जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 156/2020. तक्रार दाखल दिनांक : 26/10/2020. तक्रार निर्णय दिनांक : 23/09/2022.
कालावधी : 01वर्षे 11 महिने 03 दिवस
श्री. पवनकुमार पिता राजकुमार गंडले, वय 29 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. प्रकाश नगर, बार्शी रोड, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेज प्रा.लि. तर्फे त्यांचे व्यवस्थापक,
वय सज्ञान, व्यवसाय : नोकरी, रा. बी-91, मायापुरी,
इंडस्ट्रीयल एरिया, फेज-1, नवी दिल्ली - 110 064.
(2) बेंगलोर अयंगर बेकरी तर्फे त्यांचे प्रोप्रायटर,
वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. शिवाजी चौक, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ओ.बी. पेन्सलवार
विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, दि.17/6/2020 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून "थम्स अप" 250 मि.ली. च्या 4 बाटल्या रु.80/- मुल्य देऊन खरेदी केल्या. त्यापैकी 1 बाटलीमध्ये 10-15 मि.ली. असल्याचे आढळून आले. बाटली बदलून द्यावी किंवा परत घ्यावी, अशी विनंती केली असता विरुध्द पक्ष क्र.2 यांनी नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास, पत, कायेदशीर कार्यवाहीचा खर्च, विधिज्ञांचे शुल्क इ. नुकसान झाले. त्याकरिता विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठविले असता दखल घेण्यात आली नाही. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.50,000/- नुकसान भरपाई व्याजासह देण्याचा व कायदेशीर कार्यवाहीकरिता रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी निवेदनपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ता यांच्या लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.17/6/2020 रोजी "थम्स अप" 4 बाटल्या विक्री केल्याचे व त्याचे शुल्क रु.80/- आकारल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांनी खरेदी केलेल्या 4 बाटल्यापैकी 1 बाटलीमध्ये अत्यल्प पेय असल्याचे आढळल्यामुळे बाटली बदलून द्यावी किंवा परत घ्यावी, अशी विनंती केली असता विरुध्द पक्ष क्र.2 यांनी नकार दिला. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केल्याचे दिसून येते.
(4) असे दिसते की, विरुध्द पक्ष हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या वादकथनांस व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांकरिता विरोधी निवेदन व पुरावा नाही. वाद-तथ्यांच्या अनुषंगाने दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून वादकथित "थम्स अप" पेय बाटली खरेदी केल्याचे दिसून येते. अभिलेखावर दाखल छायाचित्र व प्रत्यक्ष बाटलीचे अवलोकन केले असता "थम्स अप" बाटलीमध्ये असणारे पेय नमूद प्रमाणापेक्षा कमी असल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. विरुध्द पक्ष यांनी कोणतेही खंडन करण्याचा प्रयत्न केलेला नाही. अशा स्थितीत, विरुध्द पक्ष क्र.2 यांनी विक्री केलेल्या वादकथित "थम्स अप" बाटलीमध्ये असणारे पेय द्रव नमूद प्रमाणापेक्षा कमी होते, असे अनुमान काढणे न्यायोचित आहे. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब व सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होत असल्यामुळे तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत.
(5) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रास, प्रतिष्ठा, कायेदशीर कार्यवाहीचा खर्च, विधिज्ञांचे शुल्क इ. करिता रु.50,000/- नुकसान रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना वादकथित बाटलीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे जावे लागले आणि त्यांनी नकार दिल्यामुळे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत आणि त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती बाटलीच्या शुल्क रु.20/- व मानसिक त्रास, कायदेशीर कार्यवाही व तक्रार खर्चाकरिता एकूण रु.2,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्र. 156/2020.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना थम्स अप बाटलीचे शुल्क रु.20/- परत करावेत.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास, कायदेशीर कार्यवाही व तक्रार खर्चाकरिता एकूण रु.2,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-