जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 74/2020. तक्रार दाखल दिनांक : 20/03/2020. तक्रार निर्णय दिनांक : 20/10/2021.
कालावधी : 01 वर्षे 07 महिने 00 दिवस
रत्नाकर व्यंकटराव चोले, वय 41 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. शिवसुंदर निवास, रेड्डी नगर, अहमदपूर,
सध्या रा. लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
4 व 5 वा मजला, इफको टॉवर, प्लॉट नं. 3, सेक्टर - 29,
गुरगांव, हरियाणा.
(2) शाखा व्यवस्थापक, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
दुसरा मजला, रविराज चेंबर्स, लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर,
मेन रोड, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. लक्ष्मण डी. पवार
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. सतिश जी. दिवाण
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष कंपनीकडून त्याच्या चारचाकी वाहनाचा विमा घेतला होता. त्या वाहनाला दि.28/11/2019 रोजी अपघात झाला. या अपघातामुळे वाहनामध्ये बिघाड झाला. त्या दुरुस्तीसाठी त्याने एकूण रु.59,395/- खर्च केला. ही रक्कम विमा कंपनीकडे मागितली असता विमा कंपनीने तांत्रिक व अयोग्य कारणामुळे विमा नाकारला. म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार सादर केली आहे. ज्यात वाहन दुरुस्ती खर्चाची रक्कम, व्याज, या कार्यवाहीचा खर्च इ. मिळावा, अशी त्याची मागणी आहे.
(2) या प्रकरणात विमा कंपनीतर्फे असे निवेदन करण्यात आले की, जेव्हा अपघाताबाबत त्यांना माहिती मिळाली तेव्हा सर्व्हेअर नियुक्त करण्यात आला. त्याने पाहणी केली. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार damage to the insured vehicle are due to wear and tear which is exclusion U/s. 1(A) of the policy अशा प्रकारचे नुकसान असल्यामुळे पॉलिसीमध्ये या नुकसानीची भरपाई करण्याला विमा कंपनी बांधील नाही. विमा कंपनीने योग्य कारणाने विमा दावा फेटाळला आहे. त्यांनी कुठलीही सेवेतील त्रुटी केलेली नाही. तक्रार फेटाळण्यात यावी.
(3) उभय बाजुंचे निवेदन, पुरावे व कागदपत्रे विचारात घेता निकालासाठी मी खालील मुद्दे निश्चित करतो व त्यावरील माझा निर्णय कारणमीमांसेसह पुढीलप्रमाणे देत आहे.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्त्याने हे सिध्द केले काय की, विरुध्द पक्षाने त्याला चुकीची व होकारार्थी
दोषपूर्ण सेवा पुरविली ?
(2) तक्रारकर्त्याला काही रक्कम विमा कंपनी देणे लागते काय ? होकारार्थी
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- या प्रकरणात विशेष वाद नसलेल्या बाबी अशा की, तक्रारकर्त्याची चारचाकी गाडी नं. एम.एच.24 ए.एफ.3795 ही विरुध्द पक्षाकडे विमा संरक्षीत केलेली होती. त्या विम्याच्या कालावधीमध्ये दि.28/11/2019 रोजी त्या गाडीला अपघात झाला. तक्रारकर्त्याच्या पुराव्यानुसार तो लातूर येथून मुरुड कडे जात असताना रस्त्यात खड्डयात वाहन आदळल्यामुळे चेंबरला मार लागला व चेंबरचा तुकडा इंजीनमध्ये आदळल्यामुळे कनेक्टींग रॉड ब्लॉक फुटला व गाडी बंद पडली. त्यानंतर टोचन करुन ती गाडी राज मोटर्स, लातूर येथे नेली. विमा कंपनीला कळविले. या ठिकाणी अपघात झाला याबद्दल सुध्दा विशेष वाद दिसत नाही. फक्त विमा कंपनीने विमा दावा नाकारण्याचे कारण असे नमूद केले आहे की, त्यांनी जेव्हा घटनास्थळाला भेट देऊन सर्व्हेअरमार्फत पाहणी केली तेव्हा त्यांना असे आढळून आले की, नुकसान हे वाहनाच्या अपघातामुळे झालेले नाही आणि वाहनास बाहेरच्या बाजुने दिसणारे असे कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले दिसून येत नव्हते. म्हणून पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार योग्यप्रकारे विमा दावा फेटाळण्यात आला.
(5) विमा कंपनीतर्फे पॉलिसीतील अट क्र. 1(ए) चा हवाला देण्यात आला. ज्यानुसार The Company shall not be liable to make any payment in respect of : (a) consequential loss, depreciation, wear and tear, mechanical or electrical breakdown, failures or breakages. या अटीनुसार विमा कंपनी नुकसान भरपाई देणे लागत नाही, असे विमा कंपनीचे म्हणणे आहे.
(6) विमा कंपनीने स्वप्नील मंगळुरे यांना सर्व्हेअर म्हणून नेमले होते. ज्यांचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, हे स्वप्नील मंगळुरे अधिकृत किंवा प्रशिक्षीत सर्व्हेअर नाहीत. त्यांचा शिक्षण इ. चा तपशील नाही. परंतु या सर्व्हे रिपोर्टनुसार या स्वप्नील मंगळुरेकडे आय.आर.डी.ए. चे लायसन असून ज्याचा नंबर 74882 असा नमूद केलेला आहे. परंतु पुढे असेही दिसते की, ते लायसन Valid Upto 26/12/2017 पर्यंत होते. या अहवालाच्या पृष्ठयर्थ स्वप्नील मंगळुरे यांचा पुरावा आयोगासमक्ष सादर करण्यात आलेला नाही. तक्रारकर्त्याने मा. चंदीगड केंद्र शासित प्रदेश राज्य आयोगाच्या 'युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ ऋषीकेष', 2 (2007) सी.पी.जे. 227 या प्रकरणाचा हवाला देऊन असे निवेदन केले आहे की, सर्व्हेअरचे क्वॉलिफिकेशन तो मेकॅनिकल इंजीनिअर असल्याबद्दल पुरावा नाही आणि म्हणून त्याचा रिपोर्ट ग्राह्य धरता येणार नाही. तसेच तक्रारकर्त्याने मा. राष्ट्रीय आयोगाच्या 'टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ मनविंदर सिंग', 1 (2019) सी.पी.जे. 37 (एन.सी.) या प्रकरणाचा हवाला दिला आहे.
(7) उभय बाजुतर्फे जो युक्तिवाद करण्यात आला तो विचारात घेता पुराव्यानुसार असे दिसते की, रस्त्यावरील खड्डयामध्ये आदळल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आणि झालेले नुकसान दुरुस्त करण्यासाठी गाडी मेकॅनिककडे न्यावी लागली. तिच्या दुरुस्तीसाठी तक्रारकर्त्याला खर्च करावा लागला. केवळ गाडीला बाहेरुन दिसणारे असे काही नुकसान (damage) दिसले नाही, अशा कारणामुळे विमा नाकारणे योग्य ठरणार नाही. पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार consequential loss, depreciation, wear and tear, mechanical or electrical breakdown, failures or breakages अशा प्रकारच्या नुकसानीला सुट दिली जाऊ शकते. परंतु या प्रकरणात वाहनाला झालेले नुकसान या सदरातच मोडते असे स्पष्टपणे सिध्द करणारा पुरावा विमा कंपनीतर्फे सादर करण्यात आलेला नाही. या प्रकरणात तज्ञ ज्याच्यामार्फत विमा कंपनीने पाहणी केली, सर्व्हे केला, त्याचा रिपोर्ट विमा कंपनीने सादर केला, त्या इसमाचे शपथपत्र अथवा पुरावा सादर करण्यात आलेला नाही. गाडीचे फोटो सादर करण्यात आले आहेत. ज्यावरुन गाडीला बाहेरच्या भागाला खोच इ. दिसत नाही. परंतु त्यावरुन असा निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही की, या एक्सक्लुजन क्लॉजमध्ये हा अपघात मोडतो. तक्रारकर्त्याने आपल्या पुराव्यात हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, रस्त्यावरील खड्डयामध्ये गाडी आदळल्यामुळे चेंबरला मार लागला. चेंबरचा तुकडा इंजीनमध्ये आदळल्यामुळे कनेक्टींग ब्लॉक रॉड फुटला व गाडी बंद पडली. अशा प्रकारचा अपघात किंवा नुकसान consequential loss किंवा depreciation किंवा wear and tear अशा सदरात मोडत नाही किंवा अशा नुकसानीला mechanical or electrical breakdown असेही म्हणता येणार नाही आणि म्हणून आम्ही अशा मतास आलो आहोत की, विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून तक्रारकर्त्याचा विमा दावा फेटाळला आणि म्हणून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला चुकीची व दोषपूर्ण सेवा दिली.
(8) अपघात झाल्यानंतर विमा कंपनीला कळविण्यात आले. या वाहनाची दुरुस्ती करुन घेण्यात आली. दुरुस्तीसंबंधी राज मोटर्स व अंतरीक्ष ॲटो ज्यांनी वाहन हाताळले त्यांच्या पावत्या सादर केल्या आहेत. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, दुरुस्तीसाठी त्याला राज मोटर्सचे बील रु.14,560/- व अंतरीक्ष ॲटोचे जे समान खरेदी केले त्याचे बील रु.44,775/- असा एकूण रु.59,395/- खर्च करावा लागला. खर्चाबाबतच्या पावत्या तक्रारकर्त्याने सादर केल्या आहेत. राज मोटर्स यांच्या बिलावर कोठेही व्हॅट अथवा तत्सम नंबर नमूद नाही. मात्र अंतरीक्ष ॲटोच्या बिलावर जी.एस.टी. इ. बाबतचा मजकूर नमूद आहे. अंतरीक्ष ॲटो यांच्याकडून स्पेअर पार्टस् खरेदी करुन ते राज मोटर्सकडे बसवून वाहन दुरुस्त करुन घेण्यात आले. अशा सर्व बाबी विचारात घेता झालेल्या खर्चापैकी अंतरीक्ष ॲटोचे रु.44,775/- हे बील पूर्णत: मान्य होण्यासारखे आहे. परंतु राज मोटर्सच्या बिलापैकी साधारणत: रु.10,000/- योग्य ठरावेत, असा अंदाज बांधून रु.44,775 + रु.10,000 = रु.54,775/- एकूण खर्च तक्रारकर्त्याला विमा कंपनीकडून दिला जाऊ शकतो. म्हणून मुद्दे त्याप्रमाणे निर्णीत करुन खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर.
ग्राहक तक्रार क्र. 74/2020.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी व्यक्तिश: व संयुक्तिकपणे तक्रारकर्त्याला या वाहनाच्या दुरुस्ती व खर्चापोटी एकूण रु.54,775/- (रुपये चोपन्न हजार सातशे पंचाहत्तर फक्त) या आदेशापासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
(3) या मुदतीत रक्कम अदा केली नाही तर विमा कंपनीला तक्रारकर्त्याला तक्रार दाखल तारखेपासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे लागेल.
(4) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व या कार्यवाहीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत.
(5) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/111021)