जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 87/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 10/04/2023.
तक्रार दाखल दिनांक : 04/05/2023 तक्रार निर्णय दिनांक : 25/06/2024.
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 15 दिवस
नागीण सुरेश भोसले, वय 30 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. गु-हाळ, ता. निलंगा, जि. लातूर. :- तक्रारकर्ती
विरुध्द
विभागीय व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.,
विभागीय कार्यालय : नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,
झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. प्रमोद एल. शिंदे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. श्रीनिवास व्ही. शास्त्री
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे राज्यातील सर्व शेतक-यांचा विरुध्द पक्ष (यापुढे 'विमा कंपनी') यांच्याकडे विमा उतरविलेला असून शेतकरी व्यक्तीच्या अपघाती मृत्यूपश्चात त्यांच्या वारसास रु.2,00,000/- देण्याची तरतूद आहे.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्यांचे पती सुरेश शिवाजी भोसले (यापुढे 'मयत सुरेश') यांच्या नांवे मौजे तळीखेड, ता. निलंगा, जि. लातूर येथे गट क्र. 178 मध्ये क्षेत्र 00 हे. 17 आर. शेतजमीन होती. मयत सुरेश हे त्यांच्या गावातील अमोल विजयकुमार पाटील यांच्या शेतामध्ये सालगडी होते. दि.11/3/2022 रोजी मयत सुरेश हे शेतातील विहिरीचे स्टार्टर बॉक्सजवळ विद्युत धक्का लागून मृत्यू पावले. पोलीस यंत्रणेने घटनेसंबंधी आ. मृ. नं. 9/2022 अन्वये नोंद करुन घटनास्थळ पंचनामा केला. मयत सुरेश यांच्या प्रेताची शवचिकित्सा करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये विद्युत धक्का हे मृत्यूचे कारण नमूद आहे. तसेच चौकशी व तपासाअंती तालुका दंडाधिकारी, निलंगा यांनी समरी मंजूर केलेली आहे.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, मयत सुरेश हे शेतकरी असल्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते. मयत सुरेश यांच्या वारस नात्याने तक्रारकर्ती यांनी विमा रक्कम मिळण्याकरिता कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा प्रपत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर केले. कृषि अधिकारी यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्यामार्फत विमा कंपनी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. मात्र विमा कंपनीने दि.22/12/2022 रोजीच्या पत्राद्वारे "सुपूर्द केलेल्या साक्षीदारांच्या जबाब व घटनास्थळ पंचनाम्यानुसार विमाधारक हे शेतातील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी लाईटचे पोलवर आकडा टाकत असताना करंट लागून मयत झाला आहे.", असे कारण नमूद करुन अपवर्जन अ.क्र.2 व 13 च्या अनुषंगाने विमा प्रस्ताव रद्द केल्याचे कळविले. विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे नमूद करण्यात येऊन रु.2,00,000/- व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.25,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(4) जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीतर्फे विधिज्ञ उपस्थित झाले; परंतु उचित संधी प्राप्त होऊनही त्यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द विना लेखी निवेदनपत्र आदेश करण्यात आले.
(5) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
(6) विमा कंपनीच्या दि.22/12/2022 रोजीच्या पत्राचे अवलोकन केले असता "सुपूर्द केलेल्या साक्षीदारांच्या जबाब व घटनास्थळ पंचनाम्यानुसार विमाधारक हे शेतातील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी लाईटचे पोलवर आकडा टाकत असताना करंट लागून मयत झाला आहे.", असे कारण नमूद करुन अपवर्जन अ.क्र.2 व 13 च्या अनुषंगाने विमा प्रस्ताव रद्द केल्याचे कळविलेले दिसून येते. प्रामुख्याने, मयत सुरेश यांच्या नांवे शेतजमीन दर्शविणारा 7/12 उतारा पाहता ते शेतकरी असल्याचे स्पष्ट होते. पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवाल पाहता विद्युत धक्का बसल्यामुळे मयत सुरेश यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते.
(7) विमा कंपनी जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले. अशा स्थितीत, त्यांच्याकडून ग्राहक तक्रार व कागदपत्रांचे खंडन नाही किंवा प्रतिकथन व पुरावे नाहीत.
(8) मयत सुरेश हे शेतकरी होते; विमाधारक होते आणि विद्युत धक्का बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला इ. बाबी स्पष्ट आहेत. ज्याअर्थी विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा विचारात घेऊन अमान्य केला; त्याअर्थी मयत सुरेश हे विमाधारक होते आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते, हे स्वीकारार्ह ठरते. विमा लाभ नामंजूर करण्याच्या विमा कंपनीच्या कृत्याची दखल घेतली असता त्या अनुषंगाने विमा संविदा किंवा विमा संविदेच्या अटी व शर्ती अभिलेखावर दाखल नाहीत. वास्तविक पाहता, विमा कंपनीच्या दावा रद्द करणा-या पत्रामध्ये नमूद असणारे अपवर्जन हे विमापत्रामध्ये व विमा संविदालेखामध्ये अंतर्भूत आहेत, असा पुरावा नाही. त्यामुळे कथित अपवर्जनाचे कलम दखलपात्र ठरणार नाहीत, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(9) असे दिसते की, विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर करताना मयत सुरेश हे विद्युत खांबावर आकडा टाकत असताना विद्युत धक्का बसल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद केलेले आहे. पोलीस यंत्रणेकडून घेण्यात आलेले नागीनबाई सुरेश भोसले, सहदेव सुभाष भोसले, अमोल विजयकुमार पाटील, अभय बलभीम पाटील व शांताबाई दशरथ दगदाडे यांचे जबाब अभिलेखावर दाखल आहेत. त्या जबाबांमध्ये मयत सुरेश हे विद्युत खांबावर आकडा टाकत होते, असा उल्लेख नाही. तसेच घटनेच्या दिवशीच पोलीस यंत्रणेने घटनास्थळ पंचनामा केलेला असून त्यामध्येही मयत सुरेश हे विद्युत खांबावर आकडा टाकत असल्याचा उल्लेख नाही किंवा घटनास्थळी आकडा टाकण्याचे साहित्य आढळून आल्याबद्दल उल्लेख नाही. मयत सुरेश यांना विद्युत खांबावर आकडा टाकताना कोणी पाहिले काय ? आकडा टाकण्याचे साहित्य घटनास्थळी होते काय ? विमा कंपनीने घटनेबद्दल स्वतंत्र अन्वेषण केले काय ? इ. बाबी सिध्द होत नाहीत. अशा स्थितीत, विमा कंपनीने तांत्रिक कारणास्तव तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केलेला आहे आणि त्यांचे कृत्य सेवेमध्ये त्रुटी ठरते, या अनुमानास आम्ही येत आहोत. त्या अनुषंगाने तक्रारकर्ती विमा योजनेनुसार रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्यास त्या पात्र ठरतात. विमा रकमेवर अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने मिळण्यासंबंधी तक्रारकर्ती यांची विनंती पाहता विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.22/12/2022 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने विमा रकमेवर व्याज मंजूर करणे न्यायोचित ठरते.
(10) तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.25,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(11) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते आणि मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करीत आहोत.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच, रु.2,00,000/- विमा रकमेवर दि. 22/12/2022 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
ग्राहक तक्रार क्र. 87/2023
(3) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष विमा कंपनीने आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत उक्त आदेशाची अंमलबजावणी करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-