जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 129/2020. तक्रार दाखल दिनांक : 22/09/2020. तक्रार निर्णय दिनांक : 27/12/2022.
कालावधी : 02 वर्षे 03 महिने 05 दिवस
हनमंत पिता साहेबराव माचेवाड, वय 40 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. देवगिरी नगर, अंबाजोगाई रोड, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखाधिकारी, ऑक्सीस बँक लि., शाखा : औसा रोड, लातूर - 413 512.
(2) शाखाधिकारी, न्यू इंडिया इन्शुरन्स कं.लि.,
रा. राजीव गांधी चौक, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. श्रीकांत डी. मोमले
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. सुनिल व्ही. देसाई
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. प्रशांत के. कदिरे
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे 'बँक') यांच्याकडे त्यांचे बचत खाते क्र. 910010012482279 आहे. बँकेने त्यांना ए.टी.एम. कार्ड उपलब्ध करुन दिले आणि ए.टी.एम. कार्डचा क्रमांक 5497 5190 0199 5321 आहे. बँकेच्या ए.टी.एम. कार्डधारकांना विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडे विमा संरक्षण दिलेले आहे.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि.12/2/2017 रोजी दुचाकी वाहनावरुन घराकडे जात असताना अपघात झाला आणि पायाचा गुडगा व त्याखाली गंभीर मार लागल्यामुळे पोद्दार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येऊन पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शासकीय रुग्णालय, भोकर, जि. नांदेड येथील वैद्यकीय अधिका-यांनी अपघातामुळे 70 टक्के अपंगत्व आल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तक्रारकर्ता यांनी दि.12/2/2017 ते 12/4/2017 पर्यंत वैद्यकीय उपचार घेतला. त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र तात्काळ प्राप्त न झाल्यामुळे विमा दावा अर्ज करण्यास विलंब लागला. तक्रारकर्ता यांनी दि.29/5/2018 रोजी सर्व कागदपत्रांसह बँकेकडे अर्ज सादर केला. त्यानंतर विनंती अर्ज करुनही बँकेने दखल घेतली नाही. त्यानंतर विलंबाने दावा अर्ज सादर केल्याचे व पुरेसे अपंगत्व नसल्याची त्रुटी काढून बँक व विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा दावा रद्द केला.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, बँक व विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.30,00,000/- विमा रक्कम न देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.30,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.2,00,000/- देण्याचा व तक्रार खर्च रु.15,000/- देण्याचा बँक व विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(4) उचित संधी प्राप्त होऊनही बँकेने लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी म्हणणे आदेश' करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(5) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, विमा दावा हाताळताना त्यांनी योग्य काळजी घेतली आहे. विमापत्राच्या नियम व तरतुदीनुसार अपघात झाल्याच्या तारखेपासून 90 दिवसाच्या आत तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार दावा करणे बंधनकारक आहे. तक्रारकर्ता यांनी 1 वर्ष व 3 महिन्यापेक्षा जास्त विलंबाने दावा सूचना दिली. त्यांनी विमापत्राच्या नियमाचा भंग केला असल्यामुळे विमा दावा रद्द केला.
(6) विमा कंपनीचे पुढे कथन असे की, विमापत्राच्या नियम व तरतुदीनुसार विमेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्णत: कायमस्वरुपी अपंगत्व म्हणजेच 100 टक्के अपंगत्व आले तरच नुकसान भरपाई मंजूर केली जाते. तक्रारकर्ता यांचे अपंगत्व पूर्णत: कायमस्वरुपी नसल्यामुळे विमापत्राच्या नियमानुसार दावा रद्द केला आहे. त्यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(7) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, अपघात तारखेनंतर 90 दिवसाच्या आत विमा दावा / सूचना देणे बंधनकारक असताना 1 वर्ष व 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर विमा दावा सूचना दिल्यामुळे व तक्रारकर्ता यांचे अपंगत्व पूर्णत: कायमस्वरुपी अपंगत्व नसल्यामुळे विमापत्र तरतुदी व नियमांचा भंग झाल्यामुळे विमा दावा नामंजूर केला, असा विमा कंपनीचा प्रतिवाद आहे. त्यासंदर्भात विमा कंपनीचे विमा दावा नामंजूर करणारे पत्र अभिलेखावर दाखल आहे. विमा कंपनीने अभिलेखावर POLICY SCHEDULE FOR CREDIT CARD PACKAGE INSURANCE POLICY दाखल केले. वाद-तथ्ये व कागदपत्रे पाहता विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना विमा संरक्षण दिलेले होते आणि तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला विमा दावा विमा कंपनीने नामंजूर केला, ही मान्यस्थिती आहे.
(9) अभिलेखावर दाखल POLICY SCHEDULE FOR CREDIT CARD PACKAGE INSURANCE POLICY चे अवलोकन केले असता त्यामध्ये Special Condition : ELIGIBILITY CRITERIA - 1 POS TRANSACTION IN PRECEDING 180 DAYS OF INCIDENT NO POS IS APPLICABLE FOR POLICE & DEFENCE PERSONNEL, REPORTING OF CLAIM TO BE DONE 90 DAYS FOR PA & 30 DAYS FOR PURCHASE PROTECTION COVER असे नमूद आहे. त्यानंतर Coverage part B-Permanent Total Disability (wherever applicable): We will pay you 100% of the sums assured if you meet with Accidental Bodily Injury during the Policy Period that causes you Permanent Total Disability within 12 months. असे नमूद आहे. 2. Definitions : "Permanent Total Disability" means Doctor certified total, continious and permanent : - Loss of sight of both eyes. - Physical separation of or the loss of ability to use both hands or both feet. - Physical separation of or the loss of ability to use one hand and one foot. - Loss of sight of one eye and the physical separation of or the loss of ability to use either one hand or one foot. असे नमूद दिसते.
(10) उक्त वस्तुस्थिती पाहता विमापत्रानुसार कायमस्वरुपी पूर्णत: अपंगत्व आल्यानंतर 100 टक्के विमा रक्कम देय आहे. त्यानुसार दोन्ही डोळ्यांची दृष्टी नष्ट होणे; दोन्ही हात किंवा दोन्ही पाय शारीरिक विभक्त होणे किंवा त्यांची क्षमता नष्ट होणे; एक हात व एक पाय शारीरिक विभक्त होणे किंवा त्यांची क्षमता नष्ट होणे; एका डोळ्याची दृष्टी नष्ट होणे आणि एक हात किंवा एक पाय शारीरिक विभक्त होणे किंवा त्यांची क्षमता नष्ट होणे, याबद्दल वैद्यकीय अधिका-याने पूर्णत:, सातत्यपूर्ण व कायमस्वरुपी प्रमाणित केले असल्यास ते कायमस्वरुपी पूर्णत: अपंगत्व ठरते.
(11) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता दुचाकी घसरुन पडल्यामुळे तक्रारकर्ता जखमी होऊन त्यांच्या डाव्या पायास इजा झाल्यामुळे वैद्यकीय उपचार केल्याचे दिसून येते. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, भोकर, जि. नांदेड यांनी तक्रारकर्ता यांना अपंगत्व प्रमाणपत्र निर्गमीत केले. त्यामध्ये Disability : Physical Impairment; Affected part of Body : Lt. L/L; Diagnosis : Post-traumatic deformity with joint stiffness lt. lower limb; Disability (in%) : 70; 1. The Above condition is Permanent, non-progressive, not likely to improve. असे नमूद आहे. उक्त वस्तुस्थिती व कागदपत्रे पाहता तक्रारकर्ता यांच्या डाव्या पायाकरिता अपंगत्व निर्माण झाले, हे स्पष्ट आहे.
(12) वाद-तथ्यानुसार तक्रारकर्ता यांचे अपंगत्व विमापत्राच्या तरतुदीनुसार पात्र ठरते काय ? हा प्रश्न निर्माण होतो. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांच्या डाव्या पायाकरिता 70 टक्के अपंगत्व आले, याबद्दल वाद नाही. विमापत्रानुसार कायमस्वरुपी पूर्णत: अपंगत्व आल्यानंतरच 100 टक्के विमा रक्कम देय आहे. विमापत्रामध्ये डोळे, हात, पाय इ. अवयवांचे नुकसान किंवा हाणीसंबंधी निकष आहेत. विमापत्रामध्ये नमूद तरतुदीनुसार तक्रारकर्ता यांचे शारीरिक अपंगत्व आढळून येत नाही. विमापत्र हा संविदेचा प्रकार आहे. त्यामध्ये नमूद अटी, शर्ती, तरतुदी संबंधीत पक्षांवर बंधनकारक असतात. प्रकरणातील वाद-तथ्ये व कागदपत्रे पाहता तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर करण्याचे विमा कंपनीचे कृत्य अनुचित किंवा अयोग्य नाही. त्या अनुषंगाने विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करुन तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही आणि तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत, या निष्कर्षाप्रत येत आहोत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-