न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती रोहिणी बा. जाधव, सदस्य
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 व 14 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार यांचे जाबदार बँकेत खाते आहे. तक्रारदारांनी जाबदार बँकेत दि. 15/3/2019 रोजी फेडरल बँक, शाखा कराड या बँकेचा चेक क्र. 018366 हा रक्कम रु. 2,75,000/- चा त्यांचे खाते क्र. 50150085232658 वर भरला होता. तदनंतर तक्रारदारांनी सदर चेकबाबत जाबदार यांचेकडे सात ते आठ वेळा चौकशी केली. परंतु जाबदारांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रारदारांनी जाबदार यांना दि. 22/5/2019 रोजी लेखी अर्जाने सदरचा चेक परत मिळणेबाबत चौकशी केली. परंतु जाबदार यांनी त्यास लेखी उत्तर दिले नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदार यांना वर नमूद चेक परत केलेला नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदार बँकेला दि.12/6/2019 रोजी रक्कम रु. 2,75,000/- चा मूळ चेक क्र. 018366 परत मिळावा म्हणून दि. 12/6/2019 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु सदर नोटीसीस जाबदार यांनी दि. 27/6/2019 ची खोटी उत्तरी नोटीस पाठवून मूळ चेक परत केलेला नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास अनुचित व्यापारी व्यवहार केला आहे तसेच सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून चेकची रक्कम रु.2,75,000/- मिळावी, सदर रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज मिळावे, शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- जाबदारांकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत जाबदार बँकेत चेक जमा केल्याच्या पावतीची प्रत, जाबदार यांनी दिलेल्या स्टेटमेंटची प्रत, तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेल्या अर्जाची प्रत तसेच नोटीसची प्रत, सदर नोटीसीस जाबदारांनी दिलेले उत्तर, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
4. जाबदार क्र.1 व 2 यांनी याकामी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारीतील मजकूर परिच्छेदनिहाय नाकारला आहे. तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार यांचे बचत खाते क्र. 50150085232658 जाबदार बँकेचे मलकापूर कराड शाखेमध्ये दि. 12/5/2016 रोजी उघडण्यात आले होते. दि. 15/3/2019 रोजी तक्रारदाराने सदर शाखेत श्री महेश जाधव यांनी तक्रारदारांना दिलेला रक्कम रु. 2,75,000/- चा दि.11/3/2019 रोजीचा चेक क्र. 018366 जमा केला होता. सदरचा चेक जाबदार यांनी ताबडतोब त्याचदिवशी वटविण्यासाठी पाठविला होता. तथापि श्री महेश जाधव यांचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदरचा चेक दि. 16/3/2019 रोजी न वटता परत आला. तदनंतर जाबदार यांनी तक्रारदारास भ्रमणध्वनीवरुन सदरची बाब अनेकवेळा कळविली होती. तथापि तक्रारदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जाबदार बँकेने तक्रारदार यांचे पत्त्यावर तक्रारदार यांचे खात्यावर जमा केलेला चेक व रिटर्न मेमो कुरियरने पाठविला. परंतु सदरचे पत्त्यावर तक्रारदार मिळून येत नसलेबाबतचा शेरा मारुन सदरचे कुरियर परत आले. जाबदार बँकेने तक्रारदार यांना त्यांचे भ्रमणध्वनीवरुन अनेकवेळा संपर्क करुन संपर्क न झाल्याने जाबदार यांनी पुन्हा दि. 25/3/2019 रोजी कुरियरद्वारे सदरचा चेक पुन्हा तक्रारदार यांना पाठविला. तदनंतर कुरियर कंपनीने दि. 2/6/2019 रोजी पत्र पाठवून जाबदार बँकेला कळविले की, सदर कागदपत्रे गहाळ झालेली आहेत व त्याबाबत कुरियर कंपनीने कराड पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. जाबदार बँकेने तक्रारदारांना दि. 27/6/2019 च्या पत्राद्वारे सदरची बाब कळविलेली आहे. तक्रारदारांनी दिलेल्या नोटीसीस जाबदारांनी उत्तर दिलेले आहे. जाबदार बँक व कुरियर कंपनी यांचेमध्ये झालेल्या करारानुसार कुरियर कंपनीचे चुकीमुळे जाबदार बँकेचे जर नुकसान झाले तर त्यास कुरियर कंपनी जबाबदार राहील असे करारात नमूद आहे. सबब, कुरियर कंपनीस पक्षकार केल्याशिवाय प्रस्तुतची तक्रार चालू शकत नाही. जाबदार बँकेत असलेल्या ॲटोमेटेड एस.एम.एस. द्वारे तक्रारदार यांस वेळोवेळी भ्रमणध्वनीवर सूचना केली असतानाही तक्रारदार याने जाबदार बँकेत येवून चेक व रिटर्न मेमो घेवून जाण्याचा प्रयत्न केला नाही. यावरुन तक्रारदाराचा निष्काळजीपणा दिसून येतो. कुरियर कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत जाबदार बँकेस जबाबदार धरण्यात येवू नये. सबब, जाबदार यांनी सेवा देण्यात कोणतीही त्रुटी केली नसल्याने तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार यांनी केली आहे.
5. जाबदार यांनी याकामी शपथपत्र, कागदयादीसोबत मुखत्यारपत्राची प्रत, कुरिअरची पावती, कुरिअर कंपनीने पोलिस स्टेशनला दिलेली फिर्याद, जाबदार बँकेने कुरियर कंपनीस पाठविलेले पत्र, जाबदारांनी तक्रारदारास दिलेली उत्तरी नोटीस इ. कागदपत्रे दाखल केले आहेत. तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र, युक्तिवाद तसेच जाबदार क्र.1 व 2 यांचे म्हणणे, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार बँकेने तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार जाबदार बँकेकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदार यांचे जाबदार बँकेत खाते असून त्याचा क्र. 50150085232658 आहे. तक्रारदार हे जाबदार यांचे खातेदार आहेत ही बाब जाबदारांना मान्य आहे. तक्रारदारांनी जाबदार बँकेत दि. 15/3/2019 रोजी फेडरल बँक, शाखा कराड या बँकेचा चेक क्र. 018366 चा रक्कम रु. 2,75,000/- चा त्यांचे खातेवर भरला होता व तो न वटता परत आला. सदरची बाब जाबदार यांनी मान्य केली आहे. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदारांनी जाबदार बँकेत दि. 15/3/2019 रोजी फेडरल बँक, शाखा कराड या बँकेचा चेक क्र. 018366 चा रक्कम रु. 2,75,000/- चा त्यांचे खातेवर भरला होता. तदनंतर तक्रारदारांनी सदर चेकबाबत जाबदार यांचेकडे सात ते आठ वेळा चौकशी केली. परंतु जाबदारांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदार यांना वर नमूद चेक परत केलेला नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता असे दिसून येते की, तक्रारदाराने जाबदार बँकेत भरलेला चेक हा न वटता परत आलेला होता. तक्रारदारांना यासंबंधीचा रिटर्न मेमो मिळाला असे तक्रारदारांनी बँकेला दिलेल्या दि. 22/5/2019 च्या अर्जात मान्य केले आहे. सदरील चेक दि. 16/3/2019 रोजी न वटता परत आल्यानंतर जाबदार यांनी तक्रारदार चौकशीकरिता आले तेव्हा अथवा फोन द्वारे, मेसेजद्वारे याबाबत त्यांना कळविल्याचे दिसून येत नाही. जाबदार बँकेने लगेचच सदर चेक कुरियरने दि. 18/3/2019 रोजी तक्रारदाराचे पत्त्यावर पाठवून दिला. परंतु तक्रारदार त्यांचे पत्त्यावर मिळून न आल्याने सदरचा चेक जाबदार बँकेकडे परत आला. त्यानंतरही बँकेने तक्रारदारांना फोनद्वारे संदेश न देता किंवा मेसेज न पाठवता चेक दि. 25/3/2019 रोजी पुन्हा कुरियरने पाठवून दिला व तो चेक कुरियर कंपनीद्वारे गहाळ झाला. वास्तविक, तक्रारदार हे वेळोवेळी चेकसंदर्भात चौकशी करण्यासाठी जाबदार बँकेमध्ये गेले होते. त्यावेळी चेक संदर्भातील संपूर्ण माहिती देण्याची जबाबदारी जाबदार बँकेवर तक्रारदार हे त्यांचे खातेदार असल्याने होती. परंतु प्रत्यक्षात जाबदार बँकेने तक्रारदार हे समक्ष चौकशी करिता गेले असता उडवाउडवीची उत्तरे दिली व संबंधीत चेक कुरियरने, तक्रारदारांना त्याबाबतची कोणतीही लेखी अथवा तोंडी समज न देता तक्रारदारांचे पत्त्यावर पाठवून दिला. वास्तविक पाहता, जाबदार बँकेने तक्रारदाराला चेक कुरियरने पाठविण्यापेक्षा समक्ष घ्यायला येण्यासाठी कळविणे आवश्यक होते. तक्रारदारांने चेक जमा केल्यानंतर दोन-तीन दिवसांनी बॅंकेत चौकशीसाठी गेले असता बँकेने 2 ते 3 दिवसांत कळवितो असे तक्रारदारास सांगितले. परंतु त्यावेळी जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास वादातील मूळ चेक हा कुरियरमार्फत पाठविला आहे हे तक्रारदारास सांगितले नाही. यावरुन जाबदार यांनी वादातील चेकच्या संदर्भात तक्रारदारासोबत बेजबाबदारपणे वर्तन केले आहे व त्यांना सेवा देण्यात त्रुटी केल्याचे कागदोपत्री पुराव्यावरुन शाबीत होत आहे. तक्रारदाराने जाबदार बँकेत चेक जमा केल्यानंतर दुस-या दिवशीच डिसऑनर झाला होता व तिस-याच दिवशी जाबदार बँकेने कुरियरने पाठवूनही दिला होता. तक्रारदाराला वारंवार सूचना देऊनही तक्रारदाराने न वटलेला चेक नेलेला नाही असे कुठलेही कथन जाबदारने केलेले नाही. जाबदार बँकेने तक्रारदारास कुरियरने चेक पाठवला व तो गहाळ झाला. जाबदार बँकेने दि.27/6/2019 च्या पत्राद्वारे तक्रारदारांना चेक न वटता परत आल्याबाबत सांगितले असल्याचे व सदरचे पत्र मे. आयोगात दाखल केल्याचे म्हणण्यामध्ये कथन केले आहे. परंतु तसे कोणतेही पत्र दिसून येत नाही. सदरच्या सर्व बाबी विचारात घेता जाबदार बँकेने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडलेली नाही ही बाब शाबीत होते. सबब, जाबदार बँकेने तक्रारदारास न वटलेला चेक परत न करुन सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
10. जाबदार यांचे कथनानुसार, तक्रारदाराने कुरियर कंपनीला याकामी पक्षकार करणे गरजेचे आहे. परंतु जाबदारचे एकूण कथन पाहता, तक्रारदार व कुरियर कंपनी यांचेमध्ये कोणतेही Privity of contract नाही. तक्रारदार हा जाबदार बँकेचा ग्राहक आहे, कुरियर कंपनीचा नाही. कुरियर सेवेबाबत जाबदार बँक व कुरियर कंपनी यांचेमध्ये करार झालेला आहे, त्याचेशी तक्रारदाराचा कोणताही संबंध नाही. जाबदार बँकेने सदर कराराची प्रत म्हणण्यासोबत दाखल केली असल्याचे त्यांचे म्हणण्यात कथन केले आहे, परंतु प्रत्यक्षात दाखल केलेली नाही. सबब, कुरियर कंपनीस या कामी पक्षकार करणेची आवश्यकता नाही असे या आयोगाचे मत आहे.
मुद्दा क्र.3
11. जाबदार यांनी दि. 2/1/2024 च्या कागदयादीसोबत अ.क्र. 2 ला दाखल केलेल्या दि. 25/3/2019 च्या प्रोफेशनल कुरियरच्या पावतीवरुन चेक कुरियर केल्याचे दिसून येते. कुरियर कंपनीने जाबदार बँकेला पाठविलेल्या दि. 2/6/2019 च्या चेक गहाळ झाल्यासंबंधीच्या, दि. 2/1/2024 च्या कागदयादीसोबत दाखल केलेल्या अ.नं.5 चे पत्रावरुन व पोलिसांनी दिलेल्या दि. 2/1/2024 च्या कागदयादीसोबत दाखल केलेल्या नं.3 च्या दि. 3/7/2019 च्या दाखल्यावरुन, गहाळ झालेला चेक मिळून आलेला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर चेक तक्रारदारास परत करण्याचे आदेश करता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे. परंतु जाबदार बँकेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 15,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. वादातील चेक हा गहाळ झाला असल्यामुळे सदर चेकसंबंधी आदेश करता येणार नाही.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार बँकेने तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 15,000/- अदा करावी.
- जाबदार बँकेने तक्रारदारास तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकाल तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.