अर्जदार तर्फे वकील - श्री.डी.के.कदम
गैरअर्जदार क्र.1 व 2 स्वतः हजर,
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - श्री.अविनाश जी.कदम
निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार नंदाबाई भ्र.आनंदा शेजूळे ही मयत आनंदा निवृत्ती शेजुळे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती आनंदा शेजुळे हे दिनांक 28.06.2013 रोजी चिखली ते नांदेड येथे मोटार सायकलवर पाठीमागे बसून जात असतांना कासरखेड येथे आसना नदीच्या पुलाजवळ पोहोचले तेव्हा सदर मोटारसायकलचा अपघात झाला. अर्जदाराचे पतीस डोक्यावर व इतर ठिकाणी गंभीर मार लागला. अपघातानंतर त्यांना ग्लोबल हॉस्पीटल,नांदेड येथे व नंतर जे.जे. हॉस्पीटल,मुंबई येथे शरीक करण्यात आले. परंतु दिनांक 05.08.2013 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. पोलीस स्टेशन अर्धापूर जिल्हा नांदेड येथे 32/2011 नुसार गुन्हा कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
अर्जदाराचे पती मयत आनंदा शेजुळे हा व्यवसायाने शेतकरी होता,त्याचे नावाने मौजे चिखली तालुका व जिल्हा नांदेड शिवारात गट क्रमांक 24 मध्ये 82आर, एवढी शेतजमीन होती. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्याची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे महाराष्ट्र शासनाने घेतली होती. अर्जदार यांनी पतीचे मृत्यु पश्चात तालुका कृषी अधिकारी, नांदेड यांचेकडे दिनांक 30.09.2013 रोजी विमा रक्कम मिळणेसाठी अर्ज केला. परंतु गैरअर्जदार यांनी आजपर्यंत अर्जदारास कोणतीही रक्कम दिली नाही. दिनांक 12.02.2014 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रक्कम देण्यासाठी स्पष्ट नकार दिला. म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह सन 2013 पासून संपुर्ण रक्कम वसुल होईपर्यंत गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदार यांनी दिनांक 10.10.2013 रोजी विमा योजनेतील क्लेम फॉर्म व इतर कागदपत्रे या कार्यालयास सादर केली. कागदपत्रे संबंधीत यंत्रणेव्दारे साक्षांकीत केलेले सादर करणेबाबत संबंधीतास तोंडी सुचना देण्यात आली. तरीपण सादरकर्त्याने प्रस्ताव आवक-जावक मध्ये दिला. दिनांक 15.10.2013 रोजी सदर प्रस्ताव मा. जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,नांदेड यांचेकडे पाठविण्यात आला. अधिक्षक, कृषी अधिकारी,नांदेड यांनी मुळ प्रतीत प्रस्तावनाही, सर्व कागदपत्रे झेरॉक्स या कारणास्तव त्रुटी काढल्या व त्रुटींची पुर्तता करणेस सांगितली. विमा रक्कम देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 यांची नाही तरी पण त्यांचे कार्यालयास सदरील प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. अर्जदार यांनी वस्तुस्थिती लपवून खोटी तक्रार केलेली आहे. अर्जदाराचा अर्ज वास्तविक घटनेतील आधारापासून व वस्तुस्थितीच्या विरुध्द आहे. म्हणून त्यांचे विरुध्द फेटाळणे योग्य आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील बहूतांश कथन अमान्य केलेले आहे व अर्जदार यांनी त्यांचे म्हणणे कागदपत्रांसह सिध्द करावे असे म्हटलेले आहे. प्रथम खबरी अहवाल,घटनास्थळ पंचनामा, साक्षीदारांचे जबाब आणि त्यामधील मजकूर अर्जदार यांनी सिध्द करावयाचे आहे असे म्हटलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या अतिरिक्त जबाबामध्ये असे म्हटलेले आहे की, गैरअर्जदार कंपनीस अर्जदाराचा कोणत्याही प्रकारचा क्लेम मिळालेला नाही. म्हणून तो क्लेम बाबत कुठलीही कार्यवाही करु शकला नाही. अर्जदाराचा क्लेम प्रिमॅच्युअर्ड आहे. म्हणून गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान भरपाई देणे लागत नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी मंचास अशी विनंती केलेली आहे की अर्जदाराचा अर्ज रक्कम रु.10,000/- च्या दंडासह फेटाळण्यात यावा.
गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
6. सदर प्रस्तावाची मुळ कागदपत्रे व प्रस्तावाबाबत कसलाही दावा जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,नांदेडकडून तथा अन्य कोणाकडूनही आजतागायत मिळालेला नाही. म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारची पुढील कार्यवाही केलेली नाही. गैरअर्जदार यांनी मंचास अशी विनंती केलेली आहे की, सदर दाव्यातून त्यांना मुक्त करण्यात यावे.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
8. अर्जदार यांचे पती मयत आनंदा शेजुळे हा शेतकरी होता हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराचे मयत पती हा शेतकरी या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता हे स्पष्ट आहे. अर्जदाराचे पतीचा दिनांक 28.06.2013 राजी मोटार सायकलवर पाठीमागे बसून जात असतांना अपघात झाला आहे होता हे अर्जदार यांनी केलेल्या पोलीस पेपर्स(जबाब,घटनास्थळ पंचनामा,इनक्वेस्ट पंचनामा, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट इत्यादी) वरुन स्पष्ट आहे. सदर अपघातानंतर अर्जदाराचे पतीस प्रथम नांदेड येथे ग्लोबल हॉस्पीटल व नंतर मुंबई येथे जे.जे. हॉस्पीटल मध्ये शरीक करण्यात आले. आनंदा शेजुळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला हे देखील वरील उल्लेखी पोलीस पेपर्सवरुन स्पष्ट आहे. अर्जदार यांचे पती हे शेतकरी असुन त्यांचा मृत्यु अपघाती झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा तो लाभार्थी होता. मयत आनंदा शेजुळे यांची पत्नी अर्जदार नंदाबाई यांनी दिनांक 09.10.2013 रोजी विमा रक्कम मिळणेसाठी तालुका कृषी अधिकारी नांदेड यांचेकडे अर्ज दाखल केलेला आहे. सदर अर्जाची प्रत अर्जदाराने मंचात दाखल केलेली आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी सदरचा प्रस्ताव त्यांच्या दिनांक 15.10.2013 च्या पत्रासह जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,नांदेड यांचेकडे सादर केलेला आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमा दावा त्यांना मिळालेला नाही म्हणून पुढील कार्यवाही केलेली नाही असे कथन केलेले आहे. अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने सर्व कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली आहे. ही सर्व कागदपत्रे गैरअर्जदार विमा कंपनीस प्राप्त झालेली आहे. असे असतांना देखील गैरअर्जदार यांनी कांहीही कार्यवाही केलेली नाही.
तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराने संबंधीत यंत्रणेव्दारे साक्षंकीत केलेले कागदपत्रे दाखल केलेली नाहीत या कारणास्तव विमा दावा विमा कंपनीकडे पाठविलेला नाही. अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांनी काढलेल्या त्रुटींची पुर्ततेसंबंधीची सर्व कागदपत्रे प्रकरणामध्ये दाखल केलेली आहेत. दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदार यांचे मयत पती हे व्यवसायाने शेतकरी असुन त्यांचा मृत्यु हा अपघाती झालेला असल्याचे सिध्द होते. त्यामुळे अर्जदार ही शेतकरी वैयक्तीक जनता अपघात योजनेची लाभार्थी असल्याचे सिध्द होते. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
4. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.