जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 19/2021. तक्रार दाखल दिनांक : 19/01/2021 तक्रार निर्णय दिनांक : 03/12/2021.
कालावधी : 00 वर्षे 10 महिने 15 दिवस
विरेश कुमुदचंद्र शेठ, वय 59 वर्षे, धंदा : व्यापार,
रा. भक्तामर बिल्डींग, काकुशेठ उक्का मार्ग, चंद्र नगर, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
विभागीय व्यवस्थापक, दी न्यू इंडिया ॲश्युरन्स कं.लि.,
लातूर विभागीय कार्यालय (161200), वसंत संकुल,
आश्विनी हॉस्पिटलसमोर, औसा रोड, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- तापडिया एस.व्ही.
न्यायनिर्णय
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्त्याने आपल्या घराचा विमा उतरविलेला होता आणि या विमा संरक्षण कालावधीमध्ये त्याच्या घराच्या संरक्षीत भिंतीला नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीबाबत त्याने विमा कंपनीला कळविले. विमा कंपनीने नुकसानीचा आढावा देखील घेतला. परंतु संरक्षीत भिंत विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट नाही, असे कारण दाखवून विमा कंपनीने विमा दावा फेटाळला आणि म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार सादर केली आहे. त्याचे म्हणणे असे की, संरक्षीत भिंतीला झालेले नुकसान व त्याच्या पुन:बांधणीसाठी त्याला एकूण रु.2,05,000/- खर्च येणार आहे. तो खर्च, व्याज इ. सह विमा कंपनीकडून मिळावा, यासाठीची ही तक्रार आहे.
(2) याबाबत विमा कंपनीचे निवेदन असे की, तक्रारकर्त्याने खोटी व चुकीची तक्रार सादर केली आहे. जो मुळ विमा उतरविण्यात आला होता तो तक्रारकर्त्याच्या घराच्या मुळ इमारतीबाबतचा होता. ज्यामध्ये संरक्षीत भिंत समाविष्ट नव्हती. त्यामुळे संरक्षीत भिंतीला जर काही नुकसान झाले असेल तर त्याबाबतची भरपाई देण्यास विमा कंपनी बांधील नाही. तसेच झालेल्या नुकसानीबद्दल तक्रारकर्त्याने वेगवेगळी निवेदने केली आहेत. योग्य कारण देऊन विमा कंपनीने विमा दावा नाकारला आहे. त्यांनी कुठलीही सेवेत त्रुटी केलेली नाही. चुकीचे व खोटी तक्रार दिली आहे. ती फेटाळण्यात यावी.
(3) उभय बाजुंचे निवेदन, पुरावे इ. विचारात घेता निकालासाठी खालील मुद्दे निश्चित करतो व त्यावरील माझा निर्णय पुढीलप्रमाणे देत आहे.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्त्याने हे सिध्द केले काय की, विरुध्द पक्षाने त्याला
चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली ? होकारार्थी
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रकरणाची एकंदरीत हकीकत, पुरावे व निवेदने विचारात घेता हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्त्याच्या लातूर येथील घराचा त्याने विमा उतरविलेला होता. त्या घराला संरक्षीत भिंत (compound wall) देखील आहे. असे दिसते की, या संरक्षीत भिंतीला मार्च 2020 मध्ये नुकसान झाले. त्या नुकसानीबद्दल विमा कंपनीला कळविण्यात आले. विमा कंपनीने आपला सर्व्हेअर नियुक्त करुन नुकसानीबाबत अंदाज देखील घेतला. परंतु विमा दावा फेटाळला.
(5) उभय पक्षकारांमधील वादाचा मुद्दा हा आहे की, या विमा करारामध्ये संरक्षीत भिंतीबाबत विमा संरक्षण उपलब्ध होते की नाही. याबाबत तक्रारकर्त्याचे निवेदन असे की, जेव्हा त्यांना या संरक्षीत भिंतीला नुकसान झाल्याचे कळविण्यात आले, तेव्हा विमा कंपनीने जो सर्व्हेअर नियुक्त केला, त्याने आपल्या अहवालात संरक्षीत भिंतीच्या नुकसानीबाबत सविस्तर अहवाल सादर केलेला आहे. त्याच्या अहवालावरुन हे स्पष्ट होते की, विम्यामध्ये संरक्षीत भिंतीचा समावेश करण्यात आलेला आहे. या अहवालाची प्रत सादर करण्यात आलेली आहे. त्यावरुन असे दिसते की, सर्व्हेअरने विमा संरक्षीत इमारत संरक्षीत भिंतीसह असल्याचे नमूद करुन नुकसानीचा आढावा घेतला आणि त्याप्रमाणे अहवाल सादर केला. याबाबत विमा कंपनीच्या वकिलांचे निवेदन असे की, केवळ सर्व्हेअरच्या अहवालावरुन संरक्षीत भिंत देखील विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट होती, हे ठरत नाही. मुळ पॉलिसीमध्ये जो उल्लेख आहे तो जास्त महत्वाचा आहे.
(6) याबाबत मुळ पॉलिसीचे अवलोकन केले असता विमा कंपनीच्या वकिलांनी या पॉलिसीमधील परिच्छेद क्र. 6 मधील तपशील दाखवून दिला. यात Block Details : Risk Code यामध्ये जो तपशील नमूद केलेला आहे की Discription of Property यात HALF RESIDENTIAL BUILDING, PASSAGE STAIRCASE, WATER TANKS, OPEN TERRESE, PLINTH FOUNDATION एवढाच उल्लेख आहे. परंतु हा विमा पॉलिसीचा दस्त अशा तुटक प्रकारे वाचणे योग्य ठरणार नाही. याच दस्तामध्ये याच कॉलम क्र.6 मध्ये 6 (a) मध्ये Block या हेडखाली असा स्पष्ट उल्लेख आहे की, Name of Block : Residential Flat Including Compound Wall, Electrical and Electronic Goods, FFF, Household Jewellary and Household cash etc. असा आहे. म्हणजेच या कॉलम 6 मध्ये (a) या सबहेड खाली Residential Flat Including Compound Wall असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. तसेच Asset Description मध्ये Superstructure : Rs.2500000, Plant, Machinery and accessories Rs.150000, Furniture, Fittings, Fixtures and other contents Rs.200000, Stocks and stocks in process : Rs. 150000 असे एकूण रु.3000000/- ला विमा हमी रकमेबद्दलचा उल्लेख आहे. Superstructure, Plinth & Foundation अशा हेडखाली संरक्षीत भिंत गणली जाऊ शकते. तसेच संरक्षीत भिंतीबद्दल स्पष्ट उल्लेख देखल 6(a) मध्ये आलेला आहे. असे असताना विमा कंपनीने या विमा पॉलिसीमध्ये संरक्षीत भिंतीच्या बाबत उल्लेख नसल्याचे कारण दाखवून विमा दावा नाकारला आहे. अशाप्रकारे तांत्रिक मुद्दा काढून अयोग्य व चुकीच्या प्रकारे विमा कंपनीने विमा दावा नाकारला. म्हणून विमा कंपनीने चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली, असे आयोगाचे मत आहे.
(7) या संरक्षीत भिंतीचे नेमके नुकसान किती झाले, याबद्दल तक्रारकर्त्याच्या म्हणणे असे की, त्याने झालेल्या भिंतीचे नुकसान पुन्हा बांधून काढण्यासाठी म्हणून एका इसमाशी करार केला. ज्याने त्यासाठी रु.2,10,000/- खर्च येईल, असे सांगितले. या ठिकाणी विमा कंपनीने हे दाखवून दिले की, तक्रारकर्त्याने ही रक्कम जास्तीची व चुकीची दाखवली आहे. हा जो ठराव सादर केला आहे, तो दि.28/6/2020 रोजीचा आहे. त्यामुळे विमा कंपनीचे निवेदन असे की, तो विचारपूर्वक नंतर तयार करण्यात आलेला आहे. काही इतर कागदपत्रे देखील रेकॉर्डवर आहेत. ज्यामध्ये नुकसानीचा आकडा नमूद करण्यात आलेला आहे. तक्रारकर्त्याने विमा कंपनीला जो प्रस्ताव सादर केला, त्या प्रस्तावात आपले झालेले नुकसान त्याबाबतचा आकडा नमूद केला आहे. त्या क्लेम फॉर्ममध्ये रु.1,50,000/- चे नुकसान दर्शविलेले आहे. त्याच प्रमाणे दुस-या एका दस्तामध्ये नुकसान रु.1,65,000/- चे दर्शविलेले आहे. साईट सर्व्हे रिपोर्ट दि.18/3/2020 यात या नुकसानीचा आकडा रु.1,65,000/- दाखविलेला आहे. म्हणून हे पटते की, तक्रारकर्त्याने रु.2,10,000/- हे जास्तीचे नुकसान दाखविलेले आहे. वस्तुत: सुरुवातीला आपल्या क्लेम फॉर्ममध्ये त्याने केवळ रु.1,50,000/- नुकसान दर्शविलेले होते. जर त्याच्या करारात रु.2,10,000/- चा उल्लेख आला असेल तर त्याने मागणी करताना नुकसानीची रक्कम रु.2,05,000/- दर्शविलेली आहे. अशा सर्व बाबी विचारात घेता यापैकी कमीतकमी म्हणजे रु.1,50,000/- नुकसान भरपाई अदा करणे योग्य राहील, असे आमचे मत आहे. त्याप्रमाणे मुद्दा निर्णीत करुन खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर.
ग्राहक तक्रार क्र. 19/2021.
(2) तक्रारकर्त्याच्या इमारतीच्या संरक्षीत भिंतीच्या नुकसानीच्या विम्यापोटी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रु.1,50,000/- या आदेशापासून 30 दिवसाच्या आत अदा करावेत.
(3) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व या कार्यवाहीच्या खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्या प्रती विनामुल्य त्वरीत देण्यात याव्यात.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/261121)