जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 111/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 12/04/2022. तक्रार निर्णय दिनांक : 22/03/2024.
कालावधी : 01 वर्षे 11 महिने 10 दिवस
(1) योगिता भ्र. ज्ञानोबा केंद्रे, वय 37 वर्षे, व्यवसाय : घरकाम.
(2) गणेश ज्ञानोबा केंद्रे, वय 12 वर्षे, व्यवसाय : शिक्षण
तर्फे आई : योगिता भ्र. ज्ञानोबा केंद्रे.
(3) कार्तिक ज्ञानोबा केंद्रे, वय 10 वर्षे, व्यवसाय : शिक्षण
तर्फे आई : योगिता भ्र. ज्ञानोबा केंद्रे.
सर्व रा. रामवाडी (को.), ता. रेणापूर, जि. लातूर. :- तक्रारकर्ते
विरुध्द
(1) युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि. तर्फे त्यांचे
विभागीय व्यवस्थापक, वय : सज्ञान, व्यवसाय : नोकरी,
रा. प्लॉट क्र. ईएल 994/केएलसी टॉवर, एमआयडीसी,
महापे, नवी मुंबई - 400 710.
(2) जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. तर्फे व्यवस्थापकीय संचालक,
वय : सज्ञान, व्यवसाय : नोकरी, रा. दुसरा मजला,
जायका बिल्डींग, कमर्शिअल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001.
(3) तालुका कृषि अधिकारी, वय : सज्ञान, व्यवसाय : नोकरी,
रा. तहसील कार्यालयाजवळ, रेणापूर.
(4) जिल्हा कृषि अधिकारी, वय : सज्ञान, व्यवसाय : नोकरी,
रा. पंचायत समिती कार्यालयाजवळ, लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. ओ. बी. पेन्सलवार
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. एस. व्ही. शास्त्री
विरुध्द पक्ष क्र.2 :- स्वत:
विरुध्द पक्ष क्र. 3 :- डाकेद्वारे लेखी निवेदनपत्र सादर.
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, तक्रारकर्ती क्र.1 ही मयत ज्ञानोबा राम केंद्रे (यापुढे 'मयत ज्ञानोबा') यांच्या पत्नी असून तक्रारकर्ते क्र.2 व 3 त्यांची मुले आहेत. महाराष्ट्र शासनाने विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे 'जायका इन्शुरन्स') यांच्यामार्फत विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे महाराष्ट्रातील शेतक-यांचा प्रत्येकी रु.2,00,000/- रकमेचा विमा उतरविलेला होता. दि.11/1/2020 रोजी मयत ज्ञानोबा हे ॲटो रिक्षा क्र. एमएच24/ई5866 चालवत होते आणि अन्य वाहनास बाजू देण्याकरिता रिक्षा रस्त्याच्या कडेला घेत असताना रिक्षा घसरुन पलटी झाला. अपघातामध्ये मयत ज्ञानोबा गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात नेले असता मृत घोषीत करण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्ती क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र.4 (यापुढे "जिल्हा कृषि अधिकारी") यांच्याकडे सर्व कागदपत्रांसह विमा दावा सादर केला. मात्र विमा कंपनीने दि.7/8/2021 रोजी "मयत ॲटो रिक्षा वेगाने चालवत होता" असे कारण देऊन दावा रद्द केला. विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे नमूद करुन रु.2,00,000/- विमा रक्कम देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.1,00,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्च रु.20,000/- अशी एकूण रक्कम व्याजासह देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केलेली आहे.
(2) विमा कंपनी जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिली; मात्र लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(3) जायका इन्शुरन्स यांनी डाकेद्वारे लेखी निवेदनपत्र दाखल केले. सर्वप्रथम त्यांनी अपघात विमा योजनेखाली प्राप्त होणा-या दाव्यासंबंधी होणा-या कार्यपध्दतीचा तपशील नमूद केला. त्यांच्या कथनाप्रमाणे दावा मंजूर-नामंजुरीची बाब विमा कंपनीच्या अखत्यारीत असते आणि जयका इन्शुरन्स हे केवळ मध्यस्त आहेत. त्यांचे पुढे कथन आहे की, मयत ज्ञानोबा यांचा दावा प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे दि.17/11/2020 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे दि.24/11/2020 व जयका इन्शुरन्स यांच्याकडे दि.24/3/2021 रोजी प्राप्त झाला. दाव्याची छाननी करुन दि.23/7/2021 रोजी पुढील निर्णयाकरिता विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. परंतु विमा कंपनीने दि.7/8/2021 रोजी "पॉलिसीच्या अटी अनुसार क्लेम अपात्र ठरविण्याचे कारण : सूपुर्द केलेल्या घटनास्थळ पंचनाम्यानुसार विमाधारक याने त्याच्या ताब्यातील ॲटोरिक्षा भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून ॲटोरिक्षा पलटी करुन स्वत:चे मरणास कारणीभूत झाला" या कारणास्तव दावा नामंजूर केला. विमा दाव्यासंबंधी निर्णय घेण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. जयका इन्शुरन्सने त्यांची जबाबदारी त्वरीत व व्यवस्थित पार पाडली आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: न्यायालयीन प्रक्रियेतून त्यांना वगळण्यात यावे, अशी त्यांनी विनंती केलेली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.4 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर करुन मयत ज्ञानोबा यांच्या दाव्यामध्ये ॲटोरिक्षा भरधाव वेगाने चालवत असल्याच्या कारणास्तव विमा कंपनीने दावा नामंजूर केल्याचे नमूद केले.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, जायका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी होय
केल्याचे सिध्द होते काय ? (विमा कंपनीने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. अभिलेखावर दाखल कागदपत्रे पाहता मयत ज्ञानोबा हे शेतकरी होते आणि रिक्षा चालवत असताना रिक्षा पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट होते. जायका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत ज्ञानोबा यांच्या अपघाती मृत्यूपश्चात तक्रारकर्ती क्र.1 यांनी विमा कंपनीकडे रितसर मार्गाने विमा दावा दाखल केला होता, याबद्दल पुष्ठी मिळते. विमा कंपनीचे दि.7/8/2021 रोजीचे पत्र पाहता "पॉलिसीच्या अटी अनुसार क्लेम अपात्र ठरविण्याचे कारण : सूपुर्द केलेल्या घटनास्थळ पंचनाम्यानुसार विमाधारक याने त्याच्या ताब्यातील ॲटोरिक्षा भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून ॲटोरिक्षा पलटी करुन स्वत:चे मरणास कारणीभूत झाला" असे नमूद करुन दावा अपात्र ठरविण्यात आलेले आहे.
(7) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही आणि त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले. विमा कंपनीद्वारे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व दाखल केलेल्या कागदपत्रांचे खंडन नाही आणि विरोधी पुरावे नाहीत.
(8) विमा कंपनीने मयत ज्ञानोबा यांचा विमा दावा नामंजूर करण्यासाठी मयत ज्ञानोबा यांनी भरधाव वेगाने निष्काळजीपणे रिक्षा चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे कारण दिलेले आहे. अभिलेखावर दाखल पोलीस कागदपत्रांमध्ये प्रथम खबर अहवाल पाहता मयत ज्ञानोबा हे समोरुन येणा-या वाहनास बाजू देत असताना रस्त्याच्या कडेला जाऊन रिक्षा पलटी झाल्याचे नमूद आहे आणि त्याच कथनास अन्य पोलीस कागदपत्रे पुष्ठी देतात. सकृतदर्शनी, मयत ज्ञानोबा हे रिक्षा चालवत असताना अन्य वाहनास बाजू देतेवेळी रिक्षा पलटी झाल्याचे दिसून येते. अपघातामध्ये मयत ज्ञानोबा यांचा निष्काळजीपणा सिध्द होण्याकरिता उचित पुरावा नाही. अशा स्थितीत, विमा कंपनीचे दावा अपात्र ठरविण्याचे कृत्य योग्य व उचित मानता येणार नाही. विमा कंपनीने अयोग्य व अनुचित कारणास्तव तक्रारकर्ती क्र.1 यांचा विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते.
(9) प्रस्तुत प्रकरण सुनावणीसाठी असताना विमा कंपनीतर्फे विधिज्ञांनी अर्ज सादर करुन विमा नुकसान भरपाई रु.2,00,000/- तक्रारकर्ती क्र.1 यांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खाते क्र. 80058341936 मध्ये दि.21/6/2022 रोजी दिल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करण्याची विनंती केली. विमा कंपनीने त्याबद्दल ई-मेलचा संदर्भ सादर केलेला असला तरी तक्रारकर्ती क्र.1 यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केल्यासंबंधी उचित कागदपत्रे दाखल केलेले नाहीत.
(10) तक्रारकर्ते यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता व तक्रार खर्चाकरिता रकमेची मागणी केलेली आहे. मात्र त्याबद्दल समर्पक स्पष्टीकरण व पुरावा दिसून येत नाही. आमच्या मते, प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे. असे दिसते की, तक्रारकर्ती क्र.1 यांना विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ती क्र.1 यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती क्र.1 पात्र आहे, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(11) जायका इन्शुरन्स हे विमा सल्लागार आहेत आणि जिल्हा कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी हे शासकीय यंत्रणेचा भाग आहेत. वाद-तथ्ये व दाखल पुराव्यानुसार त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही.
(12) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ते यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने या आदेशापूर्वी तक्रारकर्ते यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम दिलेली असल्यास त्यांनी आदेश क्र.2 चे अनुपालन करु नये.
ग्राहक तक्रार क्र. 111/2022.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ती क्र.1 यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-