जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 315/2022. तक्रार दाखल दिनांक : 11/11/2022. तक्रार निर्णय दिनांक : 15/01/2024.
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 04 दिवस
सुजल पिता धनाजी काळगे, वय 16 वर्षे (अज्ञान), व्यवसाय : शिक्षण,
अ.पा.क. आई रेखा भ्र. धनाजी काळगे, वय 40 वर्षे,
व्यवसाय : घरकाम व स्वंयनिर्भर, रा. बसपूर, निटूर, ता. निलंगा,
जि. लातूर, ह.मु. बसपूर, नवीन वसाहत, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
प्रोप्रा. / व्यवस्थापक, सत्यर्थ एंटरप्रायजेस, कहारी कॉर्नर,
आय.डी.बी.आय. बँकेच्या समोर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.एम. रायबागकर
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, सुपारी कतरण्याच्या उद्देशाने मशिन व सुपारी खरेदी करण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.2/7/2022 रोजी रु.1,10,000/- मुल्य असणारी सुपारी कत्रण यंत्र व प्रतिकिलो रु.700/- प्रमाणे रु.70,000/- मुल्य असणारी 100 किलो सुपारी खरेदी केली. त्याचे एकूण मुल्य रु.1,80,000/- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना दिले. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी कत्रण केलेली सुपारी दि.28/7/2022, 1/8/2022 व 13/8/2022 रोजी पाठविली असता 14.2 कि.ग्रॅ. सुपारी अपात्र ठरविली आणि 25 किलो सुपारीची रक्कम दिली नाही. सुपारीचे कत्रण योग्य होत नसल्यामुळे मशीनमध्ये दोष असल्याचे सांगून मशीन जमा करावी आणि 25 किलो सुपारी व मशीनची रक्कम परत केली जाईल, असे विरुध्द पक्ष यांनी सांगितले. तक्रारकर्ता यांनी दि.15/9/2022 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडे मशीन परत पाठविली; परंतु त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी मशीनचे मुल्य रु.1,10,000/- व सुपारीचे मुल्य रु.25,000/- परत केले नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे नमूद करुन रु.1,35,000/- दि.2/7/2022 पासून व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.7,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले आणि ग्राहक तक्रारीतील कथने खोटे व चूक असल्याच्या कारणास्तव अमान्य केले. त्यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता त्यांचे 'ग्राहक' नाहीत आणि तक्रारकर्ता हे अज्ञान असल्यामुळे त्यांच्यातील व्यवहार वैध होत नाही. तक्रारकर्ता यांना मशीन वापरासंबंधी माहिती देऊन प्रात्यक्षिक करुन दाखविले होते. तसेच तक्रारकर्ता यांनी त्यांना मशीन परत पाठविलेली नाही. त्यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केली नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. उभयतांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादकथित सुपारी कत्रण यंत्र व कच्चा मला खरेदी केल्याचे दिसून येते. त्यामुळे उभय पक्षामध्ये 'ग्राहक' व 'विक्रेता' नाते निर्माण होते. वादविषयाच्या अनुषंगाने दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना सुपारी कत्रण यंत्र परत केले, ही बाब विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या सूचनापत्र उत्तरामध्ये मान्य केलेली आहे. कथित करारामध्ये विरुध्द पक्ष यांची स्वाक्षरी दिसून येत असली तरी त्यावर तक्रारकर्ता यांची स्वाक्षरी नाही. त्यामुळे उभयतांमध्ये वैध करार अस्तित्वात आलेला नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचे सुपारी कत्रण यंत्र योग्य व सुस्थितीत सुरु असल्यासंबंधी पुरावा सादर नाही. इतकेच नव्हेतर, तक्रारकर्ता यांच्याकडून यंत्र वापरण्यामध्ये चूक झाली, हे सिध्द केलेले नाही. तक्रारकर्ता यांच्या अज्ञान असल्यासंबंधी उपस्थित मुद्दा वादविषयाच्या अनुषंगाने गैरलागू ठरतो. आमच्या मते, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचे सुपारी कत्रण यंत्र परत स्वीकारल्यानंतर त्याचे मुल्य परत करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे कार्यवाही न करण्याचे विरुध्द पक्ष यांचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरते आणि तक्रारकर्ता हे यंत्राचे मुल्य व कत्रण केलेल्या सुपारीचे मुल्य मिळण्यास पात्र आहेत. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सुपारी कत्रण यंत्राचे मुल्य रु.1,10,000/- परत करावे. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कत्रण केलेल्या सुपारीकरिता रु.25,000/- द्यावेत.
(3) विरुध्द पक्ष यांनी आदेश क्र.2 प्रमाणे देय रक्कम आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत अदा न केल्यास आदेश तारखेपासून सदर रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देय राहील.
(4) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-