जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 277/2023. आदेश दिनांक : 10/01/2024.
गणेश उर्फ गणपत पिता प्रल्हाद मरे, वय 48 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. चिलवंतवाडी, ता. निलंगा, जि. लातूर.
ह.मु. गंगा कृषि सेवा केंद्र, मेन रोड, औराद (श.), ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि.,
शाखा : औराद (शहाजानी), ता. निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- डी. व्ही. देशपांडे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
(2) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांचे विरुध्द पक्ष यांच्याकडे सी.सी. खाते क्र. 051335100000249 असून रु.40,00,000/- रोख कर्ज मंजूर केलेले होते. त्यापैकी रु.18,00,000/- रक्कम विनियोगात आणली आणि रु.22,00,000/- खात्यामध्ये जमा आहे. बोरसुरी साठवण तलावाकरिता संपादीत केलेल्या तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीचा मंजूर झालेला मोबदला रु.34,70,323/- त्यांच्या सी.सी. खाते क्र. 051335100000249 मध्ये जमा करण्यात आला. परंतु संपादन मोबदला रकमेसंबंधी वाद निर्माण झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी यांनी तक्रारकर्ता यांचे खाते क्र. 051335100000249 हे Stop Payment Hold करण्याचे विरुध्द पक्ष यांना आदेश केले. त्याविरुध्द तक्रारकर्ता यांनी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केलेल्या याचिका क्र. 1335/2021 मध्ये उपविभागीय अधिकारी, निलंगा यांच्या आदेशास स्थगिती दिली. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी खाते क्र. 051335100000249 वापरण्याकरिता परवानगी न दिल्यामुळे नुकसान भरपाई मिळणे, खाते पूर्ववत सुरु करणे व अन्य अनुषंगिक नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी विनंती केलेली आहे.
(3) सकृतदर्शनी, मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या स्थगिती आदेशाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांची अनुतोष मागणी दिसते. आमच्या मते, खाते क्र. 051335100000249 च्या व्यवहारासंबंधी तक्रारकर्ता यांचे प्रकरण मा. उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे. अशा स्थितीत, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन तक्रारकर्ता यांची नुकसान भरपाई व अन्य अनुतोष मिळण्यासंबंधी ग्राहक तक्रार कायदेशीरदृष्टया समर्थनिय ठरत नाही. त्यामुळे ग्राहक तक्रार दाखलपूर्व टप्प्यावर रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-