जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 45/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 11/02/2022. तक्रार निर्णय दिनांक : 19/04/2024.
कालावधी : 02 वर्षे 02 महिने 08 दिवस
मोहम्मद रफी पि. मोहम्मद शफी काझी, वय 65 वर्षे,
व्यवसाय : सेवानिवृत्त व स्वंयनिर्भर, रा. आयेशा कॉलनी,
खोरी गल्ली, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
व्यवस्थापक, कर्नाटका तामिलनाडू ट्रान्सपोर्ट कंपनी,
7-4-113, सर्वे नंबर : 229, 7 रोड, गगन पहाड,
सुंदर स्टीलजवळ, हैद्राबाद - 500 052. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए. एम. के. पटेल
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एम. ए. शेख
आदेश
श्रीमती रेखा जाधव, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर कौटुंबिक उपजिविकेसाठी उस्मानिया बिस्कीट व्यवसाय करण्याचे निश्चित केले. विरुध्द पक्ष हे उस्मानिया बिस्कीटचे उत्पादक, वितरक व पुरवठादार असून बिस्कीट दळणवळण व्यवसाय करतात. तक्रारकर्ता यांचे त्यांच्याशी ओळखीचे संबंध असल्यामुळे तो व्यवसाय निवडला आणि विरुध्द पक्ष यांनी लातूर शहरापर्यंत उस्मानिया बिस्कीट पोहोच करण्याची हमी दिली. दि.17/11/2020 रोजी तक्रारकर्ता यांनी त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या लातूर येथील टिळक नगर शाखेतील खाते क्र. 52072850038 मधून एका मालट्रकमध्ये बसणा-या मालाचे रु.2,88,023.60 विरुध्द पक्ष यांच्या बँक खात्यामध्ये आर.टी.जी.एस. द्वारे UTR No. SBINR52020111700014838 अन्वये जमा केले. मात्र विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना उस्मानिया बिस्कीटचा पुरवठा केला नाही. तक्रारकर्ता यांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे विनंती केली असता विरुध्द पक्ष यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन मालाचा पुरवठा केला नाही. विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे आणि त्यामुळे तक्रारकर्ता यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.2,88,023.60 व्याजासह देण्याचा; रु.1,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.1,00,000/- देण्याचा व ग्राहक तकार खर्च रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले असून ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले. विरुध्द पक्ष यांचे कथन असे की, तक्रारकर्ता हे त्यांचे 'ग्राहक' नाहीत आणि तक्रारकर्ता यांचा त्यांच्याशी कोणताही थेट संबंध नाही. तक्रारकर्ता हे उस्मानिया बिस्कीटचे किरकोळ विक्रेते आहेत. ते घाऊक विक्रेते रफीक अहेमद सय्यद यांच्याकडून उस्मानिया बिस्कीट खरेदी करीत असल्यामुळे रफीक अहेमद सय्यद यांना आवश्यक पक्षकार केले नाही आणि ग्राहक तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. विरुध्द पक्ष हे वाहतूक सेवेचे मालक आहेत आणि विविध राज्य व जिल्ह्यांमध्ये सेवा देतात. रफीक अहेमद सय्यद हे विरुध्द पक्ष यांचे परिचित व नातेवाईक आहेत. रफीक अहेमद सय्यद हे लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्यांचे घाऊक विक्रेते आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये किरकोळ विक्रेत्यांना मागणीनुसार बिस्कीट विक्री करतात. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्याशी किरकोळ विक्रीसंबंधी लेखी अथवा मौखिक करार व ठराव केलेला नाही. रफीक अहेमद सय्यद हे तक्रारकर्ता यांचे नातेवाईक असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी रफीक अहेमद सय्यद यांना द्यावयाची रक्कम रु.2,88,023/- दि. 17/11/2020 रोजी तक्रारकर्ता यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. त्यानंतर त्या रकमेचा माल रफीक अहेमद सय्यद यांनी तक्रारकर्ता यांना दिलेला आहे. प्रकरणाचे सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर रफीक अहेमद सय्यद यांच्याकडे चौकशी केली असता रफीक अहेमद सय्यद यांचे तक्रारकर्ता यांच्याशी व्हाट्सॲपद्वारे रक्कम व मालाचे देणे-घेण्याचे संदेशवहन झालेले आहे. तक्रारकर्ता यांच्या बिस्कीट माल खरेदी व पुरवठ्याशी विरुध्द पक्ष यांचा कोणताही संबंध नाही. तक्रारकर्ता यांनी त्यांच्याविरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तसेच संपूर्ण व्यवहार दिवाणी स्वरुपाचा असल्यामुळे जिल्हा आयोगास प्रकरण निर्णयीत करता येत नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे 'ग्राहक' असल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 व 2 :- उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी दि.17/11/2020 रोजी भारतीय स्टेट बँक, लातूर येथील टिळक नगर शाखेतील त्यांच्या खाते क्र. 52072850038 मधून विरुध्द पक्ष यांना रु.2,88,023.60 हस्तांतरीत केले, याबद्दल उभयतांमध्ये मान्यस्थिती आहे.
(5) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांना रु.2,88,023.60 हस्तांतरीत केल्यानंतर उस्मानिया बिस्कीटचा पुरवठा केलेला नाही. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद असा की, ते वाहतूक सेवेचे मालक आहेत आणि विविध राज्य व जिल्ह्यांमध्ये सेवा देतात. रफीक अहेमद सय्यद हे लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्यांचे घाऊक विक्रेते असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी रफीक अहेमद सय्यद यांना द्यावयाची रक्कम रु.2,88,023/- विरुध्द पक्ष यांच्या खात्यामध्ये जमा केलेली असून त्या रकमेचा माल रफीक अहेमद सय्यद यांनी तक्रारकर्ता यांना दिलेला आहे.
(6) अभिलेखावर दाखल कागदपत्रे पाहता कर्नाटका तामिळनाडू ट्रान्सपोर्ट कंपनी ही घरगुती सेवांचा समावेश असलेल्या यादीमध्ये कार्यरत आहे. सकृतदर्शनी, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना रु.2,88,023.60 हस्तांतरीत केल्याचे दिसून येत असले तरी तक्रारकर्ता कथन करतात त्याप्रमाणे विरुध्द पक्ष हे उस्मानिया बिस्कीटचे उत्पादक, वितरक व पुरवठादार असल्यासंबंधी उचित पुरावा नाही. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर सय्यद रफिक अहेमद यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले असून ज्यामध्ये कथित व्यवहार तक्रारकर्ता यांच्याशी झाल्याचे व त्यांचे व्यवसायिक खाते अद्ययावत नसल्यामुळे त्यांचे भाऊजी म्हणजेच विरुध्द पक्ष यांच्या खात्यामध्ये रु.2,88,023/- वर्ग करण्यास सांगितल्याचे नमूद आहे. तसेच तक्रारकर्ता यांच्याशी झालेल्या व्यवहारातून रु.49,000/- शिल्लक असल्याचे व उर्वरीत रक्कम वेळोवेळी तक्रारकर्ता यांना परत केल्याचे निवेदन आढळून येते. वाद-प्रतिवाद व कागदपत्रे पाहता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्या खात्यामध्ये रु.2,88,023/-जमा केले असले तरी विरुध्द पक्ष हे कथित बिस्कीटचे उत्पादक, वितरक व विक्रेते नाहीत. विरुध्द पक्ष हे उस्मानिया बिस्कीटचे 'व्यापारी' असल्याचे सिध्द होत नाही. मात्र विरुध्द पक्ष यांच्या कथनानुसार व सय्यद रफिक अहेमद यांच्या शपथेवरील निवेदनानुसार कथित व्यवहारामध्ये सय्यद रफिक अहेमद यांची महत्वपूर्ण भुमिका आढळून येते. निश्चितपणे, सय्यद रफिक अहेमद हे आवश्यक पक्षकार ठरतात. परंतु, तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे 'ग्राहक' होत नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. ग्राहक तक्रारीमध्ये उपस्थित अन्य वाद-तथ्ये व प्रश्नांना स्पर्श न करता मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.2 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. मात्र, तक्रारकर्ता यांना योग्य पक्षकाराविरुध्द प्रकरण दाखल करण्यास स्वातंत्र्य आहे.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-