जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
किरकोळ अर्ज क्रमांक : 2/2021. आदेश दिनांक : 18/08/2022.
संजीवनी उत्तम ढगे, वय 40 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. चिंचोली (भंगार), ता. निलंगा, जि. लातूर. अर्जदार
विरुध्द
शाखाधिकारी, पेन्शन तथा समुह विमा विभाग,
औरंगाबाद विभागीय युनीट, भारतीय आयुर्विमा महामंडळ,
जीवन प्रकाश, अदालत रोड, औरंगाबाद - 431 001. प्रतिपक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. प्रमोद एल. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. सतिश गोविंद दिवाण
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) अर्जदार यांच्याद्वारे दाखल करण्यात येणा-या ग्राहक तक्रारीकरिता झालेला विलंब क्षमापित होण्याकरिता प्रस्तुत किरकोळ अर्ज सादर करण्यात आलेला असून 52 दिवसाचा विलंब क्षमापीत करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
(2) अर्जदार यांचे कथन असे की, त्यांच्या पतीच्या मृत्यूपश्चात आम आदमी विमा योजनेंतर्गत सादर केलेल्या दाव्यामध्ये प्रतिपक्षाने केवळ रु.30,000/- अदा केले आणि उर्वरीत रु.45,000/- देण्याचे टाळले आहे. त्यामुळे दि.29/10/2018 रोजी त्यांनी नोंदणीकृत डाकेद्वारे सूचनापत्र पाठविले असता प्रतिपक्षाने प्रस्तावाची दुय्यम संचिका मागवून घेतली. अर्जदार यांनी दि.7/1/2019 रोजी प्रस्तावाची दुय्यम संचिका पाठविल्यानंतर दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे दि.5/2/2019 रोजी चौकशी केली असता रु.45,000/- ची मागणी नामंजूर केल्याचे प्रतिपक्षाने सांगितले. वादकारण दि.7/1/2019 रोजी निर्माण झाल्याचे ग्राह्य धरले असता ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी त्यांना 52 दिवसांचा विलंब झालेला आहे. कोरोणा प्रादुर्भाव व कर्त्या व्यक्तीअभावी त्यांना विहीत मुदतीमध्ये ग्राहक तक्रार करण्यासाठी विलंब झाला आणि तो क्षमापित करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
(3) प्रतिपक्षाने लेखी निवेदन सादर केले असून अर्जदार यांच्या अर्जातील कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, अर्जदार यांचे पती मयत उत्तम रामचंद्र ढगे यांचा मृत्यू अपघातामध्ये झालेला नसून पूर्वनियोजीन खुन होता. त्यामुळे अर्जदार यांना अपघाती मृत्यू दाव्याचा लाभ मंजूर करता येत नाही आणि नैसर्गिक मृत्यू दाव्याकरिता रु.30,000/- दि.10/9/2018 रोजी अर्जदार यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले. प्रतिपक्षाने अपघाती दावा देय नसल्याबाबत तहसीलदार व अर्जदार यांना पत्र पाठवून दि.18/7/2019 रोजी कळविलेले आहे. अंतिमत: अर्जदार यांचा अर्ज रद्द करण्यात यावा, अशी विनंती प्रतिपक्षाद्वारे केलेली आहे.
(4) उभय पक्षांचे निवेदन विचारात घेतले. आम आदमी विमा योजनेंतर्गत अर्जदार यांचे पती मयत उत्तम रामचंद्र ढगे यांचा दावा प्रतिपक्षाद्वारे निर्णयीत करुन अर्जदार यांना रु.30,000/- अदा केले, ही बाब विवादीत नाही. असे दिसते की, मयत उत्तम रामचंद्र ढगे यांचा नैसर्गीक मृत्यू ग्राह्य धरुन प्रतिपक्षाने दावा निर्णयीत केला आणि अपघाती दाव्याचे लाभ नामंजूर केले आहेत. अर्जदार यांच्या कथनानुसार त्यांनी प्रतिपक्षांच्या कार्यालयामध्ये विचारणा केली असता रु.45,000/- ची मागणी नामंजूर केल्याचे सांगण्यात आले. प्रतिपक्ष नमूद करतात की, दि.18/7/2019 रोजीच्या पत्राद्वारे तहसीलदार व अर्जदार यांना अपघात दावा लाभ देय नसल्याचे कळविले आहे. दि.18/7/2019 रोजीचे पत्र अभिलेखावर दिसून येत नाही. परंतु अपघाती दाव्याचे अपघाती लाभ दि.18/7/2019 रोजीच्या पत्राद्वारे नामंजूर करण्यात आलेले आहेत, असे प्रतिपक्षाने निवेदन असल्यामुळे देय अपघाती लाभासंबंधी निर्माण झालेले वादकारण दि.18/7/2019 रोजी उदभवलेले आहे. अर्जदार यांनी जिल्हा आयोगापुढे दि.9/3/2021 रोजी ग्राहक तक्रार सादर केलेली आहे. अशा स्थितीमध्ये अर्जदार यांची ग्राहक तक्रार मुदतबाह्य होणार नाही, असे जिल्हा आयोगाचे मत आहे. त्या अनुषंगाने अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येतो. मुळ ग्राहक तक्रार नोंदविण्यासंबंधी कार्यवाही करण्यात यावी आणि प्राथमिक सुनावणीकरिता दैनंदीन फलकावर घ्यावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-