जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 13/2021. तक्रार दाखल दिनांक : 07/01/2021. तक्रार निर्णय दिनांक : 29/11/2022.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 22 दिवस
सौ. सुलोचना माधव चन्नागिरे, वय 65 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. नांदगाव, ता. चाकूर, जि. लातूर., ह.मु. खंदाडे यांचा वाडा,
मसोबा नगर, सारोळा चौक, नांदेड रोड, लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
शाखाधिकारी, महेश अर्बन को-ऑप. बँक लि.,
शाखा : पाण्याच्या टाकीजवळ, बार्शी रोड, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- आर.एन. कांबळे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- मंगेश एस. महिंद्रकर
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, त्यांचे विरुध्द पक्ष (यापुढे "महेश बँक") यांच्याकडे खाते क्रमांक 008007300007124 आहे. दि.14/9/2020 रोजी त्यांच्या खात्यामध्ये रु.11,32,811.60 पैसे जमा होते. दि.30/9/2020 रोजी त्यांच्या खात्यामध्ये रु.2,356.60 पैसे दिसून आले. चौकशीअंती त्यांच्या संमतीशिवाय महेश बँकेने खात्यातून रु.11,31,559/- वळते केल्याचे / उचलल्याचे निदर्शनास आले. विनंती अर्ज देऊन व विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून रकमेची मागणी केली असता महेश बँकेने दखल घेतली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.11,31,559/- व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.20,000/- देण्याचा; आर्थिक त्रासाकरिता रु.20,000/- देण्याचा व सूचनापत्र खर्च रु.5,000/- देण्याचा महेश बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(2) महेश बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांचे कथन असे की, खात्यावरील रक्कम वळविण्याकरिता / उचलण्याकरिता तक्रारकर्ती प्रत्यक्ष आल्या होत्या. त्यांनी रक्कम उचलण्याकरिता धनादेशाचा वापर केला होता. धनादेश, खातेदाराची स्वाक्षरी, स्वत: खातेदार इ. पडताळणी करुन व्यवहार पूर्ण केला. कथित व्यवहार आर.टी.जी.एस. च्या माध्यमातून धनादेशाद्वारे पूर्ण झालेला आहे आणि तो पारदर्शक आहे. तसेच त्यांच्या खात्यावरील रक्कम त्यांच्या स्वत:च्या, मुलाच्या व पतीच्या संयुक्त खात्यामध्ये वर्ग झालेली आहे. अन्य ति-हाईक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. त्यांनी नियमबाह्य नोंदी किंवा व्यवहार केलेले नाहीत. अंतिमत: तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, महेश बँकेचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) महेश बँकेने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येत आहे. प्रामुख्याने, तक्रारकर्ती यांचे महेश बँकेमध्ये बचत खाते आहे, याबद्दल विवाद नाही. ग्राहक वादाच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांचे कथन असे की, महेश बॅंकेकडे चौकशी केली असता त्यांच्या संमतीशिवाय खात्यातून रु.11,31,559/- वळविलेली / उचललेली दिसून आले. उलटपक्षी, महेश बँकेचे कथन असे की, तक्रारकर्ती यांनी धनादेशाद्वारे आर.टी.जी.एस. च्या माध्यमातून कथित व्यवहार पूर्ण केलेला आहे; धनादेश, खातेदाराची स्वाक्षरी, स्वत: खातेदार इ. पडताळणी करुन व्यवहार पूर्ण झाला आणि तो पारदर्शक आहे; तसेच तक्रारकर्ती यांनी खात्यावरील रक्कम त्यांच्या स्वत:च्या, मुलाच्या व पतीच्या संयुक्त खात्यामध्ये वर्ग केलेली असल्यामुळे महेश बँकेने नियमबाह्य नोंदी किंवा व्यवहार केलेले नाहीत.
(5) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती यांचे नांव व स्वाक्षरी असलेल्या धनादेश क्र. 300009, दि.15/9/2020, रु.11,31,559/- द्वारे गणेश माधव चन्नागिरे यांच्या नांवे आर.टी.जी.एस. प्रणालीने हस्तांतरीत केल्याचे दिसते. महेश बँकेद्वारे दाखल केलेल्या कागदपत्रांचे तक्रारकर्ती यांचे विधिज्ञांनी खंडन केले आणि दि.15/9/2020 रोजीचा धनादेश क्र. 300009 व आर.टी.जी.एस. प्रपत्रावर तक्रारकर्ती यांनी स्वाक्ष-या केलेल्या नाहीत आणि त्या महेश बँकेने केलेल्या आहेत, असा युक्तिवाद केला. मात्र खाते उघडण्याचे प्रपत्र, व्यक्तिगत माहिती प्रपत्र व अन्य धनादेशावर केलेल्या स्वाक्ष-या तक्रारकर्ती यांच्या असल्याचे त्यांनी मान्य केले. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता तक्रारकर्ती यांच्या स्वाक्ष-यांमध्ये सुसंगतता व साम्य आढळते. तक्रारकर्ता यांच्या स्वाक्ष-यांमध्ये तफावत किंवा भिन्नता आढळते किंवा संशय निर्माण होतो, असे दिसत नाही. तक्रारकर्ती यांचा पुढे युक्तिवाद असा की, धनादेश महेश बँकेच्या ताब्यात होता आणि महेश बँकेने धनादेशाचा दुरुपयोग केला. असे दिसते की, धनादेश क्र.300009 द्वारे आर.टी.जी.एस. प्रणालीने रु.11,31,559/- गणेश माधव चन्नागिरे यांना हस्तांतरीत केले आहेत. तक्रारकर्ती यांच्या कथनाची दखल घेतली असता गणेश माधव चन्नागिरे यांना रु.11,31,559/- हस्तांतरीत करण्यामागे महेश बँकेचा हेतू काय ? याची स्पष्टता नाही. उलटपक्षी, तक्रारकर्ती यांनी धनादेशाद्वारे स्वत:च्या, मुलाच्या व पतीच्या नांवे रक्कम हस्तांतरीत केली, असे महेश बँकचे प्रतिपादन आहे. गणेश माधव चन्नागिरे व तक्रारकर्ती यांचे नाते काय ? यासंबंधी तक्रारकर्ती यांनी विवेचन केलेले नाही. तक्रारकर्ती यांच्या स्वाक्ष-या करुन महेश बँकेने त्यांच्या खात्यातून रक्कम वळविलेली / उचललेली, असे कथन असल्यामुळे त्यांचे कथन फौजदारी गुन्ह्याचे स्वरुप निर्देशीत करते. त्यामुळे संबंधितांविरुध्द काय कायदेशीर कार्यवाही केली, हे तक्रारकर्ती यांनी स्पष्ट केलेले नाही. इतकेच नव्हेतर, ग्राहक तक्रार किंवा शपथपत्रामध्ये महेश बँकेने तक्रारकर्ती यांच्या धनादेशाचा दुरुपयोग करुन व स्वाक्ष-या करुन रक्कम उचलली किंवा वळती केली, असे नमूद नाही. तक्रारकर्ती यांच्या संमतीशिवाय धनादेशाद्वारे व आर.टी.जी.एस. प्रणालीद्वारे गणेश माधव चन्नागिरे यांच्या नांवे रु.11,31,559/- हस्तांतरीत केले, असा उचित पुरावा नसल्यामुळे कथित व्यवहार महेश बँकेने नियमबाह्य प्रक्रियेद्वारे केल्याचे किंवा त्याकरिता दोषी असल्याचे सिध्द होत नाही. महेश बँकेने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ती अनुतोषास पात्र नाहीत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-