जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 104/2022. तक्रार दाखल दिनांक : 04/04/2022. तक्रार निर्णय दिनांक : 09/02/2023.
कालावधी : 00 वर्षे 10 महिने 05 दिवस
श्री. कपिल शरदचंद्र डुमणे व सौ. दिपाली कपिल डुमणे,
रा. सिग्नल कॅम्प लातूर. मो. नं. 9422469265
ई-मेल : kapildumne@yahoo.com तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखाधिकारी, Indian Over Seas Bank, Latur,
तहसील कार्यालयाच्या समोर, लातूर.
(2) Regional Manager, Indian Over Seas Bank,
F.C. Road, Deccon Gym Khana, Pune. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता :- श्री. कपिल शरदचंद्र डुमणे स्वत: उपस्थित.
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- व्ही. एन. गुंडरे
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 "बँक") यांच्याकडे दि.17/8/2011 पासून बचत खाते आहे. त्यांचा बचत खाते क्रमांक 226201000000316 व कस्टमर आय.डी. 229000558 आहे. बचत खात्याकरिता त्यांनी Liquid Deposit Fund (FFD) सुविधा स्वीकारलेली होती. त्यानुसार खात्यामध्ये रु.35,000/- पेक्षा अतिरिक्त रक्कम FFD मध्ये वर्ग करण्यात येऊन ठेव स्वरुपामध्ये स्वीकारण्यासंबंधी योजना होती. त्यांनी निर्गमीत केलेल्या धनादेशाकरिता खात्यातील रक्कम अपुरी असल्यास FFD मधून रक्कम वर्ग करण्यात येत असे. अशाप्रकारे त्यांनी 9 वर्षे व्यवहार केले. त्यांना बँकेने पासबूक दिलेले असून त्यामध्ये व्यवहाराच्या नोंदी वेळोवेळी छापून घेतल्या आहेत. त्यामध्ये FFD ची शिल्लक रक्कम स्वतंत्रपणे दर्शविण्यात येत असे.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, पासबुकाच्या नोंदीनुसार दि.19/5/2021 रोजी बचत खात्यामध्ये रु.3,13,841.70 पैसे व FFD ची रु.1,70,000/- शिल्लक रक्कम दर्शविली होती. त्यानंतर दि.2/12/2021 रोजी खात्यामध्ये रु.2,84,912/- दर्शविले होते. शिलकेचा बोध होत नसल्यामुळे बँकेस लेखी पत्रे देऊन पासबूक व FFD चे सविस्तर विवरणपत्र मागणी केले. त्यानुसार दि.2/10/2021 पासून त्यांना नवे पासबूक छापून दिले. परंतु ते जुन्या पासबूक शिलकेच्या नोंदीपेक्षा भिन्न होते आणि नोंदी एकमेकांशी जुळत नव्हत्या. तसेच नव्या पासबुकमध्ये FFD शिल्लक दर्शविलेली नव्हती. तसेच त्यांचा दि.29/11/2021 रोजीचा रु.17,950/- रकमेचा धनादेश क्र.998325 (IIFL) परत पाठविला गेला.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, FFD खात्याचे त्यांना स्वतंत्र पासबूक देण्यात आले नाही. बँकेने दिलेल्या विवरणपत्रामध्ये नमूद शिल्लक पासबुकाशी जुळत नाही. अशाप्रकारे बँकेने सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केली. उक्त कथनाच्या अनुषंगाने दि.30/11/2021 रोजी रु.2,98,912/- शिल्लक रक्कम ग्राह्य धरण्याचे; FFD चे सुरुवातीपासून विवरणपत्र देण्याचे; धनादेश अनादरीत झाल्यामुळे रु.25,000/- नुकसान भरपाई देण्याचा; तक्रार खर्च व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- भरपाई देण्याचा बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले. तक्रारकर्ता यांच्या वादकथनानुसार बँकेमध्ये बचत खाते असल्याचे व खात्याकरिता FFD सुविधा दिल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांचे कथन असे की, बँकेने तक्रारकर्ता यांचे पासबुक छापून देताना जमा व वजा रकमेच्या शिल्लक नोंदी योग्यप्रकारे प्रतिबिंबीत झाल्या नाहीत. परंतु जमा केलेल्या व उचललेल्या नोंदी योग्य आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या खात्यामध्ये दि.19/5/2021 रोजी रु.3,13,841.70 व दि.2/12/2021 रोजी रु.1,70,000/- शिल्लक असल्याचे त्यांनी अमान्य केले. तक्रारकर्ता यांच्या मागणीनुसार दि.2/10/2021 पासून योग्य प्रतिबिंबीत झालेले विवरणपत्र तक्रारकर्ता यांना दिले.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 बँकेचे पुढे कथन असे की, दि.25/10/2021 रोजी तक्रारकर्ता यांच्या FFD खात्यामध्ये शिल्लक नसल्यामुळे धनादेश क्र. 998325 न वटविता परत पाठविला आणि त्याकरिता नियमाप्रमाणे शुल्क वसूल केले. तक्रारकर्ता यांनी भारतीय रिझर्व बँकेचे लोकपाल यांच्याकडे तक्रार केली होती. बँकेने त्याकरिता सविस्तर उत्तर सादर केले. त्यानंतर लोकपाल यांनी तक्रार निकाली काढलेली आहे. बँकेने त्यांची रक्कम गहाळ केलेली नाही. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार खोटी असल्यामुळे नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(6) विरुध्द पक्ष क्र.2 बँकेने लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(7) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 बँकेचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.1 बँकेच्या विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) बँकेने तक्रारकर्ता यांना त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांचे बँकेमध्ये बचत खाते असल्यासंबंधी, खात्याकरिता FFD सुविधा दिल्यासंबंधी, तक्रारकर्ता यांच्या पासबुकामध्ये व्यवहाराच्या नोंदी केल्यासंबंधी, त्यानंतर पासबुकांमध्ये शिल्लक नोंदीमध्ये तफावत असल्यासंबंधी उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे.
(9) वाद-तथ्यानुसार दखल घेतली असता तक्रारकर्ता यांच्या बचत खात्यामध्ये शिल्लक रकमेसंबंधी उभय पक्षांमध्ये मुख्य वाद दिसून येतो. तक्रारकर्ता यांच्या पासबुकामधील नोंदीनुसार दि.19/5/2021 रोजी त्यांच्या खात्यामध्ये रु.3,13,841.07 पैसे व FFD रु.1,70,000/- शिल्लक दिसते. तसेच दि.2/12/2021 रोजी खात्यामध्ये रु.2,84,912/- दर्शविलेले दिसून येतात. उलटपक्षी, बँकेने नमूद केले की, तक्रारकर्ता यांना पासबुक छापून देताना जमा केलेल्या व उचललेल्या नोंदी योग्य आहेत; परंतु शिल्लक नोंदी योग्यप्रकारे प्रतिबिंबीत झाल्या नाहीत. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्याद्वारे कथित रक्कम बचत खात्यामध्ये शिल्लक असल्याचे बँकेस अमान्य आहे.
(10) वाद-तथ्यांनुसार दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी कथन केल्यानुसार त्यांच्या नवीन पासबुकातील नोंदी पाहिल्या असता त्या नोंदींची दि.21/10/2021 पासून सुरुवात झाल्याचे दिसते. त्याप्रमाणे दि.21/10/2021 रोजी रु. 36,015.53 पैसे, दि.2/12/2021 रोजी रु.3,766/- व दि.21/1/2022 रोजी रु.9,132.03 पैसे शिल्लक दिसून येते. परंतु पूर्वीच्या पासबूकमध्ये दि.21/10/2021 रोजी रु.3,17,161.51 पैसे व दि.2/12/2021 रोजी रु.2,84,912/- शिल्लक नमूद आहे. त्यामुळे शिल्लक रकमेसंबंधी तफावत निर्माण झाल्याचे बँकेसही मान्य आहे. परंतु शिल्लक नोंदी योग्यप्रकारे प्रतिबिंबीत झाल्या नाहीत, असा बँकेचा बचाव आहे.
(11) विरुध्द पक्ष क्र.1 बँकेने दि.17/8/2011 पासून दि.21/6/2022 पर्यंत तक्रारकर्ता यांच्या बचत खाते उतारा अभिलेखावर दाखल केला आहे. उलटपक्षी, तक्रारकर्ता यांनी त्यांच्या जुन्या पासबुकातील दि.29/4/2021 ते 2/12/2021 पर्यंतच्या नोंदी व नवीन पासबुकाच्या दि.21/10/2021 ते 21/1/2022 पर्यंत नोंदी दर्शविणा-या छायाप्रती दाखल केल्या आहेत. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार मागील 9 वर्षापासून ते बचत खात्याचे व्यवहार करतात आणि त्यासंबंधीच्या नोंदी पासबूकमध्ये छापून घेतलेल्या आहेत. मात्र तक्रारकर्ता यांनी संपूर्ण नोंदी दर्शविणारे पासबूक सादर केलेले नाही. त्यांनी सोईनुसार केवळ ठराविक कालावधीच्या नोंदीची छायाप्रत सादर केली आहे. शिवाय, जुन्या किंवा नवीन पासबुकाचे मुखपृष्ठ दाखल केलेले नाहीत.
(12) असे दिसते की, तक्रारकर्ता हे केवळ शिल्लक रकमेकडे लक्ष वेधत आहेत; परंतु खात्यामध्ये केलेल्या जमा केलेल्या किंवा उचललेल्या रकमेसंबंधी त्यांचे कोणतेही भाष्य नाही. इतकेच नव्हेतर, त्यांनी बँकेमध्ये जमा किंवा उचललेल्या रकमेमध्ये तफावत किंवा चूक आहे, असे तक्रारकर्ता यांचे कथन नाही. शिवाय, बँकेने दाखल केलेल्या संपूर्ण विवरणपत्रामध्ये नमूद नोंदी चूक किंवा खोट्या आहेत, असेही कथन नाही. त्यांनी खाते विवरणपत्राचे खंडन करण्यासाठी स्वतंत्र पुरावे सादर केलेले नाही. तक्रारकर्ता यांनी त्यांच्या बचत खात्यामध्ये केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या जमा, नांवे, शिल्लक नोंदी चुक असल्याबाबत तज्ञ अहवाल दाखल केलेला नाही. अशा स्थितीत, बॅंकेने तक्रारकर्ता यांच्या पासबुकमध्ये शिल्लक रकमेची छपाई करताना केलेली चूक केवळ तांत्रिक स्वरुपाची ठरेल आणि ती तांत्रिक चुक सेवेतील त्रुटी ठरणार नाही. अशा तांत्रिक चुकीचा गैरलाभ तक्रारकर्ता घेऊ शकत नाहीत आणि ते अनुतोषास पात्र नाहीत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(13) तक्रारकर्ता यांचा धनादेश क्र.99832, दि.29/11/2021, रु.17,950/- परत करण्यात आला, ही मान्यस्थिती आहे. बँकेचे कथन असे की, दि.30/11/2021 रोजी धनादेश त्यांच्याकडे प्राप्त झाला असता त्या तारखेस तक्रारकर्ता यांच्या खात्यामध्ये रु.17,943.03 पैसे शिल्लक होते. बँकेने दाखल केलेल्या विवरणपत्राचे अवलोकन केले त्यावेळी धनादेश वटविण्याकरिता पुरेशी शिल्लक खात्यामध्ये नव्हती, असे दिसते. त्यामुळे पुरेशा रकमेअभावी धनादेश न वटवता परत करण्यासाठी बँक दोषी ठरणार नाही.
(14) तक्रारकर्ता यांनी FFD खात्यासंबंधी सुरुवातीपासूनचे विवरणपत्र देण्याकरिता विनंती केलेली आहे. वास्तविक पाहता FFD सुविधा स्वतंत्र सुविधा नसून बचत खात्याकरिता अतिरिक्त सुविधा दिसते. FFD खात्याकरिता स्वतंत्र पासबूक देण्यासंबंधी नियम असल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांची विनंती मान्य करणे न्यायोचित नाही.
(15) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-