जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 64/2020. तक्रार दाखल दिनांक : 05/03/2020. तक्रार निर्णय दिनांक : 04/08/2022.
कालावधी : 02 वर्षे 04 महिने 30 दिवस
शमाबी अब्दुल रहित शेख, वय 40 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. शास्त्री नगर, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, चोलामंडलम् इन्व्हेस्टमेंट ॲन्ड फायनान्स लि.,
यश प्लाझा, मार्केट यार्डच्या समोर, लातूर.
(2) शाखा व्यवस्थापक, एच.डी.एफ.सी. लाईफ इन्शुरन्स कं.लि.,
13 वा मजला, लोधा, एक्सलस, अपोलो मिल्स कंपाऊंड,
एन.एम. जोशी रोड, महालक्ष्मी, मुंबई. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- एस. एम. चव्हाण
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- महेश ए. बामणकर
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- घनश्याम एस. पाटील
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पती अब्दुल रहिम अब्दुल करीम शेख यांनी खरेदी केलेल्या टाटा टेम्पो क्र. एम.एच. 24 जे. 8285 व आयशर टेम्पो क्र. एम.एच. 40 वाय. 3255 करिता विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून प्रत्येकी रु.5,00,000/- कर्ज घेतले होते. कर्ज रकमेच्या हमीकरिता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अब्दुल यांचा विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे विमा उतरविलेला होता. त्या विमापत्राचे क्रमांक PP000151CAV6900 व PP0001510DL6500 आहेत. कर्ज कालावधीमध्ये कर्जदाराचा मृत्यू झाल्यास विमा रकमेतून कर्ज रकमेची परतफेड करण्यात येणार आहे.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्यांचे पती अब्दुल यांचा दि.9/5/2019 रोजी मृत्यू झाला. विमापत्राच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या प्रतिनिधीने कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली. त्यानंतर कर्ज रकमेसंबंधी बेबाकी न करता कर्ज वसुलीचा प्रयत्न करण्यात येत आहे. विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठवूनही दखल घेतली नाही. उक्त वादकथनांच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून रु.10,00,000/- कर्ज रक्कम वसूल करुन उर्वरीत रक्कम देण्याचा; बेबाकी प्रमाणपत्र देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती यांचे पतीच्या मृत्यूनंतर व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.27/9/2019 रोजी त्यांच्याकडील अब्दुल यांच्या कर्ज खात्यांमध्ये रु.42,476/- व रु.50,366/- जमा केलेले आहेत. ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य करुन अंतिमत: त्यांच्याविरुध्द ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली.
(4) विरुध्द पक्ष क्र.2 हे विधिज्ञांमार्फत जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले. परंतु उचित संधी प्राप्त होऊनही लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द विना लेखी निवेदनपत्र आदेश करण्यात आले.
(5) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ती यांचे पती अब्दुल यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून वाहन कर्ज घेतलेले होते आणि कर्ज परतफेडीच्या कालावधीमध्ये त्यांचा मृत्यू झाला, हे विवादीत नाही. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अब्दुल यांचा विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे विमा उतरविलेला होता, हे विवादीत नाही. वादविषयाच्या अनुषंगाने दखल घेतली असता अब्दुल यांच्या मृत्यूनंतर विमापत्राप्रमाणे कर्ज खात्यामध्ये विमा रक्कम जमा करण्यात आलेली आहे, असे विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी नमूद केले.
(7) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता अब्दुल यांना विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे विमापत्र क्रमांक PP000151CAV6900 अन्वये रु.42,476/- व विमापत्र क्र. PP0001510DL6500 अन्वये रु.50,366/- चे विमा संरक्षण दिल्याचे दिसून येते. कर्ज खाते उता-याचे अवलोकन केले असता दि.30/9/2019 रोजी अनुक्रमे रु.42,476/- व रु.50,366/- जमा केल्याचे दिसून येतात. असे दिसते की, विमा जोखीम असणारी रक्कम अब्दुल यांच्या कर्ज खात्यामध्ये भरणा केलेली आहे.
(8) तक्रारकर्ती कथन करतात त्याप्रमाणे कर्ज रक्कम रु.10,00,000/- विमा रकमेतून वसूल होऊन मिळण्यास त्या पात्र असल्यासंबंधी उचित पुरावा नाही. तक्रारकर्ती यांच्या अनुतोष मागणीनुसार ग्राहक तक्रार पुराव्याद्वारे सिध्द होत नाही. उपलब्ध पुराव्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ती यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ती अनुतोषास पात्र ठरत नाहीत. मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-