जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 116/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 16/05/2023.
तक्रार दाखल दिनांक : 23/05/2023. तक्रार निर्णय दिनांक : 07/06/2024.
कालावधी : 01 वर्षे 00 महिने 22 दिवस
राहुल पि. विलास गायकवाड, वय 30 वर्षे, व्यवसाय : स्वंयनिर्भर,
रा. पशुवैद्यकीय सरकारी दवाखान्याजवळ, कल्पना नगर, लातूर, ता. जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, George Maijo Automobiles Pvt. Ltd.,
प्लॉट नं. 2/216, राष्ट्रीय महामार्ग 47, कन्नाडीकड, बीटीएच सरोवरम
हॉटेलजवळ, मरादू, इर्नाकुलुम - 682 304 (केरळ राज्य)
(2) व्यवस्थापक / प्रोप्रायटर, ड्रीम कार्ड वर्ड, मल्टीकार शोरुम,
छत्रपती चौक, दालचिनी हॉटेलसमोर, बिडवे लॉन्स मंगल
कार्यालयाजवळ, रिंग रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(3) सचिन जगन्नाथ शेंडे, प्रोप्रा. माय कार, छत्रपती चौक, दालचिनी हॉटेलसमोर,
बिडवे लॉन्स मंगल कार्यालयाजवळ, रिंग रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(4) व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., शाखा कार्यालय,
बस स्टॅन्डसमोर, मेन रोड, लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- जे.पी. सूर्यवंशी
विरुध्द पक्ष क्र.1, 2 व 4 :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, उपजीविका व कौटुंबीक गरजा भागविण्याकरिता ते चारचाकी वाहनाद्वारे लक्ष्मी टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स् नांवे व्यवसाय करतात. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून मारुती सुझुकी इंडिया लि. कंपनीची इर्टिगा व्ही.एक्स.आय. सी.एन.जी. वाहन घेण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.2 व 3 हे नोंदणी प्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्याकडे नोंदणी केली. त्यांनी दिलेल्या अंदाजपत्रकानुसार रु.11,84,385/- विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांना अदा केले. त्यामध्ये विमापत्राकरिता रु.51,200/- व मारुती एक्स्टेंडेड वॉरंटीकरिता रु.19,200/- स्वीकारण्यात आले. मात्र तक्रारकर्ता यांना रु.30,549/- विमा हप्ता असणारे विमापत्र देण्यात आलेले असून दिशाभूल करुन त्यांच्याकडून रु.20,651/- अतिरिक्त स्वीकारण्यात आले. तसेच तक्रारकर्ता यांच्याकडून रु.19,200/- स्वीकारण्यात आलेले असताना मारुती एक्स्टेंडेड वॉरंटीबद्दल कागदपत्रे देण्यात आलेले नाहीत. उक्त कथनांच्या अनुषंगाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेले एकूण रु.39,851/- परत करण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.25,000/-; नुकसान भरपाई रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- अशी एकूण रक्कम रु.1,24,851/- व्याजासह देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले आणि त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.3 यांच्यातर्फे विधिज्ञ उपस्थित झालेले आहेत.
(3) तक्रारकर्ता यांचे विधिज्ञ श्री. पटेल यांचा युक्तिवाद ऐकला.
(4) तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेल्या Ertiga VXI CNG White वाहनाचे Proforma Invoice अभिलेखावर दाखल आहे. त्याचे अवलोकन केले असता Insurance (Comprehensive) रु.51,200/- व Maruti Extended Warranty (3rd year / 3rd & 4th Year) करिता रु.19,200/- आकारल्याचे दिसून येतात. अभिलेखावर तक्रारकर्ता यांच्या वाहनाचे विमापत्र दाखल करण्यात आले असून ज्यामध्ये रु.30,549/- हप्ता असल्याचे निदर्शनास येते.
(5) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, विरुध्द पक्ष यांनी त्यांच्याकडून दिशाभूल करुन रु.20,651/- अतिरिक्त स्वीकारले. तसेच रु.19,200/- स्वीकारण्यात आलेले असताना मारुती एक्स्टेंडेड वॉरंटीबद्दल कागदपत्रे देण्यात आलेले नाहीत.
(6) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांच्या वाहनाच्या विमापत्राकरिता रु.30,549/- विमा हप्ता आकारण्यात आल्याचे दिसून येते. तसेच विमापत्रावर विरुध्द पक्ष क्र.1 यांचा शिक्का दिसून येतो. सकृतदर्शनी, तक्रारकर्ता यांच्या वाहनाच्या विमापत्राकरिता रु.30,549/- विमा हप्ता असताना त्यांच्याकडून रु.20,651/- अतिरिक्त वसूल करण्यात आल्याचे सिध्द होते. तक्रारकर्ता यांच्याद्वारे अन्य उपस्थित मुद्दा असा की, त्यांच्याकडून रु.19,200/- स्वीकारण्यात आलेले असताना मारुती एक्स्टेंडेड वॉरंटीबद्दल कागदपत्रे देण्यात आलेले नाहीत. Proforma Invoice मध्ये Maruti Extended Warranty (3rd year / 3rd & 4th Year) करिता रु.19,200/- आकारण्यात आल्याचे दिसते. मात्र अतिरिक्त वॉरंटी दिल्याबद्दल कागदपत्रे उपलब्ध नाहीत.
(7) विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांच्याद्वारे तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचे व दाखल कागदपत्रांचे खंडन झालेले नाही. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांचे कथने व कागदपत्रांना विरोधी पुरावा नाही.
(8) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, विरुध्द पक्ष क्र.2 व 3 हे वाहनाच्या विक्रीची नोंदणी करणारे प्रतिनिधी आहेत आणि विरुध्द पक्ष क्र.1 मार्फत वाहन पुरवितात. तक्रारकर्ता यांनी थेट विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याशी संपर्क करुन वाहन खरेदी केले, असे त्यांचे कथन नाही. वाद-तथ्ये व कागदपत्रे पाहता; तसेच विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 यांचे कोणतेही खंडन नसल्यामुळे तक्रारकर्ता यांचे कथने व कागदोपत्री पुरावे स्वीकारार्ह ठरतात. उक्त विवेचनाअंती विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांचे वाहन विक्री व्यवहार करताना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व त्रुटीयुक्त सेवा पुरवून अतिरिक्त रक्कम वसूल केल्याचे सिध्द होते. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्याकडून रु.39,851/- परत मिळविण्यास हक्कदार ठरतात.
(9) रकमेवर व्याज मिळण्याबद्दल तक्रारकर्ता यांची विनंती पाहता वाहनाकरिता रक्कम दिल्याच्या म्हणजेच दि.7/9/2022 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने रक्कम परत करण्याचा आदेश करणे न्यायोचित राहील.
(10) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना रक्कम परत मिळविण्याकरिता जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(11) तक्रारकर्ता यांनी स्वतंत्रपणे रु.50,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली असली तरी त्याबद्दल समर्पक विश्लेषण व पुरावा नाही. त्यामुळे प्रस्तुत मागणी दखलपात्र ठरत नाही.
(12) विरुध्द पक्ष क्र.4 हे विमा कंपनी आहेत. वाद-तथ्ये व कागदोपत्री पुराव्यांची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्यांनी त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही.
(13) उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना रु.39,851/- परत करावेत.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना उक्त रकमेवर दि.7/9/2022 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-