जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
किरकोळ अर्ज क्रमांक : 2/2019. तक्रार दाखल दिनांक : 21/06/2019. (ग्राहक तक्रार क्र.157/2019 मध्ये) तक्रार आदेश दिनांक : 04/02/2021. कालावधी: 01 वर्षे 07 महिने 14 दिवस
कैलास तात्याबा बोराडे, वय 39 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. दरेवाडी, पो. सावरगांव, ता. भुम, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, कोटक महिंद्रा बँक लि., विठ्ठलराव शिंदे
शॉपींग कॉम्प्लेक्स, मार्केट यार्ड, टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
(2) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता स्वत:
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ :- विश्वेश्वर डी. कुलकर्णी
आदेश
श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य यांचे द्वारे :-
1. ग्राहक तक्रार क्र.157/2019 मध्ये दाखल अंतरीम अर्जावर पारीत आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी न केल्यामुळे तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत किरकोळ अर्ज दाखल केलेला आहे.
2. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, ग्राहक तक्रार क्र.157/2019 मध्ये अंतरीम अर्ज दाखल केला होता आणि दि.6/5/2019 रोजी त्या अर्जावर जिल्हा मंचाने विरुध्द पक्ष यांच्याविरुध्द आदेश पारीत केलेले आहेत. जिल्हा मंचाच्या आदेशानुसार तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.64,200/- चा भरणा केला. विरुध्द पक्ष यांच्या लेखी सूचनेनुसार गुरु सर्व्हीसेस, पार्कींग यार्ड, उस्मानाबाद येथून ट्रॅक्टरचा ताबा घेण्यास गेले असता पार्कींग चार्जेस भरणा केल्याशिवाय ट्रॅक्टरचा ताबा मिळणार नाही, असे सांगण्यात आले. अशाप्रकारे विरुध्द पक्ष हे जिल्हा मंचाच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या कारणास्तव प्रस्तुत अर्ज दाखल करुन विरुध्द पक्ष यांना शास्ती व्हावी, अशी विनंती केलेली आहे.
3. विरुध्द पक्ष यांनी लेखी म्हणणे दाखल केले असून अर्जातील कथने अमान्य केली आहेत. त्यांच्या कथनानुसार जिल्हा मंचाच्या दि.6/5/2019 रोजीच्या अंतरीम आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे. परंतु तक्रारकर्ता यांनी गुरु सर्व्हीसेस पार्कींग यार्ड यांच्याकडे पार्कींग चार्जेस भरणा करुन ट्रॅक्टरचा ताबा घेतलेला नाही. तक्रारकर्ता यांनी पार्कींग चार्जेस भरणा करणे कायदेशीर आहे. अंतिमत: तक्रारकर्ता यांचा अर्ज रद्द करण्याची विनंती केली आहे.
4. तक्रारकर्ता स्वत: व विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. असे दिसते की, जिल्हा आयोगाने दि.13/6/2019 रोजी पारीत केलेल्या अंतरीम आदेशाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी रक्कम भरणा केल्याचे विरुध्द पक्ष यांना मान्य आहे. असेही दिसून येते की, दि.14/6/2019 च्या रिलीज मेमोनुसार विरुध्द पक्ष यांनी वाहन क्र. एम.एच.25/ए.डी.0825 तक्रारकर्ता यांना देण्याकरिता गुरु सर्व्हीसेस यार्ड, उस्मानाबाद यांना कळविले आहे. सदर मेमोवर तक्रारकर्ता यांची स्वाक्षरी आहे. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, विरुध्द पक्ष यांच्या सूचनेनुसार गुरु सर्व्हीसेस पार्कींग यार्ड, उस्मानाबाद येथून ट्रॅक्टरचा ताबा घेण्यास गेले असता पार्कींग चार्जेस भरणा केल्याशिवाय ट्रॅक्टरचा ताबा मिळणार नाही, असे सांगण्यात आले आणि विरुध्द पक्ष हे जिल्हा मंचाच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. उलटपक्षी विरुध्द पक्ष यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता यांनी गुरु सर्व्हीसेस पार्कींग यार्ड यांच्याकडे पार्कींग चार्जेस भरणा करुन ट्रॅक्टरचा ताबा घेतलेला नाही आणि तक्रारकर्ता यांनी पार्कींग चार्जेस भरणा करणे कायदेशीर आहे.
5. आमच्या मते, जिल्हा आयोगाच्या दि.13/6/2019 च्या अंतरीम आदेशाप्रमाणे उभय पक्षांनी पूर्तता केलेली आहे. पार्कींग चार्जेसचा मुद्दा हा स्वतंत्रपणे उपस्थित झालेला आहे. जिल्हा आयोगाच्या अंतरीम आदेशामध्ये त्यांचा ऊहापोह झालेला नाही. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता यांचा प्रस्तुत अर्ज कायदेशीरदृष्टया समर्थनिय नाही. त्या अनुषंगाने त्यांचा अर्ज निकाली काढण्यात येतो.
(श्री. मुकुंद भ. सस्ते) (श्री. शशांक श. क्षीरसागर)
ज्येष्ठ सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-