जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 189/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 21/06/2022.
तक्रार दाखल दिनांक : 27/06/2022. तक्रार निर्णय दिनांक : 04/06/2024.
कालावधी : वर्षे महिने दिवस
गफुर नबी मुल्ला, वय 28 वर्षे, धंदा : ड्रायव्हर,
रा. नदी हत्तरगा, ता. निलंगा, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखाधिकारी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि.,
शाखा कार्यालय : युनिट नं. 211 व 212, दुसरा मजला,
यश प्लाझा, शिवनेरी गेटजवळ, कव्हा रोड, लातूर - 413 512.
(2) व्यवस्थापक, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि.,
कार्यालय : सहावा मजला, ओबेरॉय कॉमर्स इंटरनॅशनल बिझनेस
पार्क, ओबेरॉय गार्डन सिटी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ,
गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400 063. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- प्रमोद एल. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- सुरेश डोईजोडे
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांनी महिंद्रा कंपनीच्या खरेदी केलेल्या मालवाहू वाहन नोंदणी क्रमांक एम.एच.24/ए.यू.4403 (यापुढे "विमाकृत वाहन") करिता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे 'रिलायन्स कमर्शिअल व्हेईकल पॅकेज पॉलिसी' अन्वये विमापत्र घेतले होते. त्याचा विमापत्र क्रमांक 202422023340016574 असून विमा कालावधी दि.25/11/2020 ते 25/11/2021 होता. दि.26/7/2021 रोजी तक्रारकर्ता यांचे बंधू रहीम नबी मुल्ला हे विमाकृत वाहन चालवत असताना डाळज नं. 2, ता. इंदापूर, जि. पुणे येथे विमाकृत वाहनाचा अपघात झाला. घटनेसंबंधी विमा कंपनीस टोल फ्री नंबरवरुन माहिती देण्यात आली. तक्रारकर्ता यांनी वाहनाची दुरुस्ती करुन घेतली आणि त्याकरिता एकूण रु.2,02,125/- खर्च आला. तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या सूचनेनुसार त्यांनी स्वत: वाहन चालवत असल्याचे शपथपत्र करुन कागदपत्रे सादर केले. मात्र विमा कंपनीने दि.28/9/2021 च्या पत्रान्वये घटनेसंबंधीच्या माहितीमध्ये तफावत असल्यामुळे अटीचा भंग झाल्याचे नमूद करुन विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांच्याकडे व त्यांचे बंधू रहीम नबी मुल्ला यांच्याकडे विमाकृत वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना आहे. विमा कंपनीने चूक व अयोग्य कारणास्तव विमा दावा नामंजूर केला आहे. विधिज्ञांमार्फत विमा कंपनीस सूचनापत्र पाठवून विमा रकमेची मागणी केली असता दखल घेतली नाही. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.2,02,125/- व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- देण्याचा व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने अमान्य केलेले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी त्यांचे बंधू रहीम नबी मुल्ला दि.26/7/2021 रोजी विमाकृत वाहन चालवत असल्याची खोटी माहिती दिलेली आहे. त्याबद्दल चौकशी केली असता तक्रारकर्ता यांनी स्वत: अपघातसमयी विमाकृत वाहन चालवत असल्याचे शपथपत्र लिहून दिलेले आहे. अपघातसमयी वाहन चालकासंदर्भात खोटी माहिती तक्रारकर्ता यांच्याकडून पुरविण्यात आली. तक्रारकर्ता यांनी वाहन चालकाबद्दल खोटे निवेदन केले आहे. तक्रारकर्ता यांनी विमापत्राच्या अटी व शर्तींचा भंग केला असल्यामुळे दि.28/9/2021 रोजीच्या पत्राद्वारे विमा दावा नामंजूर करण्यात आला. तसेच अपघाताची माहिती त्वरीत देणे बंधनरक असताना त्याची पूर्तता न झाल्यामुळे विमापत्राच्या अट क्र.1 चे उल्लंघन झाले आहे. त्यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केलेली नाही. ग्राहक तक्रार खोटी असल्यामुळे खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीतर्फे करण्यात आली.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र. 1 ते 3 एकमेकांशी संलग्न असल्यामुळे त्यांचे विवेचन संयुक्तपणे करण्यात येत आहे. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांच्या विमाकृत वाहनाचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आला आणि विमा कालावधीमध्ये त्याचा अपघात झाला, याबद्दल मान्यस्थिती आढळते. विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर केला, याबद्दल विवाद नाही.
(5) विमा दावा नामंजूर करण्यासाठी विमाकृत वाहन चालकाची माहिती देण्यामध्ये अपवेदन केल्यामुळे व अपघाती नुकसान व हानीच्या घटनेबद्दल त्वरीत लेखी सूचना न दिल्यामुळे विमापत्राच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याचे कारण विमा कंपनीतर्फे देण्यात आलेले आहे.
(6) विमाकृत वाहनाचा अपघात झाल्यानंतर विमाधारकाने त्वरीत लिखीत सूचना दिली पाहिजे, अशी अट निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला, ही मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार विमाकृत वाहनाचा अपघात झाल्यानंतर घटनेसंबंधी विमा कंपनीस टोल फ्री नंबरवरुन माहिती दिलेली आहे. विमा कंपनीतर्फे घेतलेला बचाव पाहता घटनेबद्दल तक्रारकर्ता यांच्याकडून कोणत्या तारखेस सूचना प्राप्त झाली, याचे विवेचन नाही. काहीही असले तरी, मा. सर्वोच्च न्यायालय व मा. राष्ट्रीय आयोगाद्वारे निर्णयीत प्रकरणांमध्ये सत्य दावे विलंबाने सूचना दिल्याच्या कारणास्तव नामंजूर करता येत नाहीत, असे न्यायिक तत्व आढळते.
(7) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, दि.26/7/2021 रोजी त्यांचे बंधू रहीम नबी मुल्ला हे विमाकृत वाहन चालवत असताना डाळज नं. 2, ता. इंदापूर, जि. पुणे येथे विमाकृत वाहनाचा अपघात झाला. मात्र, विमा कंपनीच्या प्रतिनिधीने केलेल्या सूचनेनुसार त्यांनी स्वत: विमाकृत वाहन चालवत असल्याचे शपथपत्र करुन दिलेले आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये कोणत्याही पक्षाने विमाकृत वाहनाच्या अपघाताबद्दल पोलीस कार्यवाहीचे कागदपत्रे दाखल केलेले नाहीत. विमा कंपनीतर्फे करण्यात आलेली चौकशी किंवा अन्वेषण याबद्दल कागदपत्रे दाखल नाहीत. अपघातसमयी विमाकृत वाहन चालवत असणारे रहीम नबी मुल्ला यांचे शपथपत्र दाखल नाही. असे असले तरी, तक्रारकर्ता यांचे स्वकथन की, अपघातसमयी त्यांचे बंधू रहीम नबी मुल्ला हे वाहन चालवत होते. परंतु त्यांनी विमा कंपनीकडे दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये स्वत: विमाकृत वाहन चालवत असल्याचे नमूद केलेले आहे. तक्रारकर्ता यांनी स्वत:चा व त्यांचे बंधू रहीम नबी मुल्ला यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केला आहे. ज्यामध्ये LMV-TR वाहन चालवण्याकरिता दि.17/2/2025 पर्यंत परवाना वैध असल्याचे आढळते. प्रकरणामध्ये उद्भवलेल्या वाद-प्रश्नांच्या अनुषंगाने दखल घेतली असता विमाकृत वाहन चालविण्याकरिता तक्रारकर्ता व त्यांचे बंधू रहीम नबी मुल्ला हे पात्र आहेत. त्या दोघांशिवाय अन्य एखादी व्यक्ती विमाकृत वाहन चालवत होती, अशी स्थिती नाही.
(8) निर्विवादपणे, विमा ही संविदेशी निगडीत विषयवस्तू आहे. विमाधारक व विमा कंपनी यांच्या एकमेकांवरील अत्युच्च परम विश्वासावर विमा संविदा अस्तित्वात येत असते. त्या अनुषंगाने विमाधारकाने विमा प्रस्ताव, घोषणापत्र, विमा दाव्यामध्ये सत्य माहिती नमूद करणे आवश्यक असते.
(9) सकृतदर्शनी, अपघातसमयी विमाकृत वाहन चालविणा-या व्यक्तीबद्दल तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीस सत्य माहिती दिलेली नाही, हे सिध्द होत असले तरी ती कृती विमापत्राच्या अटी व शर्तींचे मुलभूत उल्लंघन ठरणार नाही, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(10) असे दिसते की, विमाकृत वाहनाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्यामध्ये नुकसानीकरिता रु.1,23,742/- चे मुल्यनिर्धारण केले आहे. तक्रारकर्ता यांनी सर्वेक्षण अहवालाचे खंडन केलेले नाही किंवा स्वतंत्र पुरावा सादर केलेला नाही.
(11) उक्त विवेचनाअंती विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर करण्यासाठी दिलेले कारण असंयुक्तिक व अनुचित आहे. आमच्या मते, विमा कंपनीने चूक व अयोग्य कारणास्तव विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ता विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र ठरतात.
(12) तक्रारकर्ता यांनी रु.2,02,125/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. सर्वेक्षण अहवालानुसार रु.1,23,742/- चे मुल्यनिर्धारण करण्यात आलेले आहे. तक्रारकर्ता यांनी अपघातसमयी विमाकृत वाहन चालविणा-या व्यक्तीची सत्य माहिती न दिल्यामुळे विमा दावा नॉन-स्टॅन्डर्ड तत्वावर निर्णीत होणे आवश्यक आहे. त्यानुसार रु.1,23,742/- च्या 75 टक्के रक्कम म्हणजेच रु.90,807/- मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात. तसेच विमा रकमेवर व्याज मिळण्याची तक्रारकर्ता यांची विनंती पाहता विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याचा आदेश करणे न्यायोचित राहील.
(13) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(14) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.90,807/- विमा रक्कम द्यावी.
तसेच, दि.28/9/2021 पासून उक्त रक्कम अदा करेपर्यंत रु.90,807/- रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/10624)