Maharashtra

Latur

CC/115/2019

अ‍ॅड. आकाश बळवंतराव जाधव - Complainant(s)

Versus

शाखा व्यवस्थापक, एच. डी. एफ. सी. बॅक - Opp.Party(s)

अ‍ॅड. बी. एच. जाधव

15 Jul 2022

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/115/2019
( Date of Filing : 27 May 2019 )
 
1. अ‍ॅड. आकाश बळवंतराव जाधव
c
...........Complainant(s)
Versus
1. शाखा व्यवस्थापक, एच. डी. एफ. सी. बॅक
c
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. REKHA R. JADHAV PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Jul 2022
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 115/2019.                      तक्रार दाखल दिनांक : 27/05/2019.                                                                           तक्रार निर्णय दिनांक : 15/07/2022.

                                                                                 कालावधी :  03 वर्षे 01 महिने 19 दिवस

 

ॲड. आकाश बळवंतराव जाधव, वय 30 वर्षे,

व्यवसाय : वकिली व शेती, रा. बचत भवनसमोर, लातूर.                           तक्रारकर्ता

 

                        विरुध्द

 

शाखा व्यवस्थापक, एच.डी.एफ.सी. बँक,

टाऊन हॉलसमोर, मेन रोड, लातूर.                                                         विरुध्द पक्ष

 

 

गणपूर्ती :          मा. श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार)

                        मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. बळवंत एच. जाधव

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- महेश ए. बामणकर

 

आदेश 

 

मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, विरुध्द पक्ष (यापुढे "बॅंक") यांच्याकडे त्यांचे बचत खाते आहे आणि त्यांचा खाते क्रमांक 03601530007700 आहे.  दि.16/4/2019 रोजी तक्रारकर्ता यांनी त्यांच्या बचत खात्यामध्ये ॲड. महेंद्रकुमार चव्हाण यांच्यामार्फत रु.8,00,000/- भरणा केले. त्यांना रु.9,30,906.86 पैसे खात्यामध्ये जमा असण्यासंबंधी संदेश प्राप्त झाला. त्याच दिवशी तक्रारकर्ता यांनी त्यांच्या मित्रास ऑनलाईन रु.1,00,000/- पाठविले. त्याप्रमाणे रु.8,30,906.86 रकमेचा त्यांना संदेश प्राप्त झाला. परंतु दि.18/4/2019 रोजी INST-ALERT CHG INC GST JAN-MAR-2019-MIR1910510113608 असे संबोधीत करुन रु.17.70 पैसे कपात करुन घेतले. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी दि.23/4/2019 रोजी स्वत: धनादेशाद्वारे रु.1,00,000/- काढले. त्यानंतर त्यांना रु.7,30,889.16 अशा उर्वरीत रकमेबाबत संदेश प्राप्त झाला.

 

(2)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, त्यांनी दि.4/2/2019 रोजी एक व्यवहार केला होता आणि त्यासाठी दि.24/4/2019 रोजी रु.7,30,000/- रकमेचा धनादेश क्र. 000027 दिला असता पुरेशा रकमेअभावी धनादेश वटणार नाही आणि दंड लागेल, असे कारण देऊन परत पाठविले. त्याबाबत विचारणा केली असता INTER-BRN CASH CHG INCL GST 160419 MIR 1910817874740 असे संबोधीत करुन रु.3,540/- कपात करुन घेतले. अशाप्रकारे तक्रारकर्ता यांना पूर्वकल्पना न देता व त्यांच्या संमतीशिवाय केलेले बँकेचे कृत्य नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना व्यवहार रद्द झाल्यामुळे रु.70,000/-चे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. उक्त नुकसान भरपाईसह विधिज्ञांद्वारे सूचनापत्र पाठविणे व त्याचे उत्तर देण्याकरिता रु.15,000/-, मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.30,000/-, तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- व दि.14/5/2019 रोजी INTER-BERN CASH CHG INCL GST उल्लेख करुन कपात केलेले रु.6,195/- याप्रमाणे रक्कम देण्याकरिता बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.

 

(3)       प्रस्तुत ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने बँकेने लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर त्यांनी अमान्य केलेला आहे. त्यांचे कथन आहे की, बँकेच्या नियमाप्रमाणे व सिस्टीमनुसार तक्रारकर्ता यांच्या खात्यावर वेळोवेळी बँकेने रकमा नांवे टाकल्या आहेत आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. संबंधीत रकमा कपात करण्यासाठी तक्रारकर्ता यांना पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नाही. तक्रारकर्ता यांनी ग्राहक तक्रारीमध्ये दर्शविलेली नुकसान भरपाई बँकेने अमान्य केलेली आहे. अंतिमत: तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे. 

 

(4)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, बँकेचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                          उत्तर

 

(1) बँकेने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी

      केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                            नाही.

(2) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय  ?                 नाही.

(3) काय आदेश  ?                                                                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(5)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांचे बँकेकडे बचत खाते असून त्याचा क्रमांक 03601530007700 आहे, ही बाब विवादीत नाही. तसेच त्यापृष्ठयर्थ तक्रारकर्ता यांनी बचत खात्याचा उतारा दाखल केलेला आहे. तक्रारकर्ता यांनी कथन केल्यानुसार त्यांच्या बचत खात्यातून बँकेने दि.18/4/2019 रोजी INST-ALERT CHG INC GST JAN-MAR-2019-MIR1910510113608 असे संबोधीत करुन रु.17.70 पैसे,  दि.23/4/2019 रोजी INTER-BRN CASH CHG INCL GST 160419 MIR - 1910817874740 संबोधीत करुन रु.3,540/- व दि.14/5/2019 रोजी INTER-BERN CASH CHG INCL GST 100519-MIR 1913250423764 उल्लेख करुन रु.6,195/- कपात करुन घेतल्याचे निदर्शनास येते. उक्त रकमा कपात करण्याच्या कृत्याचे समर्थन करताना बँकने निवेदन केले की, बँकेच्या नियमाप्रमाणे व सिस्टीमनुसार तक्रारकर्ता यांच्या खात्यावर वेळोवेळी रकमा नांवे टाकलेल्या आहेत.

 

(6)       उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांच्या बचत खात्यातून वादकथित रकमा कपात झाल्या, हे स्पष्ट आहे. बँकेच्या युक्तिवादानुसार संदेश सुविधेकरिता तिमाही रु.17.70 पैसे कपात करण्यात येतात. तसेच वादकथित रु.3,540/- व रु.6,195/- ह्या भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार कपात केल्या, असे बँकेचे निवेदन आहे. बचत खात्यामध्ये प्रतिमहा रु.2,00,000/- पर्यंत आर्थिक व्यवहार नि:शुल्क असून त्यापुढे झालेल्या व्यवहाराकरिता शुल्क आकारणी केले, असेही बँकेचे निवेदन आहे. बँकेतर्फे भारतीय रिझर्व बँकेद्वारे निर्गमीत दि.1/7/2014 रोजीचे परिपत्रक अभिलेखावर दाखल केले आहे आणि त्यामध्ये संदेश प्रणालीकरिता शुल्क आकारणीचा उल्लेख दिसून येतो. शिवाय, बँकेतर्फे त्यांच्या संकेतस्थळावरील माहितीची छायाप्रत दाखल करण्यात आलेली असून ज्यामध्ये रोख रकमेच्या व्यवहाराकरिता आकारलेल्या शुल्काची माहिती नमूद आहे आणि त्यानुसार रु.2,00,000/- पर्यंत नि:शुल्क व्यवहार व त्यापुढे प्रतिहजार रु.5/- परंतु किमान रु.150/- शुल्क आकारणी करण्याबाबत उल्लेख आढळतो.

 

(7)       भारतीय रिझर्व बॅंकेच्या परिपत्रकानुसार संदेश पोहोच करण्यासाठी बँक शुल्क आकारणी करु शकते. बँकेद्वारे बचत खात्यातील आर्थिक व्यवहाराचे संदेश प्राप्त झाले, हे तक्रारकर्ता यांना मान्य आहे. आर्थिक व्यवहाराकरिता संदेश सुविधा नि:शुल्क मिळावयास पाहिजे, असे त्यांचे कथन नाही किंवा संदेश सुविधा नि:शुल्क पुरविली जावी, असाही पुरावा नाही. अशा स्थितीमध्ये संदेश सुविधेकरिता बँकेने आकारणी केलेली रक्कम अयोग्य असल्याचे ग्राह्य धरता येणार नाही.

(8)       बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार रक्कम भरणे व काढण्यासाठी रु.2,00,000/- पर्यंतचे व्यवहार नि:शुल्क आहेत आणि त्यापुढे प्रतिहजार रु.5/- परंतु किमान रु.150/- शुल्क आकारणी करण्यात येतात. बँकेने लेखी युक्तिवादामध्ये रक्कम कपातीचा तपशील उदाहरणासह नमूद केलेला आहे. त्याचे खंडन करण्यासाठी तक्रारकर्ता यांच्याद्वारे उचित पुरावा सादर केलेला नाही. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता यांच्या बचत खात्यातून वादकथित रक्कम कपात करण्याचे बँकेचे कृत्य अनुचित व गैर असल्याचे मान्य करता येणार नाही.

 

(9)       त्यानंतर तक्रारकर्ता यांचे वादकथन असे की, दि.4/2/2019 रोजी त्यांनी एक व्यवहार केला होता आणि त्यासाठी दि.24/4/2019 रोजी रु.7,30,000/- रकमेचा धनादेश क्र. 000027 दिला असता पुरेशा रकमेअभावी धनादेश वटणार नाही आणि दंड लागेल, असे कारण देऊन परत पाठविले. व्यवहार रद्द झाल्यामुळे रु.70,000/- चे आर्थिक नुकसान सहन करावे लागले, असे तक्रारकर्ता यांचे कथन आहे. तक्रारकर्ता यांनी कथित व्यवहार दर्शविण्यासाठी करारनामा व पावती अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्यांनी आकाश आण्णासाहेब होदाडे यांच्याशी रु.8,00,000/- रकमेमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचे दिसून येते. तसेच त्यांनी रु.70,000/- रक्कम दिल्याचे व उर्वरीत रु.7,30,000/- चा धनादेश क्र. 000027 दिल्याचा उल्लेख दिसून येतो. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांनी धनादेश क्र. 000027 व्यवहारापोटी दिलेला होता आणि संबंधीत पक्षाने वटण्यासाठी सादर केला असता पुरेशा रकमेअभावी वटणार नसल्याचे व दंड आकारणी केला जाईल, असे बँकेने सांगितले.  त्या अनुषंगाने बँकेचा प्रतिवाद असा की, तक्रारकर्ता यांनी आपल्या कथनापृष्ठयर्थ पुरावा सादर केलेला नाही. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांची दिलेला धनादेश क्र. 000027 वटण्याकरिता बँकेमध्ये सादर केल्याचा पुरावा दिसून येत नाही. ज्यांनी कोणी धनादेश बँकेमध्ये सादर केला त्यास बँकेने पूर्वसूचित करण्याचे काही कारण असू शकत नाही. ज्यांनी कोणी धनादेश सादर केला, त्या व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र अभिलेखावर दाखल नाही. यदाकदाचित धनादेश अनादरीत झाला असता तर संबंधीत पक्षाला कायदेशीर मार्ग उपलब्ध होते. त्यामुळे उचित पुराव्याअभावी धनादेश वटणार नसल्याचे बँकेने तक्रारकर्ता यांना सांगितले, हे मान्य करता येणार नाही.

 

(10)     उक्त विवेचनाअंती बँकेने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि त्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र ठरणार नाहीत. मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आदेश

 

            (1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्‍यात येते.           

            (2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)                                                        (श्रीमती रेखा  जाधव)                

             सदस्‍य                                                                           अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)             

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MRS. REKHA R. JADHAV]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.