जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 204/2021. तक्रार दाखल दिनांक : 30/09/2021. तक्रार निर्णय दिनांक : 02/03/2023.
कालावधी : 01 वर्षे 05 महिने 02 दिवस
सरोजा भ्र. अंतेश्वर स्वामी (रंभापुरे), वय 44 वर्षे,
व्यवसाय : घरकाम व शेती, रा. अपचुंदा, ता. औसा, जि. लातूर.
ह. मु. : संभाजी नगर, कव्वा नाका, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) व्यवस्थापक, इन्डोमोबील सेल्स् ॲन्ड सर्विसेस प्रा.लि.,
प्लॉट नं. 52, एम.आय.डी.सी. एरिया, बार्शी रोड, लातूर.
(2) व्यवस्थापक, हिरो मोटो कार्पो. लि., 34, बसंत लोक,
वसंत विहार, न्यू दिल्ली - 110 057.
(3) व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी,
शाखा बस स्टॅन्डसमोर, लातूर.
(4) व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, 13 कम्युनिटी सेंटर,
पंकजा हाऊस, न्यू फ्रेंडस् कॉलनी, दिल्ली - 110 065. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम. निंबुर्गे
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- गजानन उमाकांत चाकूरकर
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- एस. डी. कुलकर्णी
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, त्यांचे पती मयत अंतेश्वर पि. प्रल्हाद स्वामी (रंभापुरे) (यापुढे "मयत अंतेश्वर") यांनी दि.1/7/2018 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "इंडोमोबील") यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "हिरो मोटो") यांच्याद्वारे उत्पादीत पॅशन प्रो दुचाकी वाहन ज्याचा नोंदणी क्र. एम.एच.24 बी.बी.3976 खरेदी केले. इंडोमोबील यांच्या विनंतीनुसार मयत अंतेश्वर यांनी हिरो गुड लाईफ कार्ड घेतले आणि त्याचा क्रमांक 1032818880000151 आहे. वाहन मालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास गट वैयक्तिक अपघात विमापत्र क्र. 355100/42/15/8200000002 अन्वये रु.1,00,000/- विमा लाभ देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष क्र.3 व 4 (यापुढे 'विमा कंपनी') यांनी स्वीकारलेली आहे. विमापत्र कालावधी दि.26/7/2021 रोजी संपुष्टात येते.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.27/12/2018 रोजी मयत अंतेश्वर हे विमा संरक्षीत दुचाकीवर सतिश दुधभाते यांच्या पाठीमागे बसून जात असताना लातूर शहरामध्ये आयशर टेम्पोने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन मयत अंतेश्वर व सतिश दुधभाते यांचा मृत्यू झाला. गांधी चौक पोलीस ठाणे, लातूर येथे क्र. 448/2018 अन्वये घटनेची नोंद करण्यात आली.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, विमापत्रानुसार विमा लाभ मिळण्याकरिता इंडोमोबील यांच्याकडे विमा दावा व अन्य कागदपत्रे सादर केली. परंतु त्यांना विमा रक्कम दिलेली नाही. विधिज्ञातर्फे सूचनापत्र पाठविले असता इंडोमोबील, हिरो मोटो व विमा कंपनीने उत्तर दिले नाही किंवा विमा रक्कम दिलेली नाही. अशाप्रकारे विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.1,00,000/-; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- अशी रक्कम अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(4) इंडोमोबील यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर अमान्य केला. त्यांच्या कथनानुसार हिरो गुड लाईफ कार्ड योजनेमध्ये मयत अंतेश्वर स्वईच्छेने सहभागी झाले. हिरो मोटो यांनी योजना सुरुवात केलेली असली तरी विमा कंपनीच्या विमा तरतुदीनुसार तक्रारकर्ती यांचा विमा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामध्ये इंडोमोबील यांचा संबंध येत नाहीत आणि त्यांनी कुचराई केलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार त्यांच्याविरुध्द रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली.
(5) हिरो मोटो यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले. त्यांचे निवेदन असे की, गुड लाईफ कार्ड हे केवळ ग्राहकांना वाहनाच्या सेवेवर व सुट्या भागाच्या खरेदीवर सवलत मिळण्याकरिता योजना आहे. योजनेच्या विमा तरतुदीचा लाभ विमा कंपनीच्या संबंधीत असल्यामुळे दावे मंजुरी-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्यारीत आहे. त्यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. शेवटी ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(6) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केली. त्यांचे निवेदन असे की, तक्रारकर्ती यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार विमा प्रस्ताव दाखल केल्याचे दिसून येत नाही. तक्रारकर्ती यांच्या तक्रारीकरिता वादकारण घडलेले नसल्यामुळे विमा लाभ देण्याकरिता विमा कंपनी जबाबदार नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(7) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते ? होय (इंडोमोबील यांनी)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 4 :- वाद-तथ्ये, कागदपत्रे व उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता मयत अंतेश्वर यांनी हिरो पॅशन प्रो दुचाकी वाहन नोंदणी क्र. एम.एच.24/बी.बी.3976 खरेदी केले; इंडोमोबील यांच्याकडून त्यांनी हिरो गुड लाईफ कार्ड घेतले; कार्ड अंतर्गत मयत अंतेश्वर यांना विमा कंपनीकडे विमा संरक्षण देण्यात आले; दि.27/12/2018 रोजी दुचाकी अपघातामध्ये मयत अंतेश्वर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला इ. बाबी विशेष विवादीत नाहीत.
(9) विमा कंपनीचा बचाव असा की, तक्रारकर्ती यांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार विमा प्रस्ताव दाखल केल्याचे दिसून येत नाही आणि तक्रारकर्ती यांच्या तक्रारीकरिता वादकारण घडलेले नसल्यामुळे विमा लाभ देण्याकरिता विमा कंपनी जबाबदार नाही. वाद-तथ्यानुसार दखल घेतली असता मयत अंतेश्वर यांनी विमा कंपनीकडून वैयक्तिकरित्या विमापत्र घेतलेले नाही, हे स्पष्ट आहे. मयत अंतेश्वर यांना इंडोमोबील यांनी दिलेल्या हिरो गुड लाईफ कार्डच्या अनुषंगाने विमा कंपनीद्वारे विमा संरक्षण दिले, ही मान्यस्थिती आहे. विमा कंपनीद्वारे दाखल कागदपत्रानुसार त्यांच्याकडे विमा दाव्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. तक्रारकर्ती यांच्या कथनानुसार विमा रक्कम मिळण्याकरिता त्यांनी इंडोमोबील यांच्याकडे विमा दाव्यासह अन्य कागदपत्रे सादर केलेले आहेत. उलटपक्षी, इंडोमोबील यांच्या कथनानुसार विमा कंपनीच्या विम्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता आणि त्यांनी प्रस्ताव प्रलंबीत ठेवण्यामध्ये किंवा त्याच्या लाभाची रक्कम देण्यामध्ये त्रुटी नाही. अशा स्थितीत, प्रश्न उपस्थित होतो की, इंडोमोबील यांनी तक्रारकर्ती यांच्या विमा दाव्याची कागदपत्रे हिरो मोटो किंवा विमा कंपनीकडे पाठविले काय ? किंवा कसे ? हिरो मोटो किंवा विमा कंपनी यांनी तक्रारकर्ती यांच्या विमा दाव्यासंबंधी इंडोमोबील यांच्याकडून कागदपत्रे प्राप्त झाल्याचे मान्य केलेले नाही. त्यामुळे इंडोमोबील यांनी तक्रारकर्ती यांच्या विमा दाव्याची कागदपत्रे हिरो मोटो किंवा विमा कंपनीकडे पाठविले, हे सिध्द होण्याकरिता पुरावा नाही. इंडोमोबील यांनी अनाधिकाराने तक्रारकर्ती यांचा विमा दावा व कागदपत्रे स्वत:कडे ठेवले आणि ते विमा कंपनीकडे पाठविले नाहीत, हेच अनुमान निघते. इंडोमोबील यांचे हे कृत्य सेवेमध्ये त्रुटी आहे आणि ज्यामुळे तक्रारकर्ती यांना विमा रक्कम रु.1,00,000/- पासून वंचित रहावे लागले. अशा स्थितीत, रु.1,00,000/- देण्यासंबंधी इंडोमोबील यांच्याविरुध्द आदेश करणे न्यायोचित राहील.
(10) तक्रारकर्ती यांनी अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने विमा रक्कम मिळावी, अशी विनंती केलेली आहे. योग्य विचाराअंती तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज आकारणे उचित ठरेल, असे जिल्हा आयोगास वाटते.
(11) तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना प्रकरणानुरुप गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ती यांना विमा रक्कम परत मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागला आहे. विमा रक्कम प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. अशा स्थितीत, तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. त्यामुळे योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(12) हिरो मोटो व विमा कंपनी यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही.
(13) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 इंडोमोबील यांनी तक्रारकर्ता यांना रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) नुकसान भरपाई द्यावी.
तसेच, उक्त रकमेवर दि.30/9/2021 पासून उक्त रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 इंडोमोबील यांनी तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 इंडोमोबील यांनी प्रस्तुत आदेशांची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-