जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 21/2022. तक्रार दाखल दिनांक : 27/01/2022. तक्रार निर्णय दिनांक : 29/07/2022.
कालावधी : 00 वर्षे 06 महिने 02 दिवस
सुनिता भ्र. संजीव बिरादार, वय 37 वर्षे, व्यवसाय : घरकाम व
शेती, रा. चिंचोली, पो. अतनूर, ता. जळकोट, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.,
विभागीय कार्यालय नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,
झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे -411 040.
(2) व्यवस्थापक, जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., दुसरा मजला,
जयका बिल्डींग, कमर्शिअल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001.
(3) तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी कार्यालय, जळकोट, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.व्ही. शास्त्री
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे
विरुध्द पक्ष क्र.3 स्वत: / प्रतिनिधी
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे दि.10/12/2019 ते 9/12/2020 कालावधीकरिता राज्यातील शेतक-यांचा विमा उतरविलेला होता. विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "जयका इन्शुरन्स") हे विमा सल्लागार आहेत आणि विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") हे विमा योजनेची अंमलबजावणी करतात.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, त्यांचे पती मयत संजीव जयराम बिरादार (यापुढे "मयत संजीव") यांच्या नांवे मौजे चिंचोली, ता. जळकोट, जि. लातूर येथे गट क्र. 63/12 व 64/7 मध्ये एकूण क्षेत्र 02 हे. 20 आर. शेतजमीन होती. दि.14/3/2020 रोजी मयत संजीव यांचा विद्युत खांबाच्या ताण तारेस स्पर्श झाल्यामुळे विद्युत धक्क्यामुळे मृत्यू झाला. पोलीस ठाणे, जळकोट येथे आकस्मित मृत्यू क्र. 4/2020 अन्वये घटनेची नोंद करण्यात आली.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, मयत संजीव शेतकरी होते आणि विमा योजनेंतर्गत लाभार्थी होते. तक्रारकर्ती त्यांच्या वारस असल्यामुळे विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा प्रपत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर केली. त्यानंतर विमा दावा प्रस्ताव जयका इन्शुरन्स व विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. परंतु त्यांचा विमा दावा अवास्तव कागदपत्रांची मागणी करुन त्या कारणास्तव प्रलंबीत ठेवण्यात आला. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा कंपनी, जयका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडून विमा रक्कम रु.2,00,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(4) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. विमा कंपनीचे कथन असे की, मयत संजीव हे ग्रामपंचायत येथे काम करीत होते. गावामध्ये बल्ब बसविणे, विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास पूर्ववत करणे इ. काम करीत होते. दि.14/3/2020 रोजी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास गावातील संगराम दादाराव बंठरे यांच्या घराजवळील विद्युत खांबाच्या विद्युत धक्क्यामुळे मृत्यू पावले. मयत संजीव हे व्यवसायाने वीजतंत्री असल्यामुळे वीजतंत्री प्रमाणपत्राची प्रत व विद्युत मंडळाकडून अपघाताचे स्पष्टीकरण आवश्यक आहे. तसेच विमा दाव्याची सूचना 45 दिवसानंतर प्राप्त झालेली आहे. तक्रारकर्ती यांनी उक्त कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे विमा दाव्याचा निर्णय घेता आलेला नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
(5) जयका इन्शुरन्स यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. लेखी निवेदनपत्रामध्ये सर्वप्रथम त्यांनी अपघात विमा योजनेखाली प्राप्त होणा-या दाव्यासंबंधी होणा-या कार्यपध्दतीचा तपशील नमूद केला. त्यांच्या कथनाप्रमाणे दावा मंजूर-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्यारीत असते आणि जयका इन्शुरन्स हे केवळ मध्यस्त आहेत. त्यांचे पुढे कथन आहे की, मयत संजीव यांचा प्राप्त विमा दावा विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. विमा कंपनीने अतिरिक्त मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता तक्रारकर्ती यांनी केलेली नाही. जयका इन्शुरन्सने त्यांची जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी तक्रारकर्ती यांची तक्रार रद्द करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
(6) तालुका कृषि अधिकारी यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती यांचा मुळ प्रस्ताव दि.25/8/2020 रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला. त्रुटीच्या पूर्ततेनंतर तो विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. तसेच पुनश्च: त्रुटीची पूर्तता तक्रारकर्ती यांनी केलेली नाही. त्यांनी प्रस्तावासंबंधी योग्य कार्यवाही केलेली आहे.
(7) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ती व विमा कंपनीतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते ? होय (विमा कंपनीने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र. 1 ते 3 एकमेकांशी पुरक व संलग्नीत असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, विमा कालावधी, विमा योजनेंतर्गत देय लाभ, मयत संजीव यांचा मृत्यू व ते शेतकरी असल्याबाबत उभय पक्षांमध्ये विशेष दुमत नाही. मयत संजीव यांच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्ती यांनी विमा दावा दाखल केला, हे विवादीत नाही. विमा कंपनीकडे विमा दावा निर्णयाधीन व प्रलंबीत आहे, हे विवादीत नाही. विमा दावा प्रलंबीत राहण्याकरिता विमा कंपनीचे कथन असे की, मयत संजीव हे व्यवसायाने वीजतंत्री असल्यामुळे वीजतंत्री प्रमाणपत्राची प्रत व विद्युत मंडळाकडून अपघाताचे स्पष्टीकरण आवश्यक आहे आणि त्याची पूर्तता न केल्यामुळे विमा दाव्याचा निर्णय घेता आलेला नाही.
(9) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता व पोलीस कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत संजीव यांचा मृत्यू विद्युत धक्क्यामुळे झाला, हे स्पष्ट आहे. मयत संजीव यांची शवचिकित्सा करण्यात आलेली आहे आणि अहवालानुसार मृत्यूचे कारण My probable cause of death is "Death due to Electric Shock" असे नमूद आहे. सकृतदर्शनी, मयत संजीव यांचा मृत्यू विद्युत धक्क्यामुळे झाल्याचे दिसते. त्यांच्या मृत्यूकरिता अन्य कोणी जबाबदार असल्याचे किंवा अन्य गुन्हा नोंद असल्याचे दिसून येत नाही. तक्रारकर्ती यांनी सादर केलेल्या कागदपत्राशिवाय विमा कंपनीच्या अन्य मागणी केलेले कागदपत्रे विमा दावा निर्णयीत करण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात किंवा त्यांच्याकडे सादर केलेल्या कागदपत्राअभावी विमा दावा का निर्णयीत करता येत नाही, याचे स्पष्टीकरण नाही. उलटपक्षी, विमा कंपनीस अपेक्षीत व आवश्यक कागदपत्रे योग्य यंत्रणेकडून प्राप्त करुन घेता येऊ शकले असते. आमच्या मते, मयत संजीव यांचा मृत्यू अपघाती असल्याचे स्पष्ट असताना विमा कंपनीने अत्यंत तांत्रिक, अनुचित व अयोग्य कारणास्तव विमा दावा प्रलंबीत ठेवला असून तक्रारकर्ती यांना विमा लाभापासून वंचित ठेवून सेवेतील त्रुटी निर्माण केलेली आहे.
(10) उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ती ह्या विमा रक्कम रु.2,00,000/- मिळण्यास पात्र आहेत. तक्रारकर्ती यांनी विमा रकमेची अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने मागणी केलेली आहे. प्रकरणाच्या वस्तुस्थितीनुसार व प्रचलित दरानुसार व्याज दर निश्चित होत असतो. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन ग्राहक तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून विमा रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळण्यास तक्रारकर्ती पात्र ठरतात.
(11) तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ती यांना त्यांच्या पतीच्या अपघाती व अकाली मृत्यूपश्चात विमा रक्कम परत मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच विमा कंपनीने विमा दावा प्रलंबीत ठेवल्यामुळे तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. शिवाय, तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(12) जयका इन्शुरन्स हे विमा सल्लागार व तालुका कृषि अधिकारी हे शासकीय यंत्रणेचा भाग आहेत आणि प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही.
(13) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्र. 21/2022.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच, उक्त विमा रकमेवर दि. 27/1/2022 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने उपरोक्त आदेशांची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-