जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 18/2020. तक्रार दाखल दिनांक : 22/01/2020 तक्रार निर्णय दिनांक : 30/11/2021.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 10 दिवस
रियाजोद्दीन खादीरमियाँ शेख, वय 25 वर्षे, व्यवसाय : स्वंयरोजगार,
रा. मुसा नगर, पटेल किराणाजवळ, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि.,
ए.बी.सी. पूर्व, तिसरा मजला, प्रोझोन मॉलजवळ,
एम.आय.डी.सी. चिखलठाणा, औरंगाबाद - 431 005.
(2) व्यवस्थापक, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि.,
मुख्य कार्यालय, जी.इ. प्लाझा, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे-411 006. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- सुधीर एन. गुरव
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्त्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी एक ॲटो खरेदी केला. या ॲटोबाबतचा विमा त्याने विरुध्द पक्षांकडे उतरविला होता. हा ॲटो त्याच्या घरासमोर ठेवलेला असताना दि.2/8/2021 रोजी चोरीला गेला. या चोरीच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला गेला असता पोलिसांनी आधी शोध घ्या, असे सांगितले. परंतु शोध घेऊनही वाहन न सापडल्यामुळे शेवटी दि.4/8/2021 ला फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा इ. कार्यवाही केली. विमा कंपनीला देखील कळविण्यात आले. विमा कंपनीच्या मागणीप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. उशिरा पोलीस तक्रारीबाबत त्यांनी खुलासा मागितला. तो देखील पाठविण्यात आला. परंतु विमा कंपनीने विमा दावा नाकारला आणि म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार सादर केली आहे. वाहनाची विमा संरक्षीत रक्कम रु.1,50,000/- व्याजासह मिळावी व इतर मानसिक व शारीरिक त्रासापोटी देखील रक्कम मिळावी, अशी तक्रारकर्त्याची मागणी आहे.
(2) या प्रकरणात विमा कंपनीतर्फे आपल्या उत्तरपत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, खोटी व चुकीची तक्रार सादर करण्यात आलेली आहे. विमा पॉलिसीच्या अटीचा भंग झालेला आहे. घटनेची ताबडतोब सूचना पाठविणे अत्यावश्यक आहे. परंतु या प्रकरणात चोरीची सूचना पोलिसांना व विमा कंपनीला देखील उशिरा पाठविण्यात आली. तसेच वाहनाची काळजी सर्व प्रकारे घेणे अपेक्षीत आहे. कागदपत्रांवरुन असे आढळून आले की, या ॲटोरिक्षाची दुसरी चावी देखील ॲटोरिक्षामध्येच ठेवण्यात आली होती. अशाप्रकारे चोरीला आमंत्रणच देण्यात आले. योग्य काळजी न घेता ॲटो वापरला. म्हणून सुयोग्य कारणावरुन विमा कंपनीने विमा दावा फेटाळला. ही चुकची व खोटी तक्रार सादर केली आहे. ती फेटाळण्यात यावी.
(3) उभय बाजुंचे निवेदन, पुरावे, युक्तिवाद व सादर करण्यात आलेला लेखी युक्तिवाद विचारात घेतला. मी निकालासाठी खालील मुद्दे निश्चित करतो व त्यावरील माझा निर्णय पुढीलप्रमाणे देत आहे.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्त्याने हे सिध्द केले काय की, विरुध्द पक्षाने त्याला
चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली ? होकारार्थी
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 व 2 :- या प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याने जो ॲटो खरेदी केला होता, त्याबाबतचा विमा त्याने विरुध्द पक्षाकडे उतरविला होता, या बाबीसंबंधी विशेष वाद नाही. हा ॲटो चोरीला गेला. त्या चोरीसंबंधी नंतर पोलीस स्टेशन व विमा कंपनीला कळविण्यात आले व विमा कंपनीने त्रुटीच्या काही पूर्ततेचा आग्रह केला; खुलासा मागितला, या गोष्टी देखील स्पष्ट आहेत. मुळ वादाचा मुद्दा असा आहे की, हा ॲटो हाताळताना तक्रारकर्त्याने योग्य ती काळजी घेतली की नाही. कागदपत्रांवरुन असे दिसते की, या ॲटोच्या 2 चाव्यापैकी एक चावी तक्रारकर्त्याने ॲटोमध्येच ठेवलेली होती. असेही स्पष्ट झाले आहे की, या ॲटोच्या डिक्कीमध्ये संबंधीत कागदपत्रे व दुसरी चावी ठेवून त्या डिक्कीला तक्रारकर्त्याने स्वत:चे दुसरे कुलूप लावले होते. त्यामुळे असे म्हणता येणार नाही की, तक्रारकर्त्याने निष्काळजीपणे ती चावी ॲटोमध्ये ठेवली. ॲटोच्या डिक्कीमध्ये चावी व कागदपत्रे सुरक्षीत रहावीत, याची पुरेशी काळजी तक्रारकर्त्याने घेतलेली होती. डिक्कीला कुलूप लावून त्याच्या आत ती चावी व कागदपत्रे ठेवली होती. म्हणून विरुध्द पक्षांचे निवेदन की, तक्रारकर्त्याने ॲटोमध्येच चावी ठेवून जणू चोरीला आमंत्रणच दिले, हे ग्राह्य धरता येणार नाही.
(5) दुसरा महत्वाचा मुद्दा असा की, चोरी झाल्यानंतर लगेचच विमा कंपनीला व पोलीस स्टेशनला योग्य ती सूचना पाठविण्यात आली नाही. त्यामुळे काहीसा विलंब झाला. उपलब्ध कागदपत्रांवरुन असे दिसते की, दि.2/8/2021 रोजी रात्री ॲटो घराजवळ पार्क करुन तक्रारकर्ता घरात झोपला आणि दि.3/8/2021 रोजी पहाटे त्याला ॲटो चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर दि.4/8/2021 रोजी तक्रार देण्यात आली आणि विमा कंपनीला सूचित करण्यात आले. या संबंधाने उभय बाजुंनी काही निवाड्यांचा हवाला दिला आहे. विमा कंपनीतर्फे मा. राष्ट्रीय आयोगाच्या "न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि. /विरुध्द/ त्रिलोचन जाने", निर्णय दि. 9/12/2009 या प्रकरणाचा हवाला देण्यात आला. तक्रारकर्त्यातर्फे मा. राष्ट्रीय आयोगाच्या "नॅशनल इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ जसमीत सिंग", रिव्हीजन पिटीशन नं.3937/2017, निर्णय दि.7/2/2018, 4 (2018) सी.पी.जे. 260 (एन.सी.) "चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ तनुश्री मंडल", 2018 (4) सी.पी.आर. 204 (एस.सी.) "ओमप्रकाश /विरुध्द/ रिलायन्स जनरल इन्शुरन्स व इतर", 2018 (3) सी.एल.टी. 1, व्हाल्युम 79 "युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ राहूल कडियान", 3 (2018) सी.पी.जे. 270 (एन.सी.) "इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ वर्षा असोसिएटस्", 3 (2018) सी.पी.जे. 567 (एन.सी.) "वेद प्रकाश काजला /विरुध्द/ न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि.", 2013 (3) सी.पी.आर. 644 (एन.सी.) "नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ नितीन खंडेलवाल", 2021 (2) सी.पी.आर. 118 (एन.सी.) "युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ श्री लाल मीना", मा. हरियाना राज्य आयोगाच्या "न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि. /विरुध्द/ यद्राम", निर्णय दि. 19/3/2014 अशा काही प्रकरणांचा हवाला देण्यात आला. यातील सुत्रे विचारात घेतली. आपल्या या प्रकरणातील परिस्थितीनुसार हे स्पष्ट आहे की, दि.2/8/2019 रोजी तक्रारकर्ता हा रात्रीच्या वेळी ॲटो घरासमोर पार्क करुन घरात झोपला होता. दुस-या दिवशी दि.3/8/2019 ला पहाटे त्याच्या असे लक्षात आले की, घरासमोर लावलेला ॲटो अज्ञात चोराने चोरुन नेला. त्याच्या पुराव्यानुसार असे दिसते की, दि.3/8/2019 रोजीच तो पोलीस स्टेशला गेला होता. पोलिसांनी विचारले की, ॲटोमध्ये किती डिझेल होते. तेवढे डिझेलमध्ये ॲटो कुठेपर्यंत जाऊ शकेल, याचा अंदाज घेऊन त्या हद्दीत शोध घेण्यास पोलिसांनी त्याला सांगितले. त्याप्रमाणे त्याने दि.3/8/2019 रोजी शोध घेतला. परंतु वाहन मिळून आले नाही आणि म्हणून दि.4/8/2019 रोजी अज्ञात चोराच्या विरुध्द फिर्याद पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली. हे तक्रारकर्त्याने जे स्पष्टीकरण सादर केलेले आहे, ते नैसर्गिक व गृहीत धरण्याजोगे आहे. जर ॲटो दि.3/8/2019 रोजी सकाळी चोरीला गेल्याचे लक्षात आले तर सुरुवातीला प्राथमिकत: त्याबद्दल जवळपास शोध घेण्यास पोलिसांनी तक्रारकर्त्याला सांगितले असू शकते आणि त्याप्रमाणे शोध घेऊनही ॲटो आढळून न आल्यामुळे नंतर रितसर तक्रार नोंदवून घेण्यात आली. अशाप्रकारे या विलंबाचे पुरेसे व समाधानकारक स्पष्टीकरण तक्रारकर्त्यातर्फे देण्यात आलेले आहे. परंतु या तांत्रिक कारणाचा हवाला देऊन विमा कंपनीने विमा दावा फेटाळला आहे. अशाप्रकारे विमा कंपनीने तक्रारकर्त्याला चुकीची व दोषपूर्ण सेवा दिली. तक्रारकर्ता वस्तुत: विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे आणि म्हणून मी मुद्दा त्याप्रमाणे निर्णीत करुन खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला वैयक्तिक व संयुक्तिकरित्या चोरीला गेलेल्या वाहनाच्या विमा रकमेबाबत रु.1,50,000/- या आदेशापासून 30 दिवसाच्या आत अदा करावेत. रक्कम या मुदतीत अदा केली नाही तर विरुध्द पक्षांना या रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देखील द्यावे लागेल.
(3) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व या कार्यवाहीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/251121)