-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-03 सप्टेंबर,2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष कंपनी विरुध्द त्याचा भ्रमणध्वनी त्याची पूर्वपरवानगी न घेता दुस-या व्यक्तीचे नावे परस्पर हस्तांतरीत केल्या मुळे तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याची मे. स्पेक्ट्रम सर्व्हीसेस ही प्रोप्रायटरी फर्म असून तो सदर फर्मचा प्रोप्रायटर आहे, त्याचे फर्मव्दारे तो शासकीय कार्यालये तसेच खाजगी संस्थांना संगणकीय सेवा व वार्षिक देखभाल इत्यादी पुरवितो. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हे अनुक्रमे वोडाफोन सेल्युलर लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यालय आणि शाखा कार्यालय आहे. विरुध्दपक्ष कंपनी ग्राहकांना भ्रमणध्वनीची सेवा पुरविते.
तक्रारकर्त्याने त्याचे फर्मचे व्यवसायासाठी विरुध्दपक्ष क्रं-2) कडून कॉर्पोरेट ग्रुप प्लॅन योजने अंतर्गत दहा पोस्टपेड भ्रमणध्वनी कनेक्शन्स त्याचे फर्मचे नावाने घेतले होते. या 10 भ्रमणध्वनी पैकी एक भ्रमणध्वनी क्रं-9049998892 हा तक्रारकर्त्याचा कर्मचारी श्री आशिष भेंडे याचेकडे फर्मचे कामासाठी दिला होता. माहे ऑगस्ट, 2012 मध्ये श्री भेंडे याला कामावरुन कमी करण्यात आले व त्याला सदर भ्रमणध्वनी तक्रारकर्त्याचे ताब्यात देण्याच्या सुचना देण्यात आल्यात. दरम्यानचे काळात सदर भ्रमणध्वनी हा परस्पर तक्रारकर्त्याची पूर्व परवानगी न घेता विरुध्दपक्षाचे अमरावती येथील कार्यालया मार्फतीने श्री भेंडे याचे नावे हस्तांतरीत केल्याचे तक्रारकर्त्याचे लक्षात आले. तक्रारकर्त्याने त्वरीत विरुध्दपक्षाकडे दिनांक-10.09.2012 रोजी ईमेल व्दारे सदर बाब सुचित केली व भ्रमणध्वनीची सेवा बंद करण्या बाबत कळविले. त्यावर विरुध्दपक्ष कंपनीने दिनांक-12.09.2012 रोजी ईमेल व्दारे त्यांना ना-हरकत-प्रमाणपत्र व इतर दस्तऐवज प्राप्त झाल्या नंतर त्यांनी सदर भ्रमणध्वनी श्री भेंडे याचे नावाने हस्तांतरीत केल्याचे कळविले व आज पावेतो भ्रमणध्वनीची सेवा सुरु ठेवली. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, सदर हस्तांतरण हे खोटया दस्तऐवजाचे आधारे करण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक-14.09.2012 रोजीचे पत्र आणि दिनांक-27.09.2012 रोजीची कायदेशीर नोटीस पाठवूनही विरुध्दपक्ष कंपनी कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्याने शेवटी तक्रार मंचात दाखल केली.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनी विरुध्द खालील प्रकारच्या मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष कंपनीने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याचे घोषीत करण्यात यावे. तक्रारकर्त्याचा भ्रमणध्वनी बेकायदेशीररित्या हस्तांतरीत केल्यामुळे सेवा बंद करुन तक्रारकर्त्यास नविन सिमकार्ड देण्याचे आदेशित व्हावे. तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- मिळावेत. ज्या खोटया दस्तऐवजाचे आधारे भ्रमणध्वनीचे हस्तांतरण करण्यात आले ते दस्तऐवज पुरविण्याचे आदेशित व्हावे. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/-मिळावेत अशा मागण्या केल्यात.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) कंपनी तर्फे नि.क्रं-7 प्रमाणे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की तक्रार ही खोटी आहे. तक्रारकर्ता स्वच्छ हाताने मंचा समक्ष आलेला नाही. तक्रारकर्त्या कडील कर्मचारी श्री आशिष रामराव भेंडे याने भ्रमणध्वनी त्याचे नावे हस्तांतरीत करण्या बाबतचे पत्र आणले होते व त्यानुसार तो त्याचे नावे हस्तांतरीत करण्यात आला. सदर प्रकरणात श्री भेंडे याचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याची फर्म असून त्याने एकाच वेळी पाच भ्रमणध्वनी सन-2009 मध्ये घेतले होते. तक्रारकर्त्याचा कर्मचारी हा विरुध्दपक्ष कंपनी कार्यालयात दिनांक-13.08.2012 रोजी आला व भ्रमणध्वनी त्याचे नावे हस्तांतरणाची विनंती केली, सर्व तपासणी केल्या नंतर तो त्याचे नावे हस्तांतरीत करण्यात आला. तक्रारकर्त्याची तक्रार आणि कायदेशीर नोटीस सप्टेंबर, 2012 मध्ये त्यांना प्राप्त झाल्या नंतर त्यांनी भ्रमणध्वनीची सेवा खंडीत केली. तक्रारकर्त्याने श्री भेंडे विरुध्द कोणतीही तक्रार लेटर हेडवर तक्रारकर्त्याची खोटी सही श्री भेंडे याने केल्या बाबत त्यांचेकडे केली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून घेतलेली सेवा ही व्यवसायिक उपयोगासाठी घेतलेली असल्याने तो ग्राहक संरक्षण कायद्दातील कलम-2 प्रमाणे ग्राहक होत नाही. तक्रारकर्त्याने आशिष भेंडे याला प्रतिपक्ष केलेले नाही, जो या प्रकरणात प्रतिपक्ष करणे आवश्यक होते. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व चुकीची असल्याने तक्रार खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्षां तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे उत्तर, दाखल दस्तऐवजाच्या प्रती आणि उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. तक्रारकर्त्याची संगणकीय सेवेतील प्रोप्रायटरी फर्म असून त्या फर्म मध्ये माजी कर्मचारी श्री आशिष रामराव भेंडे याने विरुध्दपक्ष वोडाफोन सेल्युलर लिमिटेड कंपनीचे कार्यालयात तक्रारकर्त्याची फर्म स्पेक्ट्रम सर्व्हीसेस, नागपूरचे लेटर हेड वापरुन दिनांक-13.08.2012 रोजीचे ना-हरकत-प्रमाणपत्र सादर केले, ज्यामध्ये तक्रारकर्त्याचे फर्मचे नावे असलेला भ्रमणध्वनी क्रं-9049998892 हा श्री आशिष भेंडेचे नावे करुन देण्या बाबत नमुद केले. सदर ना-हरकत-प्रमाणपत्राची प्रत विरुध्दपक्षा तर्फे दाखल करण्यात आली. जेंव्हा ईमेल व्दारे तक्रारकर्त्याची तक्रार आणि कायदेशीर नोटीस विरुध्दपक्ष वोडाफोन सेल्युलर लिमिटेड कंपनीस प्राप्त झाली त्यानंतर दिनांक 29 जुलै, 2013 रोजी विरुध्दपक्ष कंपनीने श्री आशिष भेंडे यास पत्र पाठवून त्या भ्रमणध्वनीची सेवा खंडीत केल्या बाबतचे पत्र पाठविले, जे विरुध्दपक्ष कंपनी तर्फे पुराव्या दाखल सादर करण्यात आले.
06. यामध्ये विरुध्दपक्ष कंपनीचा कोणताही दोष दिसून येत नाही, जो काही दोष आणि वादाचा मुद्दा येतो तो तक्रारकर्ता आणि त्याचा माजी कर्मचारी श्री आशिष रामराव भेंडे यांचे मध्ये उपस्थित होतो परंतु तक्रारकर्त्याने त्याचा कर्मचारी श्री आशिष भेंडे याला सदर तक्रारीत प्रतिपक्ष केलेले नाही. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याचे प्रोप्रायटरी फर्मचे लेटर हेडवर त्याची खोटी सही करुन त्याचा कर्मचारी श्री भेंडे याने त्याचे फर्मचे मालकीचा भ्रमणध्वनी श्री भेंडे याने त्याचे नावावर हस्तांतरीत करुन घेतला तर तक्रारकर्त्याने त्याचा माजी कर्मचारी श्री भेंडे विरुध्द काय कारवाई केली या बद्दलचा कोणताही तपशिल वा पुरावा दिलेला नाही. यावरुन असे दिसून येते की, जो काही वाद आहे तो तक्रारकर्ता आणि त्याचा माजी कर्मचारी श्री भेंडे यांचे मध्ये आहे, विरुध्दपक्ष कंपनीकडे जे दस्तऐवज सादर करण्यात आले त्यावरुन त्यांनी तो भ्रमणध्वनी श्री भेंडे याचे नावे हस्तांतरीत केला व नंतर जेंव्हा तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त झाली त्यावेळी त्यांनी त्या भ्रमणध्वनीची सेवा खंडीत केली, यावरुन विरुध्दपक्ष कंपनी तर्फे तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे दिसून येत असल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
07. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) वोडाफोन सेल्युलर लिमिटेड यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.