे व विमाधारक सुनिता यांचा शवचिकित्सा अहवाल दाखल केला आहे. विमा दाव्याचे अवलोकन केले असता त्यावर साक्षीदार : शेख एफ.एच. विमा प्रतिनिधी कोड नं. 41870980 असा शिल्का व त्यावर स्वाक्षरी दिसून येते. वादविषयाच्या अनुषंगाने बीमा निगमने तक्रारकर्ता यांचा विमा दावा स्वीकारल्यासंबंधी उचित पोहोच किंवा पुरावा दिसत नाही. विमापत्राचे अवलोकन केले असता विमा हप्ता वार्षिक स्वरुपाचा होता. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांनी सन 2017 व 2018 चे हप्ते भरणा केले आहेत. विमापत्र दि.24/4/2017 रोजी निर्गमीत केलेले असल्यामुळे सन 2017 करिता विमा हप्ता अदा केला, हे स्पष्ट आहे. परंतु सन 2018 करिता दि.24/4/2018 रोजी देय असणारा विमा हप्ता विमाधारक सुनिता किंवा तक्रारकर्ता यांनी भरणा केल्यासंबंधी पुरावा नाही. बीमा निगमनेही विमा हप्ते नियमीत होते किंवा कसे ? यासंबंधी स्पष्टीकरण किंवा कागदपत्रे सादर केलेले नाहीत. अशाप्रकारे वाद-तथ्यांच्या अनुषंगाने आवश्यक बाबी पुराव्याअभावी सिध्द होत नाहीत. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
(11) मुद्दा क्र. 3 ते 5 :- उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांनी बीमा निगमकडे विमा दावा व आवश्यक कागदपत्रे सादर केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे बीमा निगमद्वारे विमा दावा निर्णयीत केला गेला नसल्यास ते कृत्य सेवेतील त्रुटी ठरणार नाही. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे अनुतोषास पात्र नाहीत. परंतु तक्रारकर्ता यांनी विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र व दाव्याशी संबंधीत कागदपत्रे सादर केल्यास नियमाप्रमाणे मृत्यू दावा निर्णयीत करण्यात येईल, असे बीमा निगमचे कथन असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे विमा दावा व अन्य कागदपत्रे दाखल करावा आणि त्यानंतर बीमा निगमने दाव्यासंबंधी निर्णय घ्यावा, असे निर्देश करणे न्यायोचित ठरेल. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 3 व 4 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.5 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत विमा दावा व संबंधीत कागदपत्रे बीमा निगमकडे पाठवावेत आणि बीमा निगमने कागदपत्रे प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत विमा दाव्यासंबंधी निर्णय घ्यावा.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-