जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 138/2022. तक्रार दाखल दिनांक : 29/04/2022. तक्रार निर्णय दिनांक : 08/02/2024.
कालावधी : 01 वर्षे 09 महिने 10 दिवस
दुर्गेश्वरी मार्केटींग ॲन्ड एजन्सी प्रा. लि. तर्फे
अधिकृत प्रतिनिधी : नितेश दामोदर अग्रवाल, वय 47 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. नांदेड रोड, डालडा फॅक्टरी कंपाऊंड,
माशाळकर हॉस्पिटलजवळ, लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. तर्फे शाखाधिकारी,
मालू कॉम्प्लेक्स, हनुमान चौक, लातूर.
(2) मुख्य व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कं. लि., 3, मिडल स्टोन स्ट्रीट,
प्रफुलचंद सरानी, कोलकाता, पश्चिम बंगाल - 700 071. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अमित आर. बाहेती
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. सुरेश जी. डोईजोडे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, तक्रारकर्ती ही दुर्गेश्वरी मार्केटींग ॲन्ड एजन्सी प्रा. लि. (यापुढे "दुर्गेश्वरी कंपनी") नांवे नोंदणीकृत कंपनी असून त्यांच्यातर्फे नितेश अग्रवाल यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे. दुर्गेश्वरी कंपनीने विरुध्द पक्ष (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे त्यांच्या व्यवसाय पेढीचा विमापत्र क्र. 271401591710000320 अन्वये विमा उतरविलेला होता. दि.2/1/2019 ते 3/1/2019 च्या मध्यरात्री दुर्गेश्वरी कंपनीच्या दुकानामध्ये चोरी होऊन रु.54,47,200/- किंमतीचे गोल्ड फ्लॅक प्रिमियम व अन्य सिगारेट खोके चोरीस गेले. घटनेबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. दुर्गेश्वरी कंपनीने विमा कंपनीस घटनेची माहिती दिल्यानंतर विमा कंपनीद्वारे नियुक्त सर्वेक्षक श्री. नगरकर यांनी घटनास्थळाची पाहणी करुन रु.51,65,612/- नुकसान झाल्याचे मत मांडले. त्यानंतर दुर्गेश्वरी कंपनीने विमा कंपनीकडे वेळोवेळी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र विमा कंपनीने विमा रक्कम अदा केली नाही आणि ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. उक्त कथनांच्या अनुषंगाने सिगारेटचे मुल्य रु.54,47,200/-, त्यावरील व्याज रु.16,47,778/-, मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.1,00,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.50,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करावा, अशी विनंती दुर्गेश्वरी कंपनीने केलेली आहे.
(2) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर विमा कंपनीने अमान्य केला. दुर्गेश्वरी कंपनीने घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी नियुक्त केलेले सर्वेक्षक श्री. नगरकर यांनी घटनास्थळाची पाहणी करुन अंतिम अहवाल सादर केला. मात्र श्री. नगरकर यांनी चुक व जास्त नुकसान दर्शविले. दुर्गेश्वरी कंपनीने दाखल केलेली ग्राहक तक्रार अपरिपक्व असून त्यांच्याविरुध्द वादकारण घडलेले नाही. दुर्गेश्वरी कंपनीचा विमा प्रस्ताव कागदपत्रांअभावी प्रलंबीत आहे. त्यांनी सेवा पुरविण्यामध्ये त्रुटी किंवा चुक केलेली नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) दुर्गेश्वरी कंपनीची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विमा कंपनीने दुर्गेश्वरी कंपनीस द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने दुर्गेश्वरी कंपनी अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, दुर्गेश्वरी कंपनीने त्यांच्या व्यवसाय पेढीचा विमा कंपनीकडे कथित विमा उतरविल्याबद्दल, व्यवसाय पेढीमध्ये झालेली चोरी झाल्याबद्दल, विमा कंपनीस घटनेची माहिती दिल्याबद्दल, विमा कंपनीने सर्वेक्षकांची नियुक्ती केल्याबद्दल, सर्वेक्षकांनी सर्वेक्षण अहवाल सादर केल्याबद्दल व विमा कंपनीकडे दुर्गेश्वरी कंपनीचा विमा दावा प्रलंबीत असण्याबद्दल उभयतांमध्ये मान्यस्थिती आहे.
(5) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता विमा कंपनीने वेळोवेळी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली असतानाही विमा कंपनीने विमा रक्कम अदा केली नाही, असा दुर्गेश्वरी कंपनीचा मुख्य वाद आहे. उलटपक्षी, दुर्गेश्वरी कंपनीचा विमा प्रस्ताव कागदपत्रांअभावी प्रलंबीत आहे आणि त्यांची ग्राहक तक्रार अपरिपक्व असून त्यांनी सेवा पुरविण्यामध्ये त्रुटी किंवा चूक केलेली नाही, असा विमा कंपनीचा प्रतिवाद आहे.
(6) हे सत्य आहे की, प्रस्तुत ग्राहक तक्रार प्रलंबीत असताना विमा कंपनीने दाव्याच्या अनुषंगाने पूर्ण व अंतिम मान्यतेने दुर्गेश्वरी कंपनीस रु.39,12,445/- विमा रक्कम देऊ केली. मात्र दुर्गेश्वरी कंपनीतर्फे कायदेशीर हक्क राखून व सनिषेध विमा रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली असता विमा कंपनीने उक्त रक्कम दिलेली नाही.
(7) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता विमा कंपनीतर्फे दि.29/3/2019 चा सर्वेक्षक एम.बी. नगरकर ॲन्ड कंपनी यांचा नुकसानीचे निर्धारण करणारा अहवाल दाखल केलेला आहे. सर्वेक्षण अहवालामध्ये अट क्र.7 चा आधार घेऊन सर्वेक्षकांनी The Sum-Insured for Stock-in-Trade is Rs.1,25,00,000/- While the value of stock of the date of loss was Rs.1,31,92,193/- (Please refere Exhibit No.XI). The under insurance is 5.25% नमूद करुन एकूण नुकसानीची निर्धारण रक्कम रु.54,62,387/- मधून Under-insurance @5.25% रु.2,86,775/- वजावट करुन रु.51,75,612/- नुकसान दर्शविलेले दिसते.
(8) विमा दाव्याच्या अनुषंगाने दुर्गेश्वरी कंपनी व विमा कंपनी यांच्यामध्ये ई-मेलद्वारे संपर्क झाल्याचे निदर्शनास येते. ई-मेल संपर्कामध्ये रु.1.63 कोटी रकमेचा माल असल्याबद्दल विमा कंपनीने नमूद केले. उलटपक्षी, लातूर शाखेच्या खात्यानुसार 2 गोदाम असून त्यापैकी एक आय.टी.सी. व दुसरे हल्दीराम आहे आणि आय.टी.सी. गोदामातील माल क्षतीग्रस्त झाल्याचे दुर्गेश्वरी कंपनीने नमूद केले. तसेच विमा कंपनीने दि.19/1/2021 रोजी दुर्गेश्वरी कंपनीस संबंधीत पूर्तता करण्यास ई-मेलद्वारे कळविल्याचे व त्याकरिता दुर्गेश्वरी कंपनीने प्रतिसाद दिल्याचे दिसते.
(9) विमा कंपनीने अभिलेखावर एम.बी. नगरकर ॲन्ड कंपनी यांचे दि.21/9/2022 रोजीचे परिशिष्ट दाखल केले असून ज्यामध्ये रु.39,12,445/- रकमेचे सुधारीत नुकसान दर्शविले आहे. त्यामध्ये सुधारीत नुकसानीचे निर्धारण करण्यासंबंधी सर्वेक्षकांचे विवेचन खालीलप्रमाणे आहे.
On 21/08/2022 the undersigned visited Latur and had a meeting with Mr. Nitesh Agarwal (Director of the Insured), Mr. Vijay Pastapure (Divisional Manager, Solapur DO). We visited the current godown of Mr. Nitesh Agarwal, who stated that, he had closed Durgeshwari Marketing Agencies Pvt.Ltd. after the incidence of burglary, and started same business under new name M/s. Shakambhari Agencies, at Kolhe Nagar, Near Ganpati Mandir, Latur. In the said new firm also the Insured is having distributorship of ITC and Haldiram products.
The undersigned requested Mr. Nitesh Agarwal to show the location of godown where the stock of Haldiram products was stated to have been stored on the date of loss. Accordingly Mr. Nitesh Agarwal and the undersigned visited there. The address of same was "H-82, MIDC, Kalamb Road, Latur". It was observed that, the said location was used as godown of "Penna Cement" on the day of our visit.
Mr. Nitesh Agarwal introduced me to Mr. Subhash Appa Khanapure stating that, he was the landlord of "H-82, MIDC, Kalamb Road, Latur". Mr. Khanapure confirmed that, on the date of loss Mr. Nitesh Agarwal used to store his stock at the said location and used to pay the rent every month by cheque. However, there was no Lease Agreement or Rent Receipt in support of the said transaction. Thus the Insured was not having documentary evidence of separate godown for the stock of Haldiram products.
Mr. Nitesh Agarwal stated that, he had not taken separate insurance policy for the location, "H-82, MIDC, Kalamb Road, Latur".
We have verified the GST Registration Certificate of the Insured. From the same it was observed that, there was no mention of location of "H-82, MIDC, Kalamb Road, Latur" as place of business.
Mr. Nitesh Agarwal stated that, the Policy No. 271401591710000320 was taken for stock of ITC products only. But in the policy it is no where it is mentioned that, the Sum-Insured of Rs.1,25,00,000/- was for stock of ITC products only. Therefore, it appears that, the said sum- insured is for all the items of stock the Insured was dealing in. In other words the Sum-Insured of Rs.1,25,00,000/- was for stock of ITC products as well as for Haldiram products.
As per Trading Account for the period from 01/04/2018 to 02/01/2019 (Please refer Exhibit-A) the total value of stock of Haldiram products as on the date of loss was Rs. 33,29,348.60 excluding GST. We requested the Insured to submit the detailed item wise list of the same including GST. But the Insured did not submitted the same. Under such circumstances we have assumed that, the composition of stock of Haldiram Sweets and Haldiram Namkeen was 50:50. In this manner we have worked out the value of stock of Haldiram products including GST as follows;
Particulars of Stock | Value without GST | Rate of GST | Value of Stock with GST |
Haldiram -Sweets | 16,64,674.30 | 5% | 17,47,908.02 |
Haldiram-Namkeen | 16,64,674.30 | 12% | 18,64,435.22 |
Total | 33,29,348.60 | | 36,12,343.23 |
Under such circumstances the under-insurance in the instant claim is worked as follows;
Particulars | Value of stock with GST | Remarks |
Stock of ITC Products | 1,31,92,193 | Pl. Refer Exhibit No.XI of Survey Report |
Stock of Haldiram Products | 36,12,343 | |
Total value of stock as on the date of loss | 1,68,04,536 | |
Less : Sum-Insured | 1,25,00,000 | |
Amount of under-insurance | 43,04,536 | |
Percentage of under-insurance | 25.62% | |
In his email dated 19/03/2021 sent to the Insurers, Mr. Nitesh Agarwal agreed that, from CCTV footage it appears that, 53 boxes were stolen. But the Insurers were of the opinion that 52 boxes appears to have been stolen as per the CCTV footage. Mr. Nitesh Agarwal orally agreed to it, but denied to confirm in writing. In view of the same, the Assessment needs to be revised as follows;
Particulars | Amount |
Revised Assessed Loss (Rs.54,62,387/54x52) | 52,60,076 |
Less: Under-insurance @25.62% | 13,47,631 |
Adjusted/Net Loss | 39,12,445 |
Taking into consideration point mentioned above, we are of the opinion that, the Revised Adjusted Loss/Net Loss in the instant claim is Rs.39,12,445/- (Rupees Thirty Nine Lakh Twelve Thousand Four Hundred Forty Five Only)
Other points in our survey report remain unchanged.
(10) असे दिसते की, सर्वेक्षक एम.बी. नगरकर हे सनदी लेखापाल आहेत. तसेच भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण यांच्याद्वारे परवानाधारक सर्वेक्षक व नुकसान निर्धारक आहेत. हे सत्य आहे की, दि.29/3/2019 रोजी त्यांनी प्रथम सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यानंतर दि.21/9/2022 रोजी त्याचे परिशिष्ट सादर करुन रु.39,12,445/- नुकसानीचे निर्धारण केले. निर्विवादपणे, सर्वेक्षक एम.बी. नगरकर यांनी पहिल्या अहवालानंतर 3 वर्षे 5 महिने 23 विलंबाने परिशिष्ट दाखल करुन नुकसानीचे पुन:निर्धारण केलेले आहे. सकृतदर्शनी, विमा दाव्याचा निर्णय घेण्यासाठी किंवा अनुषंगिक कार्यवाहीसाठी हा कालावधी अवास्तव व अवाजवी आहे. सर्वेक्षक एम. बी. नगरकर यांच्या दि.29/3/2019 रोजीच्या सर्वेक्षण अहवालामध्ये नुकसान रु.1,31,92,193/- दर्शविलेले आहे. तसेच दि.21/9/2022 रोजीच्या परिशिष्टामध्येही Stock of ITC Products रु.1,31,92,193/- नमूद आहे. त्यामुळे दुर्गेश्वरी कंपनीचा रु.1,31,92,193/- सिगारेट माल चोरीस गेल्यामुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र परिशिष्टामध्ये Stock of Haldiram Products असे अतिरिक्त रु.36,12,343/- नमूद करुन नुकसानीच्या दिवशी एकूण मालाचे मुल्य रु.1,68,04,536/- दर्शविलेले दिसते. तसेच Under-Insurance टक्केवारी 25.62% नमूद करुन रु.39,12,445/- निर्धारण केलेले आहे.
(11) प्रश्न एकच आहे की, दुर्गेश्वरी कंपनीची चोरी झाली त्यावेळी विमाकृत दुकानामध्ये कोणता व किती मुल्याचा माल साठा होता. दुर्गेश्वरी कंपनीच्या वतीने विधिज्ञांचा युक्तिवाद की, दुर्गेश्वरी कंपनीच्या लातूर शाखेमध्ये 2 स्वतंत्र गोदाम आहेत. चोरी झालेल्या गोदामामध्ये आयटीसी माल म्हणजेच सिगारेट माल होता आणि त्यांच्या दुस-या अन्य गोदामामध्ये हल्दीराम माल साठा होता. दुर्गेश्वरी कंपनीतर्फे असेही नमूद करण्यात आले की, दोन्ही गोदामाकरिता एकच ट्रेडींग अकाऊंट अद्ययावत ठेवलेले होते. सर्वेक्षक एम.बी. नगरकर यांच्या परिशिष्ट अहवालामध्ये दुर्गेश्वरी कंपनीचे H-82, MIDC, Kalamb Road, Latur स्थित दुसरे गोदाम आहे आणि दुर्गेश्वरी कंपनी तेथे माल ठेवून प्रतिमहा भाडे देत असल्याचे जागामालक श्री. खानापुरे यांच्याशी निश्चित केल्याचे नमूद आहे. मात्र लिज ॲग्रीमेंट, भाडे पावती पुरावा, विमा इ. नाही, असेही अहवालामध्ये नमूद आहे. प्रामुख्याने, सर्वेक्षक एम.बी. नगरकर यांनी अतिविलंबाने म्हणजेच दि.21/9/2022 रोजी अहवालाचे परिशिष्ट का दाखल केले ? याबद्दल उचित स्पष्टीकरण नाही. श्री. नगरकर यांनी दुर्गेश्वरी कंपनीची नुकसान झालेली रक्कम चूक व जास्त दर्शविलेली आहे, असे विमा कंपनीचे कथन पाहता विमा कंपनीने सोईनुसार व स्वलाभाच्या अनुषंगाने सर्वेक्षक एम.बी. नगरकर यांच्याकडून सर्वेक्षण अहवालाचे परिशिष्ट तयार करुन घेतले, असेच अनुमान निघते. एम. बी. नगरकर यांनी दुर्गेश्वरी कंपनीच्या चोरीबद्दल नुकसानीची रक्कम चूक व जास्त दर्शविली, याबद्दल संयुक्तिक स्पष्टीकरण किंवा उचित पुरावा उपलब्ध नाही. ज्यावेळी सर्वेक्षक एम. बी. नगरकर यांनी दुस-या गोदामाचे मालक श्री. सुभाष अप्पा खानापुरे यांची भेट घेऊन तक्रारकर्ता यांचे H-82, MIDC, Kalamb Road, Latur येथे गोदाम भाडे तत्वावर घेतल्याचे, माल ठेवण्याकरिता वापर करीत असल्याचे व त्याचे भाडे प्रतिमहा देत असल्याबद्दल खात्री केली, त्यावेळी लिज ॲग्रीमेंट, भाडे पावती पुरावा, विमा इ. नसल्याच्या कारणावरुन तक्रारकर्ता यांचे अन्य गोदाम व तेथे माल नव्हता, हा सर्वेक्षकांचा तर्क मान्य करता येत नाही. हेही सत्य आहे की, विमा कंपनीतर्फे दाव्याच्या अनुषंगाने पडताळणी किंवा शहानिशा करण्यासाठी अन्वेषण अहवाल घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. परिशिष्टापृष्ठयर्थ सर्वेक्षकांचे प्रतिज्ञापत्रही अभिलेखावर दाखल नाही. मुख्यत्वेकरुन, विमा रक्कम देण्याचे दायित्व विमा कंपनीवर असल्यामुळे त्यांच्या बचावानुसार सिध्दतेची जबाबदारी विमा कंपनीवरच येते. वाद-तथ्ये व पुरावे पाहता दुर्गेश्वरी कंपनीचे H-82, MIDC, Kalamb Road, Latur येथे गोदाम होते, हे मान्य करावे लागेल. तसेच विमाकृत दुकानामध्ये आयटीसी सिगारेट व H-82, MIDC, Kalamb Road, Latur स्थित गोदामामध्ये हल्दीराम माल ठेवण्यात आलेला होता, हे मान्य करावे लागेल. सर्वेक्षक एम.बी. नगरकर यांचा दि.29/3/2019 रोजीचा सर्वेक्षण अहवाल स्थितीजन्य व उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे तयार केलेला आहे. त्यामुळे उचित पुराव्याअभावी दुर्गेश्वरी कंपनीच्या चोरी मालाचे नुकसानीचे निर्धारण कमी दर्शविणे असंयुक्तिक व अनुचित ठरते.
(12) उभय पक्षांतर्फे अभिलेखावर वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णय दाखल करण्यात आले. दुर्गेश्वरी कंपनीने दाखल केलेल्या "मे. बोम्मीडाला पुर्निया होल्डींग्ज् प्रा.लि. /विरुध्द/ न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि." 2021 (4) CPR 163; तसेच विमा कंपनीतर्फे दाखल केलेल्या मा. राष्ट्रीय आयोगाच्या "डी.एन. बदोनी /विरुध्द/ ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि." रिव्हीजन पिटीशन नं. 817/2006; 'ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ मेहता वुल स्टोअर' III (2007) CPJ 317 (NC) व मा. राष्ट्रीय आयोगाच्या "अंकुर सुराणा /विरुध्द/ युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि." रिव्हीजन पिटीशन नं. 2031/2012 मध्ये नमूद न्यायिक तत्वानुसार सर्वेक्षकांचा अहवाल महत्वपूर्ण असल्याचे विवेचन आढळते. तथ्ये, पुरावे व न्यायनिर्णयातील तत्वे पाहता सर्वेक्षक एम.बी. नगरकर यांनी सर्वेक्षण केलेला प्रथम अहवाल अग्राह्य धरण्यासाठी पुरावा नाही. दुर्गेश्वरी कंपनीने दाखल केलेल्या "मे. मारुती सुझुकी इंडिया लि. /विरुध्द/ नॅशनल इन्शुरन्स कं.लि." 2021 (3) CPR 443 व "बी.बी.एफ. इंडस्ट्रीज लि. /विरुध्द/ युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि." 2022 (2) DNJ 89 या न्यायनिर्णयांमध्ये विमा नुकसान भरपाई रकमेवर व्याज देण्यासंबंधी परामर्श झालेला दिसतो. तसेच "Emcipi Electronics Pvt. Ltd. /विरुध्द/ M/s. Shreyans Motor (P) Ltd." 2020 (4) CPJ 125 या न्यायनिर्णयामध्ये व्यवसायिक वापराकरिता घेतलेल्या विम्याकरिता विमेदार 'ग्राहक' संज्ञेत येतो, असे न्यायिक तत्व विषद केलेले आहे.
(13) उक्त विवेचनाअंती विमा कंपनीने उचित पुराव्याअभावी दुर्गेश्वरी कंपनीचा विमा दाव्यासंबंधी अनुचित दृष्टीकोन घेतल्याचे सिध्द होते आणि त्या अनुषंगाने परिशिष्ट अहवालानुसार देऊ केलेली विमा रक्कम रु.39,12,445/- संयुक्तिक ठरत नाही. दि.29/3/2019 रोजीच्या सर्वेक्षण अहवालानुसार रु.51,75,612/- विमा रक्कम अदा न करुन विमा कंपनीने सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. अंतिमत: विमा कंपनीकडून रु.51,75,612/- विमा रक्कम मिळण्यास दुर्गेश्वरी कंपनी पात्र ठरते.
(14) विमा रकमेवरील व्याज मिळण्यासंबंधी दुर्गेश्वरी कंपनीची विनंती पाहता दुर्गेश्वरी कंपनीने दाखल केलेल्या "मे. मारुती सुझुकी इंडिया लि. /विरुध्द/ नॅशनल इन्शुरन्स कं.लि." 2021 (3) CPR 443 या न्यायनिर्णयातील न्यायिक प्रमाण विचारात घ्यावे लागेल. ज्यामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविलेले आहे.
14. Under Regulation-9 of Insurance Regulatory and Development Authority (Protection of Policy Holders Interest) Regulation, 2002, after expiry of six month of the loss, if payment under the policy is not made, then the Insured is entitled for interest on the amount of loss. As such the Insured is entitled to interest @ 9% per annum, from 01.01.2009, on the amount of loss.
(15) उक्त वस्तुस्थिती नुकसान तारखेनंतर 6 महिन्याच्या अवधीनंतर म्हणजेच दि.3/7/2019 पासून विमा रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळण्यास दुर्गेश्वरी कंपनी पात्र ठरते.
(16) दुर्गेश्वरी कंपनीने मानसिक व शारीरिक त्रासाकरिता व तक्रार खर्चाकरिता रकमेची मागणी केलेली आहे. मात्र त्याबद्दल समर्पक स्पष्टीकरण व पुरावा दिसून येत नाही. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, कंपनी अधिनियम, 1956 अंतर्गत दुर्गेश्वरी कंपनीची नोंदणी झालेली आहे. दुर्गेश्वरी कंपनीचे विधिमान्य अस्तित्व पाहता दुर्गेश्वरी कंपनीस मानसिक व शारीरिक त्रास झाल्याचे ग्राह्य धरता येत नाही. मात्र दुर्गेश्वरी कंपनीस विमा कंपनीविरुध्द जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क, प्रकरण खर्च इ. आर्थिक खर्चाच्या बाबी आहेत. योग्य विचाराअंती ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळण्यास दुर्गेश्वरी कंपनी पात्र आहे, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(17) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्र. 138/2022.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने दुर्गेश्वरी कंपनीस रु.51,75,612/- (रुपये एक्कावण लक्ष पंचाहत्तर हजार सहाशे बारा फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने दुर्गेश्वरी कंपनीस उक्त रकमेवर दि.3/7/2019 पासून दि.01.01.2022 पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने दुर्गेश्वरी कंपनीस ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-