Maharashtra

Latur

CC/95/2021

सपणा ओमप्रकाश हुलगुत्ते - Complainant(s)

Versus

व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंश्युरंस कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. ए. एम. के. पटेल

11 Oct 2022

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/95/2021
( Date of Filing : 19 Mar 2021 )
 
1. सपणा ओमप्रकाश हुलगुत्ते
t
...........Complainant(s)
Versus
1. व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंश्युरंस कं. लि.
t
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. REKHA R. JADHAV PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 11 Oct 2022
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 95/2021.                        तक्रार दाखल दिनांक : 19/03/2021.                                                                           तक्रार निर्णय दिनांक :  11/10/2022.

                                                                                 कालावधी :  01 वर्षे 06 महिने 23 दिवस

 

सपना भ्र. ओमप्रकाश हुलगुत्ते, वय 34 वर्षे,

व्यवसाय : घरकाम, रा. अंबुलगा (बु.), ता. निलंगा, जि. लातूर.                                तक्रारकर्ती

 

 

                        विरुध्द

 

 

(1) व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.,

     विभागीय कार्यालय नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,

     झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040.

(2) व्यवस्थापक, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., दुसरा मजला,

     जयका बिल्डींग, कमर्शिअल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001.

(3) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, निलंगा, जि. लातूर.                            विरुध्द पक्ष

 

 

गणपूर्ती :          मा. श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार)

                        मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- असिफ एम.के. पटेल

विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एस. व्ही. शास्त्री

विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- दिपक एम. परांजपे

विरुध्द पक्ष क्र.3  : स्वत: / प्रतिनिधी

 

आदेश 

 

मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, महाराष्ट्र शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतक-यांचा विरुध्द पक्ष क्र.1 (विरुध्द पक्ष क्र.1 यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे दि.10/12/2019 ते 9/12/2020 कालावधीकरिता विमा उतरविलेला होता. विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "जयका इन्शुरन्स") हे विमा योजना राबविण्यासाठी विमा सल्लागार आहेत आणि विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") हे शासन परिपत्रकानुसार विमा योजनेची अंमलबजावणी करतात.

 

(2)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्यांचे पती ओमप्रकाश दत्तात्रय उर्फ दत्तू हुलगुत्ते (यापुढे "मयत ओमप्रकाश") हे शेतकरी होते. मयत ओमप्रकाश यांच्या वडिलांचे नांवे मौजे अंबुलगा (बु.), ता. निलंगा, जि. लातूर येथे गट क्र. 72 मध्ये 28 गुंठे, गट क्र. 73 मध्ये 37 गुंठे व गट क्र. 189/1 मध्ये 13 गुंठे शेतजमीन क्षेत्र आहे. एकत्रित कुटुंबाच्या त्या मिळकतीमध्ये ओमप्रकाश शेतजमिनीची वहिवाट करीत होते. दि.12/11/2020 रोजी शेतामध्ये काम करताना सर्पदंश होऊन ओमप्रकाश यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. पोलीस ठाणे, औराद शहाजनी येथे आकस्मिक मृत्यू क्र. 44/2020 अन्वये घटनेची नोंद करण्यात आली. 

 

(3)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, मयत ओमप्रकाश हे शेतकरी होते आणि विमा योजनेकरिता लाभार्थी होते. तक्रारकर्ती ह्या वारस असल्यामुळे विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्याद्वारे विमा दावा प्रस्ताव जयका इन्शुरन्स यांच्याकडे पाठविण्यात आला. विमा कंपनी व जयका इन्शुरन्स यांच्याद्वारे निर्देशीत त्रुटींची पूर्तता करण्यात आली. परंतु त्यांचा विमा प्रस्ताव प्रलंबीत ठेवण्यात आलेला आहे आणि सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.2,00,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने देण्याचा विमा कंपनी, जयका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.

 

(4)       विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. विमा कंपनीचे कथन असे की, महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्र.शेअवि-2018/प्र.क्र.193/11अे, दि.19 सप्टेंबर, 2019 अन्वये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.  दूर्घटनेनंतर 45 दिवसाच्या कालावधीमध्ये दावा विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रस्ताव जयका इन्शुरन्स यांच्याकडे पाठविण्यात येऊन तो विमा कंपनीकडे सादर करण्यात येतो. प्रस्तुत प्रकरणात विमा कंपनीस केवळ सूचना प्राप्त झालेली आहे. दाव्यासंदर्भात दावा प्रपत्र व आवश्यक कागदपत्रे प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे तक्रारकर्ती यांच्या दाव्यासंबंधी निर्णय घेता आलेला नाही.  विमा प्रस्तावाच्या Status Report च्या अनुक्रमांक 83 मध्ये तक्रारकर्ती यांच्या नांवापुढे कागदपत्रांच्या अपूर्णतेबद्दल शेरा नमूद आहे. तक्रारकर्ती यांनी जयका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्यामुळे पूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना सेवेतील त्रुटीकरिता जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्ती यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेली कथने अमान्य करुन अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.

 

(5)       जयका इन्शुरन्सद्वारे अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर करण्यात आले. सर्वप्रथम त्यांनी अपघात विमा योजनेखाली प्राप्‍त होणा-या दाव्‍यासंबंधी होणा-या कार्यपध्‍दतीचा तपशील नमूद केला. त्‍यांच्‍या कथनाप्रमाणे दावा मंजूर-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्‍यारीत असते आणि जयका इन्‍शुरन्‍स हे केवळ मध्यस्त आहेत. त्यांचे पुढे कथन आहे की, तक्रारकर्ती यांच्या पतीचे दि.12/11/2020 रोजी अपघाती निधन झाले. योजनेनुसार तक्रारकर्ती यांनी तालुका कृषि अधिका-यांकडे सादर केलेला अर्ज त्यांना दि.24/3/2021 रोजी प्राप्त झाला. अर्जाची शहानिशा करताना दाव्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी निदर्शनास आल्या. त्यामुळे दि.3/7/2021 रोजी तक्रारकर्ती यांच्याकडे फेरफार उतारा, 6-क, एफ.आय.आर. व व्हिसेरा रिपोर्टची मागणी करण्यात आली. परंतु तक्रारकर्ती यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अपूर्ण दावा विमा कंपनीकडे पाठविता आला नाही. जयका इन्‍शुरन्‍सने त्‍यांची जबाबदारी त्‍वरीत व व्‍यवस्थित पार पाडली आहे आणि त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी नाही. शेवटी तक्रारकर्ती यांची तक्रार रद्द करण्‍यात यावी, अशी विनंती केलेली आहे. 

 

 

(6)       तालुका कृषि अधिकारी यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्‍यांचे असे निवेदन आहे की, तक्ररकर्ती यांनी मयत ओमप्रकाश यांचा सादर केलेला प्रस्ताव दि.6/1/2021 रोजी प्राप्त झाला आणि त्याच दिवशी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्याकडे पाठविण्यात आला. विमा कंपनीचे प्रस्तावामध्ये त्रुटीची पूर्तता करण्याबाबत कळविल्यानंतर तक्रारकर्ती यांच्याकडून व्हिसेरा रिपोर्ट अप्राप्त आहे. विमा कंपनीकडून विमा प्रस्ताव प्रलंबीत ठेवण्यात आलेला आहे, असे त्यांचे निवेदन आहे.

 

 

(7)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ती व विमा कंपनीतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                    उत्तर

 

(1) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी                  होय (विमा कंपनीने)

     केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                   

(2) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने अनुतोष आहे काय ?                                           होय

     असल्‍यास किती ?                                                                          अंतिम आदेशाप्रमाणे

(3) काय आदेश  ?                                                                             अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

कारणमीमांसा

 

 

(8)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, विमा कंपनीने गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्‍यातील शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण दिलेले होते, हे विवादीत नाही. अभिलेखावर दाखल 7/12 उता-यांचे अवलोकन केले असता गाव : अंबुलगा (बु.), ता. निलंगा, जि. लातूर येथील भुमापन क्रमांक व उपविभाग : 189/1, 72, 73 व 90 मध्ये मयत ओमप्रकाश यांचे पिता दत्तु शिवाप्पा हुलगुत्ते हे भोगवाटदार असून त्यांचे नांवे शेतजमीन क्षेत्र असल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ती यांचे कथन असे की, एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीमध्ये ओमप्रकाश हे शेतजमिनीची वहिवाट करीत होते आणि शेतीमध्ये काम करताना सर्पदंश झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्र.शेअवि-2018/प्र.क्र.193/11अे, दि.19 सप्टेंबर, 2019 अन्वये राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्याबरोबरच       शेतक-याच्या कुटुंबातील कोणताही 1 वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले व्यक्ती (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) यांचा विमाछत्र प्रदान केलेले आहे. दत्तु शिवाप्पा हुलगुत्ते हे वहितीधारक शेतकरी आहेत आणि मयत ओमप्रकाश हे त्यांचे पुत्र असल्यामुळे विमा योजनेकरिता पात्र लाभार्थी
ठरतात.

(9)       अभिलेखावर पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवाल, मृत्यू कारण प्रमाणपत्र इ. कागदपत्रे दाखल करण्यात आलेले आहेत. अप्राकृतिक मृत्यू नोंद क्र. 44/2020, मरनोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा इ. पोलीस कागदपत्रे पाहता ओमप्रकाश यांना सरपटणा-या प्राण्याने दंश केल्याचे  दिसून येते. शवचिकित्सा अहवाल व मृत्यू प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता ओमप्रकाश यांना सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद आहे.

 

(10)     उभयतांचा वाद-प्रतिवाद व अभिलेखावर दाखल कागदपत्रे पाहता मयत ओमप्रकाश यांच्‍या मृत्‍यूनंतर तक्रारकर्ती यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा व कागदपत्रे दाखल केले, हे विवादीत नाही. त्यानंतर तालुका कृषि अधिका-यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्यामार्फत जयका इन्शुरन्स यांच्याकडे विमा दावा प्रस्ताव सादर केला, ही बाब विवादीत नाही. जयका इन्शुरन्सच्या कथनानुसार दि.24/3/2021 रोजी प्राप्त झाला; परंतु अर्जाची शहानिशा करताना दाव्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी निदर्शनास आल्या. त्यामुळे दि.3/7/2021 रोजी तक्रारकर्ती यांच्याकडे फेरफार उतारा, 6-क, एफ.आय.आर. व व्हिसेरा रिपोर्टची मागणी करण्यात आली असता तक्रारकर्ती यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अपूर्ण दावा विमा कंपनीकडे पाठविलेला नाही. त्या अनुषंगाने विमा कंपनीचे कथन असे की, प्रस्तुत प्रकरणात विमा कंपनीस केवळ सूचना प्राप्त झालेली असून दाव्यासंदर्भात दावा प्रपत्र व आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाले नसल्यामुळे विमा दाव्यासंबंधी निर्णय घेता आलेला नाही.

 

(11)     तक्रारकर्ती यांचेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक : शेअवि-2018/प्र.क्र.193/11अे, दि.19 सप्टेंबर, 2019 दाखल करण्यात आलेले आहे. तसेच, विमा कंपनीनेही आपल्या लेखी निवेदनपत्रामध्ये उक्त शासन परिपत्रकाचा संदर्भ नमूद केलेला आहे. त्यामुळे शासन निर्णयाबाबत उभयतांमध्ये मान्यस्थिती आहे. शासन परिपत्रकानुसार दिसून येते की, जयका इन्शुरन्सने अपूर्ण विमा प्रस्तावाबाबत विमा कंपनीस कळविणे; त्याची संगणक प्रणालीमध्ये नोंद करणे; त्याचा अहवाल शासकीय यंत्रणेकडे पाठविणे इ. सह अन्य कार्यवाही करणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता, विमा दाव्यासंबंधी त्रुटींची पूर्तता केल्याचे तक्रारकर्ती यांचे निवेदन आहे. काहीही असले तरी, जयका इन्शुरन्सने तक्रारकर्ती यांचा विमा दावा प्रस्ताव आहे त्या स्थितीमध्ये विमा कंपनीकडे पाठविणे किंवा त्याबाबत विमा कंपनीस कळविणे आवश्यक होते.  हे सत्य आहे की, विमा योजनेच्या अनुषंगाने विमा दाव्यांच्या त्रुटींची पूर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्याकरिता जयका इन्शुरन्स ही मध्यस्त यंत्रणा आहे आणि त्याकरिता त्यांना मोबदला / दलाली (Brokerage) मिळते.

 

(12)     मयत ओमप्रकाश यांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचे व तो अपघाती असल्याचे सिध्द होते. मयत ओमप्रकाश यांच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्ती यांनी विमा दावा सादर केलेला आहे. शासन निर्णयानुसार सर्पदंश झाल्यास मरनोत्तर पंचनामा व शवचिकित्सा अहवाल अत्यावश्यक कागदपत्रे आहेत आणि ते कागदपत्रे विमा दाव्यासोबत जोडलेले होते. जयका इन्शुरन्सने विमा दावा व सोबत जोडलेले कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविले नसले तरी प्रस्तुत ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने संबंधीत कागदपत्रे विमा कंपनीस प्राप्त झालेले दिसून येतात. विमा योजनेचा उद्देश, त्‍यामागील सामाजिक व परोपकारी हेतुचा विचार केला असता विमा कंपनीने प्रस्तुत ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रांच्या आधारे मयत ओमप्रकाश यांच्या विमा दाव्यासंबंधी विचार करणे आवश्यक होते.

 

 

(13)     उक्त विवेचनाअंती, मयत ओमप्रकाश यांच्या अपघाती मृत्यूपश्चात विमा योजनेनुसार तक्रारकर्ती ह्या विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र असताना विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दाव्यासंबंधी अनुचित दृष्टीकोन ठेवल्याचे दिसून येते. निश्चितच ते कृत्य  सेवेमध्ये त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्ती रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र आहेत. तक्रारकर्ती यांना विमा रक्कम न दिल्‍यामुळे जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई रु.5,000/- व तक्रार खर्च रु.3,000/- मिळण्याकरिता तक्रारकर्ती पात्र ठरतात. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

 

आदेश

 

(1) तक्रारकर्ती यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

(2) विरुध्‍द पक्ष क्र. 1 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- विमा रक्कम द्यावी.

तसेच, उक्त रकमेवर तक्रार दाखल दि.19/3/2021 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.

(3) विरुध्‍द पक्ष क्र. 1 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.

(4) विरुध्‍द पक्ष क्र. 1 विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)                                                   (श्रीमती रेखा  जाधव)                

             सदस्‍य                                                                     अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)             

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MRS. REKHA R. JADHAV]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.