Maharashtra

Latur

CC/20/2020

अरुणा अमरनाथ मालशेटवार - Complainant(s)

Versus

विभागीय व्यवस्थापक, भारतीय जिवन बिमा निगम - Opp.Party(s)

अ‍ॅड. ए. बी. पेंसलवार

06 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES RESDRESSAL COMMISSION LATUR
Old Collector Office Premises, Beside Z. P. Gate No. 1 , Latur - 413512
 
Complaint Case No. CC/20/2020
( Date of Filing : 23 Jan 2020 )
 
1. अरुणा अमरनाथ मालशेटवार
...........Complainant(s)
Versus
1. विभागीय व्यवस्थापक, भारतीय जिवन बिमा निगम
h
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Kamalakar A. Kothekar PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 
PRESENT:अ‍ॅड. ए. बी. पेंसलवार, Advocate for the Complainant 1
 अॅड.एस.एस.औसेकर, Advocate for the Opp. Party 1
Dated : 06 Sep 2021
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 20/2020.                     तक्रार दाखल दिनांक :   23/01/2020.                                                                                      तक्रार निर्णय दिनांक : 06/09/2021.

                                                                                    कालावधी : 01 वर्षे  07 महिने 14 दिवस

 

अरुणा अमरनाथ मालशेटवार, वय 53 वर्षे, व्यवसाय : डॉक्टर,

रा. 'कलामृत निवास', नवी आबादी, उदगीर, जि. लातूर.                                                    तक्रारकर्ती

 

                        विरुध्द

 

(1) भारतीय जीवन बिमा निगम (LIC of India) तर्फे त्‍यांचे

      विभागीय व्‍यवस्‍थापक, पश्चिम विभागीय कार्यालय, दुसरा मजला,

      'योगक्षेमा', जीवन बिमा मार्ग, मुंबई - 400 021. महाराष्‍ट्र.

(2) भारतीय जीवन बिमा निगम (LIC of India) तर्फे त्‍यांचे

      शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा उदगीर, तळेगावकर कॉम्‍प्‍लेक्‍स,

      देगलूर रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर.                                                             विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष

                                    मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                    मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य

 

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ओ.बी. पेन्‍सलवार

विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांचेकरिता विधिज्ञ :- संदीप एस. औसेकर

 

न्‍यायनिर्णय

 

मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ती हिचे पती वारले. त्‍यांच्‍या विम्‍याबाबतची रक्‍कम रु.2,00,000/-, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम व खर्च इ. मिळावा, यासाठी तक्रारकर्तीने ही तक्रार सादर केलेली आहे. तिचे थोडक्‍यात निवेदन असे की, अमरनाथ तिचे पती होते. दि.11/10/2018 रोजी त्‍यांनी रु.2,00,000/- साठी जीवन विमा पॉलिसी विरुध्‍द पक्षाकडून घेतली होती. या पॉलिसीच्‍या कालावधीमध्‍ये दि.14/12/2018 रोजी अमरनाथ यांचा ह्दयविकाराच्‍या झटक्‍यामुळे निधन झाले. मृत्‍यूपूर्वी 10 दिवस हैद्राबादच्‍या विरंची हॉस्पिटलमध्‍ये त्‍यांचा इलाज करण्‍यात आला. दवाखान्‍याने त्‍यांच्‍या मृत्‍यूचे कारण ह्दयविकार असे दर्शविलेले आहे. मृत्‍यूचे कारण मधुमेह कधीच नव्‍हते. पतीचे वारस या नात्‍याने तक्रारकर्तीने विमा रकमेची मागणी केली. विमा कंपनीने ती नाकारली. मयताने फसवणूकीच्‍या उद्देशाने महत्‍वाची बाब लपवली, असे कारण सांगून विमा कंपनीने विमा हप्‍ता रक्‍कम परत करुन लाभ देण्‍याचे नाकारले. अशाप्रकारे विमा कंपनीने अनुचित प्रथेचा अवलंब केला. अमरनाथने कधीही कुठलीही महत्‍वाची बाब अयोग्‍य कारणास्‍तव लपवलेली नव्‍हती. अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन विमा रक्कम नाकारण्यात आली. तक्रारकर्तीने नोटीस देखील पाठविली. परंतु तिला विमा रक्कम मिळू शकली नाही. म्हणून तिने ही तक्रार सादर केली. तक्रारकर्तीला तिच्या पतीच्या मृत्यूबाबतची विमा रक्कम रु.2,00,000/- मिळावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत व कार्यवाहीचा खर्च रु.20,000/- मिळावा व ही रक्कम 18 टक्के व्याजासह मिळावी, असे तिची मागणी आहे.

 

(2)       सुरुवातीला ही तक्रार भारतीय जीवन बिमा निगम, विभागीय कार्यालय, मुंबई यांच्या विरुध्द  सादर करण्यात आली होती. नंतर भारतीय जीवन बिमा निगम, शाखा उदगीर यांना देखील या प्रकरणात समाविष्ट करण्यात आले.

 

(3)       विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी या प्रकरणात जे उत्तर सादर केले, त्यानुसार त्यांनी हे स्पष्ट केले की, विमा घेताना विमेदाराने प्रस्तावात संपूर्ण खरी व विश्वासपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. अमरनाथ यांनी दि.11/10/2018 रोजी पॉलिसी घेण्याकरिता जो लेखी प्रस्ताव अर्ज एजंटामार्फत सादर केला व त्यासोबत घोषणापत्र देखील आहे; त्यामध्ये त्यांनी माहिती लपवून ठेवली. विमा दाव्याची छाननी केली असता असे निदर्शनास आले की, अमरनाथ यांना पॉलिसी घेण्याच्या ब-याच आधीपासून मधुमेहचा आजार होता. विमा प्रस्ताव देताना असा आजार नसल्याचे नमूद करुन त्यांनी दिशाभूल करणारी व खोटी माहिती दिली. त्यांच्या मृत्यूसंबंधी दवाखान्याने जे प्रमाणपत्र दिले आहे, त्यात मृत्यूचे प्राथमिक कारण Cardiogenic Shock व दुसरे कारण CVD TVD DM असे दिले आहे. DM म्हणजेच Diabetes Mellitus आहे. अशाप्रकारे मधुमेह देखील मृत्यूचे कारण होते. मृत्यूपूर्वी 18 महिन्यापूर्वी पासून ते आजारासाठी उपचार घेत होते. ही बाब त्यांनी लपविली. पूर्वी देखील त्यांनी उदगीर येथे उदयगिरी दवाखान्यातून उपचार घेतले होते. ते मधुमेहचा उपचार घेत होते, ही बाब त्यांनी लपविली. ह्दयरोग बळावण्याचे मुख्य कारण मधुमेह हे एक देखील आहे. अशाप्रकारे महत्वाची माहिती लपविल्यामुळे विमा कंपनीने विमा नाकारला. योग्य प्रकारे दावा फेटाळण्यात आला आहे. विमा कंपनीने कुठलीही अनुचित प्रथा अवलंबलेली नाही. तरी ही तक्रार फेटाळण्यात यावी.

(4)       या प्रकरणामध्ये तक्रारकर्ती व विमा कंपनी यांनी काही कागदपत्रे व पुरावा सादर केला. उभयतांनी सादर केलेला पुरावा, त्यांचे निवेदन, युक्तिवाद इ. विचारात घेता निकालासाठी मी खालील मुद्दे निश्चित करतो व त्यावरील माझा निर्णय पुढीलप्रमाणे देत आहे.

 

                        मुद्दे                                                                                                      उत्तर

 

(1) तक्रारकर्तीने हे सिध्द केले काय की, विरुध्द पक्ष विमा कंपनीने तिला

     चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली ?                                                                              नकारार्थी

(2) तक्रारकर्तीला विरुध्द पक्षांकडून काही रक्कम दिली जाऊ शकते काय ?                     नकारार्थी

(3) अंतिम आदेश ?                                                                                         अंतीम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(5)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- या प्रकरणामध्ये ज्या बाबीबद्दल विशेष वाद नाही त्या अशा की, तक्रारकर्ती अरुणा मयत अमरनाथ यांच्या विधवा आहेत. अमरनाथ यांनी विरुध्द पक्ष विमा कंपनीकडून विमा पॉलिसी घेतली होती. या पॉलिसीच्या प्रस्तावाचा अर्ज देखील सादर केला होता. हे देखील विशेष वादग्रस्त नाही की, अमरनाथ यांनी विरंची हॉस्पिटल, हैद्राबाद येथे उपचार घेतले व उपचारानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी म्हणून तक्रारकर्तीने विमा कंपनीकडे विमा रकमेची मागणी केली. विमा कंपनीने तिचा तो दावा फेटाळला.

 

(6)       मुळ वादाचा मुद्दा असा आहे की, अमरनाथ यांनी विमा पॉलिसी काढताना स्वत:च्या आजारपणाबद्दल काही माहिती दुष्ट हेतुने लपवून ठेवली काय ? तक्रारकर्तीचे म्हणणे असे आहे की, अमरनाथ यांनी कुठलीही माहिती लपवून ठेवली नव्हती. त्यांच्या मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्यामुळे झाला. मृत्यूच्या कारणाशी मधुमेहचा काहीही संबंध नाही. विमा कंपनीने विनाकारण विमा दावा नाकारला आहे. या उलट विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, अमरनाथ हे ब-याच कालावधीपासून मधुमेह आजाराने ग्रस्त होते व ते उपचार घेत होते. मृत्यूचे प्राथमिक कारण जरी ह्दयविकार दर्शविलेला असले तरी ह्दयविकार येण्यासाठी मधुमेह हे देखील एक कारण आहे. ज्याबाबतचा उल्लेख प्रमाणपत्रात डॉक्टरांनी केलेला आहे. विमा पॉलिसीचा प्रस्ताव भरताना असा कुठलाही आजार नाही, असे अमरनाथ यांनी लिहून दिले व त्यांनी त्यांच्या मधुमेहच्या आजाराबाबतची बाब दुष्ट हेतूने लपवून ठेवली. म्हणून विमा कंपनीने योग्य कारणाने दावा नाकारला.

 

(7)       उपलब्ध कागदपत्रावरुन असे दिसते की, अमरनाथ यांचा इलाज हैद्राबादच्या विरंची हॉस्पिटलमध्ये करण्यात आला. या विरंची हॉस्पिटलने दिलेली Death Summary सादर केलेली आहे. त्यात मृत्यूचे कारण दर्शविलेले आहे. IMMEDIATE CAUSE : (1) Acute febrile illness (2) Acute antterior wall MI (3) Severe MR (4) Severe LV dysfunction आणि UNDERLYING CAUSES या हेडखाली असे म्हटले आहे की, Ischaemic cardiomyopathy with CAD. TVD with Severe MR with CF. याबाबत विमा कंपनीने देखील काही कागदपत्रांच्या प्रती सादर केल्या आहेत. Medical Certificate of Cause of Death यामध्‍ये Cause of Death : Cardiogenic Shock आणि त्याच सोबत CAD-TVD-DM, Thymoma असे देखील कारण दर्शविलेले आहे. विमा कंपनीचे निवेदन असे की, मधुमेह हे देखील एक कारण आहे. त्यांनी काही मेडीकल जर्नलमधील उतारा सादर करुन हे स्पष्ट केले आहे की, मधुमेहचा परिणाम शरीरावर अशाप्रकारे होतो की, ज्यामुळे ह्दयरोग देखील संभवू शकतो.

 

(8)       याबाबत उभय बाजुतर्फे असे निवेदन करण्यात आले की, विमा घेताना जो प्रस्ताव फॉर्म अमरनाथने भरला, त्यामधील माहिती योग्य आहे की नाही. तक्रारकर्तीच्या वकिलांनी युक्तिवादाच्या वेळी असे निवेदन केले की, विमा एजंट याने फक्त अमरनाथ यांच्या फॉर्मवर सह्या घेतल्या. एजंटनेच तो फॉर्म भरला. अमरनाथ यांना त्यातील भरलेल्या माहितीबद्दल कल्पना नव्हती. परंतु विमा कंपनीचे म्हणणे असे की, फॉर्म अमरनाथ यांनी स्वत: भरला आणि त्यांना आता असे म्हणता येणार नाही की, या फॉर्मच्या तपशिलाची माहिती त्यांना नव्हती. फॉर्मची जी प्रत सादर करण्यात आली, त्यात असा उल्लेख दिसतो की, मधुमेह सारखा आजार नाही, असे तो फॉर्म भरताना नमूद करण्यात आलेले आहे.

 

(9)       याबाबत विमा कंपनीतर्फे "रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ रेखाबेन नरेशभाई राठोड", सिव्हील अपिल नं. 4261/2019 या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा हवाला देऊन असे निवेदन करण्यात आले की, अमरनाथ यांची त्या प्रस्ताव फॉर्मवर सही आहे आणि त्यांना असे म्हणता येणार नाही की, त्यातील तपशील समजून न घेता त्यांनी तो फॉर्म स्वीकारला व त्यावर सही केली. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाड्याचा हवाला देऊन विमा कंपनीने असे निवेदन केले की, त्या फॉर्ममधील माहिती अमरनाथ यांच्यावर बंधनकारक आहे. अमरनाथ यांनी हेतु:पुरस्सर महत्वाच्या आजाराबद्दलची माहती लपवून फसवणूक केली.

 

(10)     याबाबत विमा कंपनीतर्फे अनेक निवाड्यांचा हवाला देण्यात आला. "बाबली गोयल /विरुध्द/ आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शीयल लाइफ इन्शुरन्स", तक्रार क्र.601/2018, मा. पंजाब राज्य आयोग या निवाड्याचा हवाला देऊन असे निवेदन करण्यात आले की, अमरनाथ हे पूर्वीपासून आजाराने ग्रस्त होते आणि जी माहिती त्यांनी लपवून ठेवली आणि अशाप्रकारे Suppression of Material Fact असल्यामुळे त्यांना विमा दाव्याची रक्कम मिळू शकत नाही.      

 

(11)     "मारुती एकनाथ जगताप /विरुध्द/ एच.डी.एफ.सी. स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स कं.", तक्रार क्र.236/2011, मा. महाराष्ट्र राज्य आयोग या निवाड्याचा हवाला देऊन असे निवेदन करण्यात आले की, अमरनाथ यांची जबाबदारी होती की, त्यांनी खरी माहती जाहीर करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी आजाराबद्दलची माहिती लपवून ठेवली आणि म्हणून विमा कंपनी विमा दाव्याची रक्कम देणे लागत नाही. याबाबत "सिनियर मॅनेजर, लाइफ इन्शुरन्स /विरुध्द/ राजेशकुमार", रिव्हीजन पिटीशन नं.650/2020, मा. राष्ट्रीय आयोग या प्रकरणाचा देखील हवाला देण्यात आला. तसेच "लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ/विरुध्द/ राजविलास डोंगरे", रिव्हीजन पिटीशन नं.1949/2018, मा. राष्ट्रीय आयोग या प्रकरणाचा देखील हवाला देण्यात आला.

 

(12)     तक्रारकर्तीतर्फे "सुलभा प्रकाश मोटेगावकर /विरुध्द/ लाईफ इन्शुरन्स कार्पोरेश ऑफ इंडिया", सिव्हील अपिल नं. 8245/2015 या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणाचा हवाला देऊन असे निवेदन करण्यात आले की, अमरनाथ यांनी देखील महत्वाची अशी आजाराबद्दलची माहिती लपविली नाही. विमा कंपनीने विनाकारण दावा नाकारला. त्या प्रकरणामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केलेले आहे की, विमा कंपनीची अशी केस नव्हती की, मयत हा जीवघेण्या आजाराने ग्रस्त होता. परंतु आपल्या प्रकरणात विमा कंपनीने असा बचाव सुरुवातीपासूनच घेतलेला आहे की, मयत हा मधुमेहसारख्या जीवघेण्या आजारामुळे पूर्वीपासूनच ग्रस्त होता. मधुमेहमुळेच ह्दयविकाराचा झटका येऊ शकतो; ह्दयविकाराचा आजार होऊ शकतो आणि तो जीवघेणा आजार मयताने विमा पॉलिसी काढताना लपवून ठेवला, असे विमा कंपनीचे पहिल्यापासूनच म्हणणे आहे. आपल्या प्रकरणातील वस्तुस्थिती ही या निवाड्यातील वस्तुस्थितीपेक्षा वेगळी असल्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यातील तत्वांचा योग्य मान ठेवून मी असे नमूद करतो की, वस्तुस्थिती वेगळी असल्यामुळे ही तत्वे आपल्या प्रकरणात लागू पडू शकत नाहीत. "प्रेम सचदेवा /विरुध्द/ ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि.", अपिल नं. 2033/2008, मा. राज्य आयोग, केंद्रशासित प्रदेश, चंदीगड या प्रकरणाचा हवाला देऊन तक्रारकर्तीतर्फे असे निवेदन करण्यात आले की, मधुमेह, ह्दयविकार हे असे जीवनामध्ये नेहमी येणारे आजार आहेत आणि अमरनाथचा मृत्यू जीवघेणा आजार लपवला, या सदरात मोडणारा नाही. परंतु आपल्या प्रकरणामध्ये विमा कंपनीतर्फे हे स्पष्ट करण्यात आले की, मृत्यूपूर्वी काही महिन्यापासूनच अमरनाथ हे आजारी होते आणि त्याबद्दल इलाज देखील घेत होते.

 

(13)     तक्रारकर्तीने 2(2007) सी.पी.जे. 452, "लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया /विरुध्द/ सुधा जैन" या प्रकरणाचा हवाला देऊन निवेदन केले की, विमा कंपनीने चुकीने दावा फेटाळला. मधुमेह इ. अशा आजाराच्या स्वरुपात दावा फेटाळणे योग्य नाही. तसेच तक्रारकर्तीने "लाईफ कार्पोरेशन ऑफ इंडिया /विरुध्द/ प्रभाजोत सिंग", प्रथम अपिल नं.1620/2006, मा. पंजाब राज्य आयोग या प्रकरणाचा हवाला दिला. तसेच 1 (2011) सी.पी.जे. 128, "लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया /विरुध्द/ शितला देवी" या प्रकरणाचा हवाला देऊन असे निवेदन करण्यात आले की, मयत हा ह्दयविकाराने मृत्यू पावला, ज्याचा मधुमेहशी संबंध नाही. "निलम चोप्रा /विरुध्द/ लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ", मा. राष्ट्रीय आयोग या प्रकरणाचा देखील हवाला देण्यात आला.

 

(14)     आपल्या या प्रकरणातील उपलब्ध पुरावा, न्यायनिवाड्यातील तत्वे, उभय बाजुंचे निवेदन या सर्व बाबींचा साकल्याने विचार करता असे दिसते की, अमरनाथ हे हैद्राबाद येथे उपचार घेत असताना वारले. त्यांनी विमा पॉलिसी घेताना मधुमेहचा विकार होता, ही गोष्ट स्पष्ट केलेली नाही. विमा कंपनीतर्फे काही कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यात आल्या. त्यावरुन असे दिसते की, मृत्यूपूर्वी काही महिने आधीपासून अमरनाथ हे मधुमेहमुळे ग्रस्त होते. इलाज घेत होते. उदगीर येथे देखील ते या आजाराबद्दल नियमीत इलाज घेत होते. डॉ. रामेश्वर बाहेती यांचे प्रमाणपत्र दि.20/9/2017 असे दर्शविते की, अमरनाथ हे Type II च्या मधुमेहच्या विकाराने ग्रस्त होते आणि त्या तारखेपासून 18 महिन्यांपासून त्यांच्याकडून इलाज घेत होते. हैद्राबाद येथे जाण्यापूर्वी अमरनाथ यांनी उदयगिरी मल्टीस्पेशालिटी ॲन्ड ॲक्सीडेंट हॉस्पिटल येथे सुरुवातीला उपचार घेतले. त्यावेळी देखील जी Clinical History नमूद करण्यात आली, त्यात DM (Not on P/O) C/o. Severe Dyspnea Breathlessness असे कारण दर्शविलेले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण 380 व 240 अशा प्रकारचे दर्शविलेले आहे. फॉर्म नं. 4 मध्ये जो Cause of Death चा रिपोर्ट  सादर करण्यात आला, त्यात देखील मयताच्या मृत्यूचे कारण ह्दयविकार तसेच CAD-TVD-DM अशाप्रकारचे दर्शविण्यात आलेले आहे.

 

(15)     या प्रकरणात उपलब्ध पुराव्यावरुन हे स्पष्ट होते की, अमरनाथ यांनी दि.11/10/2018 रोजी विम्याची पॉलिसी घेतली. पॉलिसी घेतल्यानंतर 2-3 महिन्याच्या आतच म्हणजे दि.14/12/2018 रोजी त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी काही दिवस ते उपचार घेत होते. मृत्यूचे प्राथमिक कारण ह्दयविकार आहे. उपलब्ध पुराव्यावरुन असे दिसते की, विमा पॉलिसी घेण्यापूर्वीच्या किमान एक वर्षापूर्वी पासून अमरनाथ हे मधुमेहच्या विकाराने ग्रस्त होते व त्याबाबत उपचार घेत होते. त्याबाबतची वैद्यकीय कागदपत्रे विमा कंपनीतर्फे सादर करण्यात आलेली आहेत. थोडे वेळाकरिता असे जरी गृहीत धरले की, अमरनाथ यांचा मृत्यू मधुमेहमुळे झाला नाही, तरीही विमा पॉलिसीचा प्रपोजल फॉर्म भरताना त्यांनी जी माहिती दिली, ती माहिती देताना त्यांना असा मधुमेहसारखा आजार असल्याची माहिती त्यांनी लपवून ठेवली. म्हणून त्यांनी अशाप्रकारे विमा कंपनीला चुकीची माहिती दिली व मधुमेहचा आजार लपवून ठेवला, ही बाब Suppression of material fact या सदरखाली विचारात घेतली जाऊ शकते. जेव्हा असा आजार लपवून ठेवला, तेव्हा विम्याच्या अटी व शर्तीचा भंग झाला आणि अशी लपवा-लपवी करुन विमा पॉलिसी घेण्यात आली; ज्यानंतर काही महिन्यातच अमरनाथ वारले व या दोन्ही बाबी विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहेत. तसेच तक्रारकर्ती ही स्वत: डॉक्टर आहे. त्यामुळे तिला वैद्यकीय क्षेत्रातील विशेष ज्ञान आहे. ह्दयविकाराचा झटका व मधुमेहचा आजार यामधील सहसंबंध देखील तिला माहिती असू शकतो. त्यामुळे अमरनाथ यांनी मधुमेहचा असलेला विकार पॉलिसी काढताना लपवून ठेवला ही, बाब अत्यंत महत्वाची ठरते.

 

(16)     त्याच प्रमाणे विमा कंपनीमार्फत जे वैद्यकीय मत जर्नलमधील सादर करण्यात आले, त्यावरुनही असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की, ह्दयविकाराचा आजार मधुमेहमुळे बळावतो, फोफावतो किंवा मधुमेह हे देखील त्याचे एक कारण असू शकते. तक्रारकर्ती स्‍वत: डॉक्‍टर आहे. ज्‍याप्रमाणे विमा कंपनीने वैद्यकीय जर्नलमधील मत व्‍यक्‍त केले, त्‍याप्रमाणे तक्रारकर्ती डॉक्‍टर हिला देखील मधुमेह व ह्दयविकार याचा परस्‍पर सहसंबंध आहे की नाही, याबाबत विशेष वैद्यकीय ज्ञानाचा दाखला देता आला असता. परंतु डॉक्‍टर असूनही तिने असा कुठलाही प्रयत्‍न केलेला नाही. म्हणून मयताच्या मृत्युला मधुमेह हे देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारण आहे, असे म्हणता येईल. अशाप्रकारे महत्वाचा आजार लपवून ठेवून पॉलिसी काढली आणि एकप्रकारे विम्याच्या तत्वाचा व अटी-शर्तीचा भंग केला. म्हणून योग्यप्रकारे विमा कंपनीने विम्याच्या दाव्याचा लाभ नाकारला. विमा कंपनीने हप्त्याची रक्कम परत केलेली होती. यावरुन विमा कंपनीचा शुध्द हेतू स्पष्ट होतो. तक्रारकर्तीने हे सिध्द केले नाही की, विमा कंपनीने तिला चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली. विमा कंपनीने कुठलीही अनुचित व्यापारी प्रथा अवलंबलेली नाही. योग्य व संयुक्तिक कारणाने विम्याबद्दलचा दावा नाकारण्यात आला आणि म्हणून तक्रारकर्तीला विमा कंपनीकडून अशी कुठलीही रक्कम मागण्याचा अधिकार नाही. म्हणून मुद्दा त्याप्रमाणे निर्णीत करतो. तरीही तक्रारकर्ती ही विधवा महिला असल्यामुळे पक्षकारांनी आपआपला खर्च सहन करावा, असे म्हणणे उचित ठरेल. म्हणून खालीलप्रमाणे आदेश.

 

आदेश

 

            (1) तक्रार फेटाळण्यात येते.      

            (2) पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.          

            (3) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्‍या प्रती विनामुल्‍य त्‍वरीत देण्‍यात याव्‍यात.  

 

 

(श्रीमती रेखा  जाधव)                (श्री. रविंद्र शे. राठोडकर)            (श्री. कमलाकर अ. कोठेकर)

         सदस्‍य                                               सदस्‍य                                               अध्‍यक्ष                

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

(संविक/श्रु/3921)                                                                                                                -०-

 
 
[HON'BLE MR. Kamalakar A. Kothekar]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.