(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष)
01. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रिम नेशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीचे व्यवस्थापक/संस्थापक/संचालक तसेच विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास फॉर्मर प्रॉडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ.) पवनी,जिल्हा भंडारा यांचे विरुध्द शतावरी पिकाची हमी देऊनही प्रथम वर्षा मध्ये मालाची उचल न केल्याने व ते सडल्याने तसेच दुसरे वर्षी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन कंपनीने कोणतेही पाऊले उचलले नसलयाने शेत पडीत राहिल्याने झालेली नुकसान भरपाई मिळावी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यां साठी ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम-35 खाली प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे तो व्यवसायाने शेतकरी असून त्याचे मालकीची शेती ही मौजा मांगली (चौ), तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथे असून सदर शेत जमीनीचे गट क्रं 100/2-क्षेत्रफळ-1.90 हेक्टर आर आहे. तक्रारकर्ता पूर्वी या शेतां मधून धान पिकाचे उत्पादन घेत होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 हे ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड, चिंचवड पुणे या कंपनीचे संचालक आहेत तर विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 हे स्थानिक पातळी वरील चौरास फॉर्मर प्रॉडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ.) पवनी, जिल्हा भंडारा या कंपनीचे अनुक्रमे व्यवस्थापक व संस्थापक आहेत. विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 ही स्थानिक भंडारा जिल्हयातील कंपनी असून तिचे मार्फतीने तक्रारकर्त्याने त्याचे शेता मध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन कंपनीने पुरविलेल्या शतावरी औषधी वनस्पतीची रोपे आपले शेतात लागवड करुन शतावरीचे पिक सन-2018-2019 या वर्षात कार्यक्रम राबविला होता. या करीता त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन कंपनीचा फार्म विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 या स्थानिक कंपनीचे मार्फतीने भरुन देऊन शतावरी पिकाचे लागवडीसाठी विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 कंपनीमध्ये दिनांक-23 एप्रिल 2018 रोजी रुपये-30,000/- जमा केले आणि त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांचा ग्राहक आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रिम नेशन कंपनीने संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विदर्भात सन-2018 पासून शतावरी या औषधी वनस्पतीची रोपे पुरवून भरघोस उत्पन्न एकरी रुपये-2,50,000/- प्रमाणे मिळेल अशी हमी जाहिराती व्दारे दिली होती तसेच योजनेचे माहितीपत्रक सुध्दा छापले होते. विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास फॉर्मर प्रॉडयूसर कंपनी लिमिटेड यांनी ड्रीम नेशन कंपनी सोबत संपर्क साधून स्थानिक पातळवर शेतक-यांना त्यांचे शेतात शतावरी औषधी वनस्पतीचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहित केले तसेच विरुध्दपक्ष क्रं 6 यांनी आपल्या शेती मध्ये ड्रीम नेशन कंपनी मार्फतीने पुरविलेल्या शतावरी औषधी वनस्पतीचे रोपांची लागवड सुध्दा केली होती. ड्रीम नेशन कंपनीचे माहिती पत्रका प्रमाणे एका एकर मध्ये 5000 किलो शतावरीचे उत्पादन 06 महिन्यामध्ये व नंतरच्या 06 महिन्यात पुन्हा 5000 किलो शतावरीचे उत्पादन मिळणार अशी हमी दिली होती. ड्रीम नेशन कंपनीने आयुष मंत्रालया कडून तपासणी केलेले व प्रमाणित केलेले शतावरीचे रोपटे मिळणार असल्याचे जाहिरातीचे माध्यमातून शेतक-यांना सांगून विमा कंपनी कडून रुपये-2,50,000/- चा पिक विमा उतरविण्याची हमी सुध्दा दिली होती. एवढेच नव्हे तर शतावरी औषधी वनस्पती या पिकाचे लागवडी साठी वार्षिक मजूरी प्रती एकर रुपये-12000/- व पिक काढण्यासाठी येणारा खर्च रुपये-20,000/- असे दरवर्षी रुपये-32,000/- ड्रीमनेशन कंपनी देणार होती. त्याच बरोबर शतावरी वनस्पती लागवड मार्गदर्शन व शतावरी पिकाची हमी भावाने खरेदी करुन तात्काळ पेमेंट धनादेशाव्दारे देण्याची हमी देऊन सलम 24 वर्ष उत्पादनाची हमी दिली होती. त्याचबरोबर ड्रीमनेशन कंपनी तर्फे प्रतीनिधी व सुपरव्हायझर हे घटनास्थळी येऊन शतावरी पिकाची पाहणी करुन संबधित शेतक-या सोबत रजिस्टर्ड करारनामा करुन देणार होते. तसेच ड्रीमनेशन कंपनीच्या कोटक महिन्द्रा बॅंकेच्या खातेक्रमांक-5612068530 या खात्यावर संबधित शेतक-याने एकरी बुकींग रक्कम रुपये-30,000/- जमा करावेत अशी मागणी केली होती.
तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले की, ड्रीम नेशन कंपनीने स्थानिक चौरास कंपनी मार्फतीने भंडारा जिल्हयातील शेतकरी डॉ. संदीप नरहरशेटटीवार(स्वतः) राहणार मांगली (चौ) श्री अनिल महादेवराव नौकरकर राहणार आसगाव (चौ), श्री श्रावण खोपडूजी लांजेवार, राहणार मोहरी, श्रीमती नेमेश्वरी ज्ञानेश्वर धुर्वे, राहणार आसगाव (चौ), श्री किशोर पुंडलीकराव काटेखाये राहणार आसगाव (चौ), वृषाला टेकराम धुर्वे राहणार मांगली (चौ) अशा भंडारा जिल्हयातील शेतक-यां कडून एकरी बुकींग रक्कम रुपये-30,000/- प्रमाणे रक्कम घेऊन सदर रक्कम ड्रीम नेशन कंपनीला पाठविली असून ड्रीम नेशन कंपनीने संबधित शेतक-यांना त्यांचे-त्यांचे शेता मध्ये शतावरी या औषधी वनस्पतीची रोपे पुरवून पिक घेण्यास लावले, त्यासाठी संबधित शेतक-या कडून माहिती अर्ज भरुन घेतला परंतु आज पर्यंत संबधित शेतक-यांना कधीही ड्रीम नेशन कंपनीकडून करारनामा नोंदवून दिलेला नाही. तसेच ड्रीम नेशन कंपनीच्या जाहिरातील प्रमाणे आज पर्यंत शतावरी औषधी वनस्पतीची लागवड केल्या नंतर निंदण व मशागतीचा खर्च दिला नाही तसेच औषधी पुरवठा केला नाही. आंतर मशागतीसाठी एकरी रुपये-12,000/- व काढणी खर्च एकरी रुपये-20,000/- ड्रीम नेशन कंपनीने दिले नाही. तसेच ठरल्या नुसार कंपनीने प्रतीनिधी शेतावार पाठवून ओला माल प्रती रुपये-25/- किलो प्रमाणे उचलण्याची हमी दिली होती परंतु तो ओला माल देखील उचल केलेला नाही. वस्तुतः ड्रीम नेशन कंपनीला आयुष मंत्रालयाची कोणतीही परवानगी नसताना खोटी जाहिरात करुन निकृष्ट दर्जाची शतावरी औषधी वनस्पतीची रोपे शेतक-यांना पुरविलीत. तसेच कबुल केल्या प्रमाणे पिकाचा विमा उतरविला नाही.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याचे सह ईतर शेतक-यांचे शेतातील माल सन-2018-2019 मध्ये शेतावरी पिकाचा माल ड्रीम नेशन कंपनीने कबुल करुनही उचल केला नाही परिणामी सन-2018-2019 या वर्षी शेती मध्ये माल तसाच पडून राहिला व सडून गेला त्यामुळे तक्रारकर्ता व ईतर शेतक-यांचे प्रती एकर रुपये-2,50,000/- प्रमाणे नुकसान झाले.तसेच पुढील वर्षी सन-2019-2020 मध्ये देखील कंपनीने शेतक-यांचे हितासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही त्यामुळे संबधित शेतक-यांची शेत जमीन सन-2019-2020 मध्ये सुध्दा तशीच पडून होती त्यामुळे सन-2019-2020 मध्ये सुध्दा प्रती एकर रुपये-2,50,000/- प्रमाणे नुकसान झाले.
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचे मालकीची 1.90 हेक्टर आर शेती असून प्रती एकर रुपये-2,50,000/- प्रमाणे दोन वर्षात त्याचे रुपये-5,00,000/- चे उत्पनाचे नुकसान झाले. त्याच बरोबर सडलेला शतावरी पिकाचा माल काढण्यासाठी तक्रारकर्त्याला प्रती एकर रुपये-20,000/- प्रमाणे तसेच आंतर मशागतीसाठी प्रती एकर रुपये-12,000/- प्रमाणे खर्च करावा लागला अशाप्रकारे तक्रारकर्त्याचे एकूण रुपये-5,32,000/- एवढे नुकसान झाले व त्याचे झालेल्या आर्थिक नुकसानी बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 जबाबदार आहेत. विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास कंपनी तर्फे वेळोवेळी ड्रीम नेशन कंपनीचे मुख्य संचालक श्री विकास बेंगडे व त्यांची पत्नी सौ. निलम बेंगडे यांचेशी संपर्क साधला तसेच कंपनीचे कर्मचारी कु. अश्वीनी राऊत यांनी देखील वेळोवेळी सहकार्य करुन ड्रीम नेशन कंपनीचे संचालकां सोबत संपर्क साधून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीमनेशन कंपनीने एकरी रुपये-30,000/- प्रमाणे बुकींग रक्कम घेऊन तक्रारकर्त्यासह ईतर शेतक-यांची आर्थिक फसवणूक केली त्यामुळे तक्रारकर्त्यासह ईतर शेतकरी यांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास झाला म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष विरुध्दपक्षां विरुध्द दाखल केलेली असून त्याव्दारे पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
1. तक्रारकर्त्याचेी तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द खर्चासह मंजूर करण्यात यावी.
2. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन कंपनीने त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास शेतकरी कंपनीने वैयक्तिक व संयुक्तिकरितया तक्रारकर्त्याला शेताची नुकसान भरपाई म्हणून रुपये-5,32,000/- देण्याचे आदेशित करावे आणि सदर रकमेवर दिनांक-23.04.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 15 टक्के दराने व्याज तक्रारकर्तीला देण्याचे आदेशित करावे.
3. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांनी तक्रारकर्त्याला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे तयाला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-1,00,000/- तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित करावे.
4. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन कंपनीने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे नाव बेकायदेशीरपणे वापरुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-39 (1) (ड) नुसार दंड व नुकसान भरपाई रुपये-1,00,000/- अदा करण्याचे आदेशित व्हावे.
5. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांनी प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
6. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 यांचे ताब्यातील तक्रारकर्त्याचे शतावरी लागवडी संबधीची संपूर्ण कागदपत्रे जिल्हा ग्राहक आयोगासमक्ष दाखल करण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे.
03. प्रस्तुत तक्रारी मध्ये विरुध्दपक्ष ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड, चिंचवड पुणे तर्फे अनुक्रमे तिचे व्यवस्थापक/संस्थापक-संचालक/संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस दिनांक-05.04.2022 रोजी मिळाल्या बाबत/तामील झाल्या बाबत त.क.चे वकील श्री महेंद्र गोस्वामी यांनी पोस्ट विभागाचा ट्रॅक रिपोर्ट दाखल केला परंतु अशी जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 हे जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी कोणतेही लेखी निवेदन दाखल केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने प्रकरणात दिनांक-13.07.2022 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं 4 श्री सुरेश रतन ठाकरे, संचालक, ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड, चिंचवड, पुणे यास जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस “Refused” या पोस्टाचे शे-यासह परत आल्याने विरुध्दपक्ष क्रं 4 विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने प्रकरणात दिनांक-23.03.2022 रोजी पारीत केला.
05. विरुध्दपक्ष क्रं 5 चौरास फॉर्मर प्रॉडयुसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ) तालुका पवनी, जिल्हा भंडारा तर्फे व्यवस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं 6 चौरास फॉर्मर प्रॉडयुसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ) तालुका पवनी, जिल्हा भंडारा तर्फे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित होऊन विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 करीता एकत्रीत लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तर दाखल करण्यास झालेला विलंब माफ व्हावा यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयाचे सुमोटो रिट पिटीशन क्रं 3/20 मध्ये दिनांक-08 मार्च, 2021 रोजी पारीत केलेल्या आदेशावर भिस्त ठेऊन त्यांचे लेखी उत्तर अभिलेखावर घेण्यास विनंती केली त्यानुसार त्यांचे लेखी उत्तर अभिलेखावर घेण्यात आले. त्यांनी तक्रारीतील परिच्छेद क्रं 1 ते 9 मधील मजकूर मान्य असल्याने नमुद केले. तक्रारी मध्ये मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम जास्त असल्याने नामंजूर केली. तक्रारदार शेतक-याचे नुकसानीस विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 जबाबदार नसल्याचे नमुद करुन त्यांचे विरुध्दच्या मागण्या या नामंजूर केल्यात. तक्रारदारास विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनी व तिचे संचालका कडून नुकसान भरपाई देण्यात यावी असे नमुद केले. विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनीने संपूर्ण महाराष्ट्रात एकरी रुपये-2,50,000/- उत्पनाची हमी दिली होती व त्या संबधी माहितीपत्रक सुध्दा छापले होते या बाबी मान्य केल्यात. भंडारा जिल्हयातील शेतक-यांचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी म्हणजे चौरास शेतकरी कंपनीने शेतक-यांना शतावरीचे पिक घेण्यास प्रोत्साहित केले होते ही बाब सुध्दा मान्य केली व विरुध्दपक्ष क्रं 6 यांनी सुध्दा आपले शेतामध्ये शतावरीची लागवड केली होती. संबधित शेतक-यांनी चौरास कंपनीकडे शतावरी पिकाच्या लागवडीसाठी बुकींग खर्च प्रत्येकी रुपये-30,000/- प्रमाणे जमा केल्या होत्या त्या संपूर्ण रक्कमा चौरास कंपनीने ड्रीम नेशन कंपनी कडे वळती केल्या होत्या. सहामाही रुपये-1,25,000/- प्रमाणे वार्षिक रुपये-2,50,000/- उत्पादनाची हमी तसेच शतावरीचे रोपटे आयुष मंत्रालया कडून प्रमाणित असलेले व पिकाचा विमा रुपये-2,50,000/- उतरविण्याची हमी ड्रीम नेशन कंपनीने दिली होती या बाबी मान्य केल्यात. एवढेच नव्हे तर वार्षिक मजूरी प्रती एकर रुपये-12,000/- आणि पिक काढणी खर्च प्रती एकर रुपये-20,000/- प्रमाणे देण्याची हमी तसेच लागवडी संबधाने मार्गदर्शन व चेकव्दारे तात्काळ पैसे देण्याची हमी ड्रीम नेशन कंपनीने दिली होती या बाबी मान्य केल्यात परंतु यापैकी कोणत्याही बाबीची पुर्तता ड्रीम नेशन कंपनीने केलेली नाही. तक्रारदाराचे तक्रारी नुसार भंडारा जिल्हयातील शेतक-यांनी प्रत्येकी रुपये-30,000/- प्रमाणे बुकींगसाठी दिलेली रक्कम ड्रीमनेशन कंपनीला त्यांनी पाठविली होती. ड्रीम नेशन कंपनीने तक्रारदारा कडून माहिती अर्ज भरुनघेतला परंतु आज पर्यंत करारनामा लिहून दिलेला नाही. ड्रीम नेशन कंपनीने भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचा गैरवापर केलेला आहे आणि त्यासाठी ड्रीम नेशन कंपनीचे संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 जबाबदार असल्याचे नमुद केले. ड्रीम नेशन कंपनीचे मुख्य संचालक श्री विकास बेंगडे व त्यांची पत्नी सौ. निला बेंगडे यांचेशी चौरास कंपनीने वेळोवेळी संपर्क साधला तसेच चौरास कंपनीची कर्मचारी कु. अश्वीनी राऊत यांनी देखील ड्रीम नेशन कंपनीचे संचालकांशी संपर्क साधून तक्रारदारासह अन्य शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. अशाप्रकारे तक्रारदार व ईतर शेतक-यांचे नुकसानीस विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनीचे संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 जबाबदार आहेत. विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास कंपनी तर्फे तक्रादारव ईतर शेतक-यांना वेळोवेळी मदत केलेली असून आर्थिक नुकसानी बाबत त्यांची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केले.
06. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार तसेच शपथे वरील पुरावा, त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास कंपनीचे एकत्रीत लेखी उत्तर तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजाचे जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री महेंद्र गोस्वामी यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
::मुद्दे व उत्तर::
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनी चिंचवड पुणे तर्फे तिचे संस्थापक/संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांया ग्राहक होतो काय? | -होय- |
02 | तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष चौरास फॉर्मर प्रॉडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ) तहसिल पवनी, जिल्हा भंडारा तर्फे तिचे व्यवस्थापक/सस्थापक विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 यांचा ग्राहक होतो काय? | -होय- |
03 | विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास फॉर्मर प्रॉडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ) तहसिल पवनी, जिल्हा भंडारा तर्फे तिचे व्यवस्थापक/संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन कंपनीचे शतावरी औषधी वनस्पतीचे पिक घेण्यास प्रोत्साहित केल्याने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
04 | विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनी चिंचवड पुणे तर्फे तिचे संस्थापक/संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा देऊन त्याचे शतावरी पिकाचे झालेल्या नुकसानीस व ते भरुन देण्यास जबाबदार आहेत काय? | -होय- |
05 | काय आदेश? | -अंतीम आदेशा नुसार- |
मुद्दा क्रं 1 व क्रं 2 बाबत-
07 तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे यातील विरुध्दपक्ष ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे तिचे संस्थापक/संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी शतावरी या औषधी वनस्पतीची रोपे पुरवून तसेच जाहिराती व्दारे प्रती वर्ष एकरी रुपये-2,50,000/- वार्षिक उत्पन्न तसेच मजूरी व पिक काढणीचा खर्च देण्याची हमी दिली होती. विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास फॉरर्मस पोडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा तर्फे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी तक्रारकर्त्यासह भंडारा जिल्हयातील ईतर अनेक शेतक-यांना विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन कंपनीने पुरविलेले व आयुष मंत्रालयाव्दारे प्रमाणित केलेली शतावरी या झाडाची रोपे लागवड करण्यास प्रोत्साहित केले होते. त्यासाठी प्रती एकर बुकींग खर्च रुपये-30,000/- प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 5 व क्रं 6 चौरास कंपनी तर्फे तक्रारकर्ती व ईतर शेतक-यां कडून रकमा जमा करण्यात आल्यात व त्या रकमा विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनीच्या कोटक महिन्द्रा बॅंकेच्या खाते क्रमांक-5612068530 या खात्यामध्ये विरुध्दपक्ष चौरास प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फतीने जमा करण्यात आल्यात आणि ही बाब विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी आपल्या लेखी उत्तरातून मान्य केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 यांनी आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर दाखल केलेले असल्याने त्यांनी भंडारा जिल्हयातील शेतक-यां कडून गोळा केलेल्या रकमा या विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनीच्या बॅंक खात्यात जमा केलेल्या आहेत ही बाब जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे विचारात घेतली जात आहे कारण त्यांनी विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनीच्या खात्यात रकमा जमा केल्या बाबत कोणताही ईतर पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याने बुकींग पोटी विरुध्दपक्ष चौरास फॉरमर्स प्रोडयूसर कंपनी लिमिटेड आसगाव तहसिल पवनी जिल्हा भंडारा यांचे लेटरहेड वरील पावती क्रं 6, पावती दिनांक-23 एप्रिल, 2018 प्रमाणे On Account of: Ch. No.-012266 SHATAVARI PLANT BOOKING Dream Nation Pvt. Ltd. Pune 1 Acr booking नुसार रुपये-30,000/- जमा केल्याचे नमुद असून पावती खाली ऑथोराईज्ड सिग्नेटरी म्हणून सही आहे आणि विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महोदवराव नौकरकर यांनी ही बाब आपले लेखी उत्तरातून मान्य केलेली आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी तक्रारकर्त्या कडून विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 यांचे मार्फतीने बुकींगपोटी रक्कम स्विकारलेली असून विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 यांनी स्वतः करीता तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे करीता रकमेच्या मोबदल्यात तक्रारकर्त्याला योग्य ती सेवा देण्याचे मान्य केलेले असल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रिम नेशन कंपनीचे संचालक/संस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास कंपनीचे व्यवस्थापक/संस्थापक यांचा ग्राहक होतो आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 3 बाबत-
08 जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे नमुद करणे अत्यावश्यक आहे की, यातील विरुध्दपक्ष क्रं 5 चौरास कंपनी असून विरुध्दपक्ष क्रं 6 चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर हे एकच व्यक्ती आहेत.हातातील प्रकरणात चौरास कंपनीचे व्यवस्थापक/ संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी स्थानिक भंडारा जिल्हयातील शेतक-यां कडून बुकींगसाठी एकरी रुपये-30,000/- प्रमाणे रक्कम गोळा केल्याचे आणि नंतर ती रक्कम ड्रीम नेशन कंपनी कडे वळती केल्याचे आपले प्रतीज्ञालेखावरील लेखी उत्तरातून कबुली दिलेली आहे, ज्याअर्थी चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी बुकींच्या रकमा गोळा केल्यात त्याअर्थी ते ड्रीमनेशन कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत ही बाब सिध्द होते परंतु त्यांनी ही बाब त्यांचे लेखी उत्तरातून लपवून ठेवलेली आहे. ड्रीम नेशन कंपनीचे माहितीपत्रका प्रमाणे करारनाम्यासाठी कंपनीकडून अधिकृत प्रतिनिधीची नियुक्ती केलेली आहे ,याचा अर्थ असा होतो की, भंडारा जिल्हया करीता चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर हे अधिकृत प्रतिनिधी असताना त्यांनी ड्रीम नेशन कंपनीचे वतीने संबधित शेतक-यांना करारनामा करुन देणे गरजेचे होते परंतु त्यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही आणि ही त्यांनी दिलेली दोषपूर्ण सेवा आहे. चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी भंडारा जिल्हयातील शेतक-यांना विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनीचे शतावरी औषधी वनस्पती लागवड करण्यास प्रवृत्त केले ही बाब त्यांनी लेखी उत्तरातून मान्य केलेली आहे, त्यामुळे भंडारा जिल्हयातील शेतक-यांचे आर्थिक नुकसानीस ते सुध्दा जबाबदार आहेत. परिणामी तक्रारदार व ईतर शेतक-यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल व तक्रारीचा खर्च देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्रं 5 व क्रं 6 चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांची(endorser) नविन ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 2 (18) नुसार येते म्हणून आम्ही मुद्दा क्रं 3 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 4 बाबत-
09. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनी तर्फे तिचे संस्थापक/संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शतावरी पिकाची एकरी रुपये-2,50,000/- उत्पनाची हमी दिली होती व त्या संबधी माहितीपत्रक सुध्दा छापले होते आणि विरुध्दपक्ष चौरास कंपनीचे व्यवस्थापक/संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांचे मार्फतीने शेतक-यांना शतावरीचे पिक घेण्यास प्रोत्साहित केले होते . तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष चौरास फॉरमर्स प्रोडयूसर कंपनी लिमिटेड आसगाव तहसिल पवनी जिल्हा भंडारा यांचे लेटरहेडवरील पावती क्रं 6, पावती दिनांक-23 एप्रिल, 2018 प्रमाणे On Account of: Ch. No.-012266 SHATAVARI PLANT BOOKING Dream Nation Pvt. Ltd. Pune 1 Acr booking जमा केल्या बाबत पावतीची प्रत पुराव्यार्थ दाखल केलेली असून पावती खाली ऑथोराईज्ड सिग्नेटरी म्हणून सही आहे आणि विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महोदवराव नौकरकर यांनी ही बाब आपले लेखी उत्तरातून मान्य केलेली आहे. तक्रारकर्त्याने चौरास कंपनीकडे शतावरी पिकाच्या लागवडीसाठी बुकींग खर्चा पोटी जमा केलेली रक्कम विरुध्दपक्ष चौरास कंपनीने ड्रीम नेशन कंपनी कडे वळती केली होती असे विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 तर्फे श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी लेखी उत्तरातून मान्य केलेले आहे. सहामाही रुपये-1,25,000/- प्रमाणे वार्षिक रुपये-2,50,000/- उत्पादनाची हमी तसेच शतावरीचे रोपटे आयुष मंत्रालया कडून प्रमाणित असलेले व पिकाचा विमा रुपये-2,50,000/- उतरविण्याची हमी तसेच वार्षिक मजूरी प्रती एकर रुपये-12,000/- आणि पिक काढणी खर्च प्रती एकर रुपये-20,000/- प्रमाणे देण्याची हमी तसेच लागवडी संबधाने मार्गदर्शन व चेकव्दारे तात्काळ पैसे देण्याची हमी ड्रीम नेशन कंपनीने दिली होती या बाबी विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास कंपनी तर्फे तिचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी मान्य केल्यात परंतु यापैकी कोणत्याही बाबीची पुर्तता ड्रीम नेशन कंपनीने केलेली नाही. ड्रीम नेशन कंपनीने तक्रारदारा कडून माहिती अर्ज भरुन घेतला परंतु आज पर्यंत करारनामा लिहून दिलेला नाही. ड्रीम नेशन कंपनीने भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचा गैरवापर केलेला आहे आणि त्यासाठी ड्रीम नेशन कंपनीचे संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 जबाबदार असल्याचे सुध्दा चौरास कंपनीचे सस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी लेखी उत्तरातून मान्य केलेले आहे. ड्रीम नेशन कंपनीचे मुख्य संचालक श्री विकास बेंगडे व त्यांची पत्नी सौ. निला बेंगडे यांचेशी चौरास कंपनीने वेळोवेळी संपर्क साधला तसेच चौरास कंपनीची कर्मचारी कु. अश्वीनी राऊत यांनी देखील ड्रीम नेशन कंपनीचे संचालकांशी संपर्क साधून तक्रारदारासह अन्य शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनीचे संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी कोणत्याही बाबीची पुर्तता केलेली नाही असा तक्रारकर्त्याचा आरोप आहे. विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनी, चिंचवड पुणे तर्फे तिचे संस्थापक/संचालक विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील झाल्या बाबत पोस्ट विभागाचा ट्रॅक रिपोर्ट दाखल आहे परंतु ते उपस्थित झाले नाही वा कोणतेही लेखी निवेदन दाखल केलेले नसल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्द तक्रारी मध्ये वर नमुद केल्या प्रमाणे “एकतर्फी आदेश” पारीत झालेला आहे. तर विरुध्दपक्ष क्रं 4 श्री सुरेश रतन ठाकरे, संचालक, ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड, चिंचवड, पुणे यास जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस “Refused” या पोस्टाचे शे-यासह परत आल्याने त्यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार “एकतर्फी चालविण्याचा आदेश” जिल्हा ग्राहक आयोगाने वर नमुद केल्या प्रमाणे पारीत केला. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांना जिल्हा ग्राहक आयोगाची रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस तामील होऊनही ते शेवट पर्यंत प्रकरणात उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी आपली लेखी बाजू मांडली नाही तसेच तक्रारकर्त्याने आपले तक्रारी मधून त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 चौरास कंपनीचे व्यवस्थापक/संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी आपले लेखी उत्तरा मधून विरुध्दपक्ष ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड, चिंचवड,पुणे ही कंपनी आणि तिचे संस्थापक/संचालक यांचे विरुध्द केलेले आरोप नाकारल्या बाबत कोणतेही लेखी निवेदन जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांना जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे आपली बाजू मांडण्यासाठी पुरेपूर संधी देऊनही त्यांनी आपले लेखी निवेदन दाखल केले नाही वा तक्रारकर्त्याने तसेच विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 यांनी त्यांचे विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. तक्रारकर्त्याची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल असून त्याने तक्रारी सोबत पुराव्यार्थ रक्कम जमा केल्या बाबत पावतीची प्रत व विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड, चिंचवड पुणे यांचे माहिती पत्रकाची प्रत पुराव्यार्थ दाखल केलेली आहे. अशा परिस्थितीत तक्रारदाराची तक्रार ही उपलब्ध दस्तऐवजी पुराव्याचे आधारे गुणवत्तेवर (On Merit) निकाली काढण्यात येते.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनीचे माहितीपत्रकाची प्रत पुराव्यार्थ अभिलेखावर दाखलकेलेली आहे,त्यानुसार खालील प्रमाणे मजकूर नमुद आहे-
DN
DREAM NATION
Growing farming. Growing nation
ड्रिूम नेशन प्रायव्हेटलिमिटेड तर्फे स्वागत
वैशिष्टये-
शेतक-याला भंडवली खर्च शुन्य, शतावरी, अश्वगंधा इत्यादी वनस्पतीची लागवड, एकदाच लागवडपरंतु 24 वर्षा पर्यंत सतत उत्पन्न मिळते. एकरी वार्षिक किमान रुपये-2,50,000/- पर्यंत उत्पन्न मिळते.100 टक्के हमीभाव व लागवडी खर्चासह उत्पादनावरही 100 टक्के विमा संरक्षण, कार्यक्षेत्र महाराष्ट्रव गोवा राज्यात कोठेही. पिक काढणी नंतर ताबडतोब पूर्ण शेतमालाचे पैसे मिळतात.
कंत्राटी पध्दतीने शेतक-याला मिळणारे वार्षिक उत्पन्न-
प्रती सहा मन्यिांचे उत्पन्न
एकरी उत्पादन 5000 किलो दर सहा महिन्यांनी आणि दर प्रती किलो रुपये-25/- प्रमाणे सहा महिन्याकरीता एकूण उत्पन्न रुपये-1,25,000/- तसेच वर्षातून दोन वेळा म्हणजे रुपये-2,50,000/- आणि वर्षातून एकदा आंतरपिक म्हणून अश्वगंधा लागवडीसरुपये-20,000/- म्हणजेच एकूण वार्षिक उत्पन्न रुपये-2,70,000/-
शेतक-यांना ईतर मिळणारे फायदे-
आंतरमशागत करण्यासाठी वार्षिक मजूरी एकरी रुपये-12,000/- (किमान सहामाही उत्पादन 3000किलो म्हणजेच वार्षिक 6000 किलो आल्यास पिक काढणी नंतर मिळेल)पिक काढणीसाठी लागणारी मजूरी प्रती किलो रुपये-2/- प्रमाणे म्हणजेच 1000 किलोसाठी रुपये-20,000/- असे मिळूनएकूणमिळणारे ईतर फायदे रुपये-32,000/-
आयुष मंत्रालय प्रमाणित रोपे, पिक विमा,मार्गदर्शन. पिक न आल्यास विमा कंपनी जबाबदारी घेते.
विमा संरक्षण-
विमा हप्ता दरवर्षी ड्रीम नेशन प्रा.लि. कंपनी मार्फत भरला जाईल. फक्त आयुष मंत्रालय प्रमाणित रोपे आणि कंत्राटी पध्दतीने लागवड केलेल्या पिकाचा विमा उतरविला जाईल.
करारनामा-
शतावरी लागवड, मार्गदर्शन, हमी भावाने खरेदी, पैसे ताबडतोब देणे तसेच 24 वर्षा पर्यंत सतत हमखास उत्पादन, उत्पादनावरही विमा संरक्षण या गोष्टीसाठी शेतक-या बरोबर ड्रीम नेशन प्रा. लि. कंपनी करारनामा करते. करारनामा स्थानिक दुय्यम निबंधक को ऑपरेटीव्ह कार्यायात रुपये-500/- च्या स्टॅम्प पेपरवर रजि. केला जातो. करारनाम्यासाठी कंपनीकडून अधिकृत प्रतिनिची नियुक्ती केलेली आहे. पिक लागवडी नंतर तलाठया कडून 7/12 वर पिक पाहणी मध्ये शतावरी लागवडची नोंद करुन प्रतिनिधीकडे ओरिजनल 7/12 जमा केल्या नंतर 7 दिवसात शेतक-या बरोबर कंपनीचा करारनामा होईल.
कंपनीचे सहकार्य-
शेतक-या बरोबर रजि. करारनामा केल्या जाईल. आयुष मंत्रालय प्रमाणित रोपे लागवडीसाठी उपलब्ध करुन दिली जातील. लागणारी सर्व सेंद्रीय व्रिदाव्य औषधे, खते पुरविली जातील. प्रत्येक वेळी मार्गदर्शनासाठी तज्ञ सुपरवायझर व प्लॉट व्हीजीटसाठी अधिकृत प्रतिनिधी काम करतील. करारा मध्ये ठरल्या प्रमाणे हमी भावाने उत्पादीत माल खरेदी करुन ताबडतोब वजन करुन धनादेशा व्दारे पैसे दिले जातील. विमा उतरवणे व गरज पडल्यास विमा कंपनीकडून होणारे नुकसानभरपाई शेतक-यास मिळवून देण्यास मदत केली जाईल.
शेतक-याच्या जबाबदा-या-
कमीतकमी एक एकर क्षेत्र लागवडीसाठी असावे. एकरी रुपये-30,000/- प्रमाणे अधिकृत प्रतिनिधीकडे रोपांसाठी बुकींग रक्कम भरुन आपले नाव कंत्राटी शेतीसाठी निश्चीत करणे. बुकींग मर्यादित कालावधीसाठी आहे. निवडलेली जमीन प्रतिनिधीला दाखवून पूर्व मशागत करुन एकरी 2500 कि. शेणखत/सेंद्रीयखत उपलब्ध करुन देणे, 8 फूट अंतरावर 3 फूट रुंद व 1.5 उंचीचे बेड बनवणे. रोपे उपलब्ध झाल्या नंतर सुपरवायझरच्या सांगण्या नुसार लागवड करणे. पाणी व्यवस्थापनासाठी ठिंबक सिंचन व्यवस्था करणे. रोपांना लागवडी नंतर 3 महिन्यांनी तार काठीचा आधार देणे. सुपरवायझरच्या सल्ल्या नुसार आंतरमशगत फवारणी, पाणी व्यवस्थापन करणे. पहिल्यांदा 12 महिन्या नंतर व नंतर सहा महिन्यांनी पिकांची काढणी करुन आलेले उत्पादन(ओल्या मुळया) प्रतीनिधीकडे शतावरीचे वजन करुनदेणे व लगेच धनादेश घेणे.
बुकींग रक्कम घेण्यासाठी डिटेल्स-
Account Name- Dream Nation Pvt. Ltd.
Bank-Kotak Mahindra Bank Malad (W)
Account No.-5612068530
तक्रारकर्त्याने आपले शेतात शतावरी पिकाचे लागवडी बाबत-
तक्रारकर्त्याने शेतात शतावरी औषधी वनस्पतीची लागवड सन-2019-2020 मध्ये केली होती या बाबत तलाठी पौना बु., तहसिल पवनी, जिल्हा भंडारा यांनी दिलेल्या 7/12 उता-याची प्रत पुराव्यार्थ दाखल केली, त्यामध्ये संदीप मधूकरराव नरहरशेटटीवार यांनी त्यांची शेतजमीन मौजा ईसापूर, तालुका पवनी, जिल्हा भंडारा येथील भूमापन क्रं-100/2 आराजी-1.90 हेक्टर आर असून त्यापैकी 0.40 हेक्टर आर एवढया शेत्रात (म्हणजेच 01 एकर क्षेत्रात शतावरी औषधी वनस्पती लागवड केल्याचे) शतावरी औषधी वनस्पतीची लागवड केलेली दिसून येते. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने 01 एकर क्षेत्रात शतावरी औषधी वनस्पतीची लागवड केल्याची बाब सिध्द होते (40 आर म्हणजे एक एकर आणि 100 आर म्हणजेच 2.5 एकर आणि अडीच एकर म्हणजे एक हेक्टर असे जमीनीचे मोजमाप आहे)
जिल्हा ग्राहक आयोगाचा अंतीम निष्कर्ष-
जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे सदर ड्रीम नेशन कंपनी मार्फत जे माहितीपत्रक छापलेले आहे त्याचे सुक्ष्म अवलोकन केले असता त्यामध्ये असे नमुद केलेले आहे की, एकरी रुपये-30,000/- प्रमाणे अधिकृत प्रतिनिधीकडे रोपांसाठी बुकींग रक्कम भरुन आपले नाव कंत्राटी शेतीसाठी निश्चीत करणे. हातातील प्रकरणात चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी स्थानिक भंडारा जिल्हयातील शेतक-यां कडून बुकींगसाठी एकरी रुपये-30,000/- प्रमाणे रक्कम गोळा केल्याचे आणि नंतर ती रक्कम ड्रीम नेशन कंपनी कडे वळती केल्याचे आपले प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तरातून कबुली दिलेली आहे, ज्याअर्थी चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी बुकींच्या रकमा गोळा केल्यात त्याअर्थी ते ड्रीम नेशन कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत ही बाब सिध्द होते परंतु त्यांनी ही बाब त्यांचे लेखी उत्तरातून लपवून ठेवलेली आहे .
दुसरी महत्वाची बाब अशी दिसून येते की, माहिती पत्रका प्रमाणे शतावरीचे उत्पादन हे पहिल्यांदा 12 महिन्या नंतर व नंतर सहा महिन्यांनी पिकांची काढणी करुन आलेले उत्पादन(ओल्या मुळया) प्रतीनिधीकडे शतावरीचे वजन करुन देणे व लगेच धनादेश घेणे असे नमुद केलेले आहे याचाच अर्थ असा होतो की, पहिल्यांदा वर्षभरातून एकदाच शतावरीचे उत्पादन घेता येते आणि नंतर मात्र सहा सहा महिन्याचे अंतराने उत्पादन होते. माहिती पत्रका प्रमाणे करारनाम्यासाठी कंपनीकडून अधिकृत प्रतिनिची नियुक्ती केलेली आहे,याचा अर्थ असा होतो की, भंडारा जिल्हया करीता चौरास कंपनीचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर हे अधिकृत प्रतिनिधी असताना त्यांनी ड्रीम नेशन कंपनीचे वतीने संबधित शेतक-यांना करारनामा करुन देणे गरजेचे होते परंतु त्यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही. ही बाब सुध्दा स्पष्ट दिसून येतेकी, तक्रारकर्ता व अन्य शेतकरी यांना ड्रीम नेशन कंपनीचे सुपरवायझर कडून योग्य ते मार्गदर्शन मिळालेले नाही तसेच योग्य ती रासायनिक औषधी पुरविलेली नाहीत तसेच पिक विमा उतरवून दिलेला नाही. या बाबी सिध्द होतात तसेच आयुष मंत्रालय प्रमाणित रोपे पुरविल्याची बाब सिध्द झालेली नाही.
विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन कंपनीने चुकीची जाहिरात करुन तसेच प्रलोभन देऊन ग्राहकांची फसवणूक केल्याची बाब सिध्द होते. नविन ग्राहक संरक्षण कायदा-2019 मध्ये कलम-2 मध्ये खालील प्रमाणे नमुद आहे-
New Consumer Protection Act-2019-
Section-2 subsection (28) “Misleading advertisement” in relation to any product or service means an advertisement, which-
- Falsely describes such product or service, or
- Gives a false guarantee to, or is likely to mislead the consumers as to the nature, substance, quantity or quality of such product or service, or
- Conveys an express or implied representation which, it made by the manufacturer or seller or service provider thereof, would constititute an unfair trade practice, or
- Deliberately conceals important information.
त्याच बरोबर विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 अनुक्रमे चौरास कंपनी व तिचे संस्थापक श्री अनिल महादेवराव नौकरकर यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 ड्रीम नेशन कंपनीचे योजनेची स्थानिक पातळीवर चुकीची जाहिरात करुन , प्रलोभन दाखवून तक्रारदार ग्राहकां कडून बुकींच्या रकमा गोळा केल्यात ही बाब सिध्द होते. नविन ग्राहक संरक्षण कायदा-2019 मध्ये कलम-2 मध्ये खालील प्रमाणे नमुद आहे-
New Consumer Protection Act-2019-
Section-2 subsection (18) “endorsement”, in relation to an advertisement, means-
- Any message, verbal statement, demonstration, or
- Depiction of the name or seal of any institution or organization, which makes the consumer to believe that it reflects the opinion, finding or experience of the person making such endorsemet,
नुकसान भरपाईची रक्कम निर्धारण करण्या बाबत-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचे शेतातील माल सन-2018-2019 मध्ये शेतावरी पिकाचा माल ड्रीम नेशन कंपनीने कबुल करुनही उचल केला नाही परिणामी सन-2018-2019 या वर्षी शेती मध्ये माल तसाच पडून राहिला व सडून गेला त्यामुळे तक्रारकर्त्याचे प्रती एकर
रुपये-2,50,000/- प्रमाणे नुकसान झाले.तसेच पुढील वर्षी सन-2019-2020 मध्ये देखील कंपनीने शेतक-यांचे हितासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही त्यामुळे तयाची शेत जमीन सन-2019-2020 मध्ये सुध्दा तशीच पडून होती त्यामुळे सन-2019-2020 मध्ये सुध्दा प्रती एकर रुपये-2,50,000/- प्रमाणे नुकसान झाले. तयाचे दोन वर्षात रुपये-5,00,000/-रकमेचे नुकसान झाले. त्याच बरोबर सडलेला शतावरी पिकाचा माल काढण्यासाठी तक्रारकर्त्याला प्रती एकर रुपये-20,000/- प्रमाणे खर्च वेगळा करावा लागला. तसेच आंतर मशागती साठी प्रती एकर रुपये-12,000/- प्रमाणे खर्च करावा लागला अशाप्रकारे तक्रारकर्त्याचे एकूण रुपये-5,32,000/- एवढे नुकसान झाले व त्याचे झालेल्या आर्थिक नुकसानी बाबत विरुध्दपक्ष क्रं 1 ते 6 जबाबदार आहेत.
जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने सन-2019-2020 मध्ये सुध्दा त्याचे शेत पडीत ठेवल्याचे नमुद केलेले आहे परंतु या संबधात त्याने कोणताही दस्तऐवजी पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्याला प्रथम वर्षात ड्रीम नेशन कंपनीकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याने प्रथम वर्षातील शतावरीचे पिक सडून गेले होते तर दुस-या वर्षा करीता सुध्दा तक्रारकर्त्याने ड्रीमनेशन कंपनीची वाट पाहून आपले शेत पडीत ठेवले होते ही बाब आश्चर्यकारक आणि अव्यवहार्य तसेच अनाकलनीय दिसून येते. कोणतीही व्यक्ती प्रथम वर्षात मोठया प्रमाणावर पिकाचे नुकसान झाल्या नंतर दुस-या वर्षी आपले शेत त्याच पिकाचे लागवडीसाठी पडीत ठेवणार नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
विरुध्दपक्ष ड्रीम नेशन कंपनीचे माहितीपत्रकात जरी दर सहा महिन्यांनी एकरी रुपये-1,25,000/- प्रमाणे वर्षातून रुपये-2,50,000/- उत्पादनाची हमी दिलेली असली तरी सदर माहितीपत्रका मध्ये काढणी आणि उत्पादन या स्तंभा मध्ये लागवडी नंतर 12 महिन्यांनी पहिल्यांदा काढणीस तयार होते असे नमुद केलेले आहे. म्हणजेच तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष ड्रीमनेशन कंपनीचे माहितीपत्रका प्रमाणे पहिल्या वर्षात 01 एकर करीता रुपये-1,25,000/- प्रमाणे उत्पादन मिळाले असते तसेच विरुदपक्ष ड्रीम नेशन कंपनी कडून आंतर मशागत आणि पिक काढणीचा खर्च प्रती एकरी रुपये-32,000/- देण्याचे मान्य केलेले असले तरी तक्रारकर्त्याने त्या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नसल्याने सदरचा खर्च मंजूर करता येत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला ड्रीम नेशन कंपनीचे माहितीपत्रका प्रमाणे वर नमुद केल्या प्रमाणे झालेल्या नुकसानी बाबत एकूण रुपये- 1,25,000/- एवढी नुकसान भरपाई विरुध्दपक्ष ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 तिचे संचालक यांचे कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे, त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 4 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 5 बाबत-
10. उपरोक्त सविस्तर नमुद केल्या प्रमाणे मुद्दा क्रं 1 ते 4 यांचे उत्तर होकारार्थी नोंदविल्याने तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड,चिंचवड, पुणे ही कंपनी आणि तिचे संचालक असलेले विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे विरुध्द त्याच बरोबर विरुध्दपक्ष चौरास र्फारमर प्रोडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ) तहसिल पवनी जिल्हा भंडारा तर्फे तिचे व्यवस्थापक/संस्थापक विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 श्री अनिल महोदवराव नौकरकर यांचे विरुध्द अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड,चिंचवड, पुणे ही कंपनी आणि तिचे संचालक असलेले विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी शतावरी पिकाचे लागवडीचे नुकसानी बाबत वर नमुद केल्या प्रमाणे 01 एकर क्षेत्रा करीता एका वर्षासाठी नुकसान भरपाई दाखल रुपये-1,25,000/- दयावेत आणि सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांक-25.01.2021 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज दयावे असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर विरुध्दपक्ष चौरास र्फारमर प्रोडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ) तहसिल पवनी जिल्हा भंडारा तर्फे तिचे व्यवस्थापक/संस्थापक विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 श्री अनिल महोदवराव नौकरकर यांनी तक्रारदारास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- दयावेत असे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
11. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन प्रस्तुत तक्रारी मध्ये जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येतो-
:: अंतीम आदेश ::
- तक्रारकर्ता डॉ. श्री संदिप मधुकरराव नरहरशेटटीवार यांची तक्रार विरुध्दपक्ष ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड,चिंचवड, पुणे ही कंपनी आणि तिचे संचालक असलेले विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे विरुध्द त्याच बरोबर विरुध्दपक्ष चौरास र्फारमर प्रोडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ) तहसिल पवनी जिल्हा भंडारा तर्फे तिचे व्यवस्थापक/संस्थापक विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 श्री अनिल महोदवराव नौकरकर यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड,चिंचवड, पुणे ही कंपनी आणि तिचे संचालक असलेले विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकतर्यास शतावरी औषधी वनस्पतीचे लागवडीचे नुकसानी संबधात 01 एकर क्षेत्रासाठी एक वर्षा करीता नुकसान भरपाई म्हणून रुपये-1,25,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष पंचवीस हजार फक्त) दयावेत आणि सदर रकमेवर प्रस्तुत तक्रार दाखल दिनांक-25.01.2021 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज दयावे
- विरुध्दपक्ष चौरास र्फारमर प्रोडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ) तहसिल पवनी जिल्हा भंडारा तर्फे तिचे व्यवस्थापक/संस्थापक विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 श्री अनिल महोदवराव नौकरकर यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) दयावेत.
- सदर अंतीम आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष ड्रीम नेशन प्रायव्हेट लिमिटेड,चिंचवड, पुणे ही कंपनी आणि तिचे तर्फे अनुक्रमे व्यवस्थापक, संस्थापक व संचालक तसेच संचालक आणि संचालक पदावर असलेले विरुध्दपक्ष क्रं 1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या त्याचबरोबर विरुध्दपक्ष चौरास र्फारमर प्रोडयूसर कंपनी लिमिटेड, आसगाव (चौ) तहसिल पवनी जिल्हा भंडारा ही कंपनी आणि तिचे तर्फे तिचे अनुक्रमे व्यवस्थापक/संस्थापक असलेले विरुध्दपक्ष क्रं 5 व 6 श्री अनिल महोदवराव नौकरकर यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वर आदेशित केल्या प्रमाणे प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- सर्व पक्षकारांना प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी
- सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी जिल्हाग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्त संच जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.