निकालपत्र
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे अहमदनगर येथील रहिवासी असुन ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ येथुन कारकुन या पदावरून दि.२९-०२-२००४ रोजी सेवानिवृत्त झाले आहे. तक्रारदार हे परिवार पेन्शन योजना १९७१ चे सभासद आहे. सन १९९७१ पासुनच तक्रारदार यांचे दरमहाच्या पगारातुन कायद्याप्रमाणे रक्कम कपात होऊन सन २००४ पर्यंत मा.सहाय्यक आयुक्त, प्रादेशिक भविष्य निधी भवन, नाशिक यांच्याकडे पाठविली जात होती. सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन जमा होणेसाठी तक्रारदार यांनी सामनेवाले बॅंकेमध्ये खाते उघडले होते. त्यानुसार सहाय्यक आयुक्त नाशिक हे तक्रादार यांच्या खात्यात दरमहा निवृत्ती वेतन जमा करीत होते. अशाप्रकारे तक्रारदार व सामनेवाले यांच्यात ग्राहक व सेवा देणार, असे नाते निर्माण झाले आहे. असे असतांना दिनांक ०५-०८-२०१७ रोजी तक्रारदार यांना कोणतीही तोंडी अथवा लेखी नोटीस न देता तक्रारदार यांच्या खाते क्रमांक ०५०३०००११०२३०९२९८ मधुन रक्कम रूपये १४,३८२/- कपात झाली. अशाप्रकारे बॅंकेने तक्रारदाराला कोणतीही नोटीस न देता त्यांच्या परवानगीशीवाय त्यांच्या खात्यातील रक्कम रूपये १४,३८२/- सहाय्यक आयुक्त नाशिक यांना हस्तांतरीत केली. अशाप्रकारे कोणतीही सुचना न देता रक्कम हस्तांतरीत केली व सामनेवाले यांनी त्यांच्या सेवेत तक्रारदाराला त्रुटी दिली आहे. तक्रारदार यांनी सहाय्यक आयुक्त नाशिक यांच्याकडे भेट देवुन लेखी पत्राद्वारे कळविले. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाले बॅंकेविरूध्द सदरची तक्रार मंचात दाखल केली व परिच्छेद क्रमांक १५ प्रमाणे मंचात मागणी केली आहे.
३. सदर तक्रारीची नोटीस सामनेवाले बॅंकेला मिळूनही ते मंचात हजर झाले नाही, त्यामुळे त्यांच्याविरूध्द नि.१ वर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील एस.एस. पाटील (वाघ) यांनी दिलेला लेखी युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हा सामनेवालेचा ग्राहक आहे काय काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | आदेश काय ? | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
५. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हे अहमदनगर येथील रहिवासी असुन ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ येथे कारकुन या पदावरून दिनांक २९-२-२००४ रोजी सेवा निवृत्त झाले. सेवा निवृत्ती नंतर त्यांनी सामनेवाले बॅंकेमध्ये त्यांचे खाते उघडले होते. त्यांचा खाते क्रमांक ०५०३०००११०२३०९२९८ असा होता. सदरच्या खात्यामध्ये तक्रारदाराच्या कथनाप्रमाणे सन २००४ नंतर नियमीत निवृत्ती वेतनाची रक्कम सहाय्यक आयुक्त, नाशिक यांच्यातर्फे जमा होत होती. यावरून ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदार व सामनेवाले यांच्यात ग्राहक व सेवा देणार, असे नाते निर्माण झाले आहे. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यत येत आहे.
६. मुद्दा क्र. (२) : तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामनेवाले यांच्या बॅंकेमध्ये खाते उतरविले होते. त्यानुसार त्यांना खाते क्रमांक ०५०३०००११०२३०९२९८ असा देण्यात आला होता. तक्रारदार सेवा निवृत्त झाल्यानंतर सन २००४ पासुन सहाय्यक आयुक्त नाशिक यांच्यातर्फे निवृत्तवेतन तक्रारदाराच्या खात्यामध्ये जमा होत होते. असे असतांना दिनांक ०५-०८-२०१७ रोजी बॅंकेने कोणतीही लेखी नोटीस न पाठविता तक्रारदाराच्या परवानगीशीवाय त्या खात्यामधील रक्कम रूपये १४,३८२/- मा. सहाय्यक आयुक्त नाशिक यांना हस्तांतरीत केली, असे तक्रारदाराने कथन केले. याबाबत प्रकरणात दाखल असलेले तक्रारदाराच्या खाते उता-याचे अवलोकन केले. त्यावरुन ही बाब स्पष्ट होते की, रक्कम रूपये १४,३८२/- एवढी रक्कम हस्तांतरीत केलेली आहे. तसेच सामनेवाले बॅंकेला नोटीस मिळुनही ते मंचात हजर झाले नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तसेच त्यांनी तक्रारदाराने केलेले कथन खोडुन काढण्याची संधी गमावली. तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र व तक्रारीत केलेले कथन, यावरून सामनेवाले यांनी तक्रारदाराला कोणतीही नोटीस न देता त्याच्या खात्यातुन रक्कम हस्तांतरीत केली, ही बाब निश्चीतच सेवेत त्रुटी आहे, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणुन मुद्दा क्र. १ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (२) : मुद्दा क्रमांक १ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदाराला त्याच्या खात्यातुन हस्तांतरीत केलेली रक्कम रूपये १४,३८२/- (अक्षरी चौदा हजार तीनशे बेऐंशी) व त्यावर दिनांक ०५-०८-२०१७ पासुन संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ६% दराने व्याज द्यावे. ३. सामनेवाले यांनी तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. ४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. ५. उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा. ६. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. ७. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |