जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 108/2022. तक्रार दाखल दिनांक : 08/04/2022. तक्रार निर्णय दिनांक : 10/01/2024.
कालावधी : 01 वर्षे 09 महिने 02 दिवस
सॉवरिया शेठ कृषि उद्योग, प्रोप्रा. ईश्वरप्रसाद ब्रिजलाल जाजू,
वय 57 वर्षे, व्यवसाय : व्यापार, दुकानाचा पत्ता : कळंब रोड,
रेल्वे गेट, हरंगुळ (बु.), लातूर. रा. मातोश्री निवास, गॅलक्सी
हॉस्पिटल, सावेवाडी, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, इफ्को-टोकियो जनरल इन्शुरन्स लि. कंपनी,
ऑफीस : 1001, नववा मजला, सुनित कॅपिटल, कांचनबन-ब,
सिटी सर्वे नं. 967/2, सेनापती बापट रोड, पुणे-411 016 महाराष्ट्र.
(2) शाखा व्यवस्थापक, इफ्को-टोकियो जनरल इन्शुरन्स लि. कंपनी,
ऑफीस : पहिला मजला, रविराज चेंबर, मुख्य रस्ता, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- मंगेश जी. राठोड
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.व्ही. शास्त्री
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, वरंवटी शिवारामध्ये गट क्र. 82 मधील प्लॉट क्र. 20 मध्ये पत्र्याचे शेड मारुन तयार केलेल्या कॉम्प्लेक्समध्ये दुकान क्र.4 व त्यामागे गोदाम भाड्याने घेऊन ते 'सावरिया शेठ कृषि उद्योग' नांवे ताडपत्री, पोते, चवाळे, ऑर्गेनिक फर्टिलायझर, किटकनाशके इ. वस्तू विक्रीचा व्यवसाय करीत होते. जुलै 2020 पासून व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ऑर्गेनिक खते, किटकनाशके, बियाणे, फवारणी आवश्यक औषधे किटकनाशके इ. विक्री करण्यासाठी अजयसिंह दत्ताजी नाईकबावणे यांना दुकानामध्ये नोकरीवर ठेवून अजयसिंह दत्ताजी नाईकबावणे यांच्या नांवे परवाना घेण्यासाठी अर्ज केला आणि 30 दिवसाच्या आत परवाना न दिल्यास परवाना दिल्याचे गृहीत धरण्याचा नियम असल्यामुळे त्यांनी दुकानामध्ये रासायणिक खते, पिकाची औषधे व किटकनाशके खरेदी करुन गोदामामध्ये साठवणूक केले.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विरुध्द पक्ष (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडून त्यांनी Trade Protector विमापत्र घेतले असून त्याकरिता रु.902/- हप्ता भरणा केले आणि दि.3/2/2021 रोजी विमापत्र क्र.47803542 अन्वये दि.3/2/2021 ते 2/2/2022 कालावधीकरिता विमापत्र निर्गमीत करण्यात आले. तसेच 'स्टँडर्ड फायर ॲन्ड स्पेशन पेरील्स पॉलिसी' करिता रु.8,200/- हप्ता भरणा केल्यानंतर दि.17/2/2021 रोजी विमापत्र क्र.12296769 अन्वये दि.17/2/2021 ते 16/2/2022 कालावधीकरिता गोदामातील मालाच्या अपघाती नुकसानीच्या भरपाईकरिता विमापत्र निर्गमीत करण्यात आले. दुकानामध्ये खुर्च्या, टेबल, अलमा-या व विक्रीसाठी ठेवलेला माल रु.3,50,000/- याप्रमाणे होता आणि गोदामामध्ये अलमा-या, ऑर्गेनिक खते, किटकनाशके, बियाणे, पिकावर फवारणी औषधे, किटकनाशके असे एकूण रु.32,00,000/- चा माल होता.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि.26/3/2021 रोजी मध्यरात्री त्यांच्या दुकान व गोदामास आग लागली. घटनेबद्दल पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. तसेच पोलीस यंत्रणा व मंडल अधिकारी यांनी पंचनामा केला. विमा कंपनीस घटनेची माहिती दिल्यानंतर सी.ए. व लॉस असेसर आर.व्ही. सारडा यांनी घटनास्थळी येऊन दुकान व गोदामाची पाहणी करुन पंचनामा केला. तक्रारकर्ता यांच्या दुकानातील मालाचे रु.3,50,000/- व गोदामातील माल रु.32,00,000/- चे नुकसान झाले असताना विमा कंपनीने विमापत्र क्र.47803542 करिता रु.29,824/- व विमापत्र क्र.12296769 करिता रु.14,964/- नुकसान भरपाई मंजुरीचे पत्र पाठविले. दुकान व गोदामामध्ये झालेल्या नुकसानीप्रमाणे नुकसान भरपाई देण्याबद्दल सूचनापत्र पाठविले असता विमा कंपनीने खोटे उत्तर दिले. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.35,50,000/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(4) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले. विमा कंपनीचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी रु.902/- हप्ता भरणा करुन विमापत्र क्र.47803542 अन्वये दि.3/2/2021 ते 2/2/2022 कालावधीकरिता दुकानासाठी विमा संरक्षण घेतले. तसेच रु.8,200/- हप्ता भरणा करुन विमापत्र क्र.12296769 अन्वये दि.17/2/2021 ते 16/2/2022 कालावधीकरिता गोदामासाठी विमा संरक्षण घेतले. दुकान व गोदामास लागलेल्या आगीबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर विमा दाव्याची नोंद घेऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी आय.आर.डी.ए. मान्यताप्राप्त सर्वेक्षक श्री. आर.व्ही. सारडा यांची नेमणूक केली. त्याप्रमाणे सर्वेक्षकांनी आग व नुकसानीची पाहणी करुन सर्वेक्षण अहवाल विमा कंपनीकडे सादर केला. तक्रारकर्ता यांनी सादर केलेले कागदपत्रे, सर्वेक्षण अहवाल व छायाचित्रे याद्वारे विमापत्राच्या अटी व शर्तीस अधीन राहून दावा हाताळणीसाठी घेतला असता तक्रारकर्ता यांनी कायदेशीर परवाना नसताना दुकान व गोदामामध्ये रासायनिक खते, औषधे, खते, किटकनाशके इ. वस्तुंचा साठा केल्याचे आढळून आले. त्या वस्तू विमापत्रामध्ये संरक्षीत नसल्यामुळे विमा दावा मंजूर न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुकान व गोदामातील अन्य बाबी ज्याकरिता कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसते, त्याकरिता विमा दावा मंजूर करुन तसे पत्र तक्रारकर्ता यांना पाठविले. तसेच सर्वेक्षक अहवालानुसार किटकनाशकांचा रु.2,40,000/- व खतांचा रु.40,000/- किंमतीचा साठा असल्याचे निदर्शनास आले आहे. विमा दावा हाताळताना त्यांनी सेवेमध्ये त्रुटी ठेवलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीने केली आहे.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता विमा कंपनीकडे तक्रारकर्ता यांच्या दुकान व गोदामाकरिता विमा संरक्षण दिलेले होते, ही मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांच्या दुकान व गोदामास आग लागली आणि फर्निचर, खुर्च्या, लाकडी व स्टील कपाटे, खते, किटकनाशके, ताडपत्री इ. चे नुकसान झाले, ही मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला आणि विमा कंपनीने दावा क्र. 47025230 करिता रु.29,850/- व दावा क्र. 11023157 करिता रु.15,000/- विमा रक्कम मंजूर करुन पत्र पाठविले, ही मान्यस्थिती आहे.
(7) प्रामुख्याने, दुकानातील मालाचे रु.3,50,000/- व गोदामातील माल रु.32,00,000/- चे नुकसान झाले असताना दुकान व गोदामामध्ये झालेल्या नुकसानीप्रमाणे भरपाई न देऊन सेवेमध्ये त्रुटी केली, असे तक्रारकर्ता यांचे कथन आहे. उलटपक्षी, कायदेशीर परवाना नसताना दुकान व गोदामामध्ये रासायनिक खते, औषधे, खते, किटकनाशके इ. वस्तुचा साठा केल्याचे आढळून आले आणि त्या वस्तू विमापत्रामध्ये संरक्षीत नसल्यामुळे विमा दावा मंजूर न करण्याचा निर्णय घेऊन अन्य बाबी ज्याकरिता कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसते, त्याकरिता विमा दावा मंजूर करुन पत्र पाठविल्याचे विमा कंपनीचे कथन आहे.
(8) विमा कंपनीने तक्रारकर्ता यांच्या दुकानासाठी दिलेल्या पॉलिसी क्र. 47803532 चे अवलोकन केले असता आग व अनुषंगिक जोखिमेकरिता रु.3,50,000/- चे विमा संरक्षण दिल्याचे दिसते. त्यामध्ये SECTION : 001 Fire and Allied Perils रकान्यामध्ये Stock In Trade मध्ये ON STOCK OF ALL KINDS OF FERTILIZERS, SEEDS AND OTHER BUSINESS GOODS PERTAINING TO INSURED TRADE Rs:-300000/- व GOODS HELD IN TRUST OR ON COMMISSION RS:-50000/- नमूद आहे. तसेच गोदामासाठी दिलेल्या विमापत्र क्र.12296769 चे अवलोकन केले असता साठ्याकरिता रु.31,00,000/- चे विमा संरक्षण दिल्याचे दिसते. विमापत्रातील Any Other Additional Risk Information रकान्यामध्ये Full Stock Description to be covered: Rs.3000000/- ON STOCK OF ALL TYPES OF FERTILIZERS SEEDS PESTICIDES MEDICINES AND & OTHER BUSINESS KRIUSHI SEVA GOODS PERTAINING TO INSURED TRADE. Rs:-300000/- तसेच Rs.100,000/- ON GOODS HELD IN TRUST INDEPOSIT INCOMMISSION GOODS नमूद आहे. विमापत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्ता यांच्या दुकान व गोदामातील खते, बियाणे, किटकनाशके, औषधे व अन्य कृषि सेवेच्या मालाकरिता विमा कंपनीने विमा जोखीम घेतल्याचे स्पष्ट होते. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता प्रश्न निर्माण होतो की, तक्रारकर्ता यांच्या दुकानामध्ये असणा-या खते, बियाणे, किटकनाशके, औषधे विक्री करण्याचा परवाना नसला तरी त्याकरिता विमा संरक्षण लागू होते काय ? तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये नोकरीवर ठेवलेल्या अजयसिंह दत्ताजी नाईकबावणे यांच्या नांवे परवाना घेण्यासाठी अर्ज केला होता आणि 30 दिवसाच्या आत परवाना न दिल्यास परवाना दिल्याचे गृहीत धरण्याचा नियम असल्यामुळे दुकानामध्ये रासायणिक खते, पिकाची औषधे व किटकनाशके खरेदी करुन गोदामामध्ये साठवणूक केले.
(9) प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांच्या दुकान व गोदामातील खते, बियाणे, किटकनाशके, ताडपत्री व अन्य कृषि सेवा वस्तुकरिता विमा कंपनीने जोखीम स्वीकारलेली होती, हे स्पष्ट आहे. विमा संरक्षीत वस्तु किंवा मालाची विक्री करण्याचा परवाना आवश्यक असल्याबद्दल विमापत्रामध्ये तरतूद नाही किंवा तशाप्रकारच्या अटी व शर्ती दिसत नाहीत. विमा कंपनीने परवान्याची पूर्वअट ठेवून दुकान व गोदामातील खते, बियाणे, किटकनाशके, औषधे, ताडपत्री इ. वस्तुकरिता विमा संरक्षण दिले, हे सिध्द केलेले नाही. त्यामुळे जळीत दुर्घटना घडल्यानंतर विमा कंपनीस अशाप्रकारे पळवाट काढता येणार नाही, असे जिल्हा आयोगाचे स्पष्ट मत आहे. निर्विवादपणे, विमा हा संविदेशी निगडीत विषयवस्तू आहे आणि विमापत्रास संविदालेखाचे स्वरुप असते. आमच्या मते, विमा कंपनीने तक्रारकर्ता यांच्या दुकान व गोदामातील खते, बियाणे, किटकनाशके, औषधे, ताडपत्री इ. साठी विमा संरक्षण दिलेले होते आणि त्या वस्तू आगीमध्ये जळून खाक झाल्यामुळे विमा स्वरुपात त्याची भरपाई करण्याचे दायित्व विमा कंपनीवर येते. हे सत्य आहे की, विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा दावा अंशत: मंजूर केलेला आहे. आमच्या मते, विमा कंपनीने तक्रारकर्ता यांच्या दुकान व गोदामातील विमा संरक्षीत संपूर्ण मालाकरिता विमा मंजुरीसाठी निर्णय न घेऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे आणि तक्रारकर्ता हे संपूर्ण विमा जोखीम मालाकरिता विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात.
(10) असे दिसते की, तक्रारकर्ता हे दुकानातील मालाकरिता रु.3,50,000/- व गोदामातील मालाकरिता रु.32,00,000/- नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. विमा कंपनीच्या कथनानुसार सर्वेक्षक श्री. आर.व्ही. सारडा यांच्या सर्वेक्षण अहवालानुसार किटकनाशकांचा रु.2,40,000/- व खतांचा रु.40,000/- किंमतीचा साठा असल्याचे निदर्शनास आले आहे. विमा कंपनीतर्फे अभिलेखावर मा. छत्तीसगड राज्य आयोगाचा "मे. मालू बारदाना /विरुध्द/ नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि." तक्रार क्र. 38/2017 निर्णय दि. 2/1/2018 या प्रकरणाचा संदर्भ सादर करण्यात आला. त्यामध्ये सर्वेक्षकांचा अहवाल विश्वसनिय कागदपत्रे आहे आणि तक्रारकर्ता यांनी तो संशयास्पद असल्याबद्दल कागदोपत्री पुरावा दाखल केला नसल्यामुळे नुकसानीचे निर्धारण करण्यासाठी सर्वेक्षकांचा अहवाल अवलंबून व विश्वसनिय ठरतो, असे निरीक्षण नोंदविले आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ता यांनी सर्वेक्षण अहवालाचे खंडन केलेले नाही किंवा त्या विरोधात अन्य कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. अशा स्थितीत, सर्वेक्षण अहवाल ग्राह्य धरणे न्यायोचित ठरते. तक्रारकर्ता यांनी मा. राष्ट्रीय आयोगाच्या "लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. /विरुध्द/ गिता महादेवराव दामशे" 2023(5) ALL MR (JOURNAL)16 व मा. राष्ट्रीय आयोगाच्या "मे. फ्लोटेक्स प्रोडक्टस् /विरुध्द/ मे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि." 2023(3) ALL MR (JOURNAL) 20 या निवाड्यांचा संदर्भ सादर केला. वस्तुत: या न्यायनिर्णयामध्ये जीवन विमा व आगीचे कारण यासंबंधी विवेचन आढळते. त्यामुळे न्यायनिर्णयांचा अत्युच्च आदर ठेवून त्यातील न्यायिक तत्व प्रस्तुत प्रकरणाशी सुसंगत नाही, या निष्कर्षास आम्ही येत आहोत.
(11) सर्वेक्षण अहवालानुसार विमापत्र क्र. 47803532 च्या अनुषंगाने furniture, fixtures and fittings करिता रु.39,850/- व माल साठ्याकरिता रु.1,00,000/-; तसेच विमापत्र क्र. 12296769 च्या अनुषंगाने मालाच्या नुकसानीकरिता रु.3,05,000/- निर्धारण केलेले आहे. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे उक्त विमा रक्कम ग्राहक तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळण्यास पात्र आहेत.
(12) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता व तक्रार खर्चाकरिता रकमेची मागणी केलेली आहे. मात्र त्याबद्दल समर्पक स्पष्टीकरण व पुरावा दिसून येत नाही. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, अंशत: विमा रक्कम देऊ केल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(13) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्र. 108/2022.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना विमापत्र क्र. 47803532 च्या अनुषंगाने रु.1,39,850/- व विमापत्र क्र. 12296769 च्या अनुषंगाने रु.3,05,000/- विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना उक्त रकमेवर दि.8/4/2022 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-