जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 298/2019. तक्रार दाखल दिनांक : 11/10/2019 तक्रार निर्णय दिनांक : 24/11/2021.
कालावधी : 02 वर्षे 00 महिने 14 दिवस
(1) शंकर पिता शरणप्पा बेलुरे, वय 47 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. आंबेगांव, ता. देवणी, जि. लातूर.
(2) मिना शंकर बेलुरे, वय 42 वर्षे, व्यवसाय : घरकाम व शेती,
रा. आंबेगांव, ता. देवणी, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कोटक महिंद्रा फायनान्स तर्फे व्यवस्थापक, बाभळगांव रोड, लातूर.
(2) राजमाता मोटर्स, दुकान क्र.9-10, अमन कॉम्प्लेक्स, गट क्र.55,
एम.आय.टी. कॉलेजजवळ, बीड बायपास रोड, औरंगाबाद.
(3) संजय गोविंदराव डब्बे, वय 38 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. बोरोळा, ता. देवणी, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- शांतेश्वर एम. येरटे
विरुध्द पक्ष एकतर्फा
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची थोडक्यात तक्रार अशी की, विरुध्द पक्ष क्र.3 त्यांच्या ओळखीचे असल्याने त्यांच्या सांगण्यावरुन त्यांना ट्रॅक्टरबाबत माहिती मिळाली. विरुध्द पक्ष क्र.3 ने स्वत:ला विरुध्द पक्ष क्र.1 चे एजंट असल्याचे सांगितले. जुने ट्रॅक्टर विकून नवीन ट्रॅक्टरसाठी अर्थसाहय्य देखील मिळवून देतो, असे ते म्हणाले. त्याप्रमाणे व्यवहार झाला. नवीन ट्रॅक्टर घेण्याचे ठरले. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी जुन्या ट्रॅक्टरची किंमत रु.2,25,000/- ठरवली. विरुध्द पक्ष क्र.3 मार्फत नवीन सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर घ्यावयाचे ठरले. नवीन ट्रॅक्टरची किंमत रु.6,42,000/- ठरली. त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. दि.1/2/2018 रोजी नवीन ट्रॅक्टर तक्रारकर्त्याच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या ब-याच फॉर्मवर व को-या कागदावर सह्या घेण्यात आल्या. रु.4,58,959/- कर्ज मंजूर केल्याचे सांगण्यात आले. परंतु ऐनवेळी ट्रॅक्टरची किंमत रु.7,33,959/- दर्शविली. त्याबद्दल विचारपूस केली असता विरुध्द पक्ष क्र.1 ने सांगितले की, जास्तीची घेतलेली रक्कम विरुध्द पक्ष क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र.3 मार्फत परत करतील. नवीन ट्रॅक्टरचे सर्व कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र.3 ने स्वत:कडे ठेवून घेतले. पासिंग करुन देतो म्हणाले. दोन महिने ट्रॅक्टर तक्रारकर्त्याने वापरला. परंतु पासिंग करुन दिले नाही. ट्रॅक्टर नीट चालत नव्हते. विरुध्द पक्ष क्र.2 तर्फे सर्व्हीसिंग करुन घ्यावी, असे सूचविण्यात आले. कागदपत्रे नसल्यामुळे फ्री सर्व्हीसिंग करुन घेता आली नाही. विरुध्द पक्ष क्र.3 च्या सांगण्यावरुन विरुध्द पक्ष क्र.2 ने ट्रॅक्टर दुरुस्त करुन दिला नाही. विरुध्द पक्ष क्र.3 ने विरुध्द पक्ष क्र.1 कडे संबंधीत कागदपत्रे जमा केली नाहीत. परंतु तक्रारकर्त्याला कर्जाचा हप्ता भरावयास सांगितले. त्याने कागदपत्रे व वाहनातील दोषाबाबत विचारपूस केली असता ट्रॅक्टर विरुध्द पक्ष क्र.1 कडे सोडून जा, आम्ही पासिंग करुन देतो, असे सांगितले. त्याप्रमाणे दि.7/12/2018 ला ट्रॅक्टर विरुध्द पक्ष क्र.1 च्या ताब्यात दिला. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 ने संगनमत करुन ट्रॅक्टर ताब्यात घेतला, परंतु पासिंग करुन दिले नाही. ट्रॅक्टर दुरुस्तही करुन दिला नाही. अशाप्रकारे फसवणूक केली. वारंवार मागणी करुनही पूर्तता केली नाही. शेवटी तक्रारकर्त्याने ही तक्रार सादर केली आहे. ज्यात तक्रारकर्त्याचे निवेदन असे की, त्यांना त्यांचा नवीन ट्रॅक्टर ताब्यात मिळावा. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याकडून उर्वरीत थकबाकीची रक्कम भरुन घेऊन त्यांचे ट्रॅक्टर त्यांना परत करावे. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी ट्रॅक्टरची पासिंग करुन घेऊन तक्रारकर्त्याला पूर्तता करुन द्यावी. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी रु.7,33,959/- 15 टक्के व्याजासह परत करावेत व इतर खर्च इ. देखील मिळावा.
(2) या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 बजावणी होऊन देखील गैरहजर राहिले. तक्रारकर्त्याच्या वकिलांनी लेखी युक्तिवाद देखील सादर केला. तक्रार, युक्तिवाद व कागदपत्रे विचारात घेतली.
(3) या प्रकरणात तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्द पक्ष क्र.3 यांच्यामार्फत व्यवहार करण्यात आला. विरुध्द पक्ष क्र.3 ने तो विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चा एजंट असल्याचे सांगितले. परंतु दाखल कागदपत्रांवरुन कुठेही हे स्पष्ट होत नाही की, विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी तक्रारकर्त्याला त्याचा प्रतिनिधी अथवा एजंट म्हणून मान्यता दिलेली आहे. तक्रारकर्त्याने जी कागदपत्रे सादर केली, त्यावरुन असे कुठेही स्पष्ट पुरावा दिसून येत नाही की, ज्यावरुन असा निष्कर्ष काढता येईल की, विरुध्द पक्ष क्र.3 हा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चा प्रतिनिधी अथवा एजंट आहे. विरुध्द पक्ष क्र.3 ने तसे भासवून तक्रारकर्त्याची काही फसवणूक केली असल्यास त्याबाबत योग्य त्या ठिकाणी योग्य ती दाद तक्रारकर्ता मागू शकतो. जर फसवणूक झाली असेल तर त्याबाबतीत ग्राहक मंचासमोर तशा स्वरुपाची दाद अथवा तक्रार मागता येणार नाही.
(4) कागदपत्रांवरुन हे स्पष्ट होते की, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्यामार्फत तक्रारकर्त्याशी जो व्यवहार झाला, त्यानुसार सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर कर्ज घेऊन खरेदी करण्यात आला. परंतु तो ट्रॅक्टर सध्या विरुध्द पक्षांच्याच ताब्यात आहे. कर्जाची परतफेड झालेली नाही. तक्रारकर्त्यानेही आपल्या तक्रारीत असे नमूद केलेले आहे की, तो थकबाकीची रक्कम भरावयास तयार आहे, परंतु त्याला ट्रॅक्टर ताब्यात परत मिळावा. विरुध्द पक्ष क्र.1 बँक यांचे पत्र दि.6/11/2018 यावरुन असे दिसते की, व्यवहार झालेला आहे. जी काही थकबाकी होती त्याची मागणी करण्यात आली. परंतु तक्रारकर्त्याने पूर्तता केली नाही. त्याबाबतची नोटीस पाठविण्यात आली होती.
(5) तक्रारकर्त्याचे असे निवेदन आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 ने संगनमत करुन नवीन ट्रॅक्टर ताब्यात घेतला. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 अथवा 2 यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याबाबत पुरेसा स्पष्ट पुरावा नाही. जरी प्रकरण एकतर्फा असले तरी पुरेसा पुरावा सादर करुन तक्रारकर्त्याने आपली तक्रार सिध्द करणे आवश्यक आहे. या प्रकरणात तक्रारीतील नमूद सर्व बाबी सिध्द करण्याइतपत पुरेसा पुरावा तक्रारकर्त्याने सादर केलेला नाही. विरुध्द पक्ष क्र.3 बाबत मी यापूर्वीच स्पष्ट उल्लेख केलेला आहे. परंतु जर तक्रारकर्ता थकबाकी भरावयास तयार असेल तर त्याचा ट्रॅक्टर त्याच्या ताब्यात मिळणे आवश्यक आहे. विरुध्द पक्ष हेतु:पुरस्सर गैरहजर राहिले. फसवणुकीचा मुद्दा जरी बाजुला ठेवला तरी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चे ग्राहक म्हणून तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर खरेदी केला. त्या ट्रॅक्टरबाबतची सर्व थकबाकी द्यावयास तक्रारकर्ता तयार आहे. परंतु ट्रॅक्टर त्याच्या ताब्यात मिळालेला नाही. म्हणून विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी कायदेशीर थकबाकीची रक्कम भरुन घेऊन तक्रारकर्त्याच्या ताब्यात ट्रॅक्टर द्यावा व त्याचे रजिस्ट्रेशन देखील करुन द्यावे, अशाप्रकारची दाद तक्रारकर्त्याला दिली जाऊ शकते. तसेच या सर्व प्रकरणात तक्रारकर्त्याला जो शारीरिक व मानसिक त्रास झाला व खर्च झाला, याबद्दलही काही रक्कम दिली जाऊ शकते.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून ट्रॅक्टर ज्याचा इंजीन क्र. 3105ELU83A699413FZO व चेसीज क्र. BZVSG70664353 याच्या बद्दलची जी काही उर्वरीत थकबाकी आहे, ती तक्रारकर्त्याकडून भरुन घ्यावी व अशी रक्कम जमा केल्यानंतर हे ट्रॅक्टर त्यांचे ताब्यात असल्यास ते तक्रारकर्त्याच्या ताब्यात देण्यात यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी ही बाकी रक्कम जमा केल्यानंतर ते नवीन ट्रॅक्टर तक्रारकर्त्याच्या ताब्यात देताना त्याचे पासिंग देखील करुन द्यावे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व या कार्यवाहीच्या खर्चापोटी रु.1,000/- द्यावेत.
(5) तक्रारीतील इतर सर्व मागण्या फेटाळण्यात येतात.
(6) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/231121)