न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती रोहिणी बा. जाधव, सदस्य
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 34 व 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून दि. 7/2/2021 रोजी ओपो कंपनीचा ए-15 या मॉडेलचा मोबाईल रक्कम रु. 11,900/- या किंमतीस खरेदी केला. सदरची रक्कम अदा करताना जाबदार यांनी तक्रारदार याचे हातातून ए.टी.एम. कार्ड घेवून स्वत: रक्कम रु. 11,990/- स्वाईप केली. सदरचा व्यवहार यशस्वी झाला नाही असे सांगून जाबदारने पुन्हा रु.5,000/- ची रक्कम स्वाईप केली. सदरचा व्यवहार यशस्वी झाल्यानंतर जाबदारने पुन्हा उरलेले रु. 6,900/- ची रक्कम स्वाईप केली. तदनंतर यात बॅलन्स दिसत नाही म्हणून जाबदारने तक्रारदाराजवळील क्रेडीट कार्ड स्वाईप केले आणि आता हे रु. 6,900/- आमचे खात्यावर जमा झाले असे जाबदार यांनी तक्रारदार यांना सांगितले. सदरची रक्कम रु. 6,900/- तक्रारदाराचे एच.डी.एफ.सी.बँक, शाखा कराड या शाखेतून डेबीट झाली आहे. सदरचे खाते तक्रारदारांचे पत्नी सीमादेवी आकाश यादव (विवाहापूर्वीचे नाव) यांचे नावे असून त्यांच्या नावे ए.टी.एम. आणि क्रेडीट कार्ड आहेत. तक्रारदाराने दुसरे दिवशी एच.डी.एफ.सी.बँक, शाखा कराड येथे समक्ष माहिती घेतली असता रक्कम रु.11,990/- तक्रारदाराचे खात्यातून डेबीट होवून जाबदारचे खात्यात जमा झाल्याचे तक्रारदारास समजून आले. पहिला स्वाईप व्यवहार यशस्वी झाला असतानाही केवळ स्वत:च्या आर्थिक लाभासाठी जाबदारांनी पहिला व्यवहार अयशस्वी झाल्याचे सांगून दुस-यांदा कार्ड स्वाईप करुन एकदा रु.5,000/- व लगेच नंतर रु. 6,900/- अनाधिकाराने काढून घेवून तक्रारदारांची रक्कम रु.23,890/- आपल्या खात्यात वर्ग करुन घेतली व तक्रारदाराची फसवणूक केली आहे. म्हणून तक्रारदारांनी दि. 8/02/2021 रोजी जाबदारचे दुकानात जावून अतिरिक्त घेतलेली रक्कम रु.11,990/- परत करणेची विनंती केली. परंतु जाबदारांनी सदर रक्कम देण्यास टाळाटाळ केली. म्हणून तक्रारदारांनी दि. 5/03/2021 रोजी कराड शहर पोलिस स्टेशनमध्ये जाबदारविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी जाबदारास बोलावून विचारणा केली असता जाबदारांनी पैसे परत करतो असे सांगितले. परंतु पैसे परत केले नाहीत. म्हणून तक्रारदारांनी दि. 4/07/2021 रोजी पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये जाबदारविरुध्द तक्रार केली. दि. 7/07/2021 रोजी जाबदारांनी तक्रारदारास प्रत्येकी रक्कम रु.5,000/- चे अनुक्रमे चेक नं. 194847 व 194848 असे दोन चेक दिले. सदरचे चेक तक्रारदारांनी त्यांचे खात्यात भरले असता चेक नं. 194847 या क्रमांकाचा रक्कम रु.5,000/- चा चेक ‘ फंड्स इनसफिशियंट ’ या शे-याने परत आला. सदरचा चेक रिटर्न मेमो तक्रारदाराने जाबदारास दाखविला असता तो मेमो पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जाबदारांनी स्वहस्ते फाडून टाकला. तदनंतर जाबदाराचे सांगणेवरुन पुन्हा तक्रारदाराने दि. 16/07/2021 रोजी सदरचा चेक आपले खात्यात भरला. परंतु सदरचा चेक दि. 17/7/2021 रोजी पुन्हा फंड्स इनसफिशियंट या शे-याने परत आला. म्हणून तक्रारदारांनी पुन्हा तिस-यांदा पोलिसांत तक्रार केली. तदनंतर पोलिसांचे सांगणेवरुन जाबदारांनी तक्रारदारांना दि.23/7/2021 रोजी रक्कम रु.5,000/- रोख दिले व चेक क्र.194848 परत घेतला व उर्वरीत रक्कम रु.6,990/- परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु दि. 24/9/2021 पर्यंत जाबदारने पैसे न दिल्याने पुन्हा चौथ्यांदा तक्रारदारांनी कराड शहर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी जाबदारांना पैसे देण्यास सांगितल्यानंतर जाबदारानी चेक क्र. 194847 परत बँकेत भरण्यास सांगितले. परंतु सदरचा चेकही न वटता परत आला. म्हणून तक्रारदारांनी दि. 4/10/2021 रोजी जाबदारांना नोटीस पाठविली. तथापि सदरची नोटीस मिळूनही जाबदारांनी तक्रारदारास रक्कम परत केलेली नाही. अशा प्रकारे जाबदार कंपनीने तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून उर्वरीत रक्कम रु.6,990/-, सदर रकमेवरील व्याज रु.840/-, नोटीस फी व इतर खर्चापोटी रु.3,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु. 25,000/- असे एकूण रु.35,830/- जाबदारांकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदाराचे आधार कार्ड, मोबाईल खरेदीचे बिल, जाबदारांनी दिलेला चेक, चेक रिटर्न मेमो, चेक भरलेल्या स्लीपच्या प्रती, पोलिस स्टेशनला दिलेली तक्रार, जाबदारांना पाठविलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
4. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारीची नोटीस लागू होवूनही जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करणेत आला.
5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार जाबदार यांचेकडून जादा घेतलेली रक्कम परत मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
6. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून दि. 7/2/2021 रोजी ओपो कंपनीचा ए-15 या मॉडेलचा मोबाईल रक्कम रु. 11,900/- या किंमतीस खरेदी केला. सदर खरेदीपोटी तक्रारदार यांनी जाबदार यांना रक्कम रु. 23,890/- अदा केली. ही बाब जाबदार यांनी याकामी हजर राहून नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. तक्रारदाराचे कथन व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, जाबदारांनी तक्रारदारांना ओपो कंपनीचा ए-15 या मॉडेलचा मोबाईल रक्कम रु. 11,900/- या किंमतीचा मोबाईल विकला. परंतु सदर व्यवहारापोटी जाबदारांनी तक्रारदाराकडून रक्कम रु.11,900/- स्वीकारण्याऐवजी रक्कम रु. 23,890/- ए.टी.एम.कार्ड व क्रेडीट कार्डद्वारे स्वीकारले अशी तक्रारदाराची तक्रार आहे. जाबदारांनी सदरचे कथन मे. आयोगात हजर होवून नाकारलेले नाही. जाबदारांनी तक्रारदाराकडून जादा स्वीकारलेल्या रकमेची मागणी केली असता जाबदारांनी रक्कम परत केली नाही म्हणून तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार केली. तदनंतर जाबदारांनी तक्रारदारास दोन चेक अदा केले. परंतु सदरचे चेक तक्रारदारांनी त्यांचे खात्यात भरले असता चेक नं. 194847 या क्रमांकाचा रक्कम रु.5,000/- चा चेक ‘ फंड्स इनसफिशियंट’ या शे-याने परत आला. सदरचा चेक रिटर्न मेमो तक्रारदाराने जाबदारास दाखविला असता तो मेमो पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जाबदारांनी स्वहस्ते फाडून टाकला. तदनंतर जाबदाराचे सांगणेवरुन तक्रारदाराने दि. 16/07/2021 रोजी सदरचा चेक आपले खात्यात भरला. परंतु सदरचा चेकही ‘ फंड्स इनसफिशियंट ’ या शे-याने परत आला. म्हणून तक्रारदारांनी पुन्हा पोलिसांत तक्रार केली. तदनंतर पोलिसांचे सांगणेवरुन जाबदारांनी तक्रारदारांना दि.23/7/2021 रोजी रक्कम रु.5,000/- रोख दिले व चेक क्र.194848 परत घेतला व उर्वरीत रक्कम रु.6,990/- परत करण्याचे आश्वासन दिले. तदनंतर तक्रारदारांनी पुन्हा कराड शहर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी जाबदारांना पैसे देण्यास सांगितल्यानंतर जाबदारानी चेक क्र. 194847 परत बँकेत भरण्यास सांगितले. परंतु सदरचा चेक यावेळीही न वटताच परत आला. म्हणून तक्रारदारांनी दि. 4/10/2021 रोजी जाबदारांना नोटीस पाठविली. तथापि सदरची नोटीस मिळूनही जाबदारांनी तक्रारदारास रक्कम परत केलेली नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे. तक्रारदारांची सदरची कथने जाबदार यांनी याकामी हजर राहून नाकारलेली नाही. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत. सबब, जाबदार यांचेविरुध्द दि.2/09/2022 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी आपले तक्रारअर्जातील कथनांचे शाबीतीसाठी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदयादीतील पान क्र. 23 व 24 सोबत दाखल केलेल्या एच.डी.एफ.सी. बँकेच्या अकाऊंट स्टेटमेंटवरुन व एच.डी.एफ.सी. बँकेच्या क्रेडीट कार्ड स्टेटमेंटवरुन दि.7/2/2021 रोजी रु.23,890/- कपात झाल्याचे दिसून येते. जाबदारांनी दिलेल्या चेकवरुन व पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी दिलेल्या कबुलीवरुन जाबदारांकडे तक्रारदारांचे जादा पैसे गेल्याचे दिसून येते व तक्रारदारांनी मे.आयोगात दाखल केलेल्या कराड पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रार अर्जावरुन व नोटीसवरुन तक्रारदारांनी पैसे परत मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येते. तरीही जाबदार यांनी पैसे परत न केल्याने त्यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात गंभीर त्रुटी केल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रावरुन सीमादेवी आकाश यादव हे तक्रारदारांच्या पत्नीचे विवाहापूर्वीचे नांव असल्याचे दिसून येते व त्यांनी पत्नीच्या परवानगीने पत्नीच्या अकाऊंटमधून पैसे देवून मोबाईल खरेदी केल्याचे स्वत:च्या पुराव्याच्या शपथपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे दाखल कागदपत्रे व तक्रारदाराने दाखल केलेले पुरावा शपथपत्र यांचा विचार करता तक्रारदाराने आपली तक्रार शाबीत केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
8. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचेकडून न परत केलेली उर्वरीत रक्कम रु. 6,990/- परत मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर मोबाईल खरेदीचे तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच जाबदारांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 3,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार यांनी तक्रारदारास रक्कम रु. 6,990/- अदा करावी व सदर रकमेवर दि.07/02/2021 पासून संपूर्ण् रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकाल तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.