(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा. अध्यक्ष)
01. तक्रारकर्त्याने सोया लेसिथीन माल शिपिंग कंटेनर व्दारे वाहतुक करीत असताना अपघात झाल्याने मालाचे झालेल्या नुकसानीची भरपाई विमा पॉलिसी अन्वये मिळावी तसेच अन्य अनुषंगिक मागण्या साठी ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम-35 खाली प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे तो अलाईड सोयाटेक फर्मचा प्रोप्रायटर/मालक असून सोया लेसिथीन हे द्रव्य बनविण्याचा व्यवसाय आहे, सदर फर्म ही मौजा वडेगाव, तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा येथे असून सदर फर्मचे कार्यालय नागपूर येथे सुध्दा आहे. सदर सोया लेसिथीन द्रव्य औषधी बनविण्यासाठी उपयोगात येते व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुध्दा तो सदर माल पुरवठा करतो. दिनांक-29 नोव्हेंबर, 2019 रोजी तक्रारकर्त्याचे फर्मला गिवा इंडीया प्रायव्हेट लिमिटेड यांनी 20 मेगाटन सोया लेसिथीन पुरवठा करण्याचा आर्डर मिळाला होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीकडून त्याचे फर्म करीता दिनांक-17.12.2019 रोजी मरीन कार्गो स्पेसिफीक पॉलिसी Marine Cargo Specific Voyage Policy काढली होती आणि सदर विमा पॉलिसीचा क्रं-16020021190100000057 असा आहे आणि सदर पॉलिसी अंतर्गत 20 आय.बी.सी. कंटेनर प्रत्येकी 1000 किलो ग्रॅम प्रमाणे विमाकृत करण्यात आले होते. या विमा पॉलिसी अंतर्गत सोया लेसिथिन पुरविण्या करीता प्रवास हा तक्रारकर्त्याची फर्म वडेगाव तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा येथून ते गिवा सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूर असा नमुद करण्यात आला होता तसेच वाहतुकीचा मार्ग हा विमा पॉलिसी प्रमाणे समुद्र मार्ग/रेल्वे/रस्ते याव्दारे नमुद केला होता.
तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, गिवा कंपनीने मोठया प्रमाणावर मालाची मागणी केली होती व ती त्याचे फर्मचे उत्पादनाचे तुलनेने खूप जास्त होती म्हणून तक्रारकर्त्याने जालना येथील मे. गीता रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड येथून अतिरिक्त माल घेण्याचे ठरविले. सोया लेसिथीन हा माल जालना येथील मे. गीता रिफायनरी प्रायव्हट लिमिटेड येथे नेऊन तेथून माल पॅकींग करण्याचे ठरविले. तक्रारकर्त्याने सोया लेसिथिन माल हा दिनांक-18.12.2019 रोजी लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टव्दारे पाठविला. सदर माल जालना येथे दिनांक-19.12.2019 रोजी पोहचला. त्यानंतर गीता रिफायनरी कंपनी जालना यांनी गिवा प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑर्डर प्रमाणे संपूर्ण माल शिपींग कंटेनरमध्ये भरुन लॉरी व्दारे के.बी. रोड लाईन व्दारे पाठविला होता.सदर लॉरी ही तक्रारकर्त्याचा माल घेऊन जात असताना चंदनझिरा या ठिकाणी दिनांक-22.12.2019 रोजी लॉरीला अपघात झाला व नुकसान झाले. तक्रारकर्त्याने अपघाताची माहिती विरुध्दपक्ष विमा कंपनीला त्याच दिवशी ई-मेल व्दारे कळविली. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री विजय पी. धोटे यांनी अपघातग्रस्त ठिकाणास भेट देऊन नुकसानीची पाहणी करुन मुल्य निर्धारण केले. अपघातात खराब झालेला माल मे.गीता रिफायनरी येथे परत करण्यात आला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी मध्ये दिनांक-30.12.2019 रोजी नुकसानी संबधात रुपये-13,56,704/- एवढया रकमेचा विमा दावा सादर केला. विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यांचे दिनांक-24.08.2020 रोजीचे पत्रान्वये तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला आणि तो विमा दावा नामंजूरीचे कारण असे नमुद केले की, ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण विमा पॉलिसी मध्ये नमुद असलेल्या ठिकाणाशी संबधित नाही. तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्दपक्ष विमा कंपनीशी पत्र व्यवहार करुनही प्रतिसाद न मिळाल्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिनांक-25.10.2020 रोजीची नोटीस पाठविली परंतु नोटीस मिळूनही कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
1. विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून विमा पॉलिसी प्रमाणे नुकसान भरपाई म्हणून रुपये-13,61,704/- देण्याचे आदेशित व्हावे आणि सदर रकमेवर अपघात दिनांका पासून ते रक्कम प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 18 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित
व्हावे.
2. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून देण्याचे आदेशित व्हावे.
3. या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तराप्रमाणे तक्रारकर्त्याचा विमा दावा हा चुकीचा आधारहिन स्वरुपाचा आहे. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग केल्याने विमा दावा देय होत नाही. तक्रारकर्त्याने सिंगापूर येथील गिवा कंपनीला माल पाठविण्याचा ऑर्डर घेतला होता असे ऑर्डरचे प्रती वरुन दिसून येते. तक्रारकर्त्याने त्याचे उत्पादनाच्या क्षमतेपेक्षा जास्त मालाचा आर्डर घेतला होता. तक्रारकर्त्याने तक्रारी मध्येच नमुद केले की, त्याने जास्तीचा माल पाठविण्यासाठी जालना येथील मे. गीता रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड यांची मदत घेतली होती. विरुध्दपक्ष विमा कंपनीने Marine Cargo Specific Voyage Policy जारी केली होती आणि सदर पॉलिसीही विमा पॉलिसी मध्ये दर्शविलेल्या मार्गासाठीची ती पॉलिसी होती.सदर विमा पॉलिसी मध्ये जालना येथील स्टॉपचा कोणताही उल्लेख नव्हता. सदर विमा पॉलिसी ही तक्रारकर्त्याची फर्म अलाईड सोयाटेक फर्म करीता होती, दुसरी फर्म मे. गीता रिफायनरी जालना यासाठी नव्हती. तक्रारकर्त्याने मे. गीता रिफायनरी जालना यांचेशी भागीदारी केली आणि हा विम्याचे अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. तक्रारकर्त्याने ही बाब विमा कंपनी पासून लपवून ठेवली होती आणि ही बाब जेंव्हा अपघात झाला त्यावेळी उघडकीस आली. विमा पॉलिसी मध्ये ज्या मार्गाने प्रवास दाखविला होता त्याच मार्गाने प्रवास होणे आवश्यक होते. सदर पॉलिसी प्रमाणे मालाचे पॅकींग हे अलाईड सोयाटेक फर्म मोहाडी भंडारा येथून होणार होते आणि तो माल सिंगापूर येथे पोहचणार होता परंतु प्रत्यक्षात मालाचे पॅकींग हे गीता रिफायनरी जालना येथून झाले आणि त्यामुळे विमा अटी व शर्तीचा भंग झाला. मे. गीता रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड जालना यांचे कडील मालाचे नुकसान झालेले आहे. तक्रारकर्त्याचे मालाचे नुकसान झालेले नाही. तक्रारकर्त्याने नफा कमाविण्याचे उद्देश्याने गीता रिफायनरी जालना यांचेशी भागीदारी केली आणि त्यामुळे व्यवसायीक हेतू (Commercial Purpose) असल्याने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार चालू शकत नाही. लॉरी रिसीप्ट प्रमाणे माल हा गीता रिफायनरी यांचा होता आणि गीता रिफायनरी यांचे मालाचा विमा नव्हता. सबब तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनीने केली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखीउत्तर, प्रकरणातील साक्षी पुरावे,उभय पक्षांचा लेखी व मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदा-2019 प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचा ग्राहक होतो काय? | -नाही- |
2 | काय आदेश? | अंतीम आदेशा नुसार |
:: कारणे व मिमांसा ::
मुद्दा क्रं 1 व 2
05. तक्रारीतील उभय पक्षांव्दारे उपस्थित अन्य विवादीत मुद्दांना स्पर्श न करता हे तपासून पाहणे आवश्यक आहे की, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष विमा कंपनीचा ग्राहक होतो काय?.
06. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे तो अलाईड सोयाटेक फर्मचा प्रोप्रायटर/मालक असून सोया लेसिथीन हे द्रव्य बनविण्याचा व्यवसायआहे, सदर फर्म ही मौजा वडेगाव, तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा येथे असून सदर फर्मचे कार्यालय नागपूर येथे सुध्दा आहे. सदर सोया लेसिथीन द्रव्य औषधी बनविण्यासाठी उपयोगात येते व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (In the International Market) सुध्दा तो सदर माल पुरवठा करतो. दिनांक-29 नोव्हेंबर, 2019 रोजी तक्रारकर्त्याचे फर्मला गिवा इंडीया प्रायव्हेट लिमिटेड यांनी 20 मेगाटन सोया लेसिथीन पुरवठा करण्याचा आर्डर मिळाला होता.
07 आम्ही तक्रारीचे सखोल वाचन केले, त्यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून घेतलेली विम्याची सेवा ही व्यवसायीक हेतूसाठी (commercial purpose) आंतरराष्ट्रीय बाजार म्हणजे सिंगापूर येथे लेसिथिन द्रव्य पाठविण्यासाठी घेतलेली आहे
ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 2(7) अन्वये ग्राहक म्हणजे असा व्यक्ती-
i).................................................................or
ii) hires or avails of any service for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such service other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person, but does not include a person who avails of such service for any commercial purpose.
Explanation- For the purposes of this clause,-
(a) The expression “commercial purpose” does not include use by a person of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self- employment;
(b) The expressions “buys any goods” and “hires or avails any services” includes offline or online transactions through electronic means or by teleshopping or direct selling or multi-level marketing;
Whereas, as per section 2 (d) of CPA, 1986 “Consumer” means any person who -
(i) …………………………………or
(ii) (hires or avails of) any services for a consideration which had been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised ,or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person but does not include a person who avails of such services for any commercial purpose;
(Explanation-For the purposes of this clause, “commercial purpose” does not include use by a person of goods bought and used by him and services availed by him exclusively for the purposes of earning his livelihood by means of self-employment,
प्रस्तुत तक्रार ही जिल्हा ग्राहक आयोग, भंडार यांचे समक्ष 11.01.2021 रोजी दाखल केलेली आहे आणि नविन ग्राहक संरक्षण कायदा-2019 यामधील तरतुदी या दिनांक-20.07.2020 पासून अमलात आलेल्या आहेत. नविन कायदया प्रमाणे व्यवसायीक हेतूसाठी घेतलेली सेवा ही ग्राहक संरक्षण कायदयाचे अंतर्गत मोडत नाही. तक्रारकर्त्याचा व्यवसाय हा फार मोठया प्रमाणावर असून तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संलग्न आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष विमा कंपनीचा ग्राहक होत नसल्याने प्रकरणातील अन्य विवादीत मुद्दांना कोणताही स्पर्श न करता आम्ही प्रस्तुत तक्रार ही खारीज करीत आहोत. तथापि तक्रारकर्ता हा त्याचे नुकसान भरपाईसाठी सक्षम अशा दिवाणी न्यायालयात जाऊन तेथे दाद मागू शकतो, या बाबत त्याचे हक्क अबाधित ठेवण्यात येतात. तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा येथे तक्रार केलेली असल्याने त्याचा जो काही वेळ खर्च झालेला आहे, त्यामुळे मुदतीचे संबधात तो मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी Laxmi Engineering Works. vs. P.S.G. Industrial Institute reported as (1995)3 Supreme Court Cases 583 for the purpose of limitation या निवाडयाचा आधार घेऊ शकतो.
08. वरील सर्व विवचेना वरुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-
अंतिम आदेश
1. तक्रारकर्ता मे. अलाईडसोयाटेक वडेगाव, तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा तर्फे प्रोप्रायटर/मालक श्री अंदाज सेवकदास नारनवरे यांची तक्रार विरुध्दपक्ष न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांचे विरुध्दची तो ग्राहक या सज्ञेत मोडत नसल्याने खारीज करण्यात येते.
- तक्रारकर्त्याचा जिल्हा ग्राहक आयोग भंडारा यांचे समक्ष तक्रार चालविताना जो काही वेळ खर्ची पडलेला आहे त्यासाठी तो सक्षम न्यायालया पुढे लिमिटेशन अॅक्ट 1963 चे कलम 14 खाली विलंब क्षमापित करण्यासाठी अर्ज दाखल करुन तेथे मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी Laxmi Engineering Works. vs. P.S.G. Industrial Institute reported as (1995)3 Supreme Court Cases 583 for the purpose of limitation या निवाडयाचा आधार घेऊ शकतो.
3. खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
4. उभय पक्षकारांना निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी
5. उभय पक्षकारांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी जिल्हाग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्त संच जिल्हा
ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.