जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 329/2022. तक्रार दाखल दिनांक : 29/11/2022. तक्रार निर्णय दिनांक : 05/01/2024.
कालावधी : 01 वर्षे 01 महिने 07 दिवस
दैवशाला सूर्यकांत जगदाळे, वय 48 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. खुंटेफळ, ता. जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
विभागीय कार्यालय : ऑफीस नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,
झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040.
(2) व्यवस्थापक, ऑक्झीलीय इन्शुरन्स ब्रोकींग प्रा. लि.,
प्लॉट नं. 61/4, सेक्टर-28, वाशी, नवी मुंबई - 400 703.
(3) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, लातूर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- एल. डी. पवार
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- श्रीकांत टी. अग्रवाल
विरुध्द पक्ष क्र. 2 :- अनुपस्थित / एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र.3 :- स्वत:
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेखाली विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे राज्यातील शेतक-यांना दि.7/4/2021 ते 6/4/2022 कालावधीकरिता विमा संरक्षण दिलेले होते. विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "ऑक्झीलियम इन्शुरन्स") हे विमा योजनेचे सल्लागार असून विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") हे विमा योजनेची अंमलबजावणी करणारे शासकीय अधिकारी आहेत.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ती यांचे पती सूर्यकांत राजाराम जगदाळे (यापुढे "मयत सूर्यकांत") यांच्या नांवे मौजे खुंटेफळ, ता. जि. लातूर येथे शेतजमीन गट क्र. 91 मध्ये एकूण 1 हे. 29 आर. क्षेत्र होते. दि.27/9/2021 रोजी मयत सूर्यकांत हे त्यांच्या बहिणीस आणण्यासाठी भानसगाव, ता. जि. उस्मानाबाद येथे जात असताना सोनेगांव रोडलगत पाणी साचलेल्या खड्डयात पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेसंबंधी पोलीस ठाणे, उस्मानाबाद ग्रामीण, उस्मानाबाद येथे आकस्मीत मृत्यू क्र. 22/2021 अन्वये नोंद करण्यात आली.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, मयत सूर्यकांत शेतकरी होते आणि विमा योजनेंतर्गत लाभार्थी होते. तक्रारकर्ती त्यांच्या वारस असल्यामुळे विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा प्रपत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर केले. त्यानंतर विमा दावा प्रस्ताव ऑक्झीलियम इन्शुरन्स व विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. तक्रारकर्ती यांनी विमा दाव्यासंबंधी त्रुटीची पूर्तता केली. परंतु विमा कंपनीने दि.18/7/2022 रोजीच्या पत्राद्वारे मयत सूर्यकांत हे अपघातसमयी दारु प्राशन केलेले होते, या कारणास्तव विमा दावा नामंजूर केला. मयत सूर्यकांत हे अपघातसमयी दारु पिले होते, असा पुरावा नसताना विमा कंपनीने त्यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.2,00,000/- व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.7,000/- देण्यासंबंधी विमा कंपनी, ऑक्झीलियम इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(4) विमा कंपनीतर्फे विधिज्ञ जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले. मात्र विमा कंपनीतर्फे लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. उचित संधी दिल्यानंतर त्यांच्याविरुध्द 'विनालेखी निवेदनपत्र आदेश' करण्यात आले.
(5) ऑक्झीलियम इन्शुरन्स यांना सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(6) तालुका कृषि अधिकारी यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती यांचा प्रस्ताव दि.27/12/2021 रोजी प्राप्त झाला. दि.30/12/2021 रोजी तो प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्या कार्यालयाकडे सादर केला. त्यानंतर विमा कंपनीतर्फे दि.18/7/2022 रोजी ई-मेलद्वारे विमा दावा रद्द केल्याचे कळविले आणि ते पत्र दावाधारकास पोहोच केले.
(7) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, तालुका कृषि अधिकारी यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते ? होय (विमा कंपनीने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र. 1 ते 3 एकमेकांशी पुरक व संलग्न असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेसंबंधी कृषि आयुक्त, विमा कंपनी व ऑक्झीलियम इन्शुरन्स यांच्यामध्ये दि.7/4/2021 रोजी अस्तित्वात आलेला विमा संविदालेख पाहता दि.7/4/2021 ते 6/4/2022 कालावधीमध्ये विमा कंपनीने महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण दिल्याचे निदर्शनास येते. अभिलेखावर दाखल 7/12 उता-यांचे अवलोकन केले असता गाव : खुंटेफळ, ता. लातूर येथील भुमापन क्रमांक : 91 मध्ये क्षेत्र 1.29 आर. शेतजमिनीकरिता तक्रारकर्ती यांचे नांव भोगवाटदार असल्याचे निदर्शनास येते. अभिलेखावर दाखल शासन निर्णय क्र. शेअवि-2018/प्र.क्र.193/11अे, दि. 19/9/2019 चे अवलोकन केले असता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतक-याचे कुटुंब विमाछत्राखाली येत नसल्यामुळे योजनेची व्याप्ती वाढवून अपघात शेतक-यास व त्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार नोंद नसलेल्या आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी एका व्यक्तीस विमा संरक्षण लागू केल्याचे निदर्शनास येते. तसेच विमा संविदेमध्ये विमापत्राच्या अटी व शर्तीमध्येही त्याप्रमाणे उल्लेख दिसून येतो. या सर्वांची दखल घेतली असता तक्रारकर्ती यांच्या नांवे शेतजमीन क्षेत्र असले तरी त्यांचे पती मयत सूर्यकांत यांनाही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेखाली विमा संरक्षण लागू होत असल्यामुळे विमा योजनेचे ते लाभार्थी असल्याचे स्पष्ट होते.
(9) अभिलेखावर पोलीस घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा व शवचिकित्सा अहवाल इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत आणि ते कागदपत्रे मयत सूर्यकांत हे पाण्यामध्ये बुडून मृत झाल्याचे दर्शवितात.
(10) मयत सूर्यकांत यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी विमा रक्कम मिळण्याकरिता रितसर मार्गाने विमा दावा दाखल केलेला आहे. मात्र विमा कंपनीने घटनास्थळ पंचनाम्याचा आधार घेऊन विमाधारकाने अपघातावेळी अल्कोहोल (दारु) प्राशन केल्याच्या कारणास्तव विमा दावा रद्द केल्याचे आढळते.
(11) विमा कंपनीने लेखी निवदनपत्र दाखल केले नसल्यामुळे 'विनालेखी निवेदनपत्र' व ऑक्झीलियम इन्शुरन्स अनुपस्थित राहिल्यामुळे एकतर्फा चौकशी करण्यात आली. तक्रारकर्ता यांचे वादकथने व कागदोपत्री पुराव्यांकरिता खंडन किंवा विरोधी पुरावा उपलब्ध नाही.
(12) प्रामुख्याने, या ठिकाणी मयत सूर्यकांत यांनी अपघातसमयी मद्य प्राशन केले होते काय ? आणि त्यामुळे विमा संविदेचे उल्लंघन झाल्याचे सिध्द होते काय ? ह्या बाबी तपासणे आवश्यक ठरतात. प्रामुख्याने मयत सूर्यकांत हे मद्य प्राशन केल्याचे अनुमान काढण्यास विमा कंपनीने पोलीस घटनास्थळ पंचनाम्याचा आधार घेतलेला दिसतो. घटनास्थळ पंचनाम्यामध्ये मयत सूर्यकांत यांचा मुलगा श्रीकांत यांनी मयत सूर्यकांत यांना दारु पिण्याचे व्यसन असल्याचे व सोनेगाव रोडने चालत जात असताना दारु पिवून नशेत असताना संतोष ओव्हाळ यांचे शेताच्या जवळील खड्डयातील पाण्यात पडून मृत्यू पावल्याचे नमूद दिसते. कागदोपत्री पुराव्यांच्या अनुषंगाने दखल घेतली असता मयत सूर्यकांत यांची शवचिकित्सा करण्यात आलेली असून तसा शवचिकित्सा अहवाल अभिलेखावर दाखल आहे. शवचिकित्सा अहवालाच्या कलम 21 Abdomen मध्ये मयत सूर्यकांत यांच्या पोटामध्ये आढळून आलेल्या घटकांचा उल्लेख दिसतो. त्यानुसार Stomach and its conetnts :- Intact. No injury. Contains about 100 ml watery fluid. No peculiar smell present. Small Intenstine and its contents / Large intenstine and its contents : Intact. No injury. Partially loaded with green & feces. Liver (with weight) and gall blader : Intact. No injury. Conjected. याप्रमाणे उल्लेख आढळून येतो. यावरुन मयत सूर्यकांत यांच्या पोटामध्ये मद्य किंवा तत्सम द्रवपदार्थ आढळल्याचा उल्लेख नाही. तसेच शवचिकित्सा अहवालामध्ये Opinion as to the probable cause of death : As per my opinion cause of death is "Death due to drawning". असे नमूद आहे. आमच्या मते, मृतक व्यक्तीच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवचिकित्सा अहवाल महत्वपूर्ण दस्त असताना विमा कंपनी स्वत:च्या सोईनुसार त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. इतकेच नव्हेतर, ज्या घटनास्थळ पंचनाम्याचा आधार घेऊन विमा दावा नामंजूर केला, त्यातील पंचाचे शपथपत्र किंवा स्वतंत्र अन्वेषण केल्याचे निदर्शनास येत नाही. निश्चितच, शवचिकित्सा अहवालामध्ये नमूद नोंदीनुसार मयत सूर्यकांत यांनी मद्य प्राशन केलेले नव्हते, असे सिध्द होते.
(13) वाद-तथ्यांच्या अनुषंगाने दखल घेतली असता मयत सूर्यकांत यांची जीवित दुर्घटना निश्चित कोणत्या तारखेस व कोणत्या वेळी घडली, याबद्दल स्पष्टता नाही. मयत सूर्यकांत जीवित असताना शेवटी कोणी पाहिले ? ते कोठे दिसले ? त्यांनी मद्य कोठे खरेदी केले ? ते कोठे प्राशन केले ? साधारणत: ते कधी, कोठे व किती प्रमाणात मद्य प्राशन करीत असत ? त्यांना सर्वात शेवटी पाहिलेल्या व्यक्तीस त्यांचे वर्तण कसे दिसून आले ? त्यांना पाण्याच्या डबक्याकडे जात असताना कोणी पाहिले का ? त्यांना पोहता येत होते का ? इ. बाबींवर पोलीस कागदपत्रांवरुन प्रकाश पडलेला नाही. तसेच घटनास्थळी मद्याची बाटली किंवा तत्सम बाबी आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे केवळ मयत सूर्यकांत यांच्या मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळ पंचनाम्यामध्ये उल्लेख नमूद असावा, असे वाटते. आमच्या मते, पोलीस कागदपत्रांमध्ये नमूद मजकूर किंवा विधाने सत्य असण्यासंबंधी अन्य पुरक पुरावा उपलब्ध नाही. मयत सूर्यकांत यांनी मद्य प्राशन केले होते आणि मद्याच्या अंमलाखाली असताना खड्डयातील पाण्यामध्ये पडले, हे ग्राह्य धरण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. उलटपक्षी, शवचिकित्सा अहवाल हा निर्णायक पुरावा असल्यामुळे मृत्यूपूर्वी मयत सूर्यकांत यांनी मद्य किंवा तत्सम व प्रतिबंधीत द्रव प्राशन केले नव्हते, हेच सिध्द होते.
(14) उक्त विवेचनाअंती, मयत सूर्यकांत यांचा मृत्यू खड्डयातील पाण्यामध्ये बुडून झाला आणि तो अपघात असल्यामुळे विमा कंपनीने तांत्रिक कारणास्तव तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केलेला आहे आणि त्यांचे कृत्य सेवेमध्ये त्रुटी ठरते. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र असून विमा योजनेनुसार रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्यास त्या पात्र आहेत., अपघात तारखेपासून विमा रक्कम द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने मिळावी, अशी तक्रारकर्ती यांची विनंती आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेतली असता विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 18/7/2022 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने विमा रकमेवर व्याज मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत.
(15) तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.7,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्यामुळे विमा रक्कम मिळविण्याकरिता तक्रारकर्ती यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. शिवाय, तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(16) ऑक्झीलियम हे विमा सल्लागार व तालुका कृषि अधिकारी हे शासकीय यंत्रणेचा भाग आहेत. वाद-तथ्ये व पुराव्यानुसार त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही.
(17) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच, उक्त विमा रकमेवर दि.18/7/2022 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत उक्त आदेशाची अंमलबजावणी करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-