जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 253/2021. तक्रार दाखल दिनांक : 01/11/2021. तक्रार निर्णय दिनांक : 12/05/2023.
कालावधी : 01 वर्षे 06 महिने 11 दिवस
फुलचंद माधवराव बोंडगे, वय 68 वर्षे, धंदा : व्यवसाय,
रा. औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,
सिंध टॉकीजच्या विरुध्द दिशेला, लोखंडे कॉम्प्लेक्स,
पहिला मजला, सुभाष चौक, लातूर.
(2) शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक,
शाखा : औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- लक्ष्मण डी. पवार
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एस. जी. डोईजोडे
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- सुजयकुमार बी. देशमुख
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, ते औराद शहाजनी, ता. निलंगा, जि. लातूर येथे गजराई हॉटेल ॲन्ड लॉज नांवे हॉटेल व लॉजचा व्यवसाय करतात. ते विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "महाराष्ट्र बँक") यांचे खातेदार आहेत आणि विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे त्यांच्या हॉटेलचा विमा उतरविलेला होता.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि.18/7/2021 रोजी औराद शहाजनी येथे अचानक मोठा पाऊस झाला आणि महामार्गावरील पावसाचे पाणी तक्रारकर्ता यांच्या हॉटेलमध्ये गेल्यामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये फ्रिज, डिप फ्रिज, ग्लेंडर, मिक्सर, किराणा अन्नधान्य, दाळी, टेबल, खुर्च्या, इन्व्हर्टर बॅटरी इ. साहित्याचे नुकसान झाले. तक्रारकर्ता यांच्या विनंतीनुसार तलाठी यांनी पंचनामा केला. पंचनाम्यानुसार रु.16,00,000/- चे नुकसान झाले. तक्रारकर्ता यांनी महाराष्ट्र बँकेस सूचना देऊन नुकसान भरपाईसंबंधी विमा कंपनीकडे शिफारस करण्याची विनंती केली. मात्र नुकसानीबाबत 38 दिवसाच्या उशिराने कळविल्यामुळे विमा दावा रक्कम देण्याकरिता विमा कंपनीने असमर्थता दर्शविली. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.16,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा महाराष्ट्र बँक व विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(3) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर अमान्य केला. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी त्यांच्या हॉटेलच्या नुकसानीबाबत दावा सूचना तथाकथित घटनेच्या 38 दिवसानंतर कळविली असल्यामुळे दावा नाकारला आहे. विमा अटी व शर्तीनुसार नुकसानीसंबंधी विमा कंपनीस तात्काळ माहिती दिली असती तर सर्वेक्षकाची नियुक्ती करुन नुकसानीची पाहणी करुन सर्वेक्षण अहवाल दाखल करण्याचे सर्वेक्षकांना सूचित केले असते. परंतु तक्रारकर्ता यांनी हॉटेलचे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीस लेखी सूचना दिली नाही. त्यामुळे त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीतर्फे करण्यात आली.
(4) महाराष्ट्र बँकेतर्फे लेखी निवेदनपत्र दाखल करण्यात आले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केले. त्यांचे निवेदन असे की, तक्रारकर्ता त्यांचे खातेदार आहेत आणि त्यांच्यामार्फत तक्रारकर्ता यांच्या हॉटेलचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आला होता. तक्रारकर्ता यांनी दि.25/8/2021 रोजी त्यांना अर्जाद्वारे घटनेबाबत कळविले. तक्रारकर्ता यांच्या अर्जानुसार त्याच दिवशी विमा कंपनीस ई-मेल करुन नुकसानीसंबंधी माहिती दिली. मात्र विमा कंपनीने दि.22/9/2021 रोजी ई-मेलद्वारे 38 दिवसाच्या विलंबाने नुकसानीची माहिती दिल्यामुळे विमा दावा देण्यास असमर्थता दर्शविली. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती महाराष्ट्र बँकेतर्फे करण्यात आली.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनी व महाराष्ट्र बँकेचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांच्या हॉटेलचा विमा कंपनीकडे विमा उतरविण्यात आला, ही मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर विमापत्र क्र. 182001/11/2021/337 दाखल केले आहे.
(7) उभयतांचा वाद-प्रतिवाद, कागदपत्रे व युक्तिवाद पाहता विमा कंपनीकडे हॉटेलच्या नुकसानीची सूचना देण्यामध्ये 38 विलंब झाला, ही बाब स्पष्ट आहे. विमापत्राचे अवलोकन केले असता नुकसान झाल्यानंतर विमापत्र निर्गमीत करणा-या कार्यालयास दूरध्वनीद्वारे तात्काळ कळविले पाहिजे, अशा स्वरुपाची तरतूद दिसते. तक्रारकर्ता यांच्या हॉटेलचे नुकसान दि.18 जुलै, 2021 रोजी नुकसान झाले; मात्र दि.25/8/2021 रोजी महाराष्ट्र बँकेस लेखी पत्र देऊन नुकसानीची माहिती दिली आणि विमा कंपनीकडे शिफारस करण्याची विनंती केलेली आहे.
(8) तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार हॉटेलच्या नुकसानीची घटना दि.18/7/2021 रोजी घडलेली आहे. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी दि.10/8/2021 रोजी तहसीलदार, निलंगा यांना अर्ज देऊन पंचनामा करण्याची विनंती केली. तलाठी, औराद यांनी घटनेबाबत दि.20/8/2021 रोजी पंचनामा केलेला दिसून येतो. त्यामध्ये फ्रिज, ग्लेंडर, मिक्सर, गॅस भट्टा, किराणा व अन्य साहित्याचे रु.16,50,000/- चे नुकसान झाले, असे नमूद आहे.
(9) असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी हॉटेलच्या नुकसानीसंबंधी महाराष्ट्र बँक किंवा विमा कंपनीकडे तात्काळ सूचना दिलेली नाही. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडे नुकसानीची सूचना देण्यामध्ये 38 दिवसांचा विलंब केलेला आहे. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडे रितसर विमा दावा दाखल केलेला नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांचा विमा दावा असमर्थनिय ठरविण्यासंबंधी विमा कंपनीचे कृत्य चूक किंवा अनुचित नाही, असे जिल्हा आयोगाचे मत आहे. त्या अनुषंगाने विमा कंपनी किंवा महाराष्ट्र बँकेने तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. करिता, मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्र. 253/2021.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-