जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 50/2022. तक्रार दाखल दिनांक : 16/02/2022. तक्रार निर्णय दिनांक : 02/02/2024.
कालावधी : 01 वर्षे 11 महिने 17 दिवस
कौस्तुभ प्रवीण कुलकर्णी, वय 34 वर्षे,
व्यवसाय : वकिली, रा. सौभाग्य नगर, लातूर, ता. जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
विश्व ट्रॅव्हल्स सर्विसेस, दुकान क्र.2, उद्योग भवन,
शिवाजी नगर, लातूर, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. जी. यू. चाकूरकर
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. एस. एस. त्रिकोळीकर
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांनी 'रेडबस' ॲपद्वारे दि.8/9/2021 रोजी पुणे येथे जाण्यासाठी 5.30 वाजता प्रयाण करणा-या विरुध्द पक्ष यांच्या बसचे तिकीट काढले होते आणि त्याकरिता रु.555/- अदा केले. त्यांचा तिकीट पी.एन.आर. क्र. 233978858, बस क्र. एम.एच. 24 ए.यू. 3003 व आसन क्र. 15 होता. बसचा प्रवास सुरु झाल्यानंतर बसमधील दोषामुळे 5 नंबर चौक, 12 नंबर पाटील शामनगर व नंतर उस्मानाबाद येथे बस थांबविण्यात आली. त्यानंतर टायर व चाकाच्या दोषामुळे 11.30 वाजता टेंभुर्णी जवळील पिंपळनेर येथे बस थांबविण्यात येऊन प्रवाशांना बसमधून खाली उतरविण्यात आले. मात्र तक्रारकर्ता यांना पर्यायी व्यवस्था करुन प्रवासाची सोय केली नाही. विरुध्द पक्ष यांच्या कर्मचा-यांनी त्यांच्याशी उध्दट वर्तण केले. तक्रारकर्ता हे पुणे येथे न्यायालयीन कामासाठी वेळेमध्ये पोहोचू शकले नाहीत. त्यानंतर तक्रारकर्ता यांना रु.9,000/- खर्च करुन पुणे येथे जावे लागले. तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता त्यास नकार दिला. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी केल्याचे नमूद करुन रु.9,555/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.3,000/- व अन्य खर्च रु.11,500/-देण्याचा विरुद पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी त्यांच्या बसमधून प्रवास केलेला आहे. टेंभुर्णीजवळील पिंपळनेर गावी बस पोहोचल्यानंतर ब्रेकमधील अचानक उदभवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे बस थांबविण्यात आली. लातूर किंवा पुणे येथून पर्यायी वाहनाची व्यवस्था करण्यासाठी तीन ते साडेतीन तासाचा अवधी लागणार असल्यामुळे अन्य वाहनाचे जाण्यास प्रवाशांना विनंती करण्यात आली. तसेच प्रवास भाडे परत करण्यात येईल, असेही सांगण्यात येऊन मागणी केलेल्या प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत केलेली आहे. तक्रारकर्ता यांना सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणे शक्य होते. सेवेमध्ये त्रुटी केली नसल्याचे नमूद करुन ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्या बसद्वारे दि.8/9/2021 रोजी लातूर ते पुणे प्रवास करण्यासाठी तिकीट खरेदी केले, ही मान्यस्थिती आहे. प्रवास सुरु झाल्यानंतर बसच्या चाकाच्या दोषामुळे 11.30 वाजता टेंभुर्णी जवळील पिंपळनेर येथे बस थांबविण्यात येऊन प्रवाशांना बसमधून खाली उतरविण्यात आले, ही मान्यस्थिती आहे.
(5) तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार अन्य पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे तक्रारकर्ता हे पुणे येथे न्यायालयीन कामासाठी वेळेमध्ये पोहोचू शकले नाहीत आणि त्यांना रु.9,000/- खर्च करुन पुणे येथे जावे लागले. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद असा की, टेंभुर्णीजवळील पिंपळनेर गावी ब्रेकमधील अचानक उदभवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे बस थांबविण्यात आली. लातूर किंवा पुणे येथून पर्यायी वाहनाची व्यवस्था करण्यासाठी तीन ते साडेतीन तासाचा अवधी लागणार असल्यामुळे अन्य वाहनाचे जाण्यास प्रवाशांना विनंती केली आणि मागणी केलेल्या प्रवाशांना तिकिटाची रक्कम परत केलेली आहे. तसेच तक्रारकर्ता यांना सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणे शक्य होते, असे विरुध्द पक्ष यांचे कथन आहे.
(6) अभिलेखावर दाखल कागदपत्रे पाहता दि.8/9/2021 रोजी तक्रारकर्ता त्यांच्या न्यायालयीन कामासाठी पुणे येथे गेले होते, ही बाब मान्य करावी लागेल. तिकिटाचे अवलोकन केले असता बसची दुपारी 12.33 वाजता स्वारगेट, पुणे येथे पोहोचण्याची वेळ नमूद आहे. सकाळी 11.30 वाजता बस टेंभुर्णीजवळील पिंपळनेर येथे थांबविण्यात आली, ही मान्यस्थिती आहे. तेथून कोणत्याही पर्यायी वाहनाने पुणे येथे जाण्याकरिता किमान 3 तास अवधी लागणार, हे मान्य करावे लागेल. निर्विवादपणे, बसमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बस पिंपळनेर येथे थांबविण्यात आली आणि तो दोष मानवनिर्मित नव्हता किंवा त्याकरिता विरुध्द पक्ष जबाबदार नव्हते. शिवाय, पुढील प्रवासाकरिता योग्य वेळेमध्ये अन्य बसची पर्यायी व्यवस्था करणे विरुध्द पक्ष यांच्यासाठी कठीण होते, हे सुध्दा तितकेच सत्य आहे. काहीही असले तरी, तक्रारकर्ता यांचा प्रवास योग्य वेळेमध्ये व इच्छित स्थळी पूर्ण होऊ शकला नाही आणि ते कृत्य विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी ठरते.
(7) हे सत्य आहे की, बस नादुरुस्त झाल्यामुळे तक्रारकर्ता किंवा अन्य प्रवाशांना गैरसोय व आर्थिक खर्चास सामोरे जावे लागलेले आहे. तक्रारकर्ता यांची न्यायिक कामकाजामध्ये त्यांची उपस्थिती निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांची न्यायालयीन प्रकरणातील उपस्थितीची निकड व वेळेचे बंधन पाहता पुणे येथे पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहनाची प्रतिक्षा करण्याऐवजी प्राधान्याने खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा पर्याय निवडला असावा, हे मान्य करावे लागेल. वास्तविक पाहता, तक्रारकर्ता यांनी कोणत्या प्रकारच्या वाहनाने, कोणत्या क्रमांकाच्या वाहनाने, प्रवास वाहतुकीसाठी कशाप्रकारे रक्कम निश्चित करुन प्रवास केला, याबद्दल ऊहापोह केलेला नाही. असे असले तरी त्याबद्दल केवळ तर्काच्या आधारे त्याबद्दल विचार करता येऊ शकेल. पिंपळनेर ते पुणे अंतर साधारणत: 180 कि.मी. असल्याचे निदर्शनास येते. खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा झाल्यास 300 कि.मी. पेक्षा जास्त अंतरासाठी कि.मी. प्रवासानुसार दर आकारण्याची पध्दत दिसते. 300 कि.मी. पेक्षा कमी अंतरासाठी निश्चित रक्कम आकारणी करुन डिझेल, पेट्रोल किंवा गॅस इ. इंधन शुल्क स्वीकारण्याची पध्दत दिसते. उक्त बाबींचा विचार केला असता रु.1,500/- प्रवास भाडे व कमाल इंधन शुल्क रु.1,800/- विचारात घेण्यात येतात आणि त्याप्रमाणे रु.3,300/- खर्च होणे अपेक्षीत आहे. उक्त विवेचनांती तक्रारकर्ता हे रु.3,300/- मिळण्याकरिता पात्र आहेत, या निष्कर्षास आम्ही येत आहेत.
(8) तक्रारकर्ता यांच्याशी विरुध्द पक्ष यांच्या कर्मचा-याने उध्दट वर्तण केल्याबद्दल कथन पाहता तक्रारकर्ता व कर्मचारी यांच्यामध्ये नेमका काय वार्तालाप झाला, हे उचित पुराव्याअभावी सिध्द होणे कठीण आहे.
(9) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई, सूचनापत्र व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रकमेची मागणी केलेली आहे. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. बसमध्ये अचानक निर्माण झालेल्या दोषाकरिता विरुध्द पक्ष जबाबदार नसले तरी परिणामी तक्रारकर्ता यांना त्रासास सामोरे जावे लागून पुढील प्रवासासाठी खर्च करावा लागलेला आहे. नुकसान भरपाई मिळविण्याकरिता तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.3,000/- व खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(10) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रु.3,300/- नुकसान भरपाई द्यावी.
ग्राहक तक्रार क्र. 50/2022.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-