जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 72/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 23/03/2023.
तक्रार दाखल दिनांक : 29/03/2022. तक्रार निर्णय दिनांक : 30/10/2024.
कालावधी : 01 वर्षे 07 महिने 07 दिवस
(1) बब्रुवान पि. प्रभू माने, वय 70 वर्षे, व्यवसाय : शेती.
(2) आवनाबाई भ्र. बब्रुवान माने, वय 65 वर्षे, व्यवसाय : गृहिणी व शेती.
(3) प्रभाकर पि. सतिष माने, वय 14 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.
(4) मुकेश पि. सतिष माने, वय 11 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.
तक्रारकर्ते क्र.3 व 4 अज्ञान यांच्यातर्फे त्यांचे पालनकर्ता
आजोबा तक्रारकर्ता क्र.1 बब्रुवान पि. प्रभू माने,
सर्व रा. वाकसा, पो. उस्तुरी, ता. निलंगा, जि. लातूर. :- तक्रारकर्ते
विरुध्द
(1) व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.,
विभागीय कार्यालय नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,
झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040.
(2) व्यवस्थापक, चॉइस इन्शुरन्स ब्रोकींग इंडिया प्रा. लि.,
प्लॉट नं. 156-158, जे.बी. नगरजवळ, अंधेरी, मुंबई - 400 099.
(3) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, निलंगा, जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एस. व्ही. शास्त्री
विरुध्द पक्ष क्र. 2 :- अनुपस्थित / एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र. 3 :- स्वत: / प्रतिनिधी
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेखाली दि.8/8/2022 ते 7/8/2023 कालावधीकरिता विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे राज्यातील सर्व शेतक-यांना विमा संरक्षण दिलेले होते. विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "चॉईस इन्शुरन्स") हे विमा योजनेचे सल्लागार असून विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") हे विमा योजनेची अंमलबजावणी करणारे शासकीय अधिकारी आहेत.
(2) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ते क्र.1 व 2 यांचे पुत्र व तक्रारकर्ते क्र.3 व 4 यांचे पिता सतिष बब्रुवान माने (यापुढे "मयत सतिष") यांच्या नांवे मौजे वाकसा, ता. निलंगा, जि. लातूर येथे गट क्र. 30/अ मध्ये 1 हे. 08 आर. शेतजमीन क्षेत्र होते आणि तक्रारकर्ता क्र.1 यांच्या नांवे गट क्र. 26/1/ब मध्ये 0 हे. 86 आर. शेतजमीन क्षेत्र आहे. दि.26/8/2022 रोजी मयत सतिष हे बसवकल्याण येथून दुचाकीवर बसून त्यांच्या मौजे वाकसा गावी येत असताना उस्तुरी गावाच्या शिवारामध्ये अचानक जंगली कुत्रा अंगावर आल्यामुळे कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये दुचाकीवरुन पडले आणि त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यानंतर मयत सतिष यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असताना दि.1/11/2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला. घटनेबद्दल पोलीस ठाणे, कासारशिरशी येथे क्र. 275/2022 नोंद करण्यात आलेली आहे. पोलीस यंत्रणेद्वारे घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. तसेच मयत सतिष यांची शवचिकित्सा करण्यात आलेली आहे.
(3) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, मयत सतिष हे शेतकरी होते आणि विमा योजनेंतर्गत लाभार्थी होते. तक्रारकर्ते हे त्यांचे वारस असल्यामुळे विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा प्रपत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर केले. त्यानंतर तक्रारकर्ते यांचा विमा दावा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्यामार्फत चॉइस इन्शुरन्स यांच्याकडे पाठविण्यात आला. चॉइस इन्शुरन्स व विमा कंपनीने विमा दाव्यासंबंधी काढलेल्या त्रुटीची पूर्तता केली; मात्र त्यांचा विमा दावा प्रलंबीत ठेवण्यात आला आणि सेवेमध्ये त्रुटी करण्यात आलेली आहे. उक्त वादकथनांच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.2,00,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- व्याजासह देण्याचा देण्यासंबंधी विमा कंपनी, चॉइस इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केलेली आहे.
(4) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यांच्याविरुध्द "विना लेखी निवेदनपत्र" आदेश करण्यात आले.
(5) चॉइस इन्शुरन्स यांना सूचनापत्र प्राप्त झाले; परंतु ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(6) तालुका कृषि अधिकारी यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांच्या कथनानुसार दि.27/1/2023 रोजी तक्रारकर्ता क्र.1 यांनी मयत सतिष यांचा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केला. दि.7/4/2022 पासून विमा कंपनीचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. शासनाकडून विमा कंपनीची नेमणूक झालेली नसल्यामुळे तो कालावधी खंडीत कालावधी समजण्यात येतो. दि.7/4/2022 ते 22/8/2022 कालावधीमध्ये झालेल्या अपघाताचे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. परंतु त्यानंतर झालेल्या अपघाती प्रस्ताव स्वीकारण्याच्या अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे तालुकास्तरावर त्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला असून प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर व त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयास तो पाठविला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
(7) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, तालुका कृषि अधिकारी यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) मयत सतिष यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत
अपघाती मृत्यूस विमा संरक्षण लागू असल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ते अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दि.19/9/2019 रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन केले असता त्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविताना अवलंबण्याची कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना नमूद केलेल्या दिसून येतात. तसेच दि.8/8/2022 रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन केले असता सन 2022-23 करिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी विमा कंपनी व विमा सल्लागार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून येते.
(9) तक्रारकर्ते यांचे कथन असे की, विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा प्रपत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर केले आणि चॉइस इन्शुरन्स व विमा कंपनीने विमा दाव्यासंबंधी काढलेल्या त्रुटीची पूर्तता केली; परंतु त्यांचा विमा दावा प्रलंबीत ठेवण्यात आलेला आहे. विमा कंपनीने लेखी निवदनपत्र दाखल केले नसल्यामुळे 'विनालेखी निवेदनपत्र' व चॉइस इन्शुरन्स अनुपस्थित राहिल्यामुळे एकतर्फा चौकशी करण्यात आलेली आहे. अशा स्थितीत, तक्रारकर्ते यांचे वादकथने व कागदोपत्री पुराव्यांकरिता त्यांच्याकडून खंडन किंवा विरोधी पुरावा उपलब्ध नाही. तालुका कृषि अधिकारी यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले आणि त्यांच्या कथनानुसार शासनाकडून विमा कंपनीची नेमणूक न झाल्यामुळे तो कालावधी खंडीत कालावधी समजण्यात आला. तसेच दि.7/4/2022 ते 22/8/2022 कालावधीमध्ये झालेल्या अपघाताचे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. मात्र त्यानंतर झालेल्या अपघाती प्रस्ताव स्वीकारण्याच्या अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर व त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर तक्रारकर्ते यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला जाईल, असे त्यांनी नमूद केले आहे.
(10) निर्विवादपणे, दि.26/8/2022 रोजी मयत सतिष यांचा दुचाकी वाहनावरुन जात असताना रस्ता अपघात झाला आणि वैद्यकीय उपचार सुरु असताना दि.1/11/2022 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेखाली दि.8/8/2022 ते 7/8/2023 कालावधीकरिता अपघाती विमा उतरविला, असे तक्रारकर्ते यांचे कथन असले तरी अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत सतिष यांचा अपघात झाला, त्या दिवशी म्हणजेच दि. 26/8/2022 रोजी विमा कंपनीकडे राज्यातील शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण दिलेले होते, असे सिध्द होण्याकरिता उचित पुरावा नाही. सकृतदर्शनी, मयत सतिष यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघाती मृत्यूस विमा संरक्षण लागू नसल्यामुळे तक्रारकर्ते अनुतोषास पात्र ठरत नाहीत.
(11) आमच्या मते, तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार रद्द होण्यास पात्र असली तरी विमा योजना सुरु करण्याचा शासनाचा उद्देश पाहता विमा योजनेच्या खंडीत कालावधीतील पात्र विमा दाव्याच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासंबंधी शासन निर्देशानुसार कार्यवाही करणे शक्य असल्यास तालुका कृषि अधिकारी यांनी त्याप्रमाणे उचित व आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षीत राहील, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(12) अंतिमत: खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-