( आदेश पारित द्वारा- श्री नितीन घरडे, मा.सदस्य )
- आदेश -
(पारित दिनांक –30 सप्टेंबर 2013)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन असे आहे की, विरुध्द पक्ष ही शेडयुल बँक असुन
तिचा मुख्य व्यवसाय हा सभासदांना कर्ज वाटप करणे व सभासदांपासुन मुदत ठेव घेणे,जमा खाते उघडणे व सर्व बाबींचे कायदेशीर पालन करणे. तक्रारकर्त्याची पत्नी स्वर्गीय किरण धमेंद्र बनोदे यांचा दिनांक 20/12/2011 रोजी रांची बिहार येथे मरण पावली मृत्युपुर्वी तिने दिनांक 22.11.2010 रोजी विरुध्द पक्ष क्रं.2 कडे आपल्या लग्नापुर्वीच्या नावे म्हणजेच कु.किरण किशोरीलाल साहु या नावाने रुपये 80,000/-ची मुदत ठेव ठेवली होती. जिचा मुदत ठेव नंबर 370040 व खाते क्रं.9202 असा होता व परिपक्वता तारीख 22.11.2011 होती. विरुध्द पक्षाने सदर रक्कमेवर दर साल 7.50 टक्के व्याज देण्याचे कबुल केले होते. मुदत ठेव केल्याची मुळ पावती तक्रारकर्त्याकडे आहे.
3. तक्रारकर्त्याने त्याचे पत्नीचे (कु.किरण किशोरीलाल साहु) मृत्यु नंतर विरुध्द पक्ष क्रं.2 कडे नमुद मुदत ठेवीचे पैसे प्राप्त करण्याकरिता चौकशी केली असता सदर मुदत ठेव रक्कम श्री किशोरीलाल हजारीलाल शाहु यांना कुठल्याही प्रकारची चौकशी न करता,खाते केवळ लग्नापुर्वीच्या नावाने होते म्हणुन श्री कीशोरीलाल हजारीलाल शाहु यांना परस्पर अदा केली.
4. तक्रारकर्ता श्री धमेंद्र बन्सीलालजी बनोदे यांचा विवाह दिनांक 8/7/2008 रोजी कुमारी किरण किशोरीलाल शाहु यांच्याशी नागपूर मुक्कामी झाला. तक्रारकर्त्याची पत्नी सिव्हील इंजिनिअरिंगचा डिप्लोमाधारक होती व सरकारी कंत्राटदार व सिव्हील लाइसन्स तिने लग्नापुर्वीच्यानावाने प्राप्त केले. तक्रारकर्त्यास सालवंसी प्रमाणपत्राची गरज असल्याने बँकेकडे अर्ज केला असता त्यांचे पत्नीचे सर्व प्रमाणपत्रांवर लग्नापुर्वीचे नाव असल्याने, त्याच नावे रुपये 80,000/-ची रक्कम मुदत ठेव (लग्नापुर्वीच्या नावाने) करण्यास सांगीतले. त्यामुळे तक्रारकर्त्याने कुमारी किरण किशोरीलाल शाहु या नावाने रुपये 80,000/-ची मुदत ठेव केली. तक्रारकर्त्याचे पत्नीचे मृ नंतर सदर मुदत ठेवीची रक्कम तक्रारकर्त्यास नॉमीनी असल्या कारणाने देणे बंधनकारक होते परंतु विरुध्द पक्ष बँकेच्या कर्मचा-यांनी स्वर्गीय किरण यांचे वडीलांशी संगनमत करुन सदर मुदत ठेवीची रक्कम श्री कीशोरीलाल हजारीलाल शाहु यांना दिले.
5. मुदत ठेवीची रक्कम तक्रारकर्ता नॉमीनी असुन देखील रक्कम न मिळाल्याने तक्रारकर्त्याने दिनांक 19/3/2012 रोजी विरुध्द पक्षास कायदेशीर नोटीस दिली असता विरुध्द पक्षाने सदर नोटीसला उत्तर दाखल करुन नोटीस मधील रक्कमेबद्दल स्पष्टीकरण दिले नाही व सर्व जबाबदा-या टाळल्या म्हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे मागणी केली आहे.
तक्रारकर्त्याची प्रार्थना-
1. विरुध्द पक्ष बँकेने मुदत ठेवीचे रुपये 80,000/- व त्यावरील व्याजाचे रुपये 6,000/- असु एकुण 86,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
2. तक्रारकर्त्यास दिलेल्या त्रुटीपुर्ण व विलंबीत सेवेकरिता रुपये 50,000/- मिळावे. अशी मागणी केली.
6. तक्रारकर्त्याची तक्रार शपथपत्रावर असुन तक्रारीसोबत एकुण 10 दस्तऐवज दाखल केले आहे. त्यात ठेव जमा पावती/ प्रमाणपत्र, सालवंसी प्रमाणपत्र, कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र, पॅनकार्ड ची प्रत, मृत्यु प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
7. सदर तक्रारीचे अनुषंगाने, मंचाद्वारे सदर प्रकरणात विरुध्द पक्षाला नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होवुन विरुध्द पक्ष मंचासमक्ष उपस्थीत झाले व आपला लेखी जवाब प्रकरणात दाखल केला.
8. विरुध्द पक्ष आपले लेखी जवाबात नमुद करतात की, सदर तक्रारकर्त्याने बँकेशी कोणताही व्यवहार केलेला नाही व नमुद रक्कम देखील तक्रारकर्त्याने जमा केलेली नाही त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक नाही असा प्राथमिक आक्षेप घेतला.
9. तक्रारीत नमुद रक्कम रुपये 80,000/- स्वर्गीय किरण किशोरीलाल शाहु यांनी जमा केली होती. परंतु तक्रारकर्त्याने कुठल्याही प्रकारचा व्यवहार विरुध्द पक्ष बँकेशी केलेला नाही. त्यामुळे सदर रक्कमेशी तक्रारकर्त्याचा कसलाही संबंध नाही. तक्रारकर्त्याची ही तक्रार खोटी व बिनबुडाची असल्याने खर्चासह खारीज करण्यात यावी. असा उजर घेतला.
10. स्वर्गीय किरण धमेंन्द्र बनोदे यांनी दिनांक 22.11.2010 रोजी स्वतःच्या नावाने विरुध्द पक्ष बँकेकडे रुपये 80,000/- मुदत ठेवीकरिता जमा केले. परंतु स्वर्गीय किरण किशारीलाल शाहू याच किरण बनोदे होत्या व त्यांनी तक्रारकर्त्याशी लग्न केले होते ही बाब अमान्य केली.
11. स्वर्गीय किरण किशोरीलाल शाहू यांनी विरुध्द पक्ष बँकेकडे रुपये 80,000/- मुदत ठेवीमधे दिनांक 22.11.2010 रोजी जमा केले त्यामध्ये त्यांनी वडीलांचे नावे नामांकन केले होते व मुदत ठेव खाते सुरु करतांना स्वर्गीय किरण किशोरीलाल शाहू यांनी आपला पत्ता उमरेड दिला होता व अर्जात कोठेही त्यांचे लग्न झाल्याबाबत उल्लेख नाही तसेच त्या नागपूरला राहात असल्याचा उल्लेखही करण्यात आलेला नाही.
12. किरण किशोरीलाल शाहू यांचे मृत्युनंतर त्यांचे वडील श्री किशोरीलाल शाहू यांनी विरुध्द पक्षाकडे नामांकनाप्रमाणे पैसे मिळण्याकरिता अर्ज सादर केला. सदर अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावरुन देखील कोठेही स्वर्गीय किरण किशोरीलाल शाहू यांचे लग्न झाल्याचे किंवा तक्रारकर्ता त्यांचा पती असल्याचे दिसत नाही. दाखल केलेल्या मृत्यु प्रमाणपत्रात किरण शाहू यांचे नाव श्री किशोरीलाल शाहू यांची मुलगी असे नमुद आहे. पुढे मुदत ठेवीची रक्कम उचलतांना श्री कीशोरीलाल हजारीलाल शाहु यांनी श्री जशनभाई पटेल यांचे हमीपत्र देखील सादर केले आहे. तसेच श्री कीशोरीलाल हजारीलाल शाहु यांनी दिनांक 5.7.2012 रोजी सादर केलेल्या शपथपत्रात असे स्पष्टपणे नमुद केले आहे की त्यांची मुलगी अविवाहीत होती. विरुध्द पक्षाने विविध कागदपत्रे व शपथपत्राप्रमाणे पडताळणी करुन श्री कीशोरीलाल हजारीलाल शाहु यांना रक्कम अदा केली असुन कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार अथवा त्रुटीपुर्ण व्यवहार केला नाही. तक्रारकर्त्यास सदर तक्रार करण्याचा कोणताही अधिकार नाही तक्रारकर्त्याने कायद्याचा गैरवापर करुन विरुध्द पक्ष बँकेविरुध्द खोटी तक्रार दाखल केली म्हणुन तक्रारकर्त्याची तक्रार दंडासह खारीज करावी अशी विनंती केली.
//*// कारण मिमांसा //*//
तक्रारकर्त्याने दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्म अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या मुदत ठेवीच्या पावती वरुन ही बाब सिध्द होते की, स्वर्गीय किरण कीशोरीलाल शाहुने (स्वर्गीय किरण धमेंन्द्र बनोदे) विरुध्द पक्ष बँकेकडे रुपये 80,000/- पावती क्रमांक 370040 नुसार दिनांक 22/11/2010 रोजी एक वर्षाकरिता मुदत ठेव ठेवली होती. सदर मुदत ठेवीचा परिपक्वता दिनांक 22/11/2011 होती. ही बाब दाखल पावतीवरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सालवंसी प्रमाणपत्रात, कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्रात, पॅन कार्डवर व मृत्यु प्रमाणपत्रात देखिल कु. किरण कीशोरीलाल शाहु हेच नाव नमुद नसल्याचे दिसते. तसेच स्वतः स्वर्गीय किरण कीशोरीलाल शाहुने आपले दिनांक 22/11/2010 चे मुदत ठेवीचे अर्जात श्री कीशोरीलाल हजारीलाल शाहु (वडील) यांचे नाव नामांकित व्यक्ति म्हणुन लिहील्याचे (कागदपत्र क्रं.55) वरुन स्पष्ट होते. पुढे विरुध्द पक्ष बँकेने दाखल केलेल्या कागदपत्रांत दिनांक 22/11/2010 चे फार्म नं.60 (कागदपत्र क्रं.57) मध्ये कु किरण शाहु नमुद असल्याचे दिसुन येते. विरुध्द पक्ष बँकेने नियमानुसार स्वर्गीय किरण किशोरीलाल शाहू हीचे मुत्युनंतर तिचे वडील श्री कीशोरीलाल हजारीलाल शाहु यांनी रक्कम मिळण्याकरिता केलेल्या विनंती अर्जानुसार त्यांना नामांकित व्यक्ति म्हणुन मुदत ठेव रक्कम अदा करतांना शपथपत्र, इंडीमीनिटी बॉन्ड रेशनकार्ड, मृत्यु प्रमाणपत्र, व इतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यावरच मुदत ठेवीची रक्कम अदा केल्याची बाब दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. यावरुन विरुध्द पक्ष बँकेचे सेवेत कुठलीही कमतरता दिसुन येत नाही करिता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही
3) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना नि:शुल्क देण्यात याव्या.
| Nitin Manikrao Gharde, MEMBER | C.K.Dhiran, PRESIDENT | , | |