जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 248/2021. तक्रार दाखल दिनांक : 27/10/2021. तक्रार निर्णय दिनांक : 13/01/2023.
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 17 दिवस
एजाज खाजा पटेल, वय 28 वर्षे, धंदा : व्यापार,
रा. हलगरा, ता. निलंगा, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
शाखा व्यवस्थापक, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स
कंपनी लि., विभागीय कार्यालय, रविराज चेंबर्स, पहिला मजला,
सातमजली बँकेसमोर, मेन रोड, लातूर, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- आय.आर. पटेल
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.व्ही. शास्त्री
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, टोयाटो कंपनीच्या कोरोला अल्टीस वाहन क्र. एम.एच. 20 बी.वाय. 2755 (यापुढे 'विमा संरक्षीत वाहन') करिता त्यांनी विरुध्द पक्ष (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडे दि.30/7/2020 रोजी विमापत्र क्र. TIT/91945828 घेतले होते. विमा कालावधी दि.30/7/2020 ते 29/7/2021 होता. विमा हप्ता रु.42,259/- अदा केला. विमा कंपनीने विमा संरक्षीत वाहनाकरिता रु.8,15,295/- विमा जोखीम स्वीकारली.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि.4/10/2020 रोजी विमा संरक्षीत वाहनाचा जे.सी.बी. वाहनासोबत अपघात झाला. अपघातामध्ये विमा संरक्षीत वाहनाचे नुकसान झाले. विमा संरक्षीत वाहन दुरुस्तीसाठी राजयोग ॲटो प्रा.लि., लातूर येथे नेण्यात आले. घटनेची सूचना प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने वाहनाचे सर्वेक्षण करुन तक्रारकर्ता यांना दि.16/12/2020 रोजी पत्र देऊन कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. विमा कंपनीच्या निर्देशानुसार विमा कंपनीचे प्रतिनिधी विक्रम पिंपरीकर यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु विमा कंपनीने विमा रक्कम देण्याकडे दुर्लक्ष केले. तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता विमा कंपनीने दखल घेतली नाही. विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करुन उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.8,15,295/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(3) विमा कंपनीतर्फे अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल करण्यात आले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने अमान्य केले. तक्रारकर्ता यांच्या विमा संरक्षीत वाहनाकरिता विमा जोखीम स्वीकारल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांचे कथन असे की, विमा संरक्षीत वाहनाच्या अपघातासंबंधी माहिती प्राप्त झाल्यानंतर सर्वेक्षक मे. गुप 9 रिसर्च विंग यांची नियुक्ती केली. दि.16/12/2020 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्ता यांच्याकडे विमा दाव्यासंबंधी आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली. तक्रारकर्ता यांना पत्रव्यवहार करुनही विमा कंपनीकडे कागदपत्रे सादर केले नाहीत. त्या कागदपत्रांअभावी विमा दाव्याची पुढील कार्यवाही करण्यास विमा कंपनी असमर्थ आहे. त्यामुळे नाईलाजाने तक्रारकर्ता यांचा विमा दावा 'No Claim' कारणास्तव बंद करावा लागला आणि दि.5/2/2021 रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. अंतिमत:, तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करावी, अशी विनंती केलेली आहे.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना विमा नुकसान भरपाई न देऊन
सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांच्या विमा संरक्षीत वाहनाकरिता विमापत्र क्र. TIT/91945828 अन्वये दि.30/7/2020 ते 29/7/2021 कालावधीकरिता विमा कंपनीने रु.8,15,295/- करिता विमा जोखीम स्वीकारली, हे विमापत्रावरुन निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांच्या विमा संरक्षीत वाहनाकरिता विमा जोखीम स्वीकारल्याचे विमा कंपनीस मान्य आहे. विमा संरक्षीत वाहनाच्या अपघाताची सूचना प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने सर्वेक्षक मे. गुप 9 रिसर्च विंग यांची नियुक्ती केली, ही मान्यस्थिती आहे. तसेच विमा कंपनीने दि.16/12/2020 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्ता यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली, याबद्दल उभयतांमध्ये वाद नाही.
(6) प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करुनही उपलब्ध न केल्यामुळे विमा दावा 'No Claim' कारणास्तव बंद केला आणि दि.5/2/2021 रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आले, असा विमा कंपनीचा प्रतिवाद आहे. विमा कंपनीच्या पत्राचे अवलोकन केले असता विमा दावा निर्णयीत करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची मागणी केलेली दिसून येते.
1. TP Affidavit (Third party Injury)
2. Details of JCB
3. Sale & Purchase Agreement of the said Vehicle.
4. Previous policy detail of the said car.
5. Copy of Delivery Note
6. Copy of Service History of the said Vehicle.
7. Toll Receipt of the said Car.
8. Last three year ITR - along with balance sheet.
9. Policy is taken after @ 3 months form lapse of previous policy. Need
Clarification for keeping vehicle uninsured for this period.
(7) असे दिसते की, विमा कंपनीने उक्त कागदपत्रांची तक्रारकर्ता यांच्याकडे मागणी केली आणि ते कागदपत्रे अप्राप्त असल्यामुळे विमा दावा बंद केला.
(8) निर्विवादपणे, विमा दावा मंजूर किंवा नामंजूर करण्याचा विमा कंपनीस अधिकार आहे. असे असले तरी, ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विमा दावा योग्य व वैध कारणास्तव नामंजूर केला काय ? हे पाहणे आवश्यक ठरते. विमा कंपनीने दि.5/2/2021 रोजीच्या पत्रामध्ये व तत्पूर्वी दिलेल्या पत्रामध्ये उक्त कागदपत्रांची मागणी केली, हे स्पष्ट आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर केला जाऊ शकेल, अशा स्वरुपाचे ते मुलभूत व अत्यावश्यक कागदपत्रे आहेत काय ? निश्चितच, त्यासंबंधी विमा कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण नाही. त्या कागदपत्राअभावी विमा दाव्याचा निर्णय घेण्याकरिता येणा-या अडचणी, अपूर्णत:, असमर्थता इ. बद्दल कोणतेही समर्पक व उचित विवेचन नाही. आमच्या मते, कदाचित, ते कागदपत्रे विमा दाव्याकरिता केवळ पुरक ठरतील; परंतु त्याअभावी विमा दावा नामंजूर करता येणार नाही. विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा अयोग्य व अनुचित कारणास्तव बंद करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे आणि तक्रारकर्ता अनुतोषास पात्र ठरतात, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(9) तक्रारकर्ता यांनी विमापत्रामध्ये नमूद IDV रु.8,15,295/- रकमेची विमा कंपनीकडून मागणी केलेली आहे. तक्रारकर्ता यांनी विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीकरिता राजयोग ॲटो प्रा.लि., लातूर यांचे अंदाजपत्रक दाखल केले आहे आणि त्यानुसार रु.8,30,917.97 पैसे खर्च अपेक्षीत दिसतो. विमा कंपनीने नियुक्त केलेल्या सर्वेक्षकांचा अहवाल किंवा अन्य कागदपत्रे अभिलेखावर दाखल नाहीत. विमा संरक्षीत वाहनाच्या IDV रकमेपेक्षा दुरुस्ती खर्च अतिरिक्त दिसून येतो. त्यामुळे विमा संरक्षीत वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले, असे ग्राह्य धरावे लागेल. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता वाहनाची IDV रक्कम रु.8,15,295/- विमा कंपनीकडून मिळण्यास पात्र ठरतात.
(10) तक्रारकर्ता यांनी अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने विमा रकमेची मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन विमा दावा बंद केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विमा कंपनीस आदेश करणे न्यायोचित राहील.
(11) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, विमा रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांना विमा कंपनीकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. विमा रक्कम प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(12) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.8,15,295/- विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना उक्त रकमेवर दि.5/2/2021 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-