जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 6/2021. तक्रार दाखल दिनांक : 04/01/2021. तक्रार निर्णय दिनांक : 30/01/2023.
कालावधी : 02 वर्षे 00 महिने 26 दिवस
प्रेमलाबाई भ्र. नरसिंग पांढरे, वय 55 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. भुतमुगळी, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) विभागीय व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.,
डीओ-17, बेलापूर डिव्हीजन, विंध्या कमर्शिअल कॉम्प्लेक्स,
पाचवा मजला, प्लॉट नं.1, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई - 400 614.
(2) शाखा व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
बस स्टॅन्डसमोर, मेन रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(3) शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक,
दत्त नगर, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. सुरेश जी. डोईजोडे
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. संजय सी. यादव
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, त्यांचे पती नरसिंग विठोबा पांढरे (यापुढे 'खातेधारक नरसिंग') यांचे विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे 'भारतीय स्टेट बँक') यांच्याकडे बचत खाते क्र. 37713610196 होते. त्या खात्यांतर्गत भारतीय स्टेट बँकेने खातेधारक नरसिंग यांना एस.बी.आय. क्लसिक व्हिजा डेबीट कार्ड क्र. 4591 1503 2490 9837 निर्गमीत केलेले होते. डेबीट कार्ड वैधतेच्या कालावधीमध्ये डेबीट कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास रु.20,00,000/- पर्यंत रक्कम देण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (यापुढे 'विमा कंपनी') यांनी विमा जोखीम स्वीकारलेली होती आणि हप्त्याची वार्षिक रक्कम खातेधारक नरसिंग यांच्या खात्यातून कपात केलेली आहे.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.3/9/2019 रोजी खातेधारक नरसिंग हे ॲपे ॲटोमधून प्रवास करीत असताना ॲटो पलटी होऊन अपघात झाला आणि अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे ते मृत्यू पावले. घटनेबाबत कासार शिरसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्र. 122/2019 नोंद करण्यात आला. त्यानंतर दि. 12/10/2019 रोजी तक्रारकर्ती यांनी भारतीय स्टेट बँकेकडे विमा प्रस्ताव व कागदपत्रे सादर केले. विमापत्रानुसार त्यांना रु.5,00,000/- मिळणे क्रमप्राप्त होते. परंतु त्यांना रक्कम अदा करण्यात आली नाही. तक्रारकर्ती यांनी विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता दखल घेतलेली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.5,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा विमा कंपनी व भारतीय स्टेट बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(3) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र सादर केले आणि त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती यांचा विमा प्रस्ताव त्यांना प्राप्त झालेला नाही. खातेधारक नरसिंग यांचे डेबीट कार्ड विमापत्रामध्ये नमूद नसल्यामुळे वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र नाहीत. विमापत्रामध्ये एस.बी.आय. गोल्ड; प्लॅटीनियम; सिग्नेचर व्हेरिएंट कार्ड Powered by Visa or Master Card यांचा अतंर्भाव होतो. एस.बी.आय. एटीएम डेबीट कार्ड व क्लासिक व्हिजा कार्डचा विमापत्रामध्ये अंतर्भाव होत नाही. त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(4) भारतीय स्टेट बँकेने लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार एस.बी.आय. क्लासिक व्हिसा कार्डसंबंधी आहे आणि खातेधारक नरसिंग कथित योजनेकरिता पात्र नाहीत. तक्रारकर्ती नमूद करीत असणा-या योजनेनुसार केवळ गोल्ड, प्लाटीनियम व सिग्नेचर कार्डकरिता विमापत्र संरक्षण दिलेले आहे. त्यांना अनावश्यक पक्षकार केलेले आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(5) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनी व भारतीय स्टेट बँकेचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विमा कंपनी व भारतीय स्टेट बँकेने तक्रारकर्ती यांना सेवा
देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? नाही
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, खातेधारक नरसिंग यांचे भारतीय स्टेट बँकेमध्ये बचत खाते क्र. 37713610196 होते, ही मान्यस्थिती आहे. भारतीय स्टेट बँकेने खातेधारक नरसिंग यांच्या बचत खाते क्र. 37713610196 करिता एस.बी.आय. क्लासिक व्हिजा डेबीट कार्ड क्र. 4591 1503 2490 9837 निर्गमीत केले, हे विवादीत नाही. खातेधारक नरसिंग यांचा वाहन अपघातामध्ये दि.3/9/2019 रोजी अपघाती मृत्यू झाला, असे दर्शविणारे पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवाल अभिलेखावर दाखल आहे.
(7) वाद-तथ्यानुसार खातेधारक नरसिंग यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर विमा रक्कम मिळण्यासाठी विमा दावा सादर केला असता विमा रक्कम अदा केलेली नाही, असा मुख्य वाद आहे. त्या अनुषंगाने विमा कंपनीचा प्रतिवाद असा की, तक्रारकर्ती यांचा विमा प्रस्ताव त्यांच्याकडे प्राप्त झालेला नाही आणि त्यांनी निर्गमीत केलेल्या विमापत्रामध्ये एस.बी.आय. गोल्ड, प्लॅटिनियम व सिग्नेचर प्रकारच्या व्हिसा व मास्टर कार्डधारक विमा संरक्षीत असून एस.बी.आय. डेबीट कार्ड व क्लासिक व्हिजा कार्डधारकांना विमा संरक्षीत नसल्यामुळे विमा रक्कम देण्याचे दायित्व विमा कंपनीवर येत नाही. तसेच, भारतीय स्टेट बँकेचे कथन असे की, तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार एस.बी.आय. क्लासिक व्हिसा कार्डसंबंधी आहे आणि खातेधारक नरसिंग हे योजनेकरिता पात्र नाहीत.
(8) तक्रारकर्ती यांनी अभिलेखावर विमापत्र अनुसूची क्रमांक 240700421810000101 दाखल केली. त्यानुसार विमा कालावधी दि.8/8/2018 ते 7/8/2019 दिसून येतो. त्यामध्ये Coverage Discription : Personal Accident Cover Death Only आणि Additional Information : Personal Accident Death only cover to Internatioinal Debit Card holders (Gold, Platinum and Signature / World). ADD-ON Covers and other terms as per RFQ all other details as per RFQ received from SBI dated 3rd August 2018. असा उल्लेख आढळतो. तसेच तक्रारकर्ती यांचेतर्फे विमा दावा, दाव्याचे सूचनापत्र, कागदपत्राची यादी इ. दाखल केलेले असून त्यावर विमापत्र क्र. 240700421810000101 नमूद दिसतो. उलटपक्षी, विमा कंपनीतर्फे विमापत्र अनुसूची क्रमांक 240700421910000081 दाखल केले आणि त्यामध्ये विमा कालावधी दि.8/8/2019 ते 7/8/2020 दिसून येतो. त्यातील Coverage Description रकान्यामध्ये Death cover only to International Debit Card holders (Gold Variant, Platinum Variant & Signature/World Variant) incl. sub variants of SBI असा उल्लेख आहे.
(9) तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांनी युक्तिवाद केला की, विमापत्र अनुसूचीमध्ये incl. sub variants of SBI उल्लेख नमूद असल्यामुळे खातेधारक नरसिंग यांच्या SBI Classsic VISA कार्डचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. उलटपक्षी, विमा कंपनीच्या विधिज्ञांनी निवेदन केले की, विमापत्रानुसार केवळ International Debit Card holders (Gold Variant, Platinum Variant & Signature/World Variant) यांना विमा संरक्षण दिलेले असल्यामुळे खातेधारक नरसिंग विमा योजनेकरिता पात्र नव्हते.
(10) निर्विवादपणे, दि.3/9/2019 रोजी वाहन अपघातामध्ये खातेधारक नरसिंग मृत्यू पावले. विमापत्राचा कालावधी व खातेधारक नरसिंग यांच्या अपघात व मृत्यू तारखेसंबंधी दखल घेतली असता विमा कंपनीने दाखल केलेले विमापत्र विचारात घ्यावे लागेल. कारण तक्रारकर्ती यांच्यातर्फे दाखल केलेले विमापत्र दि.8/8/2018 ते 7/8/2019 कालावधीचे आहे आणि खातेधारक नरसिंग यांचा मृत्यू दि.3/9/2019 रोजी झालेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ती यांच्याद्वारे दाखल व कथित विमापत्राप्रमाणे खातेधारक नरसिंग यांना विमा संरक्षण लागू असल्याचे मान्य करता येत नाही.
(11) भारतीय स्टेट बँकेने खातेधारक नरसिंग यांना SBI Classsic VISA कार्ड निर्गमीत केलेले होते. विमा कंपनीतर्फे दाखल विमापत्र अनुसूची क्रमांक 240700421910000081 अनुसार विमा कालावधी दि.8/8/2019 ते 7/8/2020 असून त्यामध्ये नमूद विमा जोखीम वर्णन पाहता International Debit Card holders (Gold Variant, Platinum Variant & Signature/World Variant) incl. sub variants of SBI कार्डधारकांना विमा संरक्षण दिलेले दिसते. विमापत्र अनुसुचीमध्ये नमूद REMARKS रकान्यामध्ये Active Gold Cards, Active Platinum Cards व Active Signature / World Cards धारण करणा-या कार्डधारकांना AIR व NON-AIR वर्गवारीमध्ये विमा संरक्षण आहे. निश्चितच, विमापत्र अनुसूचीनुसार केवळ आंतरराष्ट्रीय डेबीट कार्डधारकांना विमा संरक्षण दिलेले आहे. हे सत्य आहे की, खातेधारक नरसिंग यांचे डेबीट कार्ड हे SBI Classsic VISA होते आणि ते International Debit Card नव्हते. अशा स्थितीत, विमापत्र अनुसूची क्रमांक 240700421910000081 मध्ये नमूद विमा जोखीम वर्णनामध्ये त्यांच्या SBI Classsic VISA कार्डचा अंतर्भाव होऊ शकत नाही. उक्त विवेचनाअंती विमा कंपनी किंवा भारतीय स्टेट बँकेद्वारे खातेधारक नरसिंग यांच्या SBI Classsic VISA डेबीट कार्डकरिता विमा संरक्षण दिलेले नसल्यामुळे खातेधारक नरसिंग हे विमाधारक नव्हते आणि त्यांच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्ती विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र नाहीत. त्या अनुषंगाने विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ती अनुतोषास पात्र नाहीत. मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-