जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 24/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 23/01/2023. तक्रार निर्णय दिनांक : 25/04/2024.
कालावधी : 01 वर्षे 03 महिने 02 दिवस
कौशल्याबाई उर्फ कौशाबाई भ्र. सिताराम लव्हरे, वय : 62 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. मसलगा, ता. निलंगा, जि. लातूर. :-- तक्रारकर्ती
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि.,
सिंध टॉकीजसमोर, लोखंडे कॉम्प्लेक्स, सुभाष चौक, लातूर. :-- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. एल. डी. पवार
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. काशिनाथ जी. देशपांडे (साताळकर)
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पती मयत सिताराम महादा लव्हरे (यापुढे "मयत सिताराम") हे मसलगा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचे सभासद होते. त्या सोसायटीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा निटूर यांच्यामार्फत त्यांच्या सर्व सभासदांचा विरुध्द पक्ष (यापुढे “विमा कंपनी”) यांच्याकडे विमा उतरविलेला आहे. सभासद यादीमध्ये मयत सितराम यांचा अनुक्रमांक 71 आहे. सोसायटीने विमा हप्ता रु. 215/- लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर यांच्यामार्फत विमा कंपनीकडे भरणा केला. गट विमापत्र क्र. 164400/47/2020/695 व दावा क्र. 164400/47/2022/ 00000070 आहे. मयत सितराम यांच्याकरिता विमा कंपनीने रु.3,58,319/- रकमेची जोखीम स्वीकारलेली आहे.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.29/1/2022 रोजी मयत सिताराम हे सायंकाळी 6.15 वाजता शेताकडून गावी येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले असता मृत घोषीत करण्यात आले. घटनेबाबत पोलीस ठाणे, निलंगा येथे गुन्हा क्र. 39/2022 नोंद करण्यात आला. मयत सितराम यांची शवचिकित्सा करण्यात आली.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्यांनी दि.22/2/2022 रोजी तक्रारकर्ती यांनी विमा कंपनीकडे विमा दाव्यासह आवश्यक कागदपत्रे दाखल केले. मात्र विमा कंपनीने दि.7/9/2022 रोजीच्या पत्राद्वारे मयत सितराम यांचे वय 70 वर्षाच्या आत नसल्याचे कारण देऊन विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले. मसलगा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या जनता अपघात विमा योजना यादीमध्ये मयत सितराम यांचे वय 63 वर्षे नमूद होते. विमा कंपनीस त्याबद्दल माहिती होती आणि विमा जोखीम स्वीकारल्यानंतर विमा दावा नामंजूर केलेला आहे. उक्त कथनांच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.3,58,319/- व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(4) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार मयत सिताराम हे ‘ग्राहक’ नाहीत. विमापत्रानुसार शेतक-याचे वय 10 ते 70 कालमर्यादेमध्ये असल्यानंतर नुकसान भरपाई देय आहे. मात्र मयत सितराम यांचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असून विमापत्र घेत असताना त्यांचे वय 70 पेक्षा जास्त असल्यामुळे मयत सिताराम 'ग्राहक' संज्ञेमध्ये येत नाहीत. त्याबद्दल मयत सिताराम यांचे आधार कार्ड दाखल केल्यानंतर त्याबद्दल खुलासा होऊ शकतो. उक्त कथनाच्या अनुषंगाने ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीतर्फे करण्यात आलेली आहे.
(5) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांच्या विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करुन
सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे विवेचन एकत्रपणे करण्यात येते. तक्रारकर्ती यांनी अभिलेखावर मयत सिताराम यांच्या मृत्यूपश्चात विमा रक्कम मिळण्यासाठी द्यावयाचे दावा प्रपत्र, दावा प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्याबद्दल मसलगा विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटी लि., मसलगा यांच्या ठरावाची प्रत, प्रथम खबर अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवचिकित्सा अहवाल, मृत्यूचे अंतिम कारण प्रमाणपत्र, सभासदांची विमा यादी, विमा दावा नामंजूर करणारे विमा कंपनीचे पत्र इ. कागदपत्रे दाखल केले.
(7) विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. उभयतांचा वाद-प्रतिवाद व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत सिताराम हे विमाधारक होते; त्यांचा अपघाती मृत्यू झाला; त्यांच्या मृत्यूपश्चात विमा दावा दाखल करण्यात आला इ. बाबी स्वीकारार्ह ठरतात.
(8) विमा कंपनीचे दि.7/9/2022 रोजीचे पत्र पाहता अपघातसमयी मयत सिताराम यांचे वय 75 पेक्षा जास्त होते आणि विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार विमा संरक्षण वयाच्या 70 वर्षापर्यंत लागू असल्याचे कारण देऊन विमा दावा रक्कम देय नसल्यासंबंधी कळविले आहे. विमा कंपनीतर्फे अभिलेखावर जनता वैयक्तिक अपघात विमापत्राच्या तरतुदीचे पत्रक दाखल केले आहे. त्याचे अवलोकन केले असता 10 ते 70 वर्षे वय असणा-या व्यक्तींना जनता वैयक्तिक अपघात विमापत्रानुसार संरक्षण असल्याचे नमूद आहे.
(9) असे दिसते की, पोलीस व वैद्यकीय यंत्रणेच्या कागदपत्रांवर मयत सिताराम यांचे वय 75 वर्षे नमूद आहे. मसलगा वि.का.से. सह. सो.लि. यांनी जनता अपघात विम्याबद्दल दिलेल्या यादीमध्ये मयत सितराम यांचे वय 63 वर्षे नमूद दिसते. विमा कंपनीने मयत सितराम यांचे आधार कार्ड दाखल केले असून ज्यामध्ये जन्म वर्ष 1942 नमूद आहे. उलटपक्षी, तक्रारकर्ती यांनी दाखल केलेल्या आधार कार्ड पाहता मयत सिताराम यांची जम्न तारीख 01/01/1954 नमूद आहे. उभय पक्षांनी मयत सिताराम यांच्या दाखल केलेल्या आधार कार्डशिवाय त्यांच्या वयाबद्दल अन्य पुरावा उपलब्ध नाही.
(10) युक्तिवादाच्या वेळी तक्रारकर्ती यांच्या विधिज्ञांचे निवेदन असे की, त्यांनी मयत सिताराम यांच्या आधार कार्ड अद्ययावत केले असून त्याप्रमाणे जन्म तारखेची नोंद करण्यात आली. विमा कंपनी यांच्या विधिज्ञांचे निवेदन असे की, तक्रारकर्ती यांनी त्यांना आधार कार्ड उपलब्ध करुन दिलेले नव्हते आणि त्यांनी मसलगा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांच्याकडून मयत सिताराम यांचे आधार कार्ड मिळविलेले आहे.
(11) अभिलेखावर दाखल केलेल्या छायाप्रतीनुसार उभय पक्षांनी मयत सिताराम यांचे मुळ आधार कार्ड जिल्हा आयोगाच्या अवलोकनार्थ सादर केलेले नाही. मयत सिताराम हे तक्रारकर्ती यांचे पती असल्यामुळे मयत सिमाराम यांचे आधार कार्ड त्यांच्या ताब्यात असले पाहिजे. असे दिसते की, तक्रारकर्ती यांच्याद्वारे दाखल आधार कार्डनुसार मयत सिताराम यांचे मृत्यूसमयी वय 68 वर्षे दिसून येते. उलटपक्षी, विमा कंपनीने दाखल केलेल्या आधार कार्डनुसार मयत सितराम यांचे मृत्यूसमयी वय 80 असल्याचे दिसून येते. उभय पक्षांनी त्यांच्याद्वारे दाखल करण्यात आलेल्या आधार कार्डचा लाभ घेऊन आपआपली बाजू मांडलेली आहे.
(12) निर्विवादपणे, विमा कंपनीने अपघातसमयी मयत सितराम यांचे वय 70 पेक्षा जास्त असल्याचे कारण देऊन तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला आहे. तक्रारकर्ती यांनी मयत सिताराम यांचे अद्यतन केलेले आधार कार्ड दाव्यासोबत विमा कंपनीस दिलेले नव्हते व नाही. आधार कार्डनुसार मयत सितराम यांचे वय 68 वर्षे होते, याबद्दल तक्रारकर्ती यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा केलेला नाही; किंबहुना त्यांचे तसे कथन नाही. तसेच विमा कंपनीद्वारे दाखल केलेल्या आधार कार्डचे तक्रारकर्ती यांनी खंडन केलेले नाही. हे सत्य आहे की, आधार कार्डचे अद्यतन हे संबंधिताच्या जीवित कालावधीमध्ये होऊ शकते. मयत सिताराम यांच्या आधार कार्डचे अद्यतन करुन जन्म तारखेमध्ये बदल केल्याचे कथन तक्रारकर्ती यांचा युक्तिवाद असताना त्याप्रमाणे जन्म तारखेमध्ये बदल करण्यासाठी कोणता पुरावा दाखल केला होता, याचे स्पष्टीकरण नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ती यांच्याद्वारे दाखल केलेले मयत सितराम यांचे आधार कार्डची सत्यता पटविण्याकरिता अद्यतन केलेले मुळ आधार कार्ड जिल्हा आयोगाच्या निदर्शनास आणून दिले नाही. वाद-तथ्ये व कागदोपत्री पुरावे पाहता अपघातसमयी मयत सितराम यांचे वय 68 असल्याचे व त्याप्रमाणे विमा कंपनीकडे आधार कार्ड सादर केल्याचे किंवा अन्य पुरावा सादर केल्याचे सिध्द होत नाही. आमच्या मते, विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करण्यासाठी दिलेले कारण अनुचित व अयोग्य असल्याचे मानता येत नाही. त्या अनुषंगाने विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ती अनुतोषास पात्र नाहीत, या निष्कर्षाप्रत येत आहोत. ग्राहक तक्रारीमध्ये उपस्थित अन्य वाद-तथ्ये व प्रश्नांना स्पर्श न करता मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.2 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-