जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 214/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 05/10/2023. तक्रार निर्णय दिनांक : 16/04/2024.
कालावधी : 00 वर्षे 06 महिने 14 दिवस
राऊबाई सतिश साखरे, वय 36 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. कुमदाळ, ता. उदगीर, जि. लातूर. :- तक्रारकर्ती
विरुध्द
व्यवस्थापक, दी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि., वसंत संकुल,
अश्विनी हॉस्पिटलजवळ, औसा रोड, लातूर, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- एल. डी. पवार
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- प्रशांत के. कदिरे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पती सतिश किशनराव साखरे (यापुढे "मयत सतिश") हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, आरसनाळ, ता. उदगीर यांचे सभासद होते आणि त्या सहकारी संस्थेचे कामकाज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लातूर यांच्या नियंत्रण व अधिपत्याखाली चालते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे सहकारी संस्थेच्या सभासदांचा विरुध्द पक्ष (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडे रु.3,00,000/- रकमेचा विमा उतरविण्यात आलेला होता आणि त्यांचा विमा हप्ता कपात केलेला आहे.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.30/9/2022 रोजी सकाळी 7.00 वाजता मयत सतिश यांना चक्कर व घाम येत असल्यामुळे त्यांच्या दुचाकी वाहन क्र. एम.एच.24 बी.एम.2625 वर सुनिल कोंडिबा साखरे यांच्या पाठीमागे बसून उदगीर येथे रुग्णालयामध्ये जात होते. मात्र पाठीमागे बसलेले मयत सतिश दुचाकीवरुन पडले आणि गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेबद्दल पोलीस ठाणे, उदगीर शहर येथे आकस्मित मृत्यू क्र. 27/2022 अन्वये नोंद करण्यात आली.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, विमा लाभ मिळण्याकरिता तक्रारकर्ती यांनी आवश्यक कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर केले असता दि.2/5/2023 रोजीच्या पत्राद्वारे विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार वैयक्तिक अपघात संरक्षण हे विमाधारकास बाह्य, हिंसक, दृश्यमान माध्यमांमुळे केवळ किंवा थेट अपघातामुळे होणारी कोणतीही शारीरिक इजा असली पाहिजे, असे कारण देऊन विमा दावा नामंजूर केला. विमा कंपनीने अकार्यक्षम सेवा दिल्याचे नमूद करुन रु.3,25,000/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.20,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(4) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. विमा कंपनीचे कथन असे की, तक्रारकर्ती ह्या त्यांच्या ग्राहक नाहीत. त्यांच्या सेवमध्ये त्रुटी नसल्यामुळे ग्राहक संरक्षण अधिनियमाच्या कलम 2 (जी) लागू होत नाही.
(5) विमा कंपनीचे पुढे कथन असे की, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने सोसायटीच्या सर्व सभासदांचा त्यांच्याकडे विमा उतरविलेला होता. तो 'रस्ता आपत्ती कचव विमा' असून विमापत्र क्र. 16120148206800000001 असून विमा कालावधी दि. 10/12/2020 ते 9/12/2023 आहे. विमापत्राच्या नियम व तरतुदीसह मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी चालकाकडे सक्षम अधिका-यांनी दिलेला वैध वाहन चालविण्याचा परवाना असणे अत्यावश्यक व अनिवार्य आहे. तसेच दुचाकीस्वार व दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने सुरक्षेसाठी शिरस्त्राण परिधान करणे आवश्यक आहे. घटनेच्या वेळी दुचाकीस्वाराकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. तसेच मयत सतिश व दुचाकीस्वाराने शिरस्त्रान परिधान केलेले नव्हते. पोलीस कागदपत्रांनुसार मयत सतिश यांना घाम व चक्कर येत असल्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसून जात असताना भोवळ / चक्कर आल्यामुळे स्वत: दुचाकीवरुन पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे घटना घडलेली नसल्यामुळे मयत सतिश यांचा मृत्यू रस्ता अपघात होऊ शकत नाही. विमापत्र हे विमेदार व विमा कंपनी यांच्यातील करार असून त्या करारातील अटी व शर्ती दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतात. विमा कंपनीने विमापत्राच्या नियम व तरतुदीनुसार विमा दावा नामंजूर केला असून जो योग्य आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीतर्फे करण्यात आलेली आहे.
(6) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने विमा कंपनीकडून 39243 व्यक्तींकरिता 'रस्ता आपत्ती कवच विमा' विमापत्र क्र. 16120148206800000001 घेतले आणि विमा कालावधी दि. 10/12/2020 ते 9/12/2023 होता, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. मयत सतिश हे उक्त विमापत्रानुसार विमाधारक होते, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. मयत सतिश यांचा दि.30/9/2022 रोजी मृत्यू झाला, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. मयत सतिश यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला असता विमा कंपनीने दि.2/5/2023 रोजीच्या पत्राद्वारे विमा दावा नामंजूर केला, याबद्दल़ विवाद नाही.
(8) तक्रारकर्ती ह्या मयत सतिश यांच्या पत्नी आहेत. विमापत्रानुसार मयत सतिश हे विमाधारक असून विमा कंपनीचे 'ग्राहक' होते. ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (5) अन्वये ग्राहकाच्या मृत्यूनंतर त्याचे कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी यांना 'तक्रारकर्ता' संबोधलेले आहे. विमा कंपनीद्वारे मयत सतिश यांना विमा सेवा पुरविण्यात येत होती आणि मयत सतिश यांच्या मृत्यूपश्चात विमा रक्कम मिळविण्याकरिता तक्रारकर्ती ह्या लाभार्थी असल्यामुळे ग्राहक तक्रार दाखल करण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे विमा कंपनीचा प्राथमिक आक्षेप स्वीकारार्ह नसल्यामुळे अमान्य करण्यात येतो.
(9) उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद व कागदपत्रे पाहता विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करण्यासाठी दुचाकीस्वाराने मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 3 (1) चे उल्लंघन करणे; दुचाकीस्वार व मयत सतिश यांनी विनाहेल्मेट वाहन चालविणे; मयत सतिश हे चक्कर येऊन दुचाकीवरुन पडणे इ. कारणे नमूद करुन विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार अपघातामुळे विमेधारकास बाह्य, हिंसक व दृश्य मार्गाने पूर्णपणे व थेट इजा झाल्यास विमा संरक्षण असल्याचे नमूद केले आहे.
(10) दुचाकीस्वार सुनिल कोंडिबा साखरे यांचा जबाब, आकस्मित मृत्यू खबर, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा इ. पोलीस कागदपत्रे पाहता मयत सतिश हे दुचाकीवर पाठीमागे बसलेले असताना खाली पडून रस्त्याच्या दुभाजकास त्यांच्या डोक्यास इजा झाल्याचे निदर्शनास येते. मयत सतिश यांचा शवचिकित्सा अहवाल व मृत्यूचे कारण देणारे प्रमाणपत्र पाहता मृत्यूचे कारण "Head Injury" नमूद आहे. पोलीस यंत्रणेद्वारे मयत सतिश यांच्या मृत्यूबद्दल तालुका दंडाधिकारी, उदगीर यांच्याकडे अंतिम अहवाल सादर केलेला असून समरी मंजूर करण्यात आलेली आहे. पोलीस यंत्रणेद्वारे सादर केलेल्या अहवालानुसार सुनिल साखरे हे मयत सतिश यांना दुचाकीवरुन दवाखान्यात नेत असताना दुधिया हनुमान मंदीरापुढे मयत सतिश यांना चक्कर येत असल्यामुळे दुचाकी उभी केली असता मयत सतिश दुचाकीवरुन उतरुन त्यांना चक्कर आल्यामुळे खाली पडले आणि रस्ता दुभाजकास डोके लागल्यामुळे मृत्यू पावल्याचे नमूद आहे.
(11) निर्विवादपणे, मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 3 अन्वये सार्वजनिक स्थळी वाहन चालविण्याकरिता कार्यक्षम (Effective) वाहन चालविण्याच्या परवान्याची आवश्यकता वाहनचालकाकडे असणे आवश्यक आहे. हे सत्य आहे की, घटनेच्यावेळी मयत सतिश हे दुचाकीस्वार नव्हते किंवा त्यावेळी त्यांनी दुचाकी चालविलेली नाही. तसेच दुचाकीस्वार सुनिल कोंडिबा साखरे यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना होता किंवा नाही ? याबद्दल उचित पुरावा नाही आणि यदाकदाचित दुचाकीस्वाराने कलम 3 चे उल्लंघन केले असल्यास त्याकरिता मयत सुनिल जबाबदार ठरु शकत नाहीत. दुसरे कारण असे की, अपघातसमयी दुचाकीस्वार व मयत सतिश यांनी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे विमापत्राच्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाले आहे. वास्तविक पाहता, विमा कंपनीद्वारे दाखल विमापत्र व संलग्न अटी-शर्तींचे अवलोकन केले असता त्यामध्ये तशाप्रकारे तरतूद निदर्शनास येत नाही. तिसरे कारण असे की, मयत सतिश यांना चक्कर आल्यामुळे दुचाकीवरुन खाली पडले आणि त्यामध्ये त्यांचा निष्काळजीपणा असून ते अपघाती प्रकरण नाही. पोलीस यंत्रणेद्वारे केलेला तपास अहवाल पाहता सुनिल साखरे हे मयत सतिश यांना दुचाकीवरुन दवाखान्यात नेत असताना दुधिया हनुमान मंदीरापुढे मयत सतिश यांना चक्कर येत असल्यामुळे दुचाकी उभी केली असता मयत सतिश दुचाकीवरुन उतरुन त्यांना चक्कर आल्यामुळे खाली पडले आणि रस्ता दुभाजकास डोके लागल्यामुळे मृत्यू पावल्याचे नमूद आहे.
(12) असे दिसते की, विमा कंपनीने मयत सतिश यांच्या विमा दाव्याच्या अनुषंगाने अन्वेषण अहवाल घेतल्याचे नमूद दिसते. परंतु त्यांनी अन्वेषण अहवाल अभिलेखावर दाखल केलेला नाही. वाद-तथ्ये व कागदपत्रे पाहता मयत सतिश यांच्या डोक्यास इजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे सिध्द होते. मयत सतिश हे चालत्या दुचाकीवरुन खाली पडले की थांबलेल्या दुचाकीवरुन उतरल्यानंतर खाली पडले, हा अन्वेषणाचा भाग ठरतो. काहीही असले तरी, मयत सतिश यांच्या डोक्यास बाह्य, हिंसक व दृश्य मार्गाने पूर्णपणे व थेट इजा ठरते. निर्विवादपणे, मयत सतिश यांचा मृत्यू नैसर्गिक नाही. मयत सतिश यांच्या दावा प्रकरणामध्ये विमापत्राच्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे सिध्द होत नाही. विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करण्यासाठी दिलेले कारण सिध्द होत नाहीत. त्या अनुषंगाने विमा कंपनीचे दावा नामंजूर करण्याचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरते.
(13) विमापत्रानुसार वैयक्तिक अपघाताकरिता रु.3,00,000/- व रस्ता अपघाताकरिता अतिरिक्त रु.25,000/- देय आहेत. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती ह्या रु.3,25,000/- विमा रक्कम मिळण्यास हक्कदार ठरतात. तक्रारकर्ती यांनी अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने विमा रकमेची मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विमा कंपनीस आदेश करणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(14) तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.20,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, तक्रारकर्ती यांना विमा रकमेसंबंधी विमा कंपनीकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. विमा दावा नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(15) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.3,25,000/- विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना उक्त रकमेवर दि.2/5/2023 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-