जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 85/2021. तक्रार दाखल दिनांक : 10/03/2021. तक्रार निर्णय दिनांक : 25/07/2022.
कालावधी : 01 वर्षे 04 महिने 15 दिवस
लक्ष्मण धोंडीराम चोपणे, वय 43 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. केळगाव, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
शाखा प्रबंधक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,
शाखा कार्यालय, लोखंडे कॉम्प्लेक्स, पहिला मजला,
सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर - 413 512. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- प्रमोद एल. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.जी. डोईजोडे
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षीप्त स्वरुपात अशी की, त्यांचे वडील धोंडीराम काशीराम चोपणे हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, केळगाव, ता. निलंगा यांचे सभासद होते. सहकारी संस्थेने जनता अपघात विमा योजनेखाली विरुध्द पक्ष यांच्याकडे त्यांचा विमा उतरविलेला होता. दि.1/10/2019 रोजी तक्रारकर्ता यांचे वडील धोंडीराम यांना शेतामध्ये काम करीत असताना सर्पदंश झाला आणि उपचारादरम्यान दि.15/10/2019 रोजी मृत्यू पावले. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे कागदपत्रांसह दावा प्रस्ताव सादर केला. परंतु विरुध्द पक्ष यांनी दि.29/5/2020 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्ता यांच्या वडिलांचे वय 70 पेक्षा जास्त असल्यामुळे दावा नामंजूर केल्याचे कळविले. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.2,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे कथन की, तक्रारकर्ता यांच्या वडिलांचे मृत्यूसमयी 70 पेक्षा जास्त वय असल्यामुळे विमा दावा नामंजूर केला आणि त्याप्रमाणे तक्रारकर्ता यांना कळविण्यात आले. गट जनता वैयक्तिक अपघात विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार सभासदाच्या वयाची अट 70 वर्षापर्यंत आहे. त्यानुसार तक्रारकर्ता यांचा विमा दावा अटी व शर्तीमध्ये येत नसल्यामुळे नामंजूर केला. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, विमा कंपनीने मयताचे वय 70 वर्षापेक्षा जास्त होते आणि गट जनता वैयक्तिक अपघात विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार 70 वर्षे वयापर्यंत संरक्षण असल्यामुळे विमा दावा बंद केल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने दखल घेतली असता विरुध्द पक्ष यांनी विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचे पत्रक दाखल केलेले आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी महाराष्ट्र शासनाचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसंबंधी शासन निर्णय दाखल केला आहे. ही बाब नमूद करणे आवश्यक वाटते की, उभय पक्षांपैकी कोणीही विमापत्र अभिलेखावर दाखल केलेले नाही. विरुध्द पक्ष यांनी अटी व शर्तीचे जे पत्रक दाखल केले आहे, ते जनता व्यक्तिगत अपघात विमापत्रासंबंधी आहे. त्यामध्ये विमापत्राचा क्रमांक, कालावधी, विमाधारकांचे नांव व इतर आवश्यक बाबींचा उल्लेख नाही. परंतु इंग्रजीमध्ये (For Age Group 10 to 70 years) असा त्रोटक उल्लेख आढळतो.
(5) विमाधारकाचे वय विमापत्र तारखेस ग्राह्य धरण्यात येईल की मृत्यू तारखेस ग्राह्य धरण्यात येईल, हे स्पष्ट होत नाही. काही क्षणाकरिता विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या अटी व शर्तीच्या पत्रकाप्रमाणे विमाधारकाचे वय 70 वर्षाच्या आत असावयास पाहिजे, ही अट मान्य केली असता मयत धोंडीराम यांच्या आधार कार्डवर जन्म तारीख नमूद नसून 1951 असे वर्ष नमूद आहे. त्यांच्या मृत्यूची तारीख 15/10/2019 आहे. मयत धोंडीराम यांचे वय दि.1/1/1951 पासून जरी गणले तरी मृत्यू तारखेपर्यंत त्यांचे वय 68 वर्षे 9 महिने 14 दिवस होते. अशा स्थितीमध्ये मृत्यूसमयी मयत धोंडीराम यांचे वय 70 पेक्षा जास्त होते, असे ग्राह्य धरता येत नाही.
(6) उक्त विवेचनाअंती विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा आयोग्य व अनुचित कारणास्तव नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ता हे विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी रु.2,00,000/- विमा रकमेची मागणी केली आहे. विमा रकमेबाबत तक्रारकर्ता यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा आधार घेतलेला आहे. विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या अटी व शर्तीच्या पत्रकामध्ये रु.1,00,000/- विमा जोखीमेचा उल्लेख आहे. अशा स्थितीत तक्रारकर्ता हे रु.1,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.29/5/2020 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष यांना आदेश करणे न्यायोचित होईल.
(7) मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रार खर्च मागणीचा विचार करता योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्र. 85/2021.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रु.1,00,000/- विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष यांनी उक्त रु.1,00,000/- रकमेवर दि.29/5/2020 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-