जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 176/2021. तक्रार दाखल दिनांक : 23/08/2021. तक्रार निर्णय दिनांक : 05/12/2022.
कालावधी : 01 वर्षे 03 महिने 13 दिवस
(1) महेंद्र माणिकराव कोंडेकर, वय 36 वर्षे, व्यवसाय : नोकरी.
(2) मनोज माणिकराव कोंडेकर, वय 41 वर्षे, व्यवसाय : विधिज्ञ,
रा. चंद्रोदय कॉलनी, प्रकाश नगर, लातूर. तक्रारकर्ते
विरुध्द
व्यवस्थापक, बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स कं.लि.,
जी.ई. प्लाझा, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे - 411 06. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- अभय पी. पाठक
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- सुधीर एन. गुरव
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांच्या महिंद्रा के.यू.व्ही. 100 के.8 कार क्र.एम.एच.24 ए.एफ. 5070 करिता विमा संरक्षण घेण्यासाठी विरुध्द पक्ष (यापुढे "विमा कंपनी") यांच्या संकेतस्थळाद्वारे चौकशी केली आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीने विमापत्राच्या अनुषंगाने Zero depreciation, Cashless facility, Road side assistance, National Tie Up इ. सुविधा देऊन करुन रु.12,818/- रकमेचे अंदाजपत्रक दिले. त्यानुसार तक्रारकर्ते यांनी विमा कंपनीकडे रु.12,818/- हस्तांतरीत करुन विमापत्र खरेदी केले आणि विमापत्र क्रमांक OG-21-9906-1801-00046300 आहे.
(2) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, दि.9/9/2020 रोजी त्यांच्या कारचा काच फुटला. परंतु कार दुरुस्तीकरिता विमा कंपनीने रु.7,649/- खर्च कॅशलेस देण्यास नकार दिला. त्यानंतर Valuntary access करिता रु.2,500/- व प्रत्येक दाव्याच्या वेळेस रु.1,000/- शुल्क कपात दर्शवून केवळ रु.4,149/- दिले. त्याबाबत चौकशी केली असता दुरुस्त विमापत्र देण्यात येईल, असे सांगण्यात आले; मात्र त्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही.
(3) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन असे की, दि.16/10/2020 रोजी लातूर शहराबाहेर त्यांची कार बंद पडल्यामुळे Road side assistance मिळण्याकरिता ग्राहक सेवा केंद्राकडे मदत मागितली; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दि.8/12/2020 रोजी त्यांच्या कारचा अपघात झाला आणि Road side assistance मिळण्याकरिता ग्राहक सेवा केंद्राकडे मदत मागितली असता प्रतिसाद मिळाला नाही. कार दुरुस्तीकरिता कॅशलेस सुविधा न देता रु.77,000/- खर्चापैकी Valuntary access करिता रु.2,500/- कपात करुन केवळ रु.71,631/- देण्यात आले. तक्रारकर्ते यांनी दि.8/6/2021 रोजी कायदेशीर सूचनापत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता विमा कंपनीने दखल घेतली नाही. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.1,25,000/- व्याजासह देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.25,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केली आहे.
(4) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले असून ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ते त्यांचे ग्राहक नाहीत. तक्रारकर्ते यांच्या कारसाठी विमा कंपनीने विमापत्र निर्गमीत केले आणि अटी व शर्ती अमान्य असल्यास 15 दिवसाच्या आत कळविणे आवश्यक होते. तक्रारकर्ता यांचा विमा दावा निर्णयीत करुन रु.71,643/- व रु.4,149/- अदा केले आहेत. त्यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(5) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ते विमा कंपनीचे ग्राहक आहेत काय ? होय (तक्रारकर्ता क्र.1)
(2) विमा कंपनीने तक्रारकर्ते यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(3) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ते अनुतोषास पात्र आहेत काय ? होय (अंशत:)
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 :- तक्रारकर्ता क्र.1 यांच्या महिंद्रा के.यू.व्ही. 100 के.8 कार क्र. एम.एच.24 ए.एफ. 5070 करिता विमा कंपनीने विमा संरक्षण दिले होते, हे विवादीत नाही. तक्रारकर्ता क्र.1 हे विमा सेवा घेत असल्यामुळे विमा कंपनीचे 'ग्राहक' ठरतात आणि मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
(7) मुद्दा क्र. 2 ते 4 :- मुद्दा क्र.2 ते 4 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता क्र.1 यांच्या विमा संरक्षीत कारचा windshield glass फुटल्यानंतर व अपघातानंतर अनुक्रमे रु.4,149/- व रु.71,643/- देण्यात आले, ही मान्यस्थिती आहे. वादविषयाच्या अनुषंगाने Valuntary access करिता रु.2,500/- कपात करण्यात आले, असे तक्रारकर्ते यांचे कथन आहे. उलटपक्षी, विमा कंपनीचा प्रतिवाद असा की, विमापत्र घेण्यापूर्वी पडताळणी करुन व अंदाजपत्रकाप्रमाणे कारसाठी विमा संरक्षण दिलेले आहे.
(8) उभय पक्षांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्ते यांच्या विधिज्ञांनी नमूद केले की, विमापत्रानुसार त्यांना Cashless facility व Road side assistance सुविधा मिळाली नाही आणि त्यांच्याकडून Valuntary access करिता रु.2,500/- कपात करण्यात आले. विमा कंपनीतर्फे विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, तक्रारकर्ता क्र.1 यांनी online स्वरुपात विमापत्र घेतले आणि त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे व अंदाजपत्रकानुसार विमापत्र निर्गमीत केले आणि Zero depreciation, Cashless facility, Road side assistance सुविधा अतिरिक्त शुल्क अदा केल्यानंतर त्याबाबत जोखीम स्वीकारली जाते.
(9) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता Valuntary access रु.2,500/- कपात करणे, कॅशलेस व Road side assistance सुविधा असे वादप्रश्न दिसून येतात. तक्रारकर्ते यांनी अभिलेखावर कार क्र. एम.एच. 24 ए.एफ. 5070 संबंधी Transcript of Porposal for Private Car Package Policy दाखल केले आहे. त्याचे अवलोकन केले असता C. Coverage opted मध्ये नमूद अ.क्र. 5 प्रमाणे Is voluntary Excess opted : Yes; Amount of voluntary excess opted : Rs. 2,500/- दर्शविले आहे. त्यामुळे विमापत्र घेताना तक्रारकर्ता यांनी Valuntary access रु.2,500/- पर्याय स्वीकारला, हे स्पष्ट आहे. सामान्यत: Valuntary access पर्याय स्वीकारण्यामागे विमापत्राच्या हप्त्यामध्ये सवलत किंवा लाभ मिळतो. तसेच विमापत्रामध्ये Excess Details मध्ये Compulsory Excess : Rs.1,000.00; Additional Excess : Rs.0; Voluntary Excess : Rs.2,500.00 दिसून येते. आमच्या मते, विमा कंपनीने दावा नुकसान भरपाई मंजूर करताना Valuntary access रु.2,500/- कपात केले आणि ते कृत्य चूक व अयोग्य असल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे विमा नुकसान भरपाई देताना Compulsory Excess : Rs.1,000.00 व Voluntary Excess : Rs.2,500.00 कपात करण्याचे विमा कंपनीचे कृत्य अनुचित नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(10) तक्रारकर्ते यांचे कथन असे की, दि.16/10/2020 रोजी कार बंद पडल्यानंतर व दि.8/12/2020 रोजी अपघात झाल्यानंतर त्यांना Road Side Assistance सुविधा पुरविली नाही. तसेच दि.9/9/2020 रोजी कारची काच फुटल्यानंतर व दि.8/12/2020 रोजी कारचा अपघात झाल्यानंतर विमा दाव्यासंबंधी कॅशलेस सुविधा मिळाली नाही. विमा कंपनीतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद असा की, अशा सुविधा add-on आहेत आणि त्याकरिता शुल्क द्यावे लागतात. Transcript of Proposal चे अवलोकन केले असता कारची IDV रु.3,98,040/- निश्चित करण्यात आलेली होती. C. Coverage opted मध्ये Add on Cover(s) optedm2 : Yes, Plan Name : Drive Assure Welcome Plan, Description : 24x7 spot assitance, depreciation shield असे नमूद आहे. यावरुन तक्रारकर्ता यांनी कारचे विमापत्र घेताना Add on Cover स्वीकारला होता आणि त्या अंतर्गत Drive Assure Welcome Plan देण्यात येऊन 24x7 spot assitance व depreciation shield सुविधा मिळण्याकरिता तक्रारकर्ता क्र.1 पात्र होते. सामान्यत: depreciation shield अंतर्गत अपघातानंतर घसारा कपात न करता पूर्ण विमा दावा रक्कम देणे विमा कंपनीसाठी बंधनकारक आहे. विमा संरक्षीत कारच्या अपघातानंतर रु.77,000/- खर्च आला, हे विवादीत नाही. त्यापैकी रु.71,631/- देण्यात आले, असे तक्रारकर्ता यांचे कथन आहे. उलटपक्षी, विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार रु.3,500/- कपात करुन तक्रारकर्ता यांना रक्कम दिल्याचे विमा कंपनीचे कथन आहे. अभिलेखावर सर्वेक्षण अहवाल दाखल नाही. तक्रारकर्ता हे depreciation shield चा लाभ मिळण्याकरिता पात्र असल्यामुळे रु.77,000/- मधून Compulsory Excess : Rs.1,000.00 व Voluntary Excess : Rs.2,500.00 कपात केल्यानंतर रु.73,500/- मिळण्यास पात्र होते. परंतु तक्रारकर्ता यांना रु.1,869/- कमी मिळाले, असे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता क्र.1 हे विमा कंपनीकडून रु.1,869/- मिळण्याकरिता पात्र ठरतात.
(11) Transcript of Proposal चे अवलोकन केले असता तक्रारकर्ता क्र.1 यांनी Add on Cover पर्याय स्वीकारला आणि त्या अंतर्गत 24x7 spot assitance सुविधा देय असल्याचे दिसून येते. तक्रारकर्ते यांचे कथन की, दि.16/10/2020 व 8/12/2020 रोजी विमा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला असता Road Side Assistance सुविधा पुरविण्यात आली नाही. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीस ई-मेलद्वारे Road Side Assistance सुविधा मिळण्याकरिता कळविल्याचे दिसून येते. विमा कंपनीने Road Side Assistance सुविधेचे खंडन केलेले असले तरी Transcript of Proposal नुसार तक्रारकर्ता क्र.1 यांना 24x7 spot assitance सुविधा दिल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने विमा कंपनीने तक्रारकर्ता यांची कार बंद पडल्यानंतर व अपघात झाल्यानंतर Road Side Assistance सुविधा न देऊन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते.
(12) विमा कंपनीच्या सेवा त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेमुळे तक्रारकर्ते यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ सहन करावा लागला याकरिता रु.50,000/- रकमेची रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ते यांना Road Side Assistance सुविधा प्राप्त न झाल्यामुळे कार दुरुस्तीकरिता नेण्याकरिता खर्च करावा लागला आहे. Road Side Assistance सुविधा उपलब्धतेअभावी तक्रारकर्ते यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला, हे मान्य करावे लागेल. शिवाय, त्यांना विमा कंपनीकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ते यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासासह व आर्थिक नुकसान भरपाईकरिता रु.25,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ता क्र.1 पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(13) निर्विवादपणे, विमापत्रास संविदालेखाचे स्वरुप आहे. तक्रारकर्ता क्र.1 यांच्या कारसाठी विमा कंपनीने विमा संरक्षण दिलेले आहे. त्यामुळे केवळ तक्रारकर्ता क्र.1 हे अनुतोषास पात्र ठरतात. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता क्र.1 यांना रु.1,869/- द्यावेत.
उक्त रक्कम आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत न दिल्यास आदेश तारखेपासून उक्त रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज देय राहील.
(3) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता क्र.1 यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-