जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 163/2018. तक्रार दाखल दिनांक : 16/07/2018. तक्रार निर्णय दिनांक : 24/02/2023.
कालावधी : 04 वर्षे 07 महिने 08 दिवस
शकुर कासिमसाब शेख, वय सज्ञान,
व्यवसाय : शेती, रा. फत्तेपूर, ता. औसा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखाधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा औसा, ता. औसा, जि. लातूर.
(2) शाखा अधिकारी, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
शाखा जवळगा (पो.), ता. औसा, जि. लातूर.
(3) हुजुर दाऊद शेख, वय 45 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. माळकोंडजी, ता. औसा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- डी. एस. बेद्रे
विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेकरिता विधिज्ञ :- गोविंद एस. नाईक
विरुध्द पक्ष क्र. क्र. 2 यांचेकरिता विधिज्ञ :- किरण एस. जाधव
विरुध्द पक्ष क्र. 3 :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "महाराष्ट्र बँक") यांच्याकडे त्यांचे बचत खाते क्र. 25029889069 आहे. हातऊसणे रक्कम परत करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "हुजुर शेख") यांनी विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "जिल्हा बँक") यांचा धनादेश क्र. 22218, दि.19/1/2017 तक्रारकर्ता यांना दिला. दि.21/1/2017 रोजी तक्रारकर्ता यांनी महाराष्ट्र बँकेमध्ये धनादेश जमा केला. धनादेश वटण्याबद्दल महाराष्ट्र बँकेकडे पाठपुरावा केला असता दखल घेण्यात आली नाही. अंतिमत: त्यांचा धनादेश गहाळ झाल्याचे महाराष्ट्र बँकेतर्फे सांगण्यात आले. महाराष्ट्र बँकेने हुजुर शेख यांना सूचनापत्र पाठवून धनादेश क्र.22218 वटण्यास प्रतिबंध करावा आणि नवीन धनादेश द्यावा, असे कळविले. परंतु हुजुर शेख यांनी तक्रारकर्ता यांना नवीन धनादेश दिला नाही. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी महाराष्ट्र बँक व जिल्हा बँकेस सूचनापत्र पाठवून रु.45,000/- ची मागणी केली असता दखल घेण्यात आली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने धनादेशाची रक्कम रु.45,000/- व्याजासह देण्यासह मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाकरिता रु.25,000/- नुकसान भरपाई देण्याचा महाराष्ट्र बँक व जिल्हा बँकेस आदेश करावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) महाराष्ट्र बँकेने लेखी निवेदनपत्र सादर केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी दि.21/7/2017 रोजी वादकथित धनादेश जमा केला. तो धनादेश कुरिअर सेवेद्वारा संबंधीत बँकेकडे पाठविला; परंतु धनादेशाची वसुली झाली नाही किंवा धनादेश परत प्राप्त झाला नाही. तो गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले आणि शोध घेऊनही मिळून न आल्यामुळे हुजुर शेख यांना पत्र पाठवून नवीन धनादेश देण्याकरिता कळविले. त्यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही आणि ग्राहक तक्रार नामंजूर करावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) जिल्हा बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांचा धनादेश क्र.22218 त्यांच्याकडे क्लिअरींगसाठी प्राप्त झालेला नाही. तो धनादेश महाराष्ट्र बँकेकडून गहाळ झाला. जिल्हा बँकेने सेवा देण्यामध्ये त्रुटी किंवा निष्काळजीपणा केला नाही. त्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करावी, अशी विनंती केली.
(4) हुजुर शेख यांना सूचनापत्र प्राप्त झाले असताना जिल्हा आयोगापुढे ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, महाराष्ट्र बँक व जिल्हा बँकेचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी होय
केल्याचे सिध्द होते काय ? (महाराष्ट्र बँकेने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांचे महाराष्ट्र बँकेमध्ये बचत खाते क्र. 25029889069 असल्याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. हुजुर शेख यांनी तक्रारकर्ता यांना दिलेला जिल्हा बँकेचा धनादेश क्र.22218 वटविण्यासाठी दि.21/1/2017 रोजी महाराष्ट्र बँकेमध्ये जमा केला, याबद्दल विवाद नाही.
(7) महाराष्ट्र बँकेचा कथन असे की, त्यांनी कुरिअर सेवेद्वारे संबंधीत बँकेकडे धनादेश पाठविला; परंतु धनादेशाची वसुली झाली नाही किंवा धनादेश परत प्राप्त झाला नाही आणि तो गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा बँकेचा प्रतिवाद असा की, तक्रारकर्ता यांचा धनादेश क्र.22218 त्यांच्याकडे क्लिअरींगसाठी प्राप्त झालेला नसल्यामुळे ते जबाबदार नाहीत.
(8) उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांनी महाराष्ट्र बँकेकडे जमा केलेला धनादेश क्र.22218 गहाळ झाला, हे स्पष्ट आहे. निश्चितच, धनादेशाची रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त झालेली नाही. वादकथित धनादेश देणारे हुजुर शेख जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांची भुमिका स्पष्ट झालेली नाही. महाराष्ट्र बँकेच्या कथनानुसार धनादेश कुरिअर सेवेद्वारा जिल्हा बँकेकडे पाठविण्यात आलेला होता आणि तो गहाळ झाला. ज्यावेळी कुरीअर सेवेमध्ये धनादेश गहाळ झाल्याची शक्यता महाराष्ट्र बँकेने व्यक्त केलेली आहे, त्यावेळी संबंधीत कुरीअर सेवा पुरवठाधारकाविरुध्द महाराष्ट्र बँकेने केलेली कार्यवाही किंवा पाठपुरावा यासंबंधी उचित स्पष्टीकरण नाही. तसेच महाराष्ट्र बँकेने दाखल केलेल्या नोंदवहीतील नोंदीच्या कागदपत्रावरुन धनादेश किंवा धनादेशाचा लिफाफा कुरीअर सेवा पुरवठाधारकाने स्वीकारला, असे स्पष्ट होत नाही. त्यामुळे धनादेश महाराष्ट्र बँकेकडून गहाळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांचा धनादेश गहाळ होण्याकरिता केवळ महाराष्ट्र बँकेचा दोष आहे, असे अनुमान निघते. त्या अनुषंगाने बँकेने तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केली, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(9) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, धनादेशाची रक्कम किंवा धनादेश न वटल्याची कागदोपत्री माहिती व धनादेश प्राप्त न झाल्यामुळे त्यांना हुजुर शेख यांच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करता आलेली नाही. या ठिकाणी महत्वाची बाब अशी की, महाराष्ट्र बँकेने हुजुर शेख यांना नवीन धनादेश देण्याकरिता पत्र पाठविले, हे सत्य असले तरी तक्रारकर्ता यांनी स्वत: त्यांच्य येणे रकमेसंबंधी हुजुर शेख यांच्याकडे काय पाठपुरावा केला, हे स्पष्ट केले नाही. हुजुर शेख यांनी तक्रारकर्ता यांना धनादेश किंवा रक्कम देण्यास नकार दिला, अशी वस्तुस्थिती व पुरावा नाही. आमच्या मते, तक्रारकर्ता यांना हुजुर शेख यांच्याकडून पुन्हा नवीन धनादेश मिळविणे किंवा त्या धनादेशाची रक्कम मिळविता येऊ शकते. तक्रारकर्ता यांना हुजुर शेख यांच्याकडून येणे रक्कम वसूल करण्यासाठी योग्य कायदेशीर मार्ग उपलब्ध असल्यामुळे धनादेशावर नमूद रकमेसंबंधी तक्रारकर्ता यांची मागणी कायदेशीरदृष्टया समर्थनिय नाही.
(10) तक्रारकर्ता यांनी मा. राष्ट्रीय आयोगाच्या 'मॅनेजर, बँक ऑफ बडोदा /विरुध्द/ चित्रोदिया बाबुजी दिवाणजी', रिव्हीजन पिटीशन नं. 2028/2016, दि. 19/7/2019 चा संदर्भ सादर केला. मा. राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिर्णयाचे अवलोकन केले असता त्यामध्ये अनादरीत झालेला धनादेश बँकेकडून गहाळ झाल्यामुळे चलनक्षम दस्तऐवजाचा कायद्याचे कलम 138 अन्वये खटला दाखल करण्याच्या हक्कापासून वंचित रहावे लागले, असे निरीक्षण नोंदवून तक्रारकर्ता यांचे नुकसान झाल्यामुळे धनादेशाची रक्कम देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ता यांचा धनादेश गहाळ झालेला असला तरी तो अनादरीत झालेला नाही. मा. राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिर्णयातील वस्तुस्थिती प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थितीशी भिन्न आहे.
(11) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासासह आर्थिक खर्चाकरिता रु.25,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. तक्रारकर्ता यांचा धनादेश गहाळ झाल्यामुळे निश्चितच महाराष्ट्र बँक व जिल्हा बँकेकडे पाठपुरावा करावा लागला आहे. महाराष्ट्र बँक व जिल्हा बँकेने दखल न घेतल्यामुळे त्यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. शिवाय, संबंधिताकडून धनादेश रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना अन्य प्रयत्न करावा लागणार आहे. प्रस्तुत प्रकरणाच्या कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासासह आर्थिक खर्च होणे स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मंजूर करणे न्याय्य ठरेल.
(12) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र बँकेने तक्रारकर्ता यांना मानसिक व शारिरीक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 महाराष्ट्र बँकेने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-