जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 345/2019. तक्रार दाखल दिनांक : 09/12/2019. तक्रार निर्णय दिनांक : 15/09/2022.
कालावधी : 02 वर्षे 09 महिने 06 दिवस
भिमाशंकर पिता नागनाथ देवशटवार,
मालक : देवशटवार ट्रेडींग कंपनी, वय 40 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. मार्केट यार्ड, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखाधिकारी, सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक,
शाखा : मार्केट यार्ड, लातूर.
(2) शाखाधिकारी, आय.डी.बी.आय. बँक, शाखा : औसा रोड, लातूर.
(3) शाखाधिकारी, आय.डी.बी.आय. बँक, शाखा : अमुल डेअरी,
पीके चेंबर्स, अमुल डेअरी रोड, आनंद, गुजरात - 388 001.
(4) गुरुकृपा एजन्सी तर्फे मालक परेशभाई, वय सज्ञान,
व्यवसाय : व्यापार, रा. ब-6, पायनिअर शॉपींग कॉम्प्लेक्स,
सी.पी. कॉलेज रोड, आनंद, गुजरात. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अमित आर. बाहेती
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- धनंजय जी. मिटकरी
विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांचेकरिता विधिज्ञ :- आर.बी. जानते
विरुध्द पक्ष क्र.4 अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, उदरनिर्वाहाकरिता ते देवशटवार ट्रेडींग कंपनी नांवे जनरल मर्चंट व कमिशन एजंटचा व्यवसाय करतात. तक्रारकर्ता यांचे विरुध्द पक्ष क्र. 1 (यापुढे "सिध्देश्वर बँक") यांच्याकडे खाते क्र. 1017026000001 आहे. दि.1/3/2019 रोजी त्यांनी सिध्देश्वर बँकेच्या त्यांच्या खात्यातील रु.1,99,975/- हे कृष्ण मुकुंद ट्रेडींग कंपनी यांच्या विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना "आय.डी.बी.आय. बँक" संबोधण्यात येते.) येथील खाते क्र. 1830102000003070 वर आर.टी.जी.एस. द्वारे पाठविण्यासाठी प्रपत्र भरले आणि ज्यामध्ये आय.एफ.एस.सी. IBKL0001830 वर भरण्याची विनंती केली. परंतु आर.टी.जी.एस. प्रपत्र भरताना त्यांच्याकडून 8 ऐवजी 0 अशी एका अंकाची चूक झाली आणि त्यांनी चुकून खाते क्रमांक 1030102000003070 नमूद केला गेला.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, सिध्देश्वर बँकेने आय.डी.बी.आय. बँकेमार्फत प्रस्तुत रक्कम विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या खात्यावर जमा झाली. वास्तविक पाहता तक्रारकर्ता यांनी प्रपत्रामध्ये आय.एफ.एस.सी. IBKL0001830 नमूद केलेला होता. परंतु विरुध्द पक्ष क्र.3 आय.डी.बी.आय. बँकेचा आय.एफ.एस.सी. IBKL0001030 असताना सिध्देश्वर बँक व आय.डी.बी.आय. बँकेने निष्काळजीपणे विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या नांवे रक्कम पाठवली. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी दि.2/3/2019 रोजी सिध्देश्वर बँकेकडे विनंती अर्ज करुन रक्कम परत करण्याची विनंती केली असता दखल घेतली नाही. त्यानंतर दि.21/5/2019 रोजी तक्रारकर्ता यांच्या खात्यामध्ये रु.42,000/- जमा करण्यात आलेले आहेत. तसेच विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून रकमेची मागणी केली असता दखल घेण्यात आली नाही. अशाप्रकारे सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे कथन करुन रु.1,55,975/- व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा सिध्देश्वर बँक, आय.डी.बी.आय. बँक व विरुध्द पक्ष क्र.4 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(3) सिध्देश्वर बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर त्यांनी अमान्य केला आहे. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता त्यांचे ग्राहक नाहीत. तक्रारकर्ता यांनी त्यांच्यामार्फत आर.टी.जी.एस. द्वारे रक्कम पाठविण्याचा कथित व्यवहार केल्याचे त्यांना मान्य आहे. ते पुढे असे कथन करतात की, तक्रारकर्ता यांनी आर.टी.जी.एस. प्रपत्रामध्ये कृष्णा मुकूंद ट्रेडींग कंपनी, आय.डी.बी.आय. बँक, शाखा औसा रोड, अकाऊंट नं. 1030102000003070, आय.एफ.एस.सी. कोड IBKL0001830 अशी माहिती नमूद केली. आर.टी.जी.एस. प्रक्रिया पूर्ण करताना बँकींग डाटामध्ये आय.एफ.एस.सी. कोड योग्य आहे का नाही, याची खातरजमा केली जाऊ शकते. तक्रारकर्ता यांनी दिलेल्या मजकुराप्रमाणे रक्कम रु.1,99,975/- अदा करण्यात आली. त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(4) आय.डी.बी.आय. बँकेने लेखी निवेदनपत्र सादर केले असून ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता त्यांचे ग्राहक नाहीत आणि त्यांना अनावश्यक पक्षकार करण्यात आले आहे. सिध्देश्वर बँकेने एच.डी.एफ.सी. बँकेमार्फत आर.टी.जी.एस. केलेले आहे आणि एच.डी.एफ.सी. बँक आवश्यक पक्षकार आहे. ते पुढे असे कथन करतात की, तक्रारकर्ता यांनी पावतीमध्ये नमूद खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी. कोडमध्ये खाडाखोड केलेली आहे. तक्रारकर्ता यांनी प्रपत्र भरताना भारतीय रिझर्व बँकेच्या परिपत्रक क्र. RBI/2010-11/235/DPSS (C) EPPD No. 863/04-03-01/2010-11, Dt 14/10/2010 प्रमाणे कार्यवाही केलेली नाही. ते पुढे असे कथन करतात की, विरुध्द पक्ष क्र.3 आय.डी.बी.आय. बँकेने विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या खात्यातील रु.42,399/- hold ठेवून खात्यावर उर्वरीत रु.1,57,975/- चे lien ठेवले. तसेच विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडून लेखी हमीपत्र स्वीकारुन तक्रारकर्ता यांच्या खात्यामध्ये रु.42,000/- जमा केले आहेत. विरुध्द पक्ष क्र.3 आय.डी.बी.आय. बँकेने सर्व मदत केलेली आहे. त्यांची चूक किंवा त्रुटी केलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(5) विरुध्द पक्ष क्र.4 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले आणि लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. सर्वप्रथम हे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्ता यांचे सिध्देश्वर बँकेमध्ये खाते आहे आणि कथित व्यवहारामध्ये विरुध्द पक्ष क्र.3 आय.डी.बी.आय. बँकेचा सहभाग असल्यामुळे तक्रारकर्ता त्यांचे "ग्राहक" ठरतात.
(8) तक्रारकर्ता यांनी दि.1/3/2019 रोजी त्यांच्या सिध्देश्वर बँकेमध्ये असणा-या खाते क्र. 1017026000001 मधून रु.1,99,975/- आर.टी.जी.एस. द्वारे कृष्ण मुकुंद ट्रेडींग कंपनी यांच्या आय.डी.बी.आय. बँकेच्या खाते क्र. 1830102000003070 आय.एफ.एस.सी. IBKL0001830 करिता प्रपत्र भरताना 8 ऐवजी 0 अशी एका अंकाची चूक झाल्यामुळे रक्कम विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या खात्यामध्ये गेली, हे विवादीत नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 आय.डी.बी.आय. बँकेच्या प्रयत्नांअंती रु.42,000/- तक्रारकर्ता यांच्या खात्यामध्ये परत करण्यात आले, हे विवादीत नाही. यावरुन हे स्पष्ट होते की, आर.टी.जी.एस. प्रपत्र भरताना तक्रारकर्ता यांच्याकडून लाभार्थ्याचा योग्य खाते क्रमांक भरण्यामध्ये चूक झालेली होती आणि त्यामुळे रक्कम लाभार्थ्याऐवजी अन्य व्यक्तीच्या नांवे हस्तांतरीत झाली. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांनी प्रपत्रामध्ये आय.एफ.एस.सी. IBKL0001830 नमूद केलेला होता; परंतु विरुध्द पक्ष क्र.3 आय.डी.बी.आय. बँकेचा आय.एफ.एस.सी. IBKL0001030 असताना सिध्देश्वर बँक व आय.डी.बी.आय. बँकेने निष्काळजीपणे विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या नांवे रक्कम पाठवली. अभिलेखावर दाखल करण्यात आलेल्या भारतीय रिझर्व बँकेच्या परिपत्रकाचे अवलोकन केले असता रक्कम अदा करण्यासाठी खाते क्रमाकांवर विश्वास ठेवलेला दिसून येतो. वाद-तथ्ये व अनुषंगिक पुरावे पाहता सिध्देश्वर बँक व आय.डी.बी.आय. बँकेने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होत नाही. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत. मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-