जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 294/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 20/10/2022. तक्रार निर्णय दिनांक : 08/04/2024.
कालावधी : 01 वर्षे 05 महिने 19 दिवस
व्यंकटेश्वर वसंत भोजने, वय 32 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. हिप्परगा, ता. औसा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
विभागीय कार्यालय नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट, झेड के
वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040.
(2) व्यवस्थापक, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., दुसरा मजला,
जयका बिल्डींग, कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स्, नागपूर - 440 001.
(3) तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय,
औसा, ता. औसा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- प्रमोद एल. शिंदे
विरुध्द पक्ष क्र.1 :- अनुपस्थित / एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र.2 व 3 :- यांना जिल्हा आयोगाने सूचनापत्र काढलेले नाही.
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, महाराष्ट्र शासनाने विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे 'विमा कंपनी') व विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे 'जयका इन्शुरन्स') यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गंत विमा हप्ता भरुन 10 ते 75 वयोगटातील शेतक-यांचा विमा उतरविलेला आहे आणि विमा योजनेनुसार शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या अपघाती मृत्यूपश्चात त्यांच्या वारसांना रु.2,00,000/- देण्याची तरतूद आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे 'तालुका कृषि अधिकारी') यांच्यावर विमा योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांच्या आई शामल वसंत भोजने (यापुढे 'मयत शामल') ह्या शेती व्यवसाय करीत होत्या आणि त्यांच्या नांवे मौजे हिप्परगा, ता. औसा, जि. लातूर येथे गट क्र.411, 498 व 501 मध्ये एकूण 1 हे.08 आर. शेतजमीन होती. दि.23/9/2020 रोजी तक्रारकर्ता व मयत शामल दुचाकीवर बसून किल्लारी येथून गावी परत जात असताना मयत शामल चालत्या दुचाकीवरुन खाली रस्त्यावर पडल्या. अपघातामध्ये त्यांच्या डोक्यास इजा झाल्यामुळे सह्याद्री हॉस्पिटल, लातूर येथे दाखल केले असता उपचारादरम्यान दि.25/9/2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला. घटनेसंबंधी पोलीस ठाणे, किल्लारी, ता. औसा येथे आ.मृ.नं. 51/2020 अन्वये नोंद करण्यात आली. पोलीस यंत्रणेद्वारे घटनास्थळ पंचनामा व मरणोत्तर पंचनामा करण्यात येऊन मयत सुरेश यांची शवचिकित्सा करण्यात आलेली आहे. दि.30/10/2020 रोजी तालुका दंडाधिकारी, औसा यांच्याकडे अंतिम अहवाल क्र. 38/2020 अन्वये समरी सादर करण्यात आली.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, मयत शामल ह्या व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे तक्रारकर्ता हे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेनुसार लाभार्थी आहेत. तक्रारकर्ता यांनी मयत शामल यांनी दि.9/2/2021 रोजी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दाव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर केले. तालुका कृषि अधिकारी यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे व त्यांनी जायका इन्शुरन्स यांच्याकडे प्रस्ताव पाठवून दिला. त्यानंतर मयत शामल यांचा शवचिकित्सा अहवाल व वयाचा पुरावा अशा त्रुटीयुक्त कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र दि.13/12/2021 रोजीच्या पत्राद्वारे मयत शामल यांचा मृत्यू चक्कर आल्यामुळे गाडीवरुन पडल्यामुळे झाला आणि तो अपघात होऊ शकत नाही; त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याच्या कारणास्तव विमा दावा नामंजूर केला. वास्तविक पाहता, मयत शामल यांचा मृत्यू अपघाती असताना नैसर्गिक मृत्यू संबोधून काल्पनिक व चुकीच्या कारणास्तव विमा दावा नामंजूर केला आणि सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. अंतिमत: रु.2,00,000/- व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा विमा कंपनी, जायका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(4) विमा कंपनीस जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले; मात्र ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले.
(6) अभिलेखावर दाखल 'गाव नमुना 8-अ' उतारा पाहता मयत शामल ह्या शेतकरी असल्याचे स्पष्ट होते. आकस्मित मृत्यू खबर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा इ. कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत शामल यांचा रस्ता अपघात झाला, याबद्दल पुष्ठी मिळते. शवचिकित्सा अहवालाचे अवलोकन केले असता मयत शामल यांच्या डोक्यास इजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. विमा कंपनी जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित आहे आणि त्यांच्याद्वारे ग्राहक तक्रार व दाखल पुराव्यांचे खंडन नाही. निश्चितपणे, ग्राहक तक्रार, शपथपत्र व कागदपत्रांस विरोधी पुरावा नाही.
(7) अभिलेखावर अ.क्र. 26 वर दाखल असणा-या तालुका कृषि अधिका-यांच्या दि.13/12/2021 रोजीच्या पत्रामध्ये विमा कंपनीने नैसर्गिक मृत्यू (सदर मृत्यू हा मयत या चक्कर आल्यामुळे गाडीवरुन पडून झाल्यामुळे झाला असल्यामुळे हा अपघात होऊ शकत नाही.) या बाबीखाली नामंजूर केल्याचे नमूद आहे. तालुका कृषि अधिका-यांच्या पत्राची दखल घेतली असता मयत शामल यांच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्ता यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा दावा दाखल केलेला होता आणि विमा कंपनीने तो नामंजूर केला, हे स्पष्ट होते. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत शामल ह्या दुचाकीवरुन खाली पडल्यामुळे जखमी झाल्या आणि वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. हे सत्य आहे की, विमा कंपनीने जिल्हा आयोगापुढे उपस्थित होऊन मयत शामल यांचा मृत्यू नैसर्गिक होता, हे सिध्द करण्याचा प्रयत्न केलेला नाही. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत शामल यांचा मृत्यू नैसर्गिक होता, हे सिध्द होत नाही. सकृतदर्शनी, मयत शामल यांचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू पावल्याचे सिध्द होत असताना त्यांचा मृत्यू नैसर्गिक ठरविणे अन्यायकारक व अनुचित आहे. विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा अनुचित व अयोग्य कारणास्त नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. त्यामुळे विमा योजनेनुसार तक्रारकर्ता रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात. विमा रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने मिळण्यासंबंधी तक्रारकर्ता यांची विनंती पाहता विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 13/12/2021 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने विमा रकमेवर व्याज मंजूर करणे न्यायोचित ठरते.
(8) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्यामुळे विमा रक्कम मिळविण्याकरिता तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(9) अंतिमत: मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच, उक्त विमा रकमेवर दि.13/12/2021 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र. 294/2022.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत उक्त आदेशाची अंमलबजावणी करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-